व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ९६

येशू शौलला निवडतो

येशू शौलला निवडतो

शौल एक रोमी नागरिक होता आणि त्याचा जन्म तार्स इथे झाला होता. तो एक परूशी होता आणि त्याला यहुदी नियमांबद्दल भरपूर ज्ञान होतं. तो ख्रिस्ती लोकांचा राग करायचा. तो पुरुषांना आणि स्त्रियांना घराबाहेर खेचून काढायचा आणि जेलमध्ये टाकायचा. इतकंच काय, तर जेव्हा विरोध करणाऱ्‍या लोकांनी स्तेफनला दगडमार करून मारलं, त्या वेळीसुद्धा तो तिथे उभं राहून सर्वकाही पाहत होता.

यरुशलेममधल्या ख्रिस्ती लोकांना अटक करून त्याचं समाधान झालं नाही. म्हणून त्याने दिमिष्क शहराला जाण्यासाठी महायाजकाकडे परवानगी मागितली. कारण त्याला तिथल्या ख्रिस्ती लोकांनासुद्धा शोधून काढायचं होतं. मग शौल जसं शहराजवळ पोचला तसं अचानक त्याच्या आजूबाजूला लख्ख प्रकाश चमकला आणि तो जमिनीवर पडला. मग त्याने कोणाचातरी आवाज ऐकला. तो आवाज त्याला असं म्हणाला: ‘शौल, तू मला का छळत आहेस?’ शौलने विचारलं: ‘तू कोण आहेस?’ त्यावर उत्तर आलं: ‘मी येशू आहे. ऊठ आणि दिमिष्कला जा. पुढे काय करायचं आहे, हे तुला तिथे गेल्यावर समजेल.’ त्या वेळी शौल आंधळा झाला. त्यामुळे दुसऱ्‍याची मदत घेऊन तो दिमिष्क शहरापर्यंत पोचला.

दिमिष्कमध्ये हनन्या नावाचा एक विश्‍वासू ख्रिस्ती राहत होता. येशूने त्याला दृष्टान्तात सांगितलं: ‘सरळ असं नाव असलेल्या रस्त्यावर यहुदाच्या घरी जा आणि तिथे शौल नावाच्या व्यक्‍तीला भेट.’ हनन्या म्हणाला: ‘प्रभू मला त्याच्याबद्दल सर्वकाही माहीत आहे. तो तर तुझ्या शिष्यांचा छळ करतो आणि त्यांना पकडून जेलमध्ये टाकतो!’ पण येशूने म्हटलं: ‘इतर अनेक देशांच्या लोकांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी मी शौलला निवडलं आहे. तू त्याला जाऊन भेट.’

मग हनन्या शौलला जाऊन भेटला आणि त्याला म्हणाला: ‘शौल माझ्या भावा, तुला परत दिसावं यासाठी येशूने मला तुझ्याकडे पाठवलं आहे.’ त्याच क्षणी शौलला दिसू लागलं. मग तो येशूबद्दल शिकला आणि त्याचा शिष्य बनला. त्याने बाप्तिस्मा घेतला. त्यानंतर ख्रिस्ती या नात्याने तो इतर बांधवांसोबत सभास्थानात प्रचार करू लागला. त्याला पाहून यहुदी लोकांनी म्हटलं: ‘येशूच्या शिष्यांचा जो छळ करायचा तो हाच आहे ना?’ शौलला येशूबद्दल शिकवताना पाहून त्यांना खरंच किती मोठा धक्का बसला असेल!

मग तीन वर्षांपर्यंत शौलने दिमिष्कमधल्या लोकांना प्रचार केला. यहुदी लोकांना त्याचा राग यायचा आणि त्यांनी त्याला मारून टाकण्याचा कट रचला. पण बांधवांना त्याबद्दल कळलं आणि तिथून पळून जाण्यासाठी त्यांनी शौलची मदत केली. त्यांनी त्याला एका मोठ्या टोपलीत लपवून शहराच्या भिंतीच्या एका खिडकीतून खाली उतरवलं.

शौल जेव्हा यरुशलेमला गेला, तेव्हा त्याला तिथल्या बांधवांसोबत काम करायचं होतं. पण बांधवांना त्याची भीती वाटत होती. मग बर्णबा नावाच्या एका प्रेमळ बांधवाने शौलला प्रेषितांकडे नेलं. त्याने त्यांना समजावलं, की शौल आता खरंच बदलला आहे. त्यानंतर यरुशलेमच्या बांधवांसोबत, शौल अगदी आवेशाने आनंदाच्या संदेशाचा प्रचार करू लागला. पुढे तो पौल या नावाने ओळखला जाऊ लागला.

“ख्रिस्त येशू पापी लोकांना वाचवण्यासाठी जगात आला. त्यांच्यापैकी मी सर्वात मोठा पापी आहे.” —१ तीमथ्य १:१५