व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नियमन मंडळाकडून पत्र

नियमन मंडळाकडून पत्र

प्रिय बांधवांनो:

यहोवाचे उपासक या नात्याने आपल्याला त्याचं वचन, म्हणजे बायबल खूप प्रिय आहे. आपल्याला खात्री आहे की त्यात दिलेला इतिहास अगदी अचूक आहे. तसंच, जीवनासाठी भरवशालायक मार्गदर्शनही त्यात दिलं आहे. इतकंच नाही, तर यहोवाचं सर्व मानवजातीवर प्रेम आहे याचा पुरावासुद्धा त्यातून आपल्याला मिळतो. (स्तोत्र ११९:१०५; लूक १:३; १ योहान ४:१९) देवाच्या वचनात दिलेली मौल्यवान सत्यं शिकून घेण्यासाठी, इतरांना मदत करण्याची आपली मनापासून इच्छा आहे. आणि याच कारणामुळे “बायबलमधून शिकू या!” हे पुस्तक सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आम्हाला खूप आनंद होत आहे. या पुस्तकाबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगण्याची आमची इच्छा आहे.

“बायबलमधून शिकू या!” या पुस्तकाचा बहुतेक भाग मुलांना लक्षात ठेवून तयार करण्यात आला आहे. असं असलं तरी, बायबलबद्दल आणखीन शिकून घेण्याची इच्छा असलेल्या मोठ्यांना मदत करण्यासाठीही या पुस्तकाचा वापर करता येईल. खरंतर बायबल हे सर्वांसाठी असलेलं पुस्तक आहे. त्यामुळे बायबलमधून शिकलेल्या धड्यांवर विचार केल्याने, जीवनात खरा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते.

या पुस्तकात बायबलमधल्या अहवालांचा वापर करून, मानवांच्या निर्मितीपासूनची माहिती गोष्टींच्या रूपात देण्यात आली आहे. बायबलमधले अहवाल स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने सांगण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले आहेत. तसंच घटना ज्या क्रमाने घडल्या, त्या क्रमाने त्या मांडण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.

या पुस्तकात बायबलमधले अहवाल दिले आहेत. पण, त्यासोबतच अहवाल जिवंत वाटावेत म्हणून सुंदर चित्रंही आहेत. यामुळे या पुस्तकात ज्यांच्याबद्दल सांगण्यात आलं आहे, त्यांच्या भावनाही समजायला आपल्याला मदत होते.

बायबल मानवांबद्दल माहिती देणारं पुस्तक आहे हे समजण्यासाठी या पुस्तकामुळे आपल्याला मदत होते. यहोवाचं ज्यांनी ऐकलं आणि ज्यांनी ऐकलं नाही अशा लोकांबद्दल त्यातून आपल्याला समजतं. त्यांच्या उदाहरणांतून धडे शिकण्याची प्रेरणा आपल्याला या पुस्तकातून मिळते. (रोमकर १५:४; १ करिंथकर १०:६) या पुस्तकाचे १४ भाग आहेत. प्रत्येक भागात आपण काय शिकणार आहोत, याचा सारांश भागाच्या सुरुवातीला देण्यात आला आहे.

तुम्हाला जर मुलं असतील तर, तुम्ही तुमच्या मुलासोबत किंवा मुलीसोबत एक धडा वाचू शकता आणि त्यातल्या चित्रांवरही चर्चा करू शकता. त्यानंतर धडा ज्या वचनांवर आधारित आहे, ती वचनं तुम्ही बायबलमधून वाचू शकता. मग ती पुस्तकातल्या धड्याशी कशी संबंधित आहेत, हे तुमच्या मुलाला किंवा मुलीला समजण्यासाठी मदत करा. बायबलमधला संदेश थोडक्यात समजून घेण्याची इच्छा असलेल्या मोठ्यांसोबतही अशीच पद्धत वापरता येईल.

आम्हाला आशा आहे की या पुस्तकामुळे नम्र अंतःकरणाच्या सर्व मुलांना आणि मोठ्यांना देवाच्या वचनाबद्दल शिकण्यासाठी व शिकलेले धडे जीवनात लागू करण्यासाठी मदत मिळेल. यामुळे तेही देवाच्या प्रेमळ कुटुंबाचा भाग बनून त्याची उपासना करू शकतील.

तुमचे बांधव,

यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ