व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय २

देवाने त्यांची अर्पणं स्वीकारली

देवाने त्यांची अर्पणं स्वीकारली

इब्री लोकांना ११:४

अध्याय कशाबद्दल आहे: यहोवाने शुद्ध उपासनेसाठी सुरुवातीपासून काय व्यवस्था केली

१-३. (क) आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत? (ख) शुद्ध उपासनेसाठी कोणत्या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत? (सुरुवातीचं चित्र पाहा.)

 हाबेल आपल्या कळपातल्या मेंढरांकडे खूप लक्ष देऊन पाहत आहे. त्याने त्यांना खूप प्रेमाने लहानाचं मोठं केलं होतं. आता त्यांच्यापैकी काही तो निवडतो आणि यहोवासाठी बलिदान म्हणून अर्पण करतो. असं करून तो यहोवाची उपासना करतो. पण या अपरिपूर्ण मानवाची उपासना यहोवा स्वीकारेल का?

हाबेलबद्दल प्रेषित पौलने लिहिलं, की ‘देवाने त्याचं अर्पण स्वीकारलं,’ पण काइनचं अर्पण मात्र नाकारलं. (इब्री लोकांना ११:४ वाचा.) पण देवाने असं का केलं? इब्री लोकांना पत्र या पुस्तकाच्या ११ व्या अध्यायात काइन, हाबेल आणि इतर लोकांची जी उदाहरणं दिली आहेत, त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरं मिळाल्यामुळे शुद्ध उपासनेबद्दलची आपली समज आणखी वाढेल.

आता आपण हाबेलपासून यहेज्केलच्या दिवसांपर्यंतच्या काही घटना थोडक्यात पाहणार आहोत. तसंच, यहोवाने आपली उपासना स्वीकारावी म्हणून कोणत्या चार गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत तेही आपण पाहू. त्या चार गोष्टी म्हणजे: आपण यहोवाचीच उपासना केली पाहिजे, त्याला सगळ्यात चांगलं ते दिलं पाहिजे, उपासनेची पद्धत त्याला मान्य असली पाहिजे आणि आपला हेतू चांगला असला पाहिजे.

देवाने काइनची उपासना का नाकारली?

४, ५. आपण यहोवालाच अर्पण दिलं पाहिजे याची जाणीव काइनला कशी झाली असेल?

उत्पत्ती ४:२-५ वाचा. आपण आपलं अर्पण यहोवालाच दिलं पाहिजे हे काइनला माहीत होतं. असं का म्हणता येईल? कारण यहोवाबद्दल शिकण्यासाठी त्याच्याकडे बराच वेळ आणि संधी होती. त्याने आणि त्याच्या भावाने यहोवाला अर्पणं दिली तेव्हा ते दोघं शंभरएक वर्षांचे असावेत. a आणि एदेन बागेत काय घडलं होतं हे त्या दोघांना लहानपणापासूनच माहीत होतं. ती सुंदर हिरवीगार बाग त्यांनी दुरून पाहिलीही असेल. तसंच, एदेन बागेत कोणी जाऊ नये म्हणून तिथे उभे असलेले करूबसुद्धा त्यांनी पाहिले असतील. (उत्प. ३:२४) याशिवाय, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना नक्कीच सांगितलं असेल, की सगळं काही बनवणारा यहोवाच आहे आणि माणसांना खूप सुंदर जीवन द्यायचा त्याचा उद्देश होता. सध्या जरी ते तसं जीवन जगत नसले, तरी माणसांनी दुःख भोगत, म्हातारे होऊन मरून जावं असं देवाला मुळीच वाटत नव्हतं. (उत्प. १:२४-२८) काइनला या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे आपण आपलं अर्पण यहोवालाच दिलं पाहिजे याची जाणीव त्याला झाली असेल.

काइनने यहोवाला आपलं अर्पण का दिलं याचं आणखी एक कारण असू शकतं. यहोवाने आधीच सांगितलं होतं, की पुढे एक ‘संतती’ येईल, आणि ही संतती हव्वाला भुरळ घालणाऱ्‍या ‘सापाचं’ डोकं ठेचेल. (उत्प. ३:४-६, १४, १५) आदाम-हव्वाचा पहिला मुलगा असल्यामुळे काइनला कदाचित वाटलं असेल, की ही ‘संतती’ आपणच आहोत. (उत्प. ४:१) शिवाय, मानवांनी पाप केल्यानंतरही यहोवाने त्यांच्याशी बोलायचं पूर्णपणे बंद केलं नव्हतं; जसं की, आदामने पाप केल्यानंतर यहोवा बहुतेक एका स्वर्गदूताद्वारे त्याच्याशी बोलला. (उत्प. ३:८-१०) तसंच, काइनने आपलं बलिदान अर्पण केल्यानंतर यहोवा त्याच्याशी बोलला. (उत्प. ४:६) त्यामुळे आपण म्हणू शकतो, की आपण यहोवाचीच उपासना केली पाहिजे हे काइनला चांगलं माहीत होतं.

६, ७. काइनने दिलेलं अर्पण चांगलं नव्हतं का, किंवा त्याची पद्धत चुकीची होती का? समजावून सांगा.

तर मग यहोवाने काइनचं अर्पण का स्वीकारलं नाही? त्याने जे काही दिलं होतं ते चांगलं नव्हतं का? याबद्दल बायबल काही सांगत नाही. ते इतकंच सांगतं की “काइनने आपल्या शेतात उगवणाऱ्‍या काही गोष्टी यहोवाला अर्पण करण्यासाठी आणल्या.” यहोवाने पुढे मोशेला जे नियमशास्त्र दिलं त्यात त्याने सांगितलं होतं, की त्याला या प्रकारचं बलिदान मान्य आहे. (गण. १५:८, ९) शिवाय त्या काळाची परिस्थितीही विचारात घ्या. तेव्हा लोक फळं आणि भाजीपालाच खायचे. (उत्प. १:२९) इतकंच नाही, तर एदेन बागेबाहेरची जमीन शापित असल्यामुळे काइनला शेती करण्यासाठी भरपूर मेहनतही घ्यावी लागली असेल. (उत्प. ३:१७-१९) याचाच अर्थ, पोट भरण्यासाठी काइनने कष्ट करून जे काही उगवलं होतं ते यहोवाला अर्पण केलं. पण असं असूनही यहोवाने त्याचं अर्पण स्वीकारलं नाही.

मग काइनने ज्या पद्धतीने अर्पण दिलं असेल ती बरोबर नव्हती का? तसं नसेल. कारण यहोवाने जेव्हा काइनचं अर्पण नाकारलं तेव्हा त्याची पद्धत चुकीची होती असं काहीच तो बोलला नाही. खरंतर काइन आणि हाबेल यांनी कशा प्रकारे अर्पण दिलं याबद्दल बायबलमध्ये काहीच सांगितलेलं नाही. मग नेमकी समस्या काय होती? यहोवाने त्याचं अर्पण का स्वीकारलं नाही?

काइनचा हेतू चांगला नव्हता (परिच्छेद ८, ९ पाहा)

८, ९. (क) काइनला आणि त्याच्या अर्पणाला यहोवाने का नाकारलं? (ख) काइन आणि हाबेलबद्दल बायबलमध्ये जे काही सांगितलं आहे त्यात कोणती गोष्टी तुम्हाला विशेष वाटते?

पौलने इब्री लोकांना जे लिहिलं त्यावरून दिसून येतं, की अर्पण देण्यामागचा काइनचा हेतू चांगला नव्हता. देवावर त्याचा विश्‍वास नव्हता. (इब्री ११:४; १ योहा. ३:११, १२) आणि म्हणून यहोवाने फक्‍त त्याचं अर्पणच नाही, तर त्यालासुद्धा नाकारलं. (उत्प. ४:५-८) एका प्रेमळ वडिलाप्रमाणे यहोवाने आपल्या या मुलाची चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. पण काइनने यहोवाची मदत झिडकारली. काइनचं मन साफ नव्हतं. ते शरीराच्या कामांनी, म्हणजे “वैर, भांडणं, हेवेदावे” यांनी भरलं होतं. (गलती. ५:१९, २०) आणि त्यामुळे त्याने जरी यहोवाचीच उपासना केली असली, सगळ्यात चांगलं अर्पण दिलं असलं आणि योग्य पद्धतीने दिलं असलं, तरी यहोवाने ते नाकारलं. तर आपण यातून काय शिकतो? हेच, की उपासनेच्या कामांसोबतच ते करण्यामागची भावनासुद्धा चांगली असली पाहिजे; तरच आपण तिला शुद्ध उपासना म्हणू शकतो.

काइनबद्दल बायबलमध्ये बरंच काही सांगितलं आहे. जसं, की यहोवा कसा त्याच्याशी बोलला आणि त्याने यहोवाला काय उत्तरं दिली. तसंच, त्याच्या मुलांची नावं काय होती आणि त्याने कोणती कामं केली. (उत्प. ४:१७-२४) पण हाबेलबद्दल बायबलमध्ये फारसं काही सांगितलेलं नाही. त्याच्या मुलांबद्दल किंवा त्याने म्हटलेला एकही शब्द बायबलमध्ये दिलेला नाही. असं असलं, तरी त्याने जे काही केलं त्यातून तो आपल्याला खूप काही सांगून जातो. ते कसं?

शुद्ध उपासनेच्या बाबतीत हाबेलचं चांगलं उदाहरण

१०. शुद्ध उपासनेच्या बाबतीत हाबेलने एक चांगलं उदाहरण कसं मांडलं?

१० उपासना ही यहोवाचीच केली पाहिजे हे माहीत असल्यामुळे हाबेलने आपलं बलिदान यहोवाला अर्पण केलं. त्याने दिलेलं बलिदान सगळ्यात चांगलं होतं असं म्हणता येईल, कारण “त्याने आपल्या कळपातून पहिली जन्मलेली काही कोकरं” निवडून यहोवाला अर्पण केली. त्याने ते बलिदान वेदीवर अर्पण केलं की नाही हे आपल्याला माहीत नाही. पण ज्या कोणत्या पद्धतीने त्याने ते अर्पण केलं ते नक्कीच यहोवाला मान्य होतं. हाबेलच्या अर्पणाबद्दलची एक खास गोष्ट म्हणजे, ते देण्यामागचा त्याचा हेतू चांगला होता. आणि म्हणूनच आज सहा हजार वर्षांनंतरही त्याच्या उदाहरणातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. यहोवावर विश्‍वास आणि त्याच्या नीतिमान स्तरांबद्दल कदर असल्यामुळेच त्याने ते अर्पण दिलं होतं. असं का म्हणता येईल?

हाबेलने शुद्ध उपासनेसाठी आवश्‍यक असलेल्या चार महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या (परिच्छेद १० पाहा)

११. येशूने हाबेलला नीतिमान का म्हटलं?

११ पहिली गोष्ट, येशूने हाबेलबद्दल काय म्हटलं याचा जरा विचार करा. तो हाबेलला चांगला ओळखत होता, कारण त्याने हाबेलला स्वर्गातून पाहिलं होतं. आदामच्या या मुलाकडे त्याचं विशेष लक्ष होतं. (नीति. ८:२२, ३०, ३१; योहा. ८:५८; कलस्सै. १:१५, १६) येशूने हाबेलला नीतिमान म्हटलं, कारण त्याची चांगली कामं येशूने स्वतः पाहिली होती. (मत्त. २३:३५) एक नीतिमान माणूस मान्य करतो, की चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवण्याचा अधिकार यहोवालाच आहे. आणि त्याच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येतं, की त्याला ते स्तर मान्य आहेत. (लूक १:५,६ सोबत तुलना करा.) नीतिमान म्हणून नाव कमवण्यासाठी सहसा वेळ लागतो. याचा अर्थ, हाबेलने अर्पण दिलं त्या दिवसापासूनच तो नीतिमान ठरला नाही, तर त्याच्या बऱ्‍याच काळाआधीपासून तो यहोवाच्या स्तरांप्रमाणे चालत होता. आणि तसं करणं त्याला नक्कीच सोपं गेलं नसेल. एकतर त्याच्या मोठ्या भावाचं त्याच्यासमोर चांगलं उदाहरण नव्हतं. काइनचं मन साफ नव्हतं. तो दुष्ट बनला होता. (१ योहा. ३:१२ ) आणि दुसरं म्हणजे, त्याच्या आईवडिलांनी यहोवाची आज्ञा मोडून बंड केलं होतं; आपल्यासाठी चांगलं काय, वाईट काय हे त्यांनी स्वतःच ठरवलं होतं. (उत्प. २:१६, १७; ३:६) कुटुंबात एकाचंही चांगलं उदाहरण नसताना हाबेलने योग्य मार्ग निवडला. असं करून खरंच त्याने किती धैर्य दाखवलं!

१२. काइन आणि हाबेल यांच्यातला एक मुख्य फरक काय होता?

१२ आता आपण, विश्‍वास आणि नीतिमत्त्व या दोन गुणांचा एकमेकांशी किती जवळचा संबंध आहे ते पाहू. पौलने म्हटलं: “विश्‍वासानेच, हाबेलने काइनपेक्षा जास्त चांगलं बलिदान अर्पण केलं. आणि त्या विश्‍वासाद्वारेच, देवाने त्याचं अर्पण स्वीकारून त्याला अशी साक्ष दिली, की तो नीतिमान आहे.” (इब्री ११:४) पौलच्या या शब्दांवरून दिसून येतं, की हाबेल काइनसारखा मुळीच नव्हता. हाबेलने शेवटपर्यंत दाखवून दिलं, की यहोवावर त्याचा खूप विश्‍वास आहे. तसंच, यहोवाचे स्तर आणि त्याची कामं नेहमीच योग्य असतात असाही त्याला भरवसा होता.

१३. हाबेलच्या उदाहरणातून आपण काय शिकतो?

१३ हाबेलच्या उदाहरणातून आपण हेच शिकतो, की आपला हेतू चांगला असला तरच आपली उपासना शुद्ध असेल. दुसऱ्‍या शब्दांत, यहोवावर आपला पूर्ण भरवसा असला पाहिजे आणि त्याचे नीतिमान स्तर आपण मानले पाहिजेत. तसंच, शुद्ध उपासना ही फक्‍त एका कामातून नाही, तर आपल्या संपूर्ण जीवनातून, आपल्या वागण्या-बोलण्यातून नेहमी दिसून आली पाहिजे.

कुलप्रमुखांनी हाबेलचं अनुकरण केलं

१४. यहोवाने नोहा, अब्राहाम आणि याकोबची अर्पणं का स्वीकारली?

१४ यहोवाची शुद्ध उपासना करणारा हाबेल हा पहिला अपरिपूर्ण माणूस होता. पण त्याच्यानंतरही अनेकांनी यहोवाची शुद्ध उपासना केली. प्रेषित पौलने अशाच काहींची उदाहरणं दिली; जसं की नोहा, अब्राहाम आणि याकोब. (इब्री लोकांना ११:७, ८, १७-२१ वाचा.) या सगळ्या कुलप्रमुखांनी यहोवाला बलिदानं दिली आणि त्याने ती आनंदाने स्वीकारली. का? कारण त्यांनी उपासना फक्‍त करायची म्हणून केली नाही, तर शुद्ध उपासनेसाठी ज्या चार महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्यासुद्धा त्यांनी लक्षात घेतल्या. त्या कुलप्रमुखांची उदाहरणं आता आपण पाहू या.

नोहाने दिलेल्या बलिदानांतून सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट कळली (परिच्छेद १५, १६ पाहा)

१५, १६. नोहाने शुद्ध उपासनेसाठी आवश्‍यक असलेल्या चार महत्त्वपूर्ण गोष्टी कशा पूर्ण केल्या?

१५ आदामच्या मृत्यूच्या फक्‍त १२६ वर्षांनंतर नोहाचा जन्म झाला. तोपर्यंत खोटी उपासना सगळीकडे पसरली होती. b (उत्प. ६:११) जलप्रलय येण्याच्या आधीच्या काळात फक्‍त नोहा आणि त्याचं कुटुंबच यहोवाला मान्य असलेल्या पद्धतीने त्याची उपासना करत होतं. (२ पेत्र २:५) मग जलप्रलयानंतर नोहाने यहोवाला बलिदानं अर्पण करण्यासाठी एक वेदी बांधली. बायबलमध्ये वेदीचा पहिल्यांदा उल्लेख इथेच आला आहे. यहोवाला मनापासून दिलेल्या अर्पणावरून नोहाने आपल्या कुटुंबाला आणि त्याच्यानंतर येणाऱ्‍या मानवांना दाखवून दिलं, की आपण फक्‍त यहोवाचीच उपासना केली पाहिजे. नोहाने “सर्व शुद्ध प्राणी आणि सर्व शुद्ध पक्षी” यांपैकी काही निवडून ते यहोवाला अर्पण केले. (उत्प. ८:२०) यहोवाने स्वत: या प्राण्यांना आणि पक्ष्यांना शुद्ध म्हटलं होतं, त्यामुळे नोहाने दिलेलं बलिदान सगळ्यात चांगलं होतं असं म्हणता येईल.—उत्प. ७:२.

१६ नोहाने जी वेदी बांधली त्यावर त्याने होमार्पणं दिली. उपासनेची ही पद्धत यहोवाने मान्य केली का? नक्कीच. कारण बायबल म्हणतं, की त्या बलिदानांच्या “सुवासाने यहोवाला आनंद झाला” आणि त्याने “नोहाला आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद” दिला. (उत्प. ८:२१; ९:१) पण नोहाने दिलेलं अर्पण यहोवाने स्वीकारल्याचं एक मुख्य कारण म्हणजे, ते देण्यामागचा त्याचा हेतू चांगला होता. ही बलिदानं देऊन त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं, की यहोवावर त्याचा मजबूत विश्‍वास आहे. तसंच, यहोवाचे स्तर आणि कामं नेहमी योग्य असतात यावर त्याला पूर्ण भरवसा होता. नोहाने नेहमीच यहोवाचं ऐकलं आणि त्याचे स्तर पाळले. म्हणूनच बायबल म्हणतं, की “नोहा खऱ्‍या देवासोबत चालला,” आणि एक नीतिमान माणूस म्हणून त्याने नाव कमवलं.—उत्प. ६:९; यहे. १४:१४; इब्री ११:७.

१७, १८. अब्राहामने शुद्ध उपासनेसाठी आवश्‍यक असलेल्या चार महत्त्वपूर्ण गोष्टी कशा पूर्ण केल्या?

१७ अब्राहाम ऊर शहरात राहत होता. तिथे सगळीकडे खोटी उपासना केली जायची. त्या शहरात नन्‍ना नावाच्या चंद्र दैवताचं एक मोठं मंदिर होतं. c अब्राहामचे वडीलसुद्धा एकेकाळी खोट्या दैवतांची पूजा करायचे. (यहो. २४:२) पण अब्राहामने मात्र यहोवाची उपासना करायचं ठरवलं. या खऱ्‍या देवाबद्दल तो आपल्या पूर्वजाकडून, म्हणजे शेमकडून शिकला असेल. शेम हा नोहाचा मुलगा होता. आणि शेम व अब्राहाम १५० वर्षं एका काळात जगले.

१८ अब्राहामने आपल्या संपूर्ण आयुष्यात बऱ्‍याचदा यहोवाला बलिदानं अर्पण केली. पण ही बलिदानं त्याने प्रत्येक वेळी यहोवालाच दिली. कारण उपासना ही यहोवाचीच केली पाहिजे हे त्याला माहीत होतं. (उत्प. १२:८; १३:१८; १५:८-१०) पण अब्राहामने यहोवाला सगळ्यात चांगलं ते द्यायची तयारी दाखवली का? नक्कीच दाखवली. कारण तो आपल्या लाडक्या मुलाला, इसहाकला द्यायला तयार झाला होता. त्या प्रसंगी, यहोवाने अब्राहामला अर्पण द्यायची योग्य पद्धत स्पष्टपणे सांगितली. (उत्प. २२:१, २) आणि अब्राहामने त्याबद्दलची छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा पाळली. तो आपल्या मुलाचं बलिदान देणारच होता, इतक्यात यहोवाने त्याला थांबवलं. (उत्प. २२:९-१२) यहोवाने अब्राहामची उपासना स्वीकारली, कारण तो नेहमी चांगल्या हेतूने यहोवाला अर्पणं द्यायचा. त्याच्याबद्दल पौलने म्हटलं: “अब्राहामने यहोवावर विश्‍वास ठेवला आणि त्यामुळे त्याला नीतिमान ठरवण्यात आलं.”—रोम. ४:३.

याकोबने आपल्या कुटुंबासमोर एक चांगलं उदाहरण मांडलं (परिच्छेद १९, २० पाहा)

१९, २०. याकोबने शुद्ध उपासनेसाठी आवश्‍यक असलेल्या चार महत्त्वपूर्ण गोष्टी कशा पूर्ण केल्या?

१९ याकोब बरीच वर्षं कनान देशात राहिला. हा तोच देश होता जो यहोवाने अब्राहामला आणि त्याच्या वंशजांना द्यायचं वचन दिलं होतं. (उत्प. १७:१, ८) तिथले लोक इतक्या खालच्या स्तराची उपासना करायचे, की “तो देश आपल्या रहिवाशांना ओकून टाकेल,” असं यहोवा म्हणाला. (लेवी. १८:२४, २५) याकोब ७७ वर्षांचा होता तेव्हा त्याने कनान देश सोडला. पुढे त्याचं लग्न झालं आणि नंतर तो आपल्या मोठ्या कुटुंबाला घेऊन परत कनानला आला. (उत्प. २८:१, २; ३३:१८) पण त्याच्या कुटुंबातल्या काही लोकांवर खोट्या धर्माचा प्रभाव पडला होता. असं असलं, तरी यहोवाने जेव्हा याकोबला बेथेलला जाऊन तिथे एक वेदी बांधायला सांगितली तेव्हा त्याने लगेच पाऊल उचललं. पण ते करण्याआधी तो आपल्या कुटुंबाला म्हणाला: ‘तुमच्याजवळ असलेले सर्व परके देव काढून टाका आणि स्वतःला शुद्ध करा.’ त्यानंतर यहोवाने दिलेल्या सूचनांचं त्याने प्रामाणिकपणे पालन केलं.—उत्प. ३५:१-७.

२० वचन दिलेल्या देशात याकोबने ठिकठिकाणी वेदी बांधल्या. पण त्या सगळ्या यहोवासाठीच होत्या. कारण उपासना ही यहोवाचीच केली पाहिजे हे त्याला माहीत होतं. (उत्प. ३५:१४; ४६:१) तसंच, त्याने नेहमी सगळ्यात चांगली ती अर्पणं दिली. शिवाय, उपासनेची त्याची पद्धत योग्य होती आणि त्यामागचे त्याचे हेतूही चांगले होते. म्हणूनच बायबलमध्ये त्याला “निर्दोष” असं म्हटलं आहे. खरंतर, हा शब्द अशा लोकांच्या बाबतीत वापरला जातो ज्यांच्यावर यहोवा खूश असतो. (उत्प. २५:२७, तळटीप) आपल्या संपूर्ण जीवनातून याकोबने इस्राएल राष्ट्रासाठी एक खूप चांगलं उदाहरण मांडलं.—उत्प. ३५:९-१२.

२१. शुद्ध उपासनेच्या बाबतीत कुलप्रमुखांकडून आपण काय शिकू शकतो?

२१ शुद्ध उपासनेच्या बाबतीत आपण कुलप्रमुखांकडून बरंच काही शिकू शकतो. आज आपली परिस्थितीही त्यांच्यासारखीच आहे. शुद्ध उपासनेपासून आपलं मन भरकटावं म्हणून आपल्या आजूबाजूचे, अगदी कुटुंबातले लोकसुद्धा कदाचित खूप प्रयत्न करतील. आपण जर त्यांच्या जाळ्यात अडकलो तर आपण पूर्ण मनाने यहोवाची उपासना करू शकणार नाही. आपल्या बाबतीत तसं होऊ नये म्हणून यहोवावरचा आपला विश्‍वास आपण मजबूत करत राहिलं पाहिजे. आणि यहोवाचे नीतिमान स्तर योग्यच असतात याची आपल्याला खातरी असली पाहिजे. हे आपण कसं करू शकतो? यहोवाच्या आज्ञा पाळून आणि आपल्या वेळेचा, शक्‍तीचा आणि साधनांचा त्याच्या सेवेत उपयोग करून. (मत्त. २२:३७-४०; १ करिंथ. १०:३१) आपण जेव्हा शक्य तितक्या चांगल्या प्रकारे, यहोवाला मान्य असलेल्या पद्धतीने आणि चांगल्या हेतूने त्याची उपासना करतो तेव्हा तो आपल्याला नीतिमान समजतो. आणि ही गोष्ट खरंच खूप दिलासा देणारी आहे.—याकोब २:१८-२४ वाचा.

शुद्ध उपासना करणारं एक राष्ट्र

२२-२४. नियमशास्त्रात पुढे दिलेल्या गोष्टींवर कसा भर देण्यात आला होता: (क) उपासना यहोवाचीच करणं, (ख) त्याला सगळ्यात चांगलं ते देणं, आणि (ग) उपासनेची पद्धत योग्य असणं.

२२ याकोबच्या वंशजांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे त्यांना कळावं म्हणून यहोवाने त्यांना नियमशास्त्र दिलं होतं. त्यांनी जर यहोवाचं ऐकलं, तर ते त्याची “खास प्रजा” आणि एक “पवित्र राष्ट्र” बनणार होते. (निर्ग. १९:५, ६) शुद्ध उपासनेबद्दल ज्या चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांवर नियमशास्त्रात कसा भर देण्यात आला ते आता आपण पाहू.

२३ इस्राएली लोकांनी कोणाची उपासना केली पाहिजे हे यहोवाने नियमशास्त्रात अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्याने म्हटलं: “माझ्याशिवाय तुम्हाला इतर कोणतेही देव नसावेत.” (निर्ग. २०:३-५) तसंच, जी बलिदानं त्यांना अर्पण करायची होती तीसुद्धा सगळ्यात चांगली असायला हवी होती. उदाहरणार्थ, त्यांनी कोणतेही दोष नसलेले प्राणी अर्पण करायचे होते. (लेवी. १:३; अनु. १५:२१; मलाखी १:६-८ सोबत तुलना करा.) यहोवाला दिलेल्या अर्पणातून काही भाग लेव्यांना मिळायचा, पण ते स्वतःसुद्धा यहोवाला अर्पणं द्यायचे. त्यांना सांगण्यात आलं होतं, की त्यांना “मिळालेल्या सर्वात चांगल्या भेटींमधून” त्यांनी यहोवाला द्यावं. (गण. १८:२९) तसंच, उपासनेच्या पद्धतीबद्दलही यहोवाने इस्राएली लोकांना नियमशास्त्रात खूप स्पष्ट सूचना दिल्या होत्या; जसं की, यहोवाला त्यांनी कोणती, कशी आणि कुठे बलिदानं द्यावीत. शिवाय, त्यांनी कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे याबद्दलही यहोवाने त्यांना ६०० पेक्षा जास्त नियम दिले होते. त्यांना असं सांगण्यात आलं होतं: “आता तुमचा देव यहोवा याने आज्ञा दिल्याप्रमाणेच या सर्व गोष्टी करण्याची तुम्ही काळजी घ्या. उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका.”—अनु. ५:३२.

२४ बलिदानं कुठे द्यायची हेसुद्धा खूप महत्त्वाचं होतं. यहोवाने इस्राएली लोकांना एक उपासना मंडप बांधायला सांगितलं होतं आणि तिथेच शुद्ध उपासना केली जायची. (निर्ग. ४०:१-३, २९, ३४) त्या काळात इस्राएली लोकांनी आपली अर्पणं उपासना मंडपात आणली तरच यहोवा ती स्वीकारायचा. dअनु. १२:१७, १८.

२५. बलिदानांच्या बाबतीत कोणती गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची होती? समजावून सांगा.

२५ इस्राएली लोक कोणत्या हेतूने अर्पणं देतात हे सर्वात महत्त्वाचं होतं. त्यांना यहोवाबद्दल आणि त्याच्या स्तरांबद्दल मनापासून प्रेम असणं महत्त्वाचं होतं. (अनुवाद ६:४-६ वाचा.) जेव्हा इस्राएली लोक यहोवाला फक्‍त नावापुरतं बलिदान द्यायचे तेव्हा तो ते स्वीकारायचा नाही. (यश. १:१०-१३) यशया संदेष्ट्याद्वारे त्याने त्यांना दाखवून दिलं, की उपासनेचा हा दिखावा करून ते त्याला फसवू शकत नाहीत. यहोवा म्हणाला: ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, पण यांचं हृदय माझ्यापासून फार दूर आहे.’—यश. २९:१३.

मंदिरात उपासना

२६. शलमोनने बांधलेल्या मंदिरात सुरुवातीला शुद्ध उपासना कशी केली जायची?

२६ इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात जाऊन राहू लागले त्याच्या ४०० वर्षांनंतर शलमोन राजाने शुद्ध उपासना करण्यासाठी एक मंदिर बांधलं. ते मंदिर उपासना मंडपापेक्षा कितीतरी जास्त भव्य होतं. (१ राजे ७:५१; २ इति. ३:१, ६, ७) मंदिरात सुरुवातीला यहोवाचीच उपासना केली जायची; त्यालाच बलिदानं दिली जायची. शलमोन राजाने आणि त्याच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात सर्वात चांगली बलिदानं अर्पण केली. शिवाय, नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी ती योग्य पद्धतीनेही दिली. (१ राजे ८:६३) यहोवानेसुद्धा ही बलिदानं मोठ्या आनंदाने स्वीकारली. पण ती खूप मोठ्या प्रमाणात देण्यात आली होती किंवा मंदिर बांधायला खूप पैसा खर्च करण्यात आला होता म्हणून यहोवाने ती स्वीकारली नाही; तर ती देण्यामागचे त्यांचे हेतू चांगले होते हे यहोवाने पाहिलं. मंदिराचं समर्पण करण्यात आलं तेव्हा शलमोन राजाने याच गोष्टीवर भर दिला. त्याने म्हटलं: “आजच्या सारखंच तुम्ही पुढेही पूर्ण मनाने आपला देव यहोवा याच्या कायद्यांप्रमाणे चालत राहा आणि त्याच्या आज्ञांचं पालन करत राहा.”—१ राजे ८:५७-६१.

२७. (क) इस्राएलच्या राजांनी आणि त्यांच्या प्रजेने काय केलं? (ख) आणि त्यामुळे यहोवाने काय केलं?

२७ पण इस्राएली लोकांनी शलमोन राजाने दिलेल्या सल्ल्याचं पालन केलं नाही. शुद्ध उपासनेसाठी असलेल्या ज्या चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांपैकी कोणती न कोणती गोष्ट पूर्ण करण्यात ते कमी पडले. इस्राएलच्या राजांची आणि त्यांच्या प्रजेची मनं भ्रष्ट झाली. त्यांनी यहोवावर विश्‍वास ठेवायचं आणि त्याच्या नीतिमान स्तरांप्रमाणे चालायचं सोडून दिलं. त्यांना सुधारण्यासाठी आणि त्यांच्या वागण्याचे परिणाम किती भयंकर होतील याचा इशारा देण्यासाठी यहोवा प्रेमळपणे आपल्या संदेष्ट्यांना त्यांच्याकडे वारंवार पाठवत राहिला. (यिर्म. ७:१३-१५, २३-२६) त्यांच्यापैकीच एक संदेष्टा होता यहेज्केल. तो यहोवाला विश्‍वासू होता. पण त्याच्या काळात शुद्ध उपासना फक्‍त नावाला होत होती.

यहेज्केलने शुद्ध उपासना भ्रष्ट होताना पाहिली

२८, २९. यहेज्केलबद्दल आपल्याला काय माहीत आहे? (“यहेज्केल​—त्याचं जीवन आणि त्याचा काळ,” ही चौकट पाहा.)

२८ शलमोन राजाने बांधलेल्या मंदिरात उपासना कशी केली जायची हे यहेज्केलला खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं. कारण त्याचे वडील एक याजक होते. आणि मंदिरात सेवा करायची त्यांची वेळ यायची तेव्हा ते तिथे जाऊन सेवा करत असावेत. (यहे. १:३) यहेज्केलचं बालपण खूप आनंदात गेलं असेल. त्याच्या वडिलांनी त्याला नक्कीच यहोवाबद्दल आणि नियमशास्त्राबद्दल शिकवलं असेल. तो जवळपास एक वर्षाचा असताना मंदिरात “नियमशास्त्राचं पुस्तक” सापडलं होतं. e त्या वेळी योशीया राज्य करत होता. तो एक चांगला राजा होता. नियमशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि शुद्ध उपासना वाढवण्यासाठी त्याने भरपूर मेहनत घेतली.—२ राजे २२:८-१३.

यहेज्केलच्या वडिलांनी त्याला नक्कीच यहोवाबद्दल आणि त्याच्या नियमशास्त्राबद्दल शिकवलं असेल (परिच्छेद २८ पाहा)

२९ आधी होऊन गेलेल्या विश्‍वासू सेवकांप्रमाणेच यहेज्केलनेही शुद्ध उपासनेबद्दलच्या चार महत्त्वपूर्ण गोष्टी पूर्ण केल्या. यहेज्केलच्या पुस्तकाचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येतं, की त्याने नेहमी यहोवाचीच उपासना केली, त्याला सगळ्यात चांगलं ते दिलं, त्याच्या आज्ञा पाळल्या आणि त्याला हव्या असलेल्या पद्धतीने त्याची उपासना केली. त्याने हे सगळं यहोवावर असलेल्या मजबूत विश्‍वासामुळे केलं. पण त्याच्या काळातले बहुतेक लोक त्याच्यासारखे नव्हते. यहेज्केल लहानपणापासून यिर्मयाच्या भविष्यावण्या ऐकत मोठा झाला होता. यिर्मयाने इ.स.पू. ६४७ मध्ये आपलं काम सुरू केलं आणि यहोवाच्या न्यायदंडाबद्दल त्याने मोठ्या आवेशाने लोकांना सांगितलं.

३०. (क) यहेज्केलने लिहिलेल्या भविष्यवाण्यांवरून काय दिसून येतं? (ख) भविष्यवाणी म्हणजे काय, आणि यहेज्केलच्या भविष्यवाण्यांचा काय-काय अर्थ होऊ शकतो? (“यहेज्केलच्या भविष्यवाण्या समजून घेणं,” ही चौकट पाहा.)

३० यहेज्केलने देवाच्या प्रेरणेने जे काही लिहिलं त्यावरून दिसून येतं, की लोक देवापासून किती दूर गेले होते. (यहेज्केल ८:६ वाचा.) त्याबद्दल यहोवाने त्यांना शिक्षा दिली आणि त्यांना बाबेलमध्ये बंदिवासात पाठवलं. (२ राजे २४:११-१७) त्या बंदिवानांमध्ये यहेज्केलसुद्धा होता. पण याचा अर्थ यहोवा त्यालाही शिक्षा करत होता असं नाही. आपण असं का म्हणू शकतो? कारण यहोवाने त्याला एक काम दिलं होतं आणि ते त्याला त्या लोकांमध्ये राहून करायचं होतं. यहोवाने यहेज्केलला जे अद्‌भुत दृष्टान्त आणि भविष्यवाण्या लिहायला सांगितल्या त्यांवरून दिसून येतं, की यरुशलेममध्ये पुन्हा एकदा शुद्ध उपासना कशी सुरू होणार होती. तसंच, त्याच्या लिखाणांवरून हेही दिसून येतं, की शेवटी संपूर्ण पृथ्वीवर कशा प्रकारे यहोवाची शुद्ध उपासना केली जाईल.

३१. या पुस्तकातून आपल्याला कोण-कोणत्या गोष्टी समजतील?

३१ या पुस्तकात जे वेगवेगळे भाग दिले आहेत त्यांतून आपल्याला यहोवाच्या निवासस्थानाची, म्हणजेच स्वर्गाची एक झलक मिळेल. तसंच, शुद्ध उपासना कितपत दूषित झाली, यहोवाने ती पुन्हा कशी सुरू केली आणि आपल्या लोकांचं कसं संरक्षण केलं हेही आपल्याला समजेल. शिवाय, भविष्यात पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जण फक्‍त यहोवाचीच उपासना कशी करेल हेसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पुढच्या अध्यायात आपण यहेज्केलने लिहिलेल्या पहिल्या दृष्टान्ताबद्दल पाहू. त्यामुळे यहोवा किती महान आहे आणि त्याच्या संघटनेचा स्वर्गातला भाग किती भव्य आहे याची कल्पना करायला आपल्याला मदत होईल. तसंच, आपण फक्‍त यहोवाचीच उपासना का केली पाहिजे हेसुद्धा आपल्याला कळेल.

a आदाम-हव्वाला एदेन बागेतून बाहेर काढण्याच्या थोड्याच काळाने हाबेलचा जन्म झाला असावा. (उत्प. ४:​१, २) उत्पत्ती ४:२५ मध्ये म्हटलं आहे, की देवाने ‘हाबेलच्या जागी’ शेथला दिलं. हाबेलची हत्या झाली त्यानंतर आदामला शेथ झाला. त्या वेळी आदाम १३० वर्षांचा होता. (उत्प. ५:३) यावरून असं दिसतं, की काइनने जेव्हा हाबेलची हत्या केली तेव्हा हाबेल जवळपास १०० वर्षांचा असावा.

b उत्पत्ती ४:२६ मध्ये म्हटलं आहे, की आदामचा नातू, अनोश याच्या काळात “लोकांनी यहोवाला नावाने हाक मारायला सुरुवात केली.” पण असं दिसतं, की ते ही गोष्ट आदराने करत नव्हते. त्यांनी कदाचित आपल्या मूर्तींना यहोवाचं नाव दिलं होतं.

c नन्‍ना हा सीन नावानेही ओळखला जायचा. तसं पाहिलं तर ऊर शहरातले लोक बऱ्‍याच दैवतांची पूजा करायचे. पण तिथली मंदिरं आणि वेदी खासकरून नन्‍ना दैवताची होती.

d असं दिसतं की उपासना मंडपातून कराराची पेटी काढल्यानंतर, इतर ठिकाणी दिली जाणारी बलिदानंही यहोवाने स्वीकारली.​—१ शमु. ४:३,११; ७:७-९; १०:८; ११:१४, १५; १६:४, ५; १ इति. २१:२६-३०.

e इ.स.पू. ६१३ मध्ये यहेज्केलने भविष्यवाणी करायला सुरुवात केली, तेव्हा कदाचित तो ३० वर्षांचा होता. याचा अर्थ, इ.स.पू. ६४३ च्या आसपास त्याचा जन्म झाला असावा. (यहे. १:१) इ.स.पू. ६५९ मध्ये योशीया राजा बनला. आणि कदाचित त्याच्या शासनाच्या १८ व्या वर्षी, म्हणजे जवळपास इ.स.पू. ६४२-६४१ मध्ये नियमशास्त्राचं पुस्तक सापडलं होतं. ही बहुतेक मोशेने लिहिलेल्या पुस्तकाची मूळ प्रत होती.