व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ६

“तुमचा अंत जवळ आलाय”

“तुमचा अंत जवळ आलाय”

यहेज्केल ७:३

अध्याय कशाबद्दल आहे: यरुशलेमला शिक्षा देण्याबद्दलची यहोवाची भविष्यवाणी कशी पूर्ण झाली

१, २. (क) यहेज्केल कसा वागतो? (सुरुवातीचं चित्र पाहा.) (ख) त्याच्या त्या वागण्याचा काय अर्थ होता?

 बाबेलच्या बंदिवासात राहणाऱ्‍या यहुदी लोकांमध्ये एक बातमी वाऱ्‍यासारखी पसरते. ती म्हणजे, यहेज्केल संदेष्टा खूप विचित्र वागत आहे. सात दिवसांपर्यंत तो त्या बंदिवानांमध्ये काहीही न बोलता नुसताच भयचकित होऊन बसला होता. मग अचानक तो उठतो आणि स्वतःला आपल्या घरामध्ये कोंडून घेतो. त्याचं हे वागणं पाहून आजूबाजूचे लोक गोंधळात पडतात. तितक्यात तो बाहेर येतो, एक वीट उचलतो आणि ती समोर ठेवून तिच्यावर काहीतरी कोरू लागतो. मग एक शब्दही न बोलता तो त्या विटेभोवती एक छोटीशी भिंत किंवा कुंपण बांधू लागतो.—यहे. ३:१०, ११, १५, २४-२६; ४:१, २.

त्याला पाहणाऱ्‍या लोकांची गर्दी आणखीनच वाढली असेल आणि त्यांना प्रश्‍न पडला असेल, ‘या सगळ्याचा काय अर्थ होतो?’ यहेज्केलचं विचित्र वागणं खरंतर एक भविष्यवाणी आहे हे यहुद्यांना नंतर कळणार होतं. लवकरच यहोवाचा क्रोध त्यांच्यावर भडकणार होता आणि एक भयंकर घटना त्यांच्यासोबत घडणार होती. ती घटना नेमकी काय होती? इस्राएल राष्ट्रावर तिचा काय परिणाम झाला? आणि आज शुद्ध उपासना करणारे त्यातून काय शिकू शकतात?

‘एक वीट घे, गहू घे, एक धारदार तलवार घे’

३, ४. (क) शिक्षेबद्दलच्या कोणत्या तीन गोष्टी यहेज्केलला दाखवायच्या होत्या? (ख) यरुशलेमला वेढा पडेल याचा यहेज्केलने अभिनय कसा करून दाखवला?

इ.स.पू. ६१३ च्या आसपास, यहोवाने यरुशलेमला मिळणाऱ्‍या शिक्षेबद्दलच्या तीन गोष्टी यहेज्केलला सांगितल्या. आणि त्याला लोकांना त्या चिन्हांच्या रूपात करून दाखवायच्या होत्या. त्या तीन गोष्टी म्हणजे, शहराला वेढा पडणार होता, तिथल्या लोकांचे खूप हाल होणार होते, आणि शहराचा व तिथल्या लोकांचा नाश होणार होता. a चला या तीन गोष्टींबद्दल आपण आणखी माहिती घेऊ या.

यरुशलेमला वेढा पडणार होता. यहोवाने यहेज्केलला सांगितलं, “तू एक वीट घे आणि ती आपल्या समोर ठेव . . . नंतर तिला वेढा घाल.” (यहेज्केल ४:१-३ वाचा.) ती वीट यरुशलेमला तर यहेज्केल हा बाबेलच्या सैन्याला सूचित करत होता. या सैन्याद्वारेच यहोवा यरुशलेमचा नाश करणार होता. मग यहोवाने यहेज्केलला एक लहानशी भिंत उभारायला, दगडमातीचा ढिगारा रचायला आणि तट पाडणारी यंत्रं बनवायला सांगितली. नंतर त्या सगळ्या गोष्टी यहोवाने त्याला विटेभोवती ठेवायला सांगितल्या. या सर्व वस्तू युद्धाच्या साधनांना सूचित करत होत्या. यरुशलेमला वेढा घालण्यासाठी आणि त्यावर हल्ला करण्यासाठी शत्रू सैन्य त्यांचा वापर करणार होतं. शत्रू सैन्य लोखंडासारखं ताकदवान आहे हे दाखवण्यासाठी नंतर यहेज्केलला त्याच्या आणि विटेच्या (शहराच्या) मधे एक “लोखंडी तवा,” ठेवायला सांगण्यात आलं. मग यहोवाने त्याला त्या विटेकडे, म्हणजेच शहराकडे ‘तोंड करायला’ सांगितलं. या सगळ्या गोष्टी इस्राएलच्या घराण्यासाठी एक चिन्ह असणार होत्या. त्यांनी कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी घडणार होत्या. यहोवा शत्रू सैन्याचा वापर करून यरुशलेमला वेढा घालणार होता. हे खरंतर देवाच्या लोकांचं मुख्य शहर होतं आणि तिथेच यहोवाचं मंदिरही होतं.

५. यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या लोकांची अवस्था कशी होणार होती हे दाखवण्यासाठी यहेज्केलने काय केलं?

यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या लोकांचे हाल होणार होते. यहोवाने यहेज्केलला म्हटलं: “तू गहू, जव, पावटा, मसूर, बाजरी आणि खपली गहू एका भांड्यात घे आणि त्यांपासून स्वतःसाठी भाकरी तयार कर. . . . तू दररोज २० शेकेल [जवळपास २३० ग्राम] भाकरी मोजून घे.” पुढे तो असंही म्हणाला, “मी यरुशलेममधला अन्‍नपुरवठा बंद करतोय.” (यहे. ४:९-१६) या दृश्‍यात यहेज्केल बाबेलच्या सैन्याला नाही तर यरुशलेमच्या लोकांना चित्रित करत आहे. यहेज्केलला दाखवायचं होतं, की यरुशलेमला वेढा पडेल तेव्हा शहरात अन्‍नाचा तुटवडा होईल. इस्राएली लोक वेगवेगळ्या धान्यांचं विचित्र मिश्रण करून भाकरी तयार करतील. यावरून कळतं, की त्यांना मिळेल ते खावं लागणार होतं. हा दुष्काळ किती भयानक असणार होता? याचं उत्तर यहोवाने यहेज्केलद्वारे दिलं. तो जणू थेट यरुशलेमच्या लोकांना म्हणत होता: “तुझ्यातले वडील आपल्या मुलांना खातील, आणि मुलं आपल्या वडिलांना खातील.” आणि शेवटी शहरातले बरेच जण दुष्काळाच्या ‘जीवघेण्या बाणांमुळे’ कमजोर होऊन ‘मरून जातील.’—यहे. ४:१७; ५:१०, १६.

६. (क) यहेज्केलने एकाच वेळी कोणत्या दोन भूमिका करून दाखवल्या? (ख) केसांचं वजन करून त्यांचे तीन भाग करणं कशाला सूचित करतं?

यरुशलेम आणि तिथल्या लोकांचा नाश होणार होता. भविष्यवाणीच्या या भागात यहेज्केल एकाच वेळी दोन भूमिकांचा अभिनय करून दाखवतो. सगळ्यात आधी, यहोवा काय करेल हे तो करून दाखवतो. यहोवाने त्याला म्हटलं, ‘तू स्वतःसाठी एक धारदार तलवार घे आणि न्हाव्याच्या वस्तऱ्‍यासारखं तिला वापर.’ (यहेज्केल ५:१, २ वाचा.) यहेज्केलने ज्या हातात तलवार धरली आहे तो यहोवाच्या हाताला सूचित करतो. म्हणजेच, यहोवा बाबेलच्या सैन्याद्वारे यरुशलेमच्या लोकांना कशी शिक्षा करेल हे सूचित होतं. नंतर, यहुदी लोकांच्या बाबतीत काय घडेल याचा यहेज्केल अभिनय करून दाखवतो. यहोवा त्याला म्हणतो, “आपल्या डोक्यावरचे केस आणि दाढी कापून टाक.” यहेज्केलचे केस यरुशलेमच्या लोकांना चित्रित करतात. आणि केस काढून टाकणं, हे यरुशलेमच्या लोकांवर कसा हल्ला होईल आणि ते कसे मारले जातील याला सूचित करतं. पुढे यहोवा त्याला आज्ञा देतो, “एक तराजू घे आणि त्या केसांचं वजन करून त्यांचे तीन समान भाग कर.” यावरून कळतं, की यरुशलेमचा नाश अंदाधुंद किंवा कसाही होणार नव्हता, तर यहोवा तो अगदी विचार करून आणि पूर्णपणे करणार होता.

७. यहोवाने यहेज्केलला केसांचे तीन भाग करून प्रत्येक भागाच्या बाबतीत काहीतरी वेगळं करायला का सांगितलं?

  यहोवाने यहेज्केलला केसांचे तीन भाग करायला आणि प्रत्येक भागाच्या बाबतीत काहीतरी वेगळं करायला का सांगितलं? (यहेज्केल ५:७-१२ वाचा.) यरुशलेमच्या लोकांच्या बाबतीत कोणत्या वेगवेगळ्या गोष्टी घडतील हे दाखवण्यासाठी यहोवाने त्याला असं करायला सांगितलं. यहेज्केलने केसांचा एक भाग “शहरामध्ये” जाळून टाकला. यावरून त्याला लोकांना हे दाखवायचं होतं, की काही जण शहरातच मरतील. मग दुसरा भाग त्याने “शहराभोवती” तलवारीने छाटून टाकला. याचा अर्थ, काही लोक शहराबाहेर मारले जातील. आणि शेवटचा भाग त्याने वाऱ्‍यावर उधळून दिला. याचा अर्थ, काही लोकांची इतर राष्ट्रांमध्ये पांगापांग होईल, पण तरी “तलवार” त्यांचा पाठलाग करेल. म्हणजेच, हे वाचलेले लोक कुठेही गेले तरी ते शांतीने राहू शकणार नाहीत.

८. (क) यहेज्केलने केलेल्या अभिनयातून कोणती आशा मिळाली? (ख) ‘काही केस कपड्यात बांधण्याची’ भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?

पण यहेज्केलने ज्या भविष्यवाणीचा अभिनय केला त्यात एक आशेचा किरणही होता. यहोवाने यहेज्केलला म्हटलं: “काही केस घेऊन ते तुझ्या कपड्यात बांध.” (यहे. ५:३) याचा अर्थ असा होता, की राष्ट्रांमध्ये पांगापांग झालेल्या यहुद्यांपैकी काही जण वाचतील. म्हणजेच, बाबेलमधल्या ७० वर्षांच्या बंदिवासानंतर काही जण यरुशलेमला परत येतील. (यहे. ६:८, ९; ११:१७) ही भविष्यवाणी पूर्ण झाली का? नक्कीच. बाबेलमधला बंदिवास संपल्याच्या बऱ्‍याच वर्षांनंतर हाग्गय संदेष्ट्याने सांगितलं, की ज्यांची राष्ट्रांमध्ये पांगापांग झाली होती, त्यांच्यापैकी काही जण यरुशलेमला परत आले. ज्या वृद्धजनांनी “जुनं मंदिर,” म्हणजे शलमोनचं मंदिर पाहिलं होतं ते परत आले. (एज्रा ३:१२, हाग्ग. २:१-३) यहोवाने वचन दिल्याप्रमाणे शुद्ध उपासना पूर्णपणे नाहीशी होणार नाही, तर ती टिकून राहील याची त्याने काळजी घेतली. यरुशलेममध्ये शुद्ध उपासना पुन्हा कशी सुरू झाली, याबद्दल आपण या पुस्तकाच्या ९ व्या अध्यायात आणखी जाणून घेणार आहोत.—यहे. ११:१७-२०.

ही भविष्यवाणी पुढे होणाऱ्‍या घटनांबद्दल काय सांगते?

९, १०. यहेज्केलने केलेल्या भविष्यवाण्या आपल्याला पुढे होणाऱ्‍या कोणत्या महत्त्वाच्या घटनांची आठवण करून देतात?

यहेज्केलने ज्या गोष्टींचा अभिनय केला त्यावरून भविष्यात घडणाऱ्‍या घटनांची आपल्याला आठवण होते. त्यांपैकी काही घटना कोणत्या आहेत? प्राचीन यरुशलेम शहराच्या बाबतीत जे घडलं ते लवकरच पृथ्वीवरच्या सर्व धार्मिक संघटनांच्या बाबतीतही घडेल. यहोवा राजकीय सत्तांचा उपयोग करून त्यांच्यावर हल्ला करेल. पण असं काही घडेल याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. (प्रकटी. १७:१६-१८) यरुशलेमवर आलेलं ‘संकट हे असं संकट होतं जे त्यापूर्वी कधीही आलं नव्हतं.’ मोठं संकटसुद्धा “सुरुवातीपासून आतापर्यंत आलं नाही” असं असणार आहे. आणि मग शेवटी हर्मगिदोनचं युद्ध होईल.—यहे. ५:९; ७:५; मत्त. २४:२१.

१० बायबलमधून कळतं, की खोट्या धार्मिक संघटनांचा जेव्हा नाश होईल तेव्हा त्यांतले बरेच लोक वाचतील. ते लोक खूप घाबरलेले असतील आणि समाजातल्या सर्व स्तरांच्या लोकांसोबत लपण्यासाठी जागा शोधतील. (जख. १३:४-६; प्रकटी. ६:१५-१७) त्यांची परिस्थिती प्राचीन यरुशलेम शहरातल्या त्या लोकांसारखी होईल जे नाशातून वाचले होते. नाशातून वाचलेले ते लोक ‘वाऱ्‍यावर उधळले’ गेले होते, म्हणजे वेगवेगळ्या राष्ट्रांत त्यांची पांगापांग झाली होती.  परिच्छेद ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे काही काळासाठी त्यांचा जीव वाचला खरा, पण यहोवाने “तलवार उपसून त्यांचा पाठलाग” केला. (यहे. ५:२) अगदी तसंच, जे लोक खोट्या धर्माच्या नाशातून वाचतील ते कुठेही लपले, तरी यहोवाच्या तलवारीपासून वाचणार नाहीत. आणि हर्मगिदोनच्या युद्धात, ‘बकऱ्‍यांसारखी’ मनोवृत्ती दाखवणाऱ्‍या लोकांसोबत त्यांचाही नाश केला जाईल.—यहे. ७:४; मत्त. २५:३३, ४१, ४६; प्रकटी. १९:१५, १८.

आनंदाचा संदेश  सांगायच्या बाबतीत आपण जणू काही ‘मुके’ होऊ

११, १२. (क) यहेज्केलच्या भविष्यवाणीवरून आपल्याला सेवाकार्याबद्दल काय कळतं? (ख) भविष्यात आपल्या संदेशात कदाचित कोणता बदल होऊ शकतो?

११ यहेज्केलने जी भविष्यवाणी केली त्यावरून सेवाकार्याबद्दल आणि ते आताच करणं का महत्त्वाचं आहे याबद्दल काय कळतं? हेच, की लोकांना यहोवाचे सेवक बनायला मदत करण्यासाठी आपण आज पुरेपूर मेहनत घेतली पाहिजे. पण हे आत्ताच करणं का गरजेचं आहे? कारण “सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य” बनवण्यासाठी खूप कमी वेळ उरला आहे. (मत्त. २८:१९, २०; यहे. ३३:१४-१६) खोट्या धर्मावर जेव्हा ‘शिक्षेच्या छडीचा’ (राजकीय सत्तांचा) हल्ला होईल, त्यानंतर आपण तारणाचा संदेश देणार नाही. (यहे. ७:१०) यहेज्केल काही काळासाठी मुका झाला होता, म्हणजेच संदेश सांगत नव्हता. त्याचप्रमाणे आपणही आनंदाचा संदेश सांगायच्या बाबतीत ‘मुके’ होऊ. (यहे. ३:२६, २७; ३३:२१, २२) खोट्या धर्माचा जेव्हा नाश केला जाईल तेव्हा लोक “संदेष्ट्याकडून दृष्टान्ताची अपेक्षा करतील.” म्हणजेच, आपला जीव वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे शोधण्याची ते धडपड करतील; पण त्यांना ती माहिती मिळणार नाही. (यहे. ७:२६) कारण तोपर्यंत ती मिळण्याची आणि ख्रिस्ताचे शिष्य बनण्याची वेळ निघून गेलेली असेल.

१२ पण त्या वेळी प्रचाराचं आपलं काम थांबणार नाही. का नाही? कारण मोठ्या संकटाच्या वेळी आपण कदाचित न्यायदंडाचा, म्हणजेच शिक्षेचा संदेश द्यायला सुरुवात करू, जो ‘गारांच्या पीडेसारखा’ असेल. या संदेशामुळे अगदी स्पष्ट होईल, की या दुष्ट जगाचा अंत जवळ आला आहे.—प्रकटी. १६:२१.

“पाहा! अंत येतोय”

१३. यहोवाने यहेज्केलला डाव्या कुशीवर आणि उजव्या कुशीवर झोपायला का सांगितलं?

१३ यरुशलेमचा नाश कसा होईल हे तर यहेज्केल दाखवतोच, पण तो कधी होईल हेसुद्धा तो दाखवतो. यहोवाने सांगितल्याप्रमाणे यहेज्केल त्याच्या डाव्या कुशीवर ३९० दिवस आणि उजव्या कुशीवर ४० दिवस झोपतो. इथे प्रत्येक दिवस एका वर्षाला सूचित करतो. (यहेज्केल ४:४-६ वाचा; गण. १४:३४) यहेज्केल कदाचित दिवसातून काही तासच असा झोपला असेल. या अभिनयावरून यरुशलेमचा नाश नेमक्या कोणत्या वर्षी होईल ते आपल्याला कळतं. इस्राएल राष्ट्राने ३९० वर्षं यहोवाविरुद्ध पाप केलं आणि ती वर्षं कदाचित इ.स.पू. ९९७ मध्ये सुरू झाली असावीत. कारण त्या वर्षी इस्राएलच्या १२ वंशांनी बनलेल्या राज्याचे दोन भाग झाले. (१ राजे १२:१२-२०) यहूदा राष्ट्राने ४० वर्षं यहोवाविरुद्ध पाप केलं आणि त्या ४० वर्षांची सुरुवात इ.स.पू. ६४७ मध्ये झाली. कारण त्याच वर्षी यहूदा राष्ट्राला नाशाबद्दलचा इशारा देण्यासाठी यिर्मया संदेष्ट्याला नेमण्यात आलं होतं. (यिर्म. १:१, २, १७-१९; १९:३, ४) अशा प्रकारे, इस्राएलचे ३९० दिवस आणि यहूदाचे ४० दिवस इ.स.पू. ६०७ मध्ये संपणार होते, आणि त्याच वर्षी यहोवाने सांगितल्याप्रमाणे यरुशलेमचा नाश झाला. b

यरुशलेमचा नाश नेमक्या कोणत्या वर्षी होईल हे यहेज्केलने कसं दाखवलं? (परिच्छेद १३ पाहा)

१४. (क) यहोवा आपलं वचन वेळेवर पूर्ण करेल यावर भरवसा असल्याचं यहेज्केलने कसं दाखवलं? (ख) यरुशलेमच्या नाशाआधी काय घडणार होतं?

१४ यहेज्केलला जेव्हा ३९० आणि ४० दिवसांबद्दलची भविष्यवाणी देण्यात आली, तेव्हा यरुशलेमचा नाश नेमक्या कोणत्या वर्षी होईल हे त्याला समजलं नसेल. पण यरुशलेमचा नाश होण्याच्या काही वर्षांपूर्वी तो यहुद्यांना वारंवार इशारा देत राहिला, की यहोवा त्यांना शिक्षा करणार आहे. त्याने म्हटलं, “तुमचा अंत जवळ आलाय.” (यहेज्केल ७:३, ५-१० वाचा.) यहोवाने जे सांगितलं ते तो त्याच्या योग्य वेळी करेल याबद्दल यहेज्केलला जराही शंका नव्हती. (यश. ४६:१०) शिवाय, यरुशलेमच्या नाशाआधी कोणकोणत्या घटना घडतील हेसुद्धा यहेज्केलने सांगितलं. त्याने म्हटलं की “एकापाठोपाठ एक संकट कोसळेल.” या घटनांमुळे समाजातली परिस्थिती खूप वाईट होणार होती, धर्मगुरू आपल्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करणार नव्हते आणि शासनकांना लोकांवर राज्य करणं कठीण जाणार होतं.—यहे. ७:११-१३, २५-२७.

यरुशलेमला वेढा पडला तेव्हा ते ‘चुलीवर ठेवलेल्या मोठ्या कढईसारखं’ झालं (परिच्छेद १५ पाहा)

१५. यहेज्केलच्या भविष्यवाणीतले कोणते भाग इ.स.पू. ६०९ पासून पूर्ण व्हायला सुरू झाले?

१५ यहेज्केलने यरुशलेमच्या नाशाची भविष्यवाणी केल्याच्या काही वर्षांनंतरच ती पूर्ण होऊ लागली. इ.स.पू. ६०९ मध्ये यहेज्केलला माहीत पडलं, की यरुशलेमवर हल्ला व्हायला सुरुवात झाली आहे. शहराचा बचाव करण्यासाठी लोकांनी एकत्र यावं म्हणून कर्णा फुंकण्यात आला, ‘पण युद्ध करायला कोणीही गेलं नाही.’ (यहे. ७:१४) यरुशलेमवर हल्ला करणाऱ्‍या बाबेलच्या सैन्यासोबत लढण्यासाठी शहरातला एकही जण पुढे आला नाही. काही यहुद्यांना असं वाटलं असेल, की यहोवा त्यांच्या मदतीला धावून येईल. कारण पूर्वी अश्‍शूरच्या लोकांनी यरुशलेमला धमकावलं होतं, तेव्हा यहोवा त्यांच्या मदतीला धावून आला होता. त्या वेळी एका स्वर्गदूताने त्यांच्या सैन्यातल्या बहुतेक लोकांना मारून टाकलं होतं. (२ राजे १९:३२) पण या वेळी कोणताही स्वर्गदूत त्यांच्या मदतीला आला नाही. काही काळातच ते शहर, “चुलीवर” ठेवलेल्या एका मोठ्या ‘कढईसारखं’ झालं, आणि त्या शहरातले लोक कढईत शिजत असलेल्या ‘मांसाच्या तुकड्यांसारखे’ झाले. (यहे. २४:१-१०) अठरा महिने यरुशलेमला वेढा पडला त्या काळात शहरातल्या लोकांचे भयंकर हाल झाले, आणि त्यानंतर यरुशलेमचा नाश झाला.

‘स्वर्गात स्वतःसाठी संपत्ती साठवा’

१६. यहोवा वेळेचा पक्का आहे यावर आपला भरवसा असल्याचं आपण कसं दाखवू शकतो?

१६ यहेज्केलच्या भविष्यवाणीच्या ज्या भागाची आपण नुकतीच चर्चा केली, त्यातून प्रचार कार्याबद्दल आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे ते आपण शिकतो. तसंच, आपल्याला हेही समजतं, की आपण ज्यांना प्रचार करतो त्यांच्याबद्दल आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. यहोवाने खोट्या धर्माच्या नाशाची वेळ ठरवली आहे. आणि या वेळीसुद्धा ती चुकणार नाही, कारण यहोवा वेळेचा पक्का आहे. (२ पेत्र ३:९, १०; प्रकटी. ७:१-३) हे खरं आहे, की खोट्या धर्माच्या नाशाची नेमकी तारीख आपल्याला माहीत नाही. पण यहोवाने सांगितल्यानुसार, यहेज्केलसारखंच आपण लोकांना वारंवार इशारा देत राहतो, की “अंत जवळ आलाय.” पण वारंवार हा संदेश सांगायची काय गरज आहे? यहेज्केल ज्या कारणासाठी लोकांना संदेश सांगत होता, त्याच कारणासाठी आपण तो वारंवार सांगतो. c तो जेव्हा लोकांना यरुशलेमच्या नाशाबद्दलची भविष्यवाणी सांगत होता, तेव्हा बहुतेकांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही. (यहे. १२:२७, २८) पण नंतर, बाबेलच्या बंदिवासात असताना काही यहुद्यांची मनोवृत्ती बदलली. त्यांनी पश्‍चात्ताप केला आणि ते आपल्या मायदेशी परत आले. (यश. ४९:८) आजसुद्धा आपण ज्यांना प्रचार करतो त्यांपैकी अनेक जण या गोष्टीवर विश्‍वास ठेवत नाही, की जगाचा अंत होणार आहे. (२ पेत्र ३:३, ४) असं असलं, तरी लोकांनी आपला संदेश ऐकावा म्हणून यहोवाने जो काही वेळ दिला आहे, तो संपत नाही तोपर्यंत आपण प्रामाणिक मनाच्या लोकांना संदेश सांगत राहिलं पाहिजे. कारण त्यामुळे त्यांना जीवनाकडे जाणाऱ्‍या रस्त्यावर चालायला मदत होईल.—मत्त. ७:१३, १४; २ करिंथ. ६:२.

आज बरेच जण आपला संदेश ऐकत नसले, तरी आपण प्रामाणिक मनाच्या लोकांना शोधत राहतो (परिच्छेद १६ पाहा)

यरुशलेमच्या लोकांनी “आपली चांदी रस्त्यावर फेकून” का दिली? (परिच्छेद १७ पाहा)

१७. मोठ्या संकटाच्या वेळी आपण कोणत्या घटना घडताना पाहू?

१७ यहेज्केलच्या भविष्यवाणीतून आपल्याला हेसुद्धा कळतं, की धार्मिक संघटनांवर जेव्हा हल्ला होईल, तेव्हा त्यांचे सदस्य आपापल्या धर्मांचं संरक्षण करण्यासाठी ‘युद्ध करायला जाणार नाहीत.’ उलट ते जेव्हा मदतीसाठी “प्रभू, प्रभू,” अशी हाक मारतील तेव्हा त्यांना जाणवेल, की कोणीच उत्तर देत नाही. आणि त्यामुळे “त्यांचे हात लुळे पडतील” आणि ‘भीतीने त्यांचा थरकाप उडेल.’ (यहे. ७:३, १४, १७, १८; मत्त. ७:२१-२३) याशिवाय, ते आणखी काय करतील? (यहेज्केल ७:१९-२१ वाचा.) प्राचीन यरुशलेम शहरातल्या लोकांबद्दल यहोवाने जे म्हटलं होतं, तेच ते मोठ्या संकटाच्या वेळी करतील: “ते आपली चांदी रस्त्यावर फेकून देतील.” कारण त्यांच्या लक्षात येईल, की पैसा त्यांना येणाऱ्‍या संकटापासून वाचवू शकत नाही.

१८. योग्य गोष्टींना महत्त्व देण्याबद्दल आपण यहेज्केलच्या भविष्यवाणीतून काय शिकतो?

१८ यहेज्केलच्या भविष्यवाणीच्या या भागातून आपल्याला एक खूप महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे, आपण योग्य गोष्टींना जीवनात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. विचार करा: यरुशलेमच्या लोकांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण जेव्हा त्यांना समजलं, की आता त्यांचा आणि त्यांच्या शहराचा नाश होणार आहे आणि त्यांची धनसंपत्ती त्यांना वाचवू शकणार नाही, तेव्हा कुठे ते भानावर आले. आणि मग ते जीवनात योग्य गोष्टींना महत्त्व देऊ लागले. त्यांनी आपली धनसंपत्ती फेकून दिली आणि ते “संदेष्ट्याकडून दृष्टान्ताची अपेक्षा” करू लागले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. (यहे. ७:२६) याच्या अगदी उलट, आपल्याला याची पूर्ण जाणीव आहे, की या दुष्ट जगाचा अंत अगदी जवळ आहे. देवाच्या अभिवचनांवर आपला विश्‍वास असल्यामुळे आपण जीवनात योग्य गोष्टींना जास्त महत्त्व देतो. म्हणजेच, आपण आध्यात्मिक धन मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो, कारण त्याचं मोल नेहमी टिकून राहतं आणि ते कधीच “रस्त्यावर” फेकून दिलं जाणार नाही.—मत्तय ६:१९-२१, २४ वाचा.

१९. यहेज्केलच्या भविष्यवाणीतून आपल्याला काय-काय शिकायला मिळालं?

१९ तर, यहेज्केलने यरुशलेमच्या नाशाबद्दल जी भविष्यवाणी केली त्यातून आपल्याला काय-काय शिकायला मिळालं? थोडक्यात, आपण शिकलो की लोकांना देवाचे सेवक बनायला मदत करण्यासाठी फार कमी वेळ उरला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून आपण शिष्य बनवण्याचं काम आणखी आवेशाने केलं पाहिजे. खरंच, जेव्हा प्रामाणिक मनाचे लोक आपल्या पित्याची, यहोवाची उपासना करू लागतात तेव्हा आपल्याला आनंद होत नाही का? नक्कीच होतो. पण ज्यांना यहोवाबद्दल शिकायची इच्छा नाही अशांनासुद्धा आपण यहेज्केलप्रमाणेच इशारा देत राहिलं पाहिजे, की “अंत जवळ आलाय.” (यहे. ३:१९, २१; ७:३) हे सगळं करत असताना यहोवावर पूर्ण भरवसा ठेवायचा आपण पक्का निर्धार केला पाहिजे. आणि त्याच्या शुद्ध उपासनेला आपण आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे.—स्तो. ५२:७, ८; नीति. ११:२८; मत्त. ६:३३.

a यहेज्केलने ही सगळी चिन्हं अभिनयाच्या रूपात लोकांसमोर करून दाखवली असं आपण म्हणू शकतो. कशावरून? कारण काही गोष्टी, जसं की भाकर बनवणं आणि सामान घेऊन बाहेर पडणं, या गोष्टी यहोवाने त्याला “लोकांसमोर” किंवा “त्यांच्यादेखत” करायला सांगितल्या होत्या.—यहे. ४:१२; १२:७.

b यहोवाने बाबेलच्या लोकांना यरुशलेमचा नाश करू दिला. असं करून त्याने यहूदाच्या दोन वंशांच्या राज्यालाच नाही, तर इस्राएलच्या दहा वंशांच्या राज्यालाही शिक्षा दिली. (यिर्म. ११:१७; यहे. ९:९, १०) इन्साइट ऑन द स्क्रिपचर्स, खंड १, पृ. ४६२ वर, “इ.स.पू. ९९७ ते यरुशलेमच्या नाशापर्यंतचा घटनाक्रम” पाहा.

c यहेज्केल ७:५-७ यांत यहोवाने “येत आहे,” “आली आहे,” “येतोय” अशा प्रकारचे शब्द वारंवार वापरले. या तीन वचनांत हे शब्द इतक्या वेळा आले आहेत, की त्यावरून हा संदेश किती महत्त्वाचा आहे हे कळतं.