व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ९४

शिष्यांना पवित्र आत्मा मिळतो

शिष्यांना पवित्र आत्मा मिळतो

येशू स्वर्गात जाऊन दहा दिवस झाल्यानंतर, शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला. इसवी सन ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी सण साजरा करण्यासाठी लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले होते. ते वेगवेगळ्या ठिकाणांहून आले होते. माडीवरच्या खोलीत येशूचे जवळजवळ १२० शिष्य एकत्र जमले होते. तेव्हा अचानक अशी एक गोष्ट घडली, ज्यामुळे सगळ्यांना आश्‍चर्य वाटलं. प्रत्येक शिष्याच्या डोक्यावर आगीसारखं काहीतरी दिसत होतं. त्यानंतर ते सर्व वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागले. मग, जोराचा वारा वाहण्याचा आवाज संपूर्ण घरात ऐकू येऊ लागला.

वेगवेगळ्या देशांतून यरुशलेमला आलेल्या लोकांनी तो आवाज ऐकला. त्यामुळे तिथे काय होत आहे हे पाहण्यासाठी, ते धावत त्या घराकडे गेले. शिष्य वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत आहेत, हे पाहून त्यांना खूपच आश्‍चर्य वाटलं. ते म्हणू लागले: ‘हे लोक तर गालीलचे आहेत ना? मग हे आपल्या भाषेत कसे बोलत आहेत?’

मग पेत्र आणि इतर प्रेषित, जमलेल्या लोकांसमोर उभे राहिले. येशूला कसं मारण्यात आलं आणि यहोवाने त्याला कसं जिवंत केलं याबद्दल पेत्र लोकांना सांगू लागला. त्याने लोकांना म्हटलं: ‘आता येशू स्वर्गात देवाच्या उजवीकडे आहे. वचन दिल्याप्रमाणे त्याने आम्हाला पवित्र आत्मा दिला आहे. म्हणूनच तुम्ही हे चमत्कार पाहिले आहेत आणि त्यांबद्दल ऐकलं आहे.’

पेत्र जे बोलला त्याचा लोकांवर खूप जबरदस्त प्रभाव पडला. म्हणून त्यांनी विचारलं: ‘आता आम्ही काय केलं पाहिजे?’ पेत्रने त्यांना म्हटलं: ‘आपल्या पापांसाठी पश्‍चात्ताप करा आणि येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. मग तुम्हालाही पवित्र आत्मा दिला जाईल.’ त्या दिवशी जवळजवळ ३,००० लोकांनी बाप्तिस्मा घेतला. तेव्हापासून यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या भराभर वाढू लागली. प्रेषितांनी पवित्र आत्म्याच्या मदतीने आणखी मंडळ्या तयार केल्या. कारण त्यांना येशूने आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी नवीन शिष्यांना शिकवायच्या होत्या.

“ख्रिस्त हाच प्रभू आहे, असे तुम्ही आपल्या तोंडाने सर्वांसमोर कबूल केले आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा अंतःकरणात विश्‍वास बाळगला, तर तुमचे तारण होईल.”—रोमकर १०:९