व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ९९

जेलचा अधिकारी ख्रिस्ती बनतो

जेलचा अधिकारी ख्रिस्ती बनतो

फिलिप्पैमध्ये दुरात्म्याचा प्रभाव असलेली एक दासी होती. या दुरात्म्यामुळे ती मुलगी भविष्य सांगायची. यातून त्या दासीचे मालक खूप पैसे कमवायचे. जेव्हा पौल आणि सीला फिलिप्पैमध्ये होते, तेव्हा बऱ्‍याच दिवसांपर्यंत तिने त्यांचा पाठलाग केला. पाठलाग करताना तिच्यातला दुरात्मा तिला जोराने असं म्हणायला लावायचा: “ही माणसं सर्वोच्च देवाचे सेवक आहेत.” शेवटी पौलने त्या दुरात्म्याला म्हटलं: ‘येशूच्या नावाने मी तुला सांगतो, तिच्यातून निघून जा!’ मग तो दुरात्मा त्या मुलीतून निघून गेला.

जेव्हा त्या मुलीच्या मालकांना समजलं की आता आपण हिचा वापर करून पैसे कमवू शकत नाही, तेव्हा त्यांना खूप राग आला. त्यांनी पौल आणि सीला यांना फरफटत नगर-अधिकाऱ्‍यांपुढे आणलं. ते त्या अधिकाऱ्‍यांना म्हणाले: ‘ही माणसं नियम मोडत आहेत आणि संपूर्ण शहरात गोंधळ माजवत आहेत.’ हे ऐकल्यानंतर नगर-अधिकाऱ्‍यांनी पौल आणि सीला यांना फटके मारून जेलमध्ये टाकून देण्याचा आदेश दिला. मग, जेलच्या अधिकाऱ्‍याने त्यांना अगदी आतल्या खोलीत टाकलं. तिथे खूप अंधार होता. त्याने त्यांचे पाय फळ्यांमध्ये अडकवले.

जेलमध्ये पौल आणि सीला यांनी यहोवाच्या स्तुतीसाठी गीतं गायिली. ते गात असताना इतर कैद्यांनाही ती ऐकू जात होती. तेव्हा अचानक मध्यरात्री मोठा भूकंप झाला. तो भूकंप इतका जबरदस्त होता, की पूर्ण जेल हादरून गेलं. जेलचे दरवाजे सताड उघडले गेले. कैद्यांचे साखळ्यांनी बांधलेले हात आणि फळ्यांमध्ये अडकवलेले पाय मोकळे झाले. तेव्हा जेलचा अधिकारी धावत जेलच्या आतल्या बाजूला गेला. त्याने पाहिलं की दरवाजे उघडे आहेत. सगळे कैदी पळून गेले असतील असं त्याला वाटलं. आणि त्यामुळे स्वतःचा जीव घेण्यासाठी त्याने आपली तलवार काढली.

पण तेवढ्यात पौलने मोठ्याने हाक मारून त्याला म्हटलं: ‘थांब, आपला जीव घेऊ नकोस. आम्ही सर्व इथेच आहोत!’ तेव्हा तो अधिकारी पौल आणि सीला यांच्या पाया पडला. आणि त्याने त्यांना विचारलं: ‘माझं तारण होण्यासाठी मी काय करू?’ यावर त्यांनी उत्तर दिलं: ‘यासाठी तुला आणि तुझ्या कुटुंबातल्या सदस्यांना येशूवर विश्‍वास ठेवण्याची गरज आहे.’ मग पौल आणि सीला यांनी यहोवाच्या वचनांतून त्यांना शिकवलं. तेव्हा, जेलच्या अधिकाऱ्‍याने आणि त्याच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी बाप्तिस्मा घेतला.

“लोक तुम्हाला धरून तुमचा छळ करतील आणि तुम्हाला सभास्थानांच्या स्वाधीन करतील व तुरुंगांत डांबतील. माझ्या नावामुळे तुम्हाला राजांच्या व राज्यपालांच्या समोर आणलं जाईल. यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल.” —लूक २१:१२, १३