व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ९८

ख्रिस्ती धर्म अनेक देशांत पसरतो

ख्रिस्ती धर्म अनेक देशांत पसरतो

येशूच्या आज्ञेनुसार, त्याच्या प्रेषितांनी संपूर्ण पृथ्वीवर आनंदाच्या संदेशाचा प्रचार केला. इसवी सन ४७ मध्ये, अंत्युखिया इथल्या बांधवांनी पौल आणि बर्णबाला प्रचाराच्या दौऱ्‍यावर पाठवलं. या दोन आवेशी प्रचारकांनी संपूर्ण आशिया मायनरमध्ये प्रवास केला. ते दर्बे, लुस्त्र आणि इकुन्या यांसारख्या ठिकाणी गेले.

पौल आणि बर्णबा यांनी सर्वांना प्रचार केला. गरीब किंवा श्रीमंत, तरुण किंवा वृद्ध अशा सर्वांना त्यांनी आनंदाचा संदेश सांगितला. बऱ्‍याच लोकांनी ख्रिस्ताबद्दलचं सत्य स्वीकारलं. जेव्हा पौल आणि बर्णबा यांनी कुप्रचा राज्यपाल सिर्ग्य पौल याला प्रचार केला, तेव्हा एका जादूगाराने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मग पौलने त्या जादूगाराला म्हटलं: ‘यहोवा तुला शिक्षा करेल.’ आणि त्याच क्षणी तो जादूगार आंधळा झाला. हा चमत्कार पाहून सिर्ग्य पौल ख्रिस्ती बनला.

पौल आणि बर्णबाने सगळीकडे प्रचार केला. त्यांनी घरोघरी, बाजारांत, रस्त्यांवर आणि सभास्थानांतही प्रचार केला. एकदा लुस्त्रमध्ये असताना त्यांनी अशा एका माणसाला बरं केलं, ज्याला चालता येत नव्हतं. हा चमत्कार ज्यांनी कोणी पाहिला त्यांना वाटलं, की पौल आणि बर्णबा देव आहेत. आणि म्हणून त्यांनी त्यांची उपासना करण्याचा प्रयत्न केला. पण पौल आणि बर्णबाने त्यांना थांबवलं आणि म्हटलं: ‘फक्‍त देवाचीच उपासना करा! आम्ही तर माणसं आहोत.’ हे सर्व घडत असताना तिथे काही यहुदी आले. त्यांनी सर्वांना पौलविरुद्ध भडकवलं. त्यामुळे त्या लोकांनी पौलला दगडमार केला, त्याला शहराबाहेर ओढत नेलं आणि तो मरून गेला आहे असं समजून त्याला तिथेच सोडून दिलं. पण पौल जिवंत होता! त्यानंतर लगेच तिथे काही बांधव आले आणि पौलला शहरात परत घेऊन गेले. मग, पौल अंत्युखियाला परत गेला.

इसवी सन ४९ मध्ये, पौल आणखी एका दौऱ्‍यावर गेला. आशिया मायनरमधल्या बांधवांना भेटून झाल्यावर तो दूर युरोपला गेला. त्याने अथेन्स, इफिस, फिलिप्पै, थेस्सलनीका आणि इतर शहरांतही आनंदाचा संदेश सांगितला. या दौऱ्‍यात त्याच्यासोबत सीला, लूक आणि तरुण तीमथ्यही होता. नवीन मंडळ्या बनवण्यासाठी आणि तिथल्या लोकांचा विश्‍वास मजबूत करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. पौल करिंथमध्ये दीड वर्ष राहिला. त्याने तिथल्या बांधवांचा विश्‍वास मजबूत केला. तिथे त्याने प्रचार केला, शिकवलं आणि अनेक मंडळ्यांना पत्रं लिहिली. त्यासोबतच त्याने तंबू बनवण्याचं कामही केलं. काही काळाने पौल अंत्युखियाला परत गेला.

नंतर, इसवी सन ५२ मध्ये पौल तिसऱ्‍या दौऱ्‍यावर गेला. या वेळी त्याने आशिया मायनरपासून आपल्या दौऱ्‍याची सुरुवात केली. त्याने खूप दूरपर्यंत प्रवास केला. उत्तरेकडे असलेल्या फिलिप्पैपासून ते खाली करिंथपर्यंत! पौल इफिसमध्ये बरीच वर्षं राहिला. तिथे त्याने लोकांना शिकवलं, आजाऱ्‍यांना बरं केलं आणि मंडळीतल्या लोकांना मदत केली. तो दररोज शाळेच्या सभागृहात लोकांसमोर भाषणं द्यायचा. अनेकांनी ती ऐकली आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदल केले. मग बऱ्‍याच देशांमध्ये आनंदाचा संदेश सांगितल्यावर, पौल यरुशलेमला गेला.

“जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा.”—मत्तय २८:१९