व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १०१

पौलला रोमला पाठवण्यात येतं

पौलला रोमला पाठवण्यात येतं

पौलचा तिसरा प्रचाराचा दौरा यरुशलेममध्ये येऊन संपला. तिथे त्याला कैदी बनवून जेलमध्ये टाकण्यात आलं. पण, रात्री एका दृष्टान्तात येशूने त्याला म्हटलं: ‘तू रोममध्ये जाशील आणि तिथे प्रचार करशील.’ पौलला यरुशलेममधून कैसरीया या ठिकाणी नेण्यात आलं. तिथे त्याला दोन वर्षं जेलमध्ये ठेवण्यात आलं. जेव्हा राज्यपाल फेस्त याच्यापुढे त्याची चौकशी करण्यात आली, तेव्हा पौल म्हणाला: ‘मला रोममध्ये कैसराकडून न्याय हवा आहे.’ यावर फेस्तने म्हटलं: “तू कैसराकडे न्याय मागितला आहेस, तर तू कैसराकडे जाशील.” मग, एका जहाजातून पौलला रोमला पाठवण्यात आलं. त्याच्यासोबत, लूक आणि अरिस्तार्ख हे दोन ख्रिस्ती बांधवही गेले.

ते समुद्रातून जात असताना, एक मोठं वादळ आलं. ते वादळ अनेक दिवस सुरू होतं. आता आपण मरून जाणार, असं जहाजात असलेल्या सर्वांना वाटलं. पण, पौलने त्यांना म्हटलं: ‘लोकांनो, एका देवदूताने मला स्वप्नात सांगितलं: “पौल, भिऊ नकोस. कारण तू कैसरापुढे अवश्‍य उभा राहशील, आणि पाहा! देव तुझ्यासोबत प्रवास करणाऱ्‍या सर्वांचा जीव वाचवेल.” त्यामुळे हिंमत धरा! आपण मरणार नाही.’

वादळ १४ दिवसांपर्यंत सुरू राहिलं. मग, त्यांना जमीन दिसू लागली. ते मिलिता नावाचं बेट होतं. मग जहाज वाळूच्या बांधावर जोरात आदळलं आणि त्याचे तुकडे-तुकडे झाले. पण जहाजात प्रवास करणारे २७६ लोक सुरक्षित किनाऱ्‍यापर्यंत पोचले. काही जण पोहून, तर इतर जण जहाजाच्या तुकड्यांचा आधार घेऊन किनाऱ्‍यापर्यंत पोचले. मिलिता इथल्या लोकांनी त्यांची काळजी घेतली. त्यांना थंडी वाजू नये, म्हणून मिलिताच्या लोकांनी शेकोटी पेटवली.

मग तीन महिन्यांनंतर सैनिकांनी पौलला एका दुसऱ्‍या जहाजातून रोमला नेलं. जेव्हा पौल रोममध्ये पोचला तेव्हा बांधव त्याला भेटायला आले. त्यांना पाहून पौलला धीर मिळाला आणि त्याने यहोवाचे आभार मानले. पौल एक कैदी असला, तरीही त्याला भाड्याच्या घरात राहण्याची परवानगी मिळाली. पण त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक सैनिक त्याच्यासोबत असायचा. पौल त्या ठिकाणी दोन वर्षं राहिला. जेव्हा लोक त्याला भेटण्यासाठी यायचे, तेव्हा तो त्यांना देवाच्या राज्याबद्दल आणि येशूबद्दल सांगायचा. तसंच, आशिया मायनर आणि यहूदीया इथल्या मंडळ्यांना पौलने पत्रंही लिहिली. या सर्वांवरून दिसून येतं, की इतर राष्ट्रांच्या लोकांपर्यंत आनंदाचा संदेश पोचवण्यासाठी यहोवाने पौलचा वापर केला.

“सर्व प्रकारे आम्ही देवाचे सेवक म्हणून स्वतःची शिफारस करतो; धीराने अनेक दुःखे सोसून, संकटे, अडचणी, व कठीण प्रसंगांचा सामना करून.” —२ करिंथकर ६:४