व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ९५

कोणतीच गोष्ट त्यांना थांबवू शकत नव्हती

कोणतीच गोष्ट त्यांना थांबवू शकत नव्हती

एक माणूस मंदिराच्या फाटकाजवळ बसून रोज भीक मागायचा. त्याला चालता येत नव्हतं. एका दुपारी त्याने पेत्र आणि योहानला मंदिरात जाताना पाहिलं. त्याने म्हटलं: ‘दया करा, मला काहीतरी द्या.’ पेत्र म्हणाला: ‘तुला देण्यासाठी पैशांपेक्षा आणखी चांगलं असं काहीतरी माझ्याकडे आहे. येशूच्या नावाने मी तुला सांगतो, ऊठ आणि चाल!’ मग पेत्रने हात धरून त्याला उठायला मदत केली आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तो चालू लागला! आजूबाजूला लोकांची गर्दी होती. त्यांनी हा चमत्कार पाहिला आणि त्यांना खूप आनंद झाला. त्यामुळे आणखी जास्त लोक विश्‍वास ठेवणारे बनले.

पण याजक आणि सदूकी यांना खूप राग आला. त्यांनी प्रेषितांना पकडून न्यायसभेत आणलं. हे यहुद्यांचं न्यायालय होतं. यात धर्मगुरू न्याय करायचे. त्यांनी प्रेषितांना विचारलं: ‘या माणसाला बरं करण्याची शक्‍ती तुम्हाला कोणी दिली?’ पेत्रने उत्तर दिलं: ‘ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही मारून टाकलं, त्यानेच आम्हाला शक्‍ती दिली.’ यावर धर्मगुरू त्यांच्यावर ओरडले. ते म्हणाले: ‘येशूबद्दल बोलायचं बंद करा!’ पण प्रेषितांनी म्हटलं: ‘आम्हाला त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे. आम्ही ते थांबवणार नाही.’

तिथून सुटका झाल्यावर पेत्र आणि योहान इतर शिष्यांना जाऊन भेटले. जे काही घडलं, ते सर्वकाही त्यांनी शिष्यांना सांगितलं. मग त्यांनी एकत्र मिळून यहोवाला प्रार्थना केली. ते म्हणाले: ‘यहोवा, तुझं काम करत राहण्यासाठी आम्हाला धैर्य दे.’ यहोवाने त्यांना पवित्र आत्मा दिला. यामुळे ते प्रचाराचं आणि लोकांना बरं करण्याचं काम करत राहिले. अनेक लोक ख्रिस्ती बनले. हे पाहून सदूकी लोक प्रेषितांवर जळू लागले. इतके, की त्यांनी प्रेषितांना जेलमध्ये टाकून दिलं. पण रात्री यहोवाने एका देवदूताला पाठवलं आणि त्याने जेलचा दरवाजा उघडला. तो प्रेषितांना म्हणाला: ‘मंदिरात जा आणि लोकांना शिकवा.’

दुसऱ्‍या दिवशी सकाळी अधिकाऱ्‍यांनी येऊन न्यायसभेतल्या धर्मगुरूंना सांगितलं: ‘जेलचा दरवाजा बंद आहे. पण ज्या माणसांना तुम्ही पकडून आणलं होतं, ते तिथे नाहीत.’ मग आणखीन एकाने म्हटलं: ‘ती माणसं तर मंदिरात लोकांना शिकवत आहेत!’ त्यानंतर पुन्हा प्रेषितांना अटक करण्यात आली आणि न्यायसभेत आणण्यात आलं. तेव्हा महायाजकाने म्हटलं: ‘येशूबद्दल बोलू नका, अशी आज्ञा आम्ही तुम्हाला दिली होती ना?’ पेत्रने उत्तर दिलं: “आम्ही माणसांपेक्षा देवाला आपला शासक मानून त्याची आज्ञा पाळली पाहिजे.”

धर्मगुरूंना इतका राग आला, की त्यांना प्रेषितांना मारून टाकायचं होतं. पण गमलियेल नावाच्या एका परूश्‍याने उभं राहून सगळ्यांना म्हटलं: ‘काहीही करण्याआधी जरा विचार करा! कदाचित देव या माणसांसोबत असेल. तुम्हाला देवाशी लढायचं आहे का?’ गमलियेल जे बोलला ते त्यांना पटलं. म्हणून त्यांनी प्रेषितांना फटके मारले, प्रचार करू नये असं बजावून सांगितलं आणि त्यांना सोडून दिलं. पण प्रेषितांनी आपलं काम थांबवलं नाही. ते मंदिरात आणि घरोघरी जाऊन धैर्याने आनंदाचा संदेश सांगत राहिले.

“आम्ही माणसांपेक्षा देवाला आपला शासक मानून त्याची आज्ञा पाळली पाहिजे.”—प्रेषितांची कार्ये ५:२९