व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ३

“मला देवाकडून दृष्टान्त मिळू लागले”

“मला देवाकडून दृष्टान्त मिळू लागले”

यहेज्केल १:१

अध्याय कशाबद्दल आहे: यहोवाच्या रथाची एक झलक

१-३. (क) यहेज्केलने काय पाहिलं आणि काय ऐकलं? (सुरुवातीचं चित्र पाहा.) (ख) यहेज्केल कशाच्या मदतीमुळे दृष्टान्त पाहू शकला? (ग) दृष्टान्ताचा त्याच्यावर काय परिणाम झाला?

 यहेज्केल एका सपाट जमिनीवर उभा आहे आणि दूरवर पाहत आहे. तो आपले डोळे बारीक करतो; मग अचानक त्याचे डोळे विस्फारतात. त्याला जे दिसतं त्यावर त्याचा विश्‍वासच बसत नाही. दूर क्षितिजावर एक वादळ उठलेलं त्याला दिसतं. पण हे वादळ साधंसुधं नसून भयानक वाटतं. वादळामुळे उत्तर दिशेहून येणारा सोसाट्याचा वारा किती जोराचा आहे, हे त्याला जाणवतं. त्या वाऱ्‍यामुळे त्याचे केस विसकटतात, कपडे फडफडतात. मग त्याला एक मोठा विशाल ढग दिसतो. असा ढग त्याने जीवनात कधीच पाहिला नव्हता. त्या ढगातून आगीच्या ज्वाला निघत आहेत आणि त्या चकाकणाऱ्‍या धातूसारख्या वाटतात. तो ढग जसजसा यहेज्केलच्या दिशेने येऊ लागला तसतसा एक आवाज आणखी वाढू लागला. तो आवाज त्याला एका विशाल सैन्याच्या आवाजासारखा वाटतो.—यहे. १:४, २४.

यहेज्केल जवळपास ३० वर्षांचा आहे. त्याच्यासोबत ज्या रोमांचक घटना घडणार आहेत त्यांची ही फक्‍त सुरुवातच आहे. दृष्टान्त पाहताना यहोवाच्या ‘पवित्र शक्‍तीची’ जबरदस्त ताकद त्याला जाणवत होती. पवित्र शक्‍तीच्या मदतीमुळे तो जे काही पाहणार आणि ऐकणार होता ते खूप रोमांचक असणार होतं. आजच्या चित्रपटात जे स्पेशल इफेक्ट्‌स पाहायला मिळतात त्यापेक्षा हे खूप कमालीचं असणार होतं. यहेज्केलने पाहिलेल्या दृष्टान्ताचा त्याच्यावर इतका प्रभाव पडला, की तो अगदी स्तब्ध झाला आणि जमिनीवर पालथा पडला.—यहे. १:३, २८.

हा दृष्टान्त पाहून यहेज्केलला आश्‍चर्य व्हावं आणि तो विस्मयाने भरून जावा फक्‍त हा यहोवाचा उद्देश नव्हता, तर त्यामागे यहोवाचा आणखी एक उद्देश होता. यहेज्केलला दिसलेला हा पहिला दृष्टान्त आणि त्यानंतर दिसलेले इतर दृष्टान्त त्याने आपल्या रोमांचक भविष्यवाणीच्या पुस्तकात लिहिले. या दृष्टान्तांतून त्याला खूप काही शिकायला मिळालं, आणि आज यहोवाच्या सेवकांनाही त्यांतून बरंचकाही शिकायला मिळतं. चला तर, यहेज्केलला पहिल्या दृष्टान्तात काय दिसलं आणि त्याने काय ऐकलं ते आता आपण बघू या.

यहेज्केलने दृष्टान्त कुठे आणि केव्हा पाहिला

४, ५. यहेज्केलला कधी आणि कुठे दृष्टान्त मिळाला?

यहेज्केल १:१-३ वाचा. इ.स.पू. ६१३ चं वर्षं चालू होतं. मागच्या अध्यायात पाहिल्याप्रमाणे, यहेज्केल बाबेलमध्ये होता. तो खबार नदीजवळ इतर बंदिवानांसोबत राहत होता. खबार हा कदाचित एक कालवा असावा. हा फरात नदीतून निघायचा आणि नंतर पुन्हा तिला जाऊन मिळायचा.

यहेज्केल खबार नदीजवळ इतर बंदिवानांसोबत राहत होता (परिच्छेद ४ पाहा)

बंदिवानांचं यरुशलेम शहर हे बाबेलपासून जवळपास ८०० कि.मी. दूर होतं. a यहेज्केलचे वडील तिथे मंदिरात याजक म्हणून सेवा करायचे. पण आता ते मंदिर भ्रष्ट झालं होतं आणि तिथे मूर्तिपूजा केली जात होती. एकेकाळी जिथे दावीद आणि शलमोन मानाने राज्य करत होते ते आता शरमेचं ठिकाण बनलं होतं. कारण दुष्ट राजा यहोयाखीन बाबेलमध्ये बंदिवासात होता. आणि यरुशलेममध्ये त्याच्या जागी, नबुखद्‌नेस्सरच्या इशाऱ्‍यावर नाचणारा सिद्‌किया राज्य करत होता.—२ राजे २४:८-१२, १७, १९.

६, ७. यहेज्केल दुःखी का झाला?

यहेज्केलसारख्या विश्‍वासू माणसासाठी हा खरंच खूप दुःखाचा काळ असेल. कारण त्या काळात जे घडत होतं त्यामुळे बंदिवासात असलेल्या लोकांचा विश्‍वास कमी होत असल्याचं तो पाहत होता. त्या बंदिवानांच्या मनात कदाचित असे प्रश्‍न आले असतील: ‘यहोवाने आपल्याला कायमचं सोडून दिलंय का? अगणित खोटी दैवतं असलेली बाबेलची दुष्ट सत्ता, यहोवाची शुद्ध उपासना पूर्णपणे नाहीशी करेल का? तसंच, पृथ्वीवरून त्याचं शासन पूर्णपणे मिटवून टाकेल का?’

या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आता यहेज्केलने बघितलेला पहिला दृष्टान्त आपल्या बायबलमधून वाचा. त्यात त्याने कोणत्या गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या त्याचं अगदी स्पष्ट वर्णन केलं आहे. (यहे. १:४-२८) आणि वाचताना स्वतःला यहेज्केलच्या जागी ठेवा; त्याने जे पाहिलं, जे ऐकलं ते स्वतः अनुभवण्याचा प्रयत्न करा.

कर्कमीश प्रदेशाजवळची फरात नदी (परिच्छेद ५-७ पाहा)

एक असाधारण वाहन

८. (क) यहेज्केलला दृष्टान्तात काय दिसलं? (ख) आणि त्याला जे दिसलं ते कशाला सूचित करतं?

यहेज्केलने दृष्टान्तात काय पाहिलं? थोडक्यात सांगायचं तर त्याने एक अतिशय मोठं वाहन पाहिलं. रथासारखं दिसणारं हे विशाल वाहन पाहून तो अगदी थक्क झाला, त्याला खूप आश्‍चर्य वाटलं. रथाला चार मोठमोठी चाकं होती आणि सोबत चार अनोखे जिवंत प्राणीही होते. ते करूब असल्याचं पुढे जाऊन कळतं. (यहे. १०:१) त्यांच्यावरती अफाट पसरलेलं बर्फासारखं एक छत होतं. त्यावर देवाचं वैभवशाली राजासन होतं. आणि यहोवा त्यावर बसला होता. हा रथ कशाला सूचित करतो? हा यहोवाच्या विश्‍वव्यापी संघटनेच्या स्वर्गातल्या भागाला सूचित करतो. असं का म्हणता येईल? याची तीन कारणं पुढे दिली आहेत. चला ती पाहू या.

९. यहोवाचा स्वर्गदूतांवर अधिकार आहे हे रथाच्या वर्णनावरून कसं कळतं?

यहोवाचा स्वर्गदूतांवर अधिकार आहे. लक्ष द्या, दृष्टान्तात यहोवाचं राजासन करुबांच्या वर असल्याचं सांगितलं आहे. बायबलच्या इतर काही वचनांमध्येसुद्धा, यहोवाला करुबांच्या वर किंवा त्यांच्या मधे विराजमान असल्याचं सांगितलं आहे. (२ राजे १९:१५ वाचा; निर्ग. २५:२२; स्तो. ८०:१) पण याचा अर्थ यहोवाला करुबांचा आधार घ्यावा लागतो किंवा तो खरोखरच्या रथात बसला आहे असा होत नाही. तर याचा अर्थ असा होतो, की ते करूब यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करतात, त्याला पाठिंबा देतात आणि यहोवा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना विश्‍वात पाहिजे तिथे पाठवू शकतो. यहोवाच्या इतर स्वर्गदूतांप्रमाणेच हेसुद्धा त्याचे सेवक आहेत. आणि यहोवा जे काही करायचं ठरवतो त्याप्रमाणे ते काम करतात. (स्तो. १०४:४) या अर्थाने यहोवा सगळ्या स्वर्गदूतांच्या वर स्वार आहे. जसं काय, ते सगळे मिळून एका मोठ्या वाहनासारखे, रथासारखे आहेत आणि यहोवा सर्वोच्च राजा या नात्याने काय करायचं आणि काय नाही याचा त्यांना आदेश देत आहे.

१०. रथ फक्‍त चार करुबांनी बनलेला नाही असं का म्हणता येईल?

१० रथ फक्‍त चार करुबांनी बनलेला नाही. दृष्टान्तात यहेज्केलला चार करूब दिसतात. बायबलमध्ये सहसा चार ही संख्या पूर्णतेला सूचित करते. याचा अर्थ, ते चार करूब यहोवाच्या सर्व विश्‍वासू स्वर्गदूतांना सूचित करतात. शिवाय, रथाच्या चाकांना आणि करुबांना सगळीकडे डोळे आहेत. याचा अर्थ, फक्‍त ते चार करूब नाही, तर सगळेच स्वर्गदूत सावध आहेत, त्यांचं सगळीकडे लक्ष आहे. तसंच, यहेज्केलने पाहिलेल्या दृष्टान्तातलं वाहन इतकं विशाल आहे, की त्याच्यापुढे मोठमोठे करूबसुद्धा लहान दिसतात. (यहे. १:१८, २२; १०:१२) त्याचप्रमाणे, यहोवाच्या संघटनेचा स्वर्गातला भागसुद्धा खूप मोठा आहे. त्यात फक्‍त चार करूब नाही, तर अगणित स्वर्गदूत आहेत.

स्वर्गातल्या रथाचा दृष्टान्त पाहून यहेज्केलला भीती वाटली आणि तो थक्क झाला (परिच्छेद ८-१० पाहा)

११. यहेज्केलसारखंच दानीएललाही दृष्टान्तात काय दिसलं, आणि त्यावरून आपण काय म्हणू शकतो?

११ असाच दृष्टान्त दानीएललाही दिसतो. दानीएल संदेष्टा बाबेलच्या बंदिवासात खूप वर्षं जगला. आणि त्यालाही स्वर्गातला एक दृष्टान्त दाखवण्यात आला होता. विशेष म्हणजे, त्या दृष्टान्तातसुद्धा यहोवाच्या राजासनाला चाकं असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्या दृष्टान्तात खासकरून यावर भर देण्यात आला होता, की यहोवाचं स्वर्गातलं कुटुंब किती मोठं आहे. दानीएलने पाहिलं, की यहोवासमोर ‘हजारो-लाखो’ स्वर्गदूत आहेत. जसं काय, त्या सगळ्यांची एक न्यायसभाच भरली आहे आणि कदाचित त्या प्रत्येकाला एक नेमून दिलेली जागा आहे. (दानी. ७:९, १०, १३-१८) यावरून आपण म्हणू शकतो, की यहेज्केलच्या दृष्टान्तातला रथ हजारो-लाखो स्वर्गदूतांनी बनलेला आहे.

१२. रथाच्या दृष्टान्तासारख्या इतर दृष्टान्तांवर लक्ष लावल्यामुळे आपलं संरक्षण कसं होऊ शकतं?

१२ यहोवाला माहीत आहे, की माणसांनी जर “न दिसणाऱ्‍या” खऱ्‍या गोष्टींवर लक्ष लावलं, तर त्यांचं संरक्षण होईल. आपण हाडा-मांसाचे आहोत त्यामुळे सहसा आपण दिसणाऱ्‍या गोष्टींवर जास्त लक्ष लावतो. जसं की, आपल्या जीवनातल्या चिंता, आपल्या रोजच्या गरजा ज्या फक्‍त काही काळासाठी असतात. (२ करिंथकर ४:१८ वाचा.) सैतान आपल्या याच कमजोरीचा फायदा उचलतो आणि आपण फक्‍त आपल्या रोजच्या गरजांचा, चिंतांचा विचार करावा यासाठी तो खूप प्रयत्न करतो. पण यहेज्केलने पाहिलेल्या रथाच्या दृष्टान्तासारखे आणखी कितीतरी दृष्टान्त यहोवाने बायबलमध्ये दिले आहेत. त्यांच्यावर लक्ष लावल्यामुळे यहोवाचं स्वर्गातलं कुटुंब किती मोठं आहे याची आपल्याला जाणीव होते आणि सैतानाच्या दबावाचा सामना करण्याचं बळ मिळतं.

“गरगर फिरणारी चाकं!”

१३, १४. (क) यहेज्केलने चाकांचं वर्णन कसं केलं? (ख) चाकांचा यहोवाच्या राजासनाशी जवळचा संबंध कसा आहे?

१३ यहेज्केल सुरुवातीला चार करुबांवर लक्ष देतो. हे चार करूब आणि त्यांचं उल्लेखनीय स्वरूप आपल्याला यहोवाबद्दल काय शिकवतं हे आपण या प्रकाशनाच्या चौथ्या अध्यायात पाहणार आहोत. करुबांनंतर यहेज्केलला त्यांच्या बाजूला असलेली चार चाकं दिसतात. ती चार कोपऱ्‍यांवर असल्यामुळे एक मोठा चौकोन तयार झाल्याचं त्याला दिसतं. (यहेज्केल १:१६-१८ वाचा.) ती चाकं कदाचित चंद्रकांत या मौल्यवान रत्नापासून बनलेली असावीत. हे रत्न पारदर्शक असून पिवळ्या किंवा हिरव्या-पिवळ्या रंगाचं असावं. या रत्नामुळे चाकं झळकत किंवा चमकत होती.

१४ यहेज्केलने पाहिलेल्या दृष्टान्तात रथाच्या चाकांबद्दल बरंच काही सांगितलं आहे. आधी पाहिल्याप्रमाणे, रथावर यहोवाचं राजासन आहे. रथाच्या चाकांचा देवाच्या राजासनाशी जवळचा संबंध आहे. तो कसा? रथाच्या चाकांमुळे राजासन एकाच जागी थांबून राहत नाही. मानवांच्या बाबतीत पाहिलं, तर त्यांचं राजासन एकाच ठिकाणी असतं आणि एका मर्यादित क्षेत्रापर्यंतच ते शासन करू शकतात. पण यहोवा सर्वोच्च अधिकारी आणि राजा असल्यामुळे त्याच्या राजसत्तेला कोणतीही मर्यादा नाही. (नहे. ९:६) तो या संपूर्ण विश्‍वात कुठेही अधिकार चालवू शकतो. त्याच्या अधिकाराला कोणतीही सीमा नाही! याबद्दल यहेज्केलला पुढे कळणारच होतं.

१५. यहेज्केलने पाहिलेल्या चाकांचा आकार आणि रचना कशी होती?

१५ चाकं इतक्या मोठ्या आकाराची होती, की ती पाहून यहेज्केल थक्क झाला. तो म्हणाला: “चाकांच्या कडांचा घेर इतका उंच होता, की पाहणारा भयचकित होऊन जाईल.” आकाशापर्यंत पोहोचवणाऱ्‍या त्या भल्यामोठ्या आणि चमकणाऱ्‍या चाकांकडे यहेज्केल डोळे विस्फारून वरती पाहत आहे याची तुम्ही कल्पना करू शकता का? त्या चाकांबद्दल तो आपल्याला एक विशेष गोष्ट सांगतो. तो म्हणतो: “चारही चाकांच्या कडांवर सगळीकडे डोळे होते.” पण त्याहून कमालीची गोष्ट म्हणजे त्या चाकांची रचना खूप वेगळी आहे. तो म्हणतो: “त्यांची घडण अशी होती, जसं काय एका चाकात दुसरं चाक बसवलं आहे.” याचा काय अर्थ होतो?

१६, १७. (क) चाकांबद्दल यहेज्केलला आणखी विशेष काय दिसतं? (ख) चाकांच्या विशिष्ट रचनेमुळे यहोवाचा रथ काय करू शकतो?

१६ असं दिसतं, की यहेज्केलने पाहिलेलं प्रत्येक चाक खरंतर दोन चाकांनी बनलेलं होतं. आणि दोन्ही चाकं एकाच मापाची असून, एक चाक दुसऱ्‍या चाकाच्या आत आडवं बसलेलं होतं. त्यामुळे आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही अशा प्रकारे ती हालचाल करतात. यहेज्केलने म्हटलं: “ती चाकं पुढे जाताना चार दिशांपैकी पाहिजे त्या दिशेला सरळ जाऊ शकत होती; ती न वळता कोणत्याही दिशेला जाऊ शकत होती.” या चाकांवरून यहेज्केलने पाहिलेल्या रथाबद्दल आपल्याला काय कळतं?

१७ ती चाकं इतकी उंच आणि मोठी होती, की ती एकदा जरी फिरली तरी मोठं अंतर कापू शकत होती. दृष्टान्तात असं दिसतं, की हा रथ विजेच्या वेगाने हालचाल करतो. (यहे. १:१४) त्यामुळे एका क्षणात चाकं किती दूरवर जाऊ शकतात याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. चारही दिशांना जाणारी अशी चाकं बनवणं कोणत्याही इंजिनियरला अशक्यच आहे. चाकांच्या या विशिष्ट रचनेमुळे हा रथ आपला वेग कमी न करता आणि न वळता कोणत्याही दिशेला जाऊ शकतो. पण तो बेपर्वाईने, अनियंत्रितपणे असंच कुठेही जात नाही. तसंच, चाकाच्या कडांवर सगळीकडे डोळे असल्यामुळे, त्या रथाला आपल्या आजूबाजूला, म्हणजेच चारही दिशांना काय घडत आहे हे चांगलं माहीत आहे.

चाकं खूप मोठी आणि उंच होती आणि ती विजेच्या वेगाने पुढे जात होती (परिच्छेद १७ पाहा)

१८. चाकांच्या आकारावरून आणि त्यावर असलेल्या डोळ्यांवरून आपल्याला काय शिकायला मिळतं?

१८ या दृष्टान्तातून यहोवाला यहेज्केलला आणि त्याच्या सगळ्या विश्‍वासू सेवकांना काय सांगायचं होतं? त्याला आपल्या संघटनेच्या स्वर्गातल्या भागाबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगायच्या होत्या. आतापर्यंत आपण काय पाहिलं याचा विचार करा. त्या भल्यामोठ्या चकाकणाऱ्‍या चाकांवरून दिसून येतं, की यहोवाच्या संघटनेचा स्वर्गातला भाग खूप वैभवशाली आणि चकित करणारा आहे. तसंच, चाकांना सगळीकडे डोळे आहेत. त्यांवरून आपण म्हणू शकतो की संघटनेच्या या भागाला आजूबाजूला काय चाललं आहे हे पूर्णपणे माहीत आहे. यहोवा सगळं काही पाहू शकतो. (नीती. १५:३; यिर्म. २३:२४) तसंच, त्याच्याजवळ हजारो-लाखो स्वर्गदूत आहेत आणि त्याचं काम करण्यासाठी तो त्यांना या विश्‍वात कुठेही पाठवू शकतो. स्वर्गदूतांची पारखी नजर असल्यामुळे ते सर्व गोष्टींची अचूक माहिती आपल्या सर्वोच्च अधिकाऱ्‍याला, यहोवाला कळवू शकतात.इब्री लोकांना १:१३, १४ वाचा.

चाकांची रचना अशी होती की ती न वळता कोणत्याही दिशेला जाऊ शकत होती (परिच्छेद १७, १९ पाहा)

१९. रथाच्या वेगावरून आणि वळण्याच्या क्षमतेवरून आपल्याला यहोवाबद्दल आणि त्याच्या संघटनेबद्दल काय शिकायला मिळतं?

१९ तसंच, आपण हेही पाहिलं की रथाला खूप वेग आहे आणि तो कोणत्याही दिशेला जाऊ शकतो. यहोवाच्या संघटनेचा स्वर्गातला भाग आणि मानवी सरकारं, संघटना यांत किती फरक आहे याचा विचार करा. मानवी संघटनांचा सहसा अंदाधुंदी कारभार असतो आणि त्यांना परिस्थितीप्रमाणे लगेच बदल करता येत नाहीत. यामुळे बऱ्‍याच समस्या निर्माण होतात आणि त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरतात. पण यहोवाचा रथ, म्हणजे त्याची संघटना खूप विचार करून काम करते आणि परिस्थितीप्रमाणे लगेच बदल करते. कारण सर्वकाही यहोवाच्या नियंत्रणात आहे. यहोवा आपल्या नावाप्रमाणेच आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी काहीही बनू शकतो. (निर्ग. ३:१३, १४) उदाहरणार्थ, आपल्या लोकांच्या बाजूने लढण्यासाठी तो एक वीर योद्धा बनू शकतो, तर दुसऱ्‍याच क्षणी आपल्या लोकांची पापं माफ करण्यासाठी एक दयाळू पिताही बनू शकतो. तो मनाने खचलेल्या पश्‍चात्तापी लोकांची काळजी घेतो, आणि इतकंच काय तर त्याच्यासोबत पुन्हा एक चांगलं नातं जोडण्यासाठी त्यांना मदतही करतो.—स्तो. ३०:५; यश. ६६:१३.

२०. यहोवाच्या रथाबद्दल विचार केल्यावर आपण विस्मित का होतो आणि आणि आपल्या मनात गाढ आदर का दाटून येतो?

२० यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या त्यांवरून आपण स्वतःला विचारू शकतो: “यहोवाच्या रथाबद्दल विचार करून मी विस्मित होतो का?” आपण लक्षात ठेवलं पाहिजे की रथ यहोवाच्या संघटनेला सूचित करतो आणि ही संघटना खरी असून खूप वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपण जेव्हा एखाद्या समस्येमुळे निराश होतो तेव्हा यहोवा, त्याचा मुलगा आणि हजारो-लाखो स्वर्गदूत आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत असा आपण कधीच विचार करणार नाही. तसंच, देव आपल्या गरजा वेळेवर पूर्ण करेल का, अशी शंकाही आपण मनात आणणार नाही. शिवाय, या अस्थिर जगात अचानक एखादी मोठी समस्या निर्माण झाली, तर यहोवाच्या संघटनेला लगेच आवश्‍यक ते बदल करता येतील का, अशीही शंका आपण घेणार नाही. याउलट, आपण नेहमी लक्षात ठेवू, की यहोवाची संघटना खूप आवेशाने काम करत आहे आणि वेगाने पुढे जात आहे. खरंतर, यहेज्केलला स्वर्गातून एक आवाज ऐकू येतो जो म्हणतो: “गरगर फिरणारी चाकं!” यावरून असं दिसतं, की हा आवाज चाकांना पुढे जाण्याची आज्ञा देत आहे. (यहे. १०:१३) यहोवा आपल्या संघटनेला वेगाने कसं पुढे नेत आहे याचा विचार करून आपण खूप थक्क होतो. पण त्याहीपेक्षा विशेष म्हणजे आपल्या मनात यहोवाबद्दल गाढ आदर दाटून येतो.

रथाचं नियंत्रण करणारा

२१, २२. रथाचे सगळे भाग एकत्र मिळून कसं काम करतात हे समजावून सांगा?

२१ यहेज्केलचं लक्ष आता चाकांच्या वरती असलेल्या गोष्टीकडे जातं. त्याला दिसतं, की “सपाट छतासारखं काहीतरी पसरलेलं होतं. ते बर्फासारखं चमकत असून अतिशय विलक्षण होतं.” (यहे. १:२२) दूरपर्यंत पसरलेलं ते पारदर्शक छत करुबांच्या खूप वर आहे. अशा प्रकारचा रथ पाहून मशीन किंवा यंत्र कसं काम करतं याची चांगली माहिती असणाऱ्‍या व्यक्‍तीलासुद्धा बरेच प्रश्‍न पडू शकतात. जसं की, ‘चाकांच्या वरती असलेल्या छताला कशाचा आधार आहे? चारही चाकं एकमेकांना जोडलेली नसली, तरी ती सोबत पुढे कशी जातात?’ हे लक्षात असू द्या, की हा रथ खरोखरचा नसून, लाक्षणिक आहे. तो यहोवाच्या संघटनेच्या स्वर्गातल्या भागाला चित्रित करतो. तसंच हेही लक्षात घ्या, की “त्या जिवंत प्राण्यांवर कार्य करणारी पवित्र शक्‍ती चाकांमध्येही होती.” (यहे. १:२०, २१) पण ही पवित्र शक्‍ती करुबांवर आणि चाकांवर कशी काम करत होती?

२२ यहोवाची पवित्र शक्‍ती ही विश्‍वातली सगळ्यात सामर्थ्यशाली शक्‍ती आहे. ही क्रियाशील शक्‍ती रथाच्या सगळ्या भागांना एकत्र जोडून ठेवते, त्यांना ताकद देते आणि एकमेकांशी योग्य ताळमेळ ठेवून एकत्र मिळून काम करायला मदत करते. चला आता आपण रथाचं नियंत्रण करणाऱ्‍याकडे लक्ष देऊ या. त्याच्याबद्दल यहेज्केलला काय दिसतं ते पाहू या.

दृष्टान्तात पाहिलेल्या गोष्टींचं वर्णन करण्यासाठी यहेज्केलला शब्दच सूचत नव्हते

२३. यहोवाचं वर्णन करण्यासाठी यहेज्केल कोणते शब्द वापरतो? आणि का?

२३ यहेज्केल १:२६-२८ वाचा. संपूर्ण दृष्टान्ताचं वर्णन करताना यहेज्केल बऱ्‍याचदा, ‘यासारखं,’ ‘स्वरूपासारखं’ किंवा “याच्यासारखं काहीतरी’ असे शब्द वापरतो. पण या वचनांमध्ये तो हे शब्द आणखी जास्त वेळा वापरतो. यावरून असं दिसतं, की दृष्टान्तात तो जे बघत होता ते इतकं विलक्षण होतं, की त्याचं वर्णन करण्यासाठी तो शब्द शोधत होता. यहेज्केलने पाहिलं, की “नीलमण्यासारखं काहीतरी असून ते राजासनासारखं दिसत होतं.” नीलमण्याच्या एकाच अखंड दगडातून राजासन कोरलं आहे याची तुम्ही कल्पना करू शकता का? आणि त्यावर एक महान आणि शक्‍तिशाली व्यक्‍ती बसली आहे. तिचं “स्वरूप माणसाच्या स्वरूपासारखं होतं.”

२४, २५. (क) राजासनाच्या भोवती असलेल्या मेघधनुष्यावरून आपल्याला कशाची आठवण होते? (ख) असे दृष्टान्त पाहून काही विश्‍वासू सेवकांवर कसा परिणाम झाला?

२४ राजासनावर बसलेल्या त्या महान व्यक्‍तीचं, यहोवाचं स्वरूप स्पष्टपणे दिसत नव्हतं. फक्‍त एक धूसरशी आकृती दिसत होती. कारण तिच्या कमरेपासून वरचा आणि खालचा भाग चमकत होता आणि त्यातून आगीसारखं काहीतरी बाहेर निघत होतं. आणि त्यामुळे सगळीकडे तेज पसरलं होतं. खूप तेज असल्यामुळे राजासनावर कोण बसलं आहे हे यहेज्केलला स्पष्ट दिसत नसावं. म्हणून तो आपले डोळे बारीक करून आणि डोळ्यांवर हाताचा आडोसा घेऊन पाहण्याचा प्रयत्न करतो. शेवटी यहेज्केलला दृष्टान्तात अगदी अनोखं आणि विशेष असं काहीतरी दिसतं. त्याबद्दल तो म्हणतो: “त्याच्या भोवती पसरलेलं ते विलक्षण तेज, पावसाळ्याच्या दिवसांत ढगांमध्ये दिसणाऱ्‍या मेघधनुष्यासारखं होतं.” आकाशात मेघधनुष्य पाहिल्यावर आपलं मन किती प्रसन्‍न होतं, नाही का? ते पाहून आपला निर्माणकर्ता किती वैभवशाली आहे याची आपल्याला आठवण होते. ती रंगीबेरंगी कमान पाहून, जलप्रलयानंतर यहोवाने केलेल्या शांतीच्या कराराची आपल्याला आठवण होते. (उत्प. ९:११-१६) यावरून कळतं की यहोवा सगळ्यात शक्‍तिशाली तर आहेच, पण त्यासोबतच तो शांतीचाही देव आहे. (इब्री १३:२०) आणि या गोष्टीचा त्याच्या सेवकांनाही फायदा होतो. तो त्यांना भरपूर शांती देतो.

राजासनाभोवती असलेलं वैभवशाली मेघधनुष्य आपल्याला आठवण करून देतं की आपण शांतीच्या देवाची सेवा करतो (परिच्छेद २४ पाहा)

२५ यहोवाच्या या वैभवाचं तेज पाहून यहेज्केलला कसं वाटलं? त्याने म्हटलं, “मी ते पाहिलं, तेव्हा मी जमिनीवर पालथा पडलो.” त्या वेळी यहेज्केलच्या मनात खूप काही चाललं होतं. एकाच वेळी त्याच्या मनात आदर आणि भीती या भावना होत्या. बायबलमध्ये सांगितलं आहे, की यहोवाकडून दृष्टान्त मिळाल्यावर इतर संदेष्ट्यांनीही असंच काहीसं अनुभवलं होतं. यहोवासमोर आपण किती लहान आहोत याची त्यांना नक्कीच जाणीव झाली असेल आणि त्यांना खूप भीतीही वाटली असेल. (यश. ६:१-५; दानी. १०:८, ९; प्रकटी. १:१२-१७) पण असं असलं, तरी यहोवाने त्यांना दृष्टान्तात जे दाखवलं त्यामुळे त्यांना नंतर खूप बळ मिळालं. यहेज्केलच्या बाबतीतही असंच घडलं असेल. आपण अशा प्रकारचे अहवाल बायबलमधून वाचले, तर आज आपल्यालाही खूप बळ मिळू शकतं.

२६. यहेज्केलला दृष्टान्तामुळे बळ कसं मिळालं असेल?

२६ बाबेलमध्ये राहणाऱ्‍या देवाच्या लोकांचं काय होईल याची यहेज्केलला काळजी वाटत असेल. पण या दृष्टान्तामुळे त्याच्या मनातली शंका दूर होऊन त्याला नक्कीच खूप बळ मिळालं असेल. या दृष्टान्तावरून त्याच्या लक्षात आलं, की यहोवाचे लोक यरुशलेममध्ये असोत, बाबेलमध्ये असोत, किंवा आणखी कुठेही असोत, त्याने काहीच फरक पडत नाही. कारण यहोवाचा वैभवी रथ त्यांच्या मदतीसाठी लगेच कुठेही पोहोचू शकतो. सैतान किंवा त्याच्या अधिकाराखाली असलेली कोणतीही ताकद त्या वैभवी रथाला रोखू शकत नाही, कारण यहोवा स्वतः तो रथ चालवत आहे. (स्तोत्र ११८:६ वाचा.) यहेज्केलने हेही पाहिलं, की रथाची चाकं पृथ्वीला लागत होती. म्हणजेच, स्वर्गातला हा रथ माणसांपासून खूप दूर नाही. (यहे. १:१९) याचाच अर्थ, यहोवा बंदिवासात असलेल्या आपल्या विश्‍वासू लोकांचा सांभाळ करत होता. त्यांची काळजी घेणारा त्यांचा प्रेमळ पिता नेहमी त्यांच्या जवळ असणार होता.

रथाबद्दल विचार करणं का महत्त्वाचं आहे?

२७. यहेज्केलच्या दृष्टान्तावर विचार करणं आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे?

२७ यहेज्केलच्या दृष्टान्ताबद्दल विचार करणं आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे? कारण आज सैतान यहोवाच्या शुद्ध उपासनेवर जास्तच हल्ला करत आहे. तो आपल्याला असा विचार करायला लावतो की आपण एकटे आहोत आणि आपला स्वर्गातला पिता आणि त्याची संघटना आपल्यापासून खूप दूर आहे. पण अशा खोट्या गोष्टींना आपल्या मनात कधीच घर करू देऊ नका. (स्तो. १३९:७-१२) खरंतर आपल्याही भावना यहेज्केलसारख्याच असल्या पाहिजेत. दृष्टान्त पाहून तो थक्क झाला. इतका, की तो जमिनीवर पालथा पडला. असं कदाचित आपल्या बाबतीत घडणार नाही. पण यहोवाच्या संघटनेचा स्वर्गातला भाग किती शक्‍तिशाली, वैभवशाली आणि वेगवान आहे याचा विचार करून आपण खरंच चकित होतो. तसंच, तो रथ न वळता कुठल्याही दिशेला कसा जाऊ शकतो आणि परिस्थितीशी लगेच कसा जुळवून घेऊ शकतो, याचाही विचार करून आपल्या मनात खूप आदर दाटून येतो.

२८, २९. गेल्या शंभरएक वर्षांत यहोवाचा रथ वेगाने पुढे जात आहे असं का म्हणता येईल?

२८ लक्षात घ्या, यहोवाच्या संघटनेचा एक भाग पृथ्वीवरही आहे. हा भाग अपरिपूर्ण माणसांनी बनलेला आहे. तरीसुद्धा यहोवाने त्यांचा वापर करून पृथ्वीवर किती मोठमोठ्या गोष्टी साध्य केल्या आहेत याचा विचार करा. या गोष्टी माणसांना स्वतःच्या बळावर साध्य करता आल्या नसत्या, पण यहोवामुळेच त्या साध्य झाल्या. (योहा. १४:१२) आपण जर परमेश्‍वर का राज हुकूमत कर रहा है! या पुस्तकावर एक ओझरती नजर जरी टाकली, तरी गेल्या शंभरएक वर्षांत प्रचाराचं काम किती मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आहे हे आपल्या लक्षात येतं. तसंच, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी संघटनेने खऱ्‍या उपासकांना प्रशिक्षण दिलं आहे, अनेक कोर्ट केस जिंकल्या आहेत आणि नवनवीन टेक्नोलॉजीचा वापर केला आहे हेही आपल्या लक्षात येतं.

२९ यहोवाची शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी या शेवटच्या काळात काय-काय करण्यात आलं आहे याचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा यहोवाचा रथ किती वेगाने पुढे जात आहे हे आणखी चांगल्या प्रकारे आपल्याला लक्षात येतं. खरंच, या संघटनेचा भाग असणं आणि सर्वोच्च देव यहोवा याची उपासना करणं हा आपल्यासाठी किती मोठा बहुमान आहे!—स्तो. ८४:१०.

यहोवाच्या संघटनेचा पृथ्वीवरचा भाग खूप वेगाने पुढे जातच आहे (परिच्छेद २८, २९ पाहा)

३०. आपण पुढच्या अध्यायात काय पाहणार आहोत?

३० यहेज्केलच्या दृष्टान्तातून आणखी बरंच काही शिकण्यासारखं आहे. पुढच्या अध्यायात आपण चार ‘जिवंत प्राण्यांबद्दल,’ म्हणजेच करुबांबद्दल जास्त माहिती घेऊ या. तसंच, त्यांच्याकडून आपला वैभवशाली आणि सर्वोच्च देव यहोवा याच्याबद्दल आपल्याला काय शिकायला मिळेल तेही पाहू या.

a हा कमी अंतराचा सरळ मार्ग होता. पण बंदिवानांना ज्या मार्गाने नेण्यात आलं त्याचं अंतर कदाचित दुप्पट, म्हणजे जवळपास १६०० कि.मी. इतकं होतं.