व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ११

‘मी तुला पहारेकरी म्हणून नेमलंय’

‘मी तुला पहारेकरी म्हणून नेमलंय’

यहेज्केल ३३:७

अध्याय कशाबद्दल आहे: यहोवा एक पहारेकरी नेमतो आणि त्याची जबाबदारी काय आहे, हे त्याला सांगतो

१. यहोवाने नेमलेले पहारेकरी बऱ्‍याच वर्षांपासून काय काम करत होते, आणि त्यानंतर काय घडतं?

 यरुशलेमच्या भिंतीवर एक पहारेकरी उभा आहे. मावळत्या सूर्याची किरणं त्याच्या डोळ्यांवर पडत आहेत. पण डोळ्यांवर हाताचा आडोसा घेऊन दुरून कोण येत आहे, हे तो पाहण्याचा प्रयत्न करतो. मग पटकन तो कर्णा उचलतो आणि मोठा श्‍वास घेऊन तो फुंकतो. बाबेलचं सैन्य हल्ला करायला येत असल्याचा तो इशारा आहे! पण आता शहरातल्या लोकांसाठी फार उशीर झाला आहे, ते वाचू शकत नाहीत. कारण १०० पेक्षा जास्त वर्षांपासून यहोवाचे पहारेकरी, म्हणजे संदेष्टे त्यांना या दिवसाबद्दल बजावत आले होते. पण लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आता बाबेलच्या सैन्याने शहराला सर्व बाजूंनी वेढलं आहे. मग अनेक महिने शहराला वेढा घातल्यानंतर, सैनिक भिंती फोडून आत शिरतात, मंदिराचा नाश करतात, लोकांची कत्तल करतात आणि बऱ्‍याच जणांना बंदी बनवून नेतात. यहोवाची उपासना करण्याऐवजी लोकांनी मूर्तींची उपासना केली आणि याचेच भयानक परिणाम ते भोगत आहेत.

२, ३. (क) लवकरच पृथ्वीवरच्या लोकांसोबत काय घडणार आहे? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

आज आपल्या काळात, यहोवाचं स्वर्गातलं सैन्य पृथ्वीवरच्या अविश्‍वासू लोकांचा नाश करण्यासाठी वेगाने येत आहे. (प्रकटी. १७:१२-१४) हा नाश मोठ्या संकटाच्या शेवटी घडेल आणि जगाच्या इतिहासातलं हे सर्वात भयानक संकट असेल. (मत्त. २४:२१) पण अजूनही उशीर झालेला नाही. यहोवाने नेमलेल्या पहारेकऱ्‍यांच्या इशाऱ्‍याकडे जर लोकांनी लक्ष दिलं, तर त्यांचा जीव वाचू शकतो.

पण आपल्याला प्रश्‍न पडू शकतो, की यहोवाने पहारेकरी का नेमले? पहारेकरी कोणत्या प्रकारचा संदेश देतो? पहारेकरी म्हणून आजपर्यंत कोणी-कोणी काम केलं? आणि आज आपली भूमिका काय आहे? म्हणून आता आपण या प्रश्‍नांवर चर्चा करू या.

“तू माझ्या वतीने त्यांना बजावून सांग”

४. यहोवाने पहारेकरी का नेमले? (सुरुवातीचं चित्र पाहा.)

यहेज्केल ३३:७ वाचा. प्राचीन काळात लोकांचं धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी पहारेकरी सहसा शहराच्या भिंतींवर उभे असायचे. या व्यवस्थेमुळे दिसून यायचं की शहराच्या शासकाला आपल्या प्रजेची काळजी आहे. जेव्हा पहारेकरी रात्री अचानक रणशिंग वाजवायचा तेव्हा बऱ्‍याचदा लोक घाबरून, खडबडून जागे व्हायचे. पण त्याने दिलेल्या इशाऱ्‍याकडे लोकांनी लक्ष दिलं तर त्यांचा जीव वाचायचा. यहोवाने नेमलेले संदेष्टेसुद्धा एका अर्थी पहारेकरीच होते. यहोवाने लोकांना घाबरवण्यासाठी नाही, तर त्यांचा जीव वाचवण्यासाठी पहारेकरी नेमले. कारण त्याला आपल्या लोकांची काळजी होती.

५, ६. यहोवा न्यायी आहे हे कसं दिसून येतं?

यहोवाने यहेज्केललासुद्धा पहारेकरी म्हणून जबाबदारी दिली होती. ती जबाबदारी देताना यहोवाने यहेज्केलला जे सांगितलं त्यावरून आपल्याला यहोवाच्या गुणांबद्दल खूप काही शिकायला मिळतं. तसंच आपल्याला प्रोत्साहनही मिळतं. चला, त्यांपैकी आता आपण दोन गुणांबद्दल चर्चा करू या.

न्याय: यहोवा न्यायी आहे, म्हणजे तो प्रत्येक व्यक्‍तीशी भेदभाव न करता वागतो. उदाहरणार्थ, यहेज्केलच्या संदेशाकडे बहुतेक लोकांनी दुर्लक्ष केलं असलं, तरी यहोवाने सर्वच इस्राएली लोकांना बंडखोर ठरवलं नाही. तर प्रत्येक व्यक्‍ती त्याचा संदेश ऐकून काय करते त्याकडे त्याने लक्ष दिलं. हीच गोष्ट त्याच्या बोलण्यातूनसुद्धा दिसून येते. त्याने अनेकदा ‘एखादा दुष्ट माणूस,’ “एखादा नीतिमान माणूस” असे एकवचनी शब्द वापरले. यावरून दिसून येतं की यहोवाचा संदेश ऐकून प्रत्येक व्यक्‍ती काय करते त्या आधारावर तो तिचा न्याय करतो.—यहे. ३३:८, १८-२०.

७. यहोवा कोणत्या आधारावर एखाद्याचा न्याय करतो?

यहोवा ज्या प्रकारे प्रत्येक व्यक्‍तीचा न्याय करतो त्यावरूनही त्याचा न्यायाचा गुण दिसून येतो. एखाद्या व्यक्‍तीने आधी केलेल्या वाईट गोष्टींचा यहोवा हिशोब ठेवत नाही, तर ती व्यक्‍ती संदेशाला आज कसा प्रतिसाद देते त्या आधारावर तो तिचा न्याय करतो. याबद्दल यहोवाने यहेज्केलला म्हटलं, “मी जर एखाद्या दुष्ट माणसाला म्हणालो, की ‘तू नक्की मरशील.’ पण तो जर आपल्या पापांपासून मागे फिरला आणि न्यायाने व नीतीने वागू लागला . . . तर तो नक्की वाचेल.” पुढे यहोवा आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तो म्हणतो, “त्याने केलेल्या कोणत्याही पापांचा हिशोब ठेवला जाणार नाही.” (यहे. ३३:१४-१६) पण दुसरीकडे पाहता ज्यांनी आधी चांगली कामं केली आहेत ते असं म्हणू शकत नाहीत, की ‘आम्हाला आता वाईट कामं करायची मोकळीक आहे.’ कारण यहोवाने त्याबद्दल काय म्हटलं याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं, की जर एखाद्या माणसाने “आपल्या नीतिमत्त्वावर भरवसा ठेवून एखादं वाईट काम केलं, तर त्याने केलेलं एकही नीतिमान काम आठवलं जाणार नाही. उलट, त्याने केलेल्या वाईट कामामुळे तो नक्की मरेल.”—यहे. ३३:१३.

८. यहोवाचा न्यायाचा गुण आणखी कोणत्या गोष्टीवरून दिसून येतो?

नाश आणण्याच्या बऱ्‍याच काळाआधी यहोवा लोकांना सावध करतो. यावरूनसुद्धा त्याचा न्यायाचा गुण दिसून येतो. बाबेलच्या सैन्याने यरुशलेमचा नाश केला त्याच्या जवळजवळ सहा वर्षांआधीपासून यहेज्केल लोकांना सावध करत होता. पण लोकांना सावध करणारा हा काही पहिला संदेष्टा नव्हता. यरुशलेमचा नाश होण्याच्या शंभरपेक्षा जास्त वर्षांपासून यहोवा त्यांच्याकडे संदेष्टे पाठवत होता. होशेय, यशया, मीखा, ओदेद आणि यिर्मया हे एका अर्थी पहारेकऱ्‍यांसारखं त्यांना सावध करत होते. यहोवाने यिर्मयाद्वारे इस्राएली लोकांना म्हटलं होतं, “मी पहारेकरी नेमले. ते [पहारेकरी] म्हणाले: ‘रणशिंगाच्या आवाजाकडे लक्ष द्या.” (यिर्म. ६:१७) पण लोकांनी लक्ष दिलं नाही. त्यामुळे यहोवाने जेव्हा बाबेलद्वारे यरुशलेमचा नाश केला तेव्हा त्यांच्या मृत्यूसाठी यहोवा किंवा ते पहारेकरी जबाबदार नव्हते.

९. यहोवाने एकनिष्ठ प्रेम कसं दाखवलं?

प्रेम: यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाचा एक पुरावा म्हणजे त्याने नीतिमान लोकांसोबतच दुष्ट लोकांनाही सावध करण्यासाठी पहारेकरी पाठवले. या दुष्ट लोकांनी खरंतर यहोवाला दुःखी केलं होतं आणि त्याच्या नावावर कलंक लावला होता. इस्राएली लोकांना यहोवाचे लोक म्हटलं जायचं. पण तरीही, त्यांनी वारंवार यहोवाकडे पाठ फिरवली आणि ते खोट्या देवांची उपासना करू लागले. त्यांनी यहोवाचा विश्‍वासघात केला तेव्हा त्याला खूप दुःख झालं. म्हणून त्याने त्यांची तुलना एका व्यभिचारी बायकोसोबत केली. (यहे. १६:३२) पण यहोवाने त्यांच्यावर प्रेम करायचं सोडून दिलं नाही. त्याने बदला घेतला नाही, तर त्यांच्यासोबत पुन्हा नातं जोडण्याचा प्रयत्न केला. पण अनेकदा संधी देऊनसुद्धा जेव्हा ते सुधारले नाहीत, तेव्हा शेवटी यहोवाने त्यांना शिक्षा केली. त्याबद्दल त्याने यहेज्केलला म्हटलं, “जेव्हा एखादा दुष्ट माणूस मरतो तेव्हा मला आनंद होत नाही. उलट, तो आपला दुष्ट मार्ग सोडतो आणि जिवंत राहतो तेव्हा मला आनंद होतो.” (यहे. ३३:११) यहोवा आजही बदललेला नाही. लोकांबद्दल त्याला आधी जसं वाटायचं तसंच आतापण वाटतं.—मला. ३:६.

१०, ११. यहोवा इस्राएली लोकांशी जसा वागला त्यावरून आपण कोणत्या गोष्टी शिकू शकतो?

१० यहोवा इस्राएली लोकांसोबत जसा प्रेमाने आणि न्यायाने वागला त्यातून आपण काय शिकू शकतो? एक गोष्ट म्हणजे, प्रचार करताना सगळे लोक एकसारखेच आहेत असा आपण विचार करणार नाही. तर प्रत्येक व्यक्‍ती वेगळी आहे, तिची परिस्थिती वेगळी आहे, हे आपण लक्षात ठेवू. एखादी व्यक्‍ती कशी दिसते, कुठे राहते, तिच्याकडे किती पैसा आहे किंवा ती कोणती भाषा बोलते यावरून आपण ठरवणार नाही, की ती आपला संदेश ऐकेल की नाही. किंवा तिने आधी काही वाईट कामं केली असतील, तर तिला संदेश सांगण्यात काहीच अर्थ नाही असाही आपण विचार करणार नाही. या बाबतीत यहोवाने पेत्रला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली होती. त्याबद्दल पेत्रने लिहिलं: “देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही. तर प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भीती बाळगून योग्य ते करतो, त्याचा तो स्वीकार करतो.” (प्रे. कार्यं १०:३४, ३५) आणि ही गोष्ट आजही तितकीच खरी आहे.

यहोवा लोकांबद्दल जसा विचार करतो तसाच आपणही करतो का? (परिच्छेद १० पाहा)

११ शिकण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे, आपण स्वतःच्या वागण्या-बोलण्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. कारण आपण ज्यांना प्रचार करतो त्यांच्यासारखंच आपणही अपरिपूर्ण आहोत, आपल्याकडूनही चुका होऊ शकतात. त्यामुळे, आपण आधी चांगली कामं केली होती म्हणून आता आपल्याला वाईट कामं करायची मोकळीक आहे असा आपण विचार करू नये. पौलने करिंथच्या मंडळीला जो सल्ला दिला होता तो आपल्यालाही तितकाच लागू होतो. त्याने म्हटलं: “आपण उभे आहोत असं ज्याला वाटतं त्याने पडू नये म्हणून सांभाळावं. माणसांवर सहसा येते त्यापेक्षा वेगळी परीक्षा तुमच्यावर आली नाही.” (१ करिंथ. १०:१२, १३) त्यामुळे आपण ‘स्वतःच्या नीतिमत्त्वावर भरवसा ठेवणाऱ्‍या माणसासारखं’ असू नये. आपण चांगली कामं करतो म्हणून आपल्याला वाईट कामांसाठी शिक्षा होणार नाही असा आपण कधीच विचार करू नये. (यहे. ३३:१३) आपण खूप वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलो, तरीही आपण नेहमी नम्र असलं पाहिजे आणि देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत.

१२. आपण जर पूर्वी गंभीर पापं केली असली तर आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१२ पण समजा आपण पूर्वी काही गंभीर पापं केली असली आणि त्यांबद्दल जर आपल्याला खूप वाईट वाटत असेल तर काय? यहेज्केलच्या संदेशातून आपण शिकतो, की जे लोक पश्‍चात्ताप करत नाहीत अशांना यहोवा शिक्षा देतो. पण आपल्याला हेही शिकायला मिळतं, की यहोवा एक प्रेमळ देव आहे. प्रेम हा त्याचा मुख्य गुण आहे. (१ योहा. ४:८) त्यामुळे आपण जर मनापासून पश्‍चात्ताप केला, तर देव आपल्याला नक्की माफ करेल याची आपण खातरी बाळगू शकतो. (याको. ५:१४, १५) यहोवाचा विश्‍वासघात करणाऱ्‍या इस्राएली लोकांना जर त्याने मोठ्या मनाने क्षमा केली, तर तो आपल्याला क्षमा करणार नाही का?—स्तो. ८६:५.

“तू आपल्या लोकांशी बोल”

१३, १४. (क) पहारेकरी कोणत्या प्रकारचा संदेश द्यायचे? (ख) यशयाने कोणता संदेश दिला?

१३ यहेज्केल ३३:२, ३ वाचा. यहोवाचे पहारेकरी कोणत्या प्रकारचा संदेश द्यायचे? येणाऱ्‍या धोक्याबद्दल इशारा देणं हे त्यांचं मुख्य काम होतं, पण यासोबतच ते आनंदाचा संदेशही द्यायचे. चला, आपण याची काही उदाहरणं पाहू या.

१४ यशयाने जवळपास इ.स.पू. ७७८ ते ७३२ पर्यंत सेवा केली. त्याने यरुशलेमच्या लोकांना इशारा दिला की बाबेलचे लोक यरुशलेम काबीज करतील आणि त्यांना बंदिवासात घेऊन जातील. (यश. ३९:५-७) पण यासोबतच त्याने देवाच्या प्रेरणेने एक आनंदाचा संदेशही दिला. त्याने यरुशलेम शहराला उद्देशून म्हटलं, “ऐक! तुझे पहारेकरी मोठ्याने ओरडत आहेत. ते एकत्र मिळून आनंदाने ओरडत आहेत. कारण यहोवा सीयोनला परत आणत असल्याचं ते स्पष्टपणे पाहतील.” (यश. ५२:८) याचा अर्थ, शुद्ध उपासना पुन्हा सुरू होणार होती. खरंच, यापेक्षा मोठी आनंदाची बातमी आणखी कोणती असू शकते!

१५. यिर्मयाने कोणता संदेश दिला?

१५ यिर्मयाने इ.स.पू. ६४७ ते ५८० पर्यंत सेवा केली. काहींनी त्याला ‘संकटाचा संदेश देणारा’ असं नाव दिलं आहे. पण असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण त्याने जरी यहोवाकडून येणाऱ्‍या संकटांबद्दल a इस्राएली लोकांना वारंवार इशारा दिला असला, तरी यासोबतच त्याने आनंदाचा संदेशही दिला. त्याने सांगितलं की इस्राएली लोक त्यांच्या मायदेशात परत जातील आणि तिथे ते शुद्ध उपासना पुन्हा सुरू करतील.—यिर्म. २९:१०-१४; ३३:१०, ११.

१६. बाबेलच्या बंदिवासात असलेल्या लोकांना यहेज्केलच्या संदेशामुळे कसा फायदा झाला?

१६ यहोवाने यहेज्केलला इ.स.पू. ६१३ मध्ये पहारेकरी म्हणून नेमलं. आणि त्याने हे काम जवळपास इ.स.पू. ५९१ पर्यंत केलं. या पुस्तकातच्या व्या आणि ६ व्या अध्यायात आपण पाहिलं होतं, की कशा प्रकारे यहेज्केलने इस्राएली लोकांना त्यांच्यावर येणाऱ्‍या नाशाबद्दल आवेशाने सांगितलं होतं. त्यामुळे जर त्यांचा नाश झाला तर त्याच्यावर त्यांचा रक्‍तदोष येणार नव्हता. त्याने बाबेलच्या बंदिवासात असलेल्या यहुदी लोकांना सांगितलं की यरुशलेमच्या बंडखोर लोकांना यहोवा शिक्षा करेल. या संदेशामुळे त्या बंदिवानांना फायदा झाला. त्यांचं यहोवासोबतचं नातं टिकून राहिलं आणि यहोवा भविष्यात त्यांना जे काम देणार होता त्यासाठी ते तयार होणार होते. कारण ७० वर्षांच्या शेवटी यहोवा काही उरलेल्या यहुदी लोकांना इस्राएलमध्ये परत घेऊन जाणार होता. (यहे. ३६:७-११) हे उरलेले यहुदी लोक कोण असणार होते? खासकरून यहेज्केलच्या संदेशाकडे ज्यांनी लक्ष दिलं त्यांची ही मुलं आणि नातवंडं असणार होती. या पुस्तकाच्या ३ ऱ्‍या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे, यहेज्केलने यरुशलेममध्ये शुद्ध उपासना पुन्हा सुरू होईल ही आनंदाची बातमी लोकांना सांगितली.

१७. यहोवाने केव्हा-केव्हा पहारेकरी नेमले?

१७ पण इ.स.पू. ६०७ मध्ये यरुशलेमचा नाश झाला त्या काळातच फक्‍त यहोवाने संदेष्ट्यांना पहारेकरी म्हणून नेमलं का? नाही. आपला उद्देश पूर्ण करताना त्याने प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर पहारेकरी नेमले. या पहारेकऱ्‍यांनी दुष्टांना सावध तर केलंच, पण त्यासोबतच नीतिमान लोकांना आनंदाचा संदेशही सांगितला.

पहिल्या शतकातले पहारेकरी

१८. बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानने कोणतं काम केलं?

१८ पहिल्या शतकात बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानने पहारेकरी म्हणून काम केलं. त्याने इस्राएली लोकांना इशारा दिला, की यहोवा लवकरच त्यांना नाकारणार आहे. (मत्त. ३:१, २, ९-११) पण त्याने फक्‍त इशाराच दिला नाही, तर आणखीनही एक जबाबदारी पार पाडली. येशूने म्हटलं, की भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे योहान हा मसीहासाठी मार्ग तयार करणारा “दूत” होता. (मला. ३:१; मत्त. ११:७-१०) हे काम करताना योहानने असा आनंदाचा संदेशही दिला की “जगाचं पाप दूर करणारा देवाचा कोकरा,” येशू आला आहे.—योहा. १:२९, ३०.

१९, २०. येशूने आणि त्याच्या शिष्यांनी पहारेकरी म्हणून कसं काम केलं?

१९ यहोवाने पाठवलेल्या सर्व पहारेकऱ्‍यांपैकी येशू हा सगळ्यात मुख्य पहारेकरी होता. यहेज्केलप्रमाणेच त्यालाही यहोवाने ‘इस्राएलच्या घराण्याकडे’ पाठवलं होतं. (यहे. ३:१७; मत्त. १५:२४) येशूने इस्राएल राष्ट्राला इशारा दिला होता, की यहोवा लवकरच त्यांना नाकारेल आणि यरुशलेमचा नाश केला जाईल. (मत्त. २२:३७, ३८; २४:१, २; लूक २१:२०-२४) पण येशूचं सगळ्यात मुख्य काम होतं, आनंदाचा संदेश सांगणं.—लूक ४:१७-२१.

२० येशूच्या शिष्यांनीसुद्धा पहारेकरी म्हणून काम केलं. येशूने त्यांना आज्ञा दिली होती की “जागे राहा.” (मत्त. २४:४२) ही आज्ञा पाळून त्यांनी इस्राएलच्या घराण्याला सांगितलं, की यहोवाने त्यांना आणि यरुशलेम शहराला नाकारलं आहे. (रोम. ९:६-८; गलती. ४:२५, २६) पण त्यांच्याआधी होऊन गेलेल्या पहारेकऱ्‍यांप्रमाणेच शिष्यांनी आनंदाचा संदेशसुद्धा सांगितला. त्या संदेशाचा एक महत्त्वाचा भाग हा होता, की आता विदेशी लोकसुद्धा पवित्र शक्‍तीने अभिषिक्‍त केलेल्या ‘देवाच्या इस्राएलचा’ भाग बनतील. आणि त्यांनाही येशूसोबत मिळून पृथ्वीवर शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्याचा बहुमान मिळेल.—प्रे. कार्यं १५:१४; गलती. ६:१५, १६; प्रकटी. ५:९, १०.

२१. पौलने पहारेकरी म्हणून एक चांगलं उदाहरण कसं मांडलं?

२१ पहिल्या शतकातल्या पहारेकऱ्‍यांमध्ये पौलचंही एक चांगलं उदाहरण आहे. त्याची ही जबाबदारी किती गंभीर आहे याची त्याला जाणीव होती. यहेज्केलप्रमाणे त्यालाही माहीत होतं, की त्याने आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही तर तो लोकांच्या रक्‍तासाठी दोषी ठरेल. (प्रे. कार्यं २०:२६, २७) इतर पहारेकऱ्‍यांप्रमाणे त्याने लोकांना सावध तर केलंच, पण त्यासोबत आनंदाचा संदेशही सांगितला. (प्रे. कार्यं १५:३५; रोम. १:१-४) इतकंच काय, तर त्याने पवित्र शक्‍तीच्या प्रेरणेने यशयाच्या भविष्यवाणीतल्या शब्दांचा उल्लेख करून म्हटलं, ‘जो आनंदाचा संदेश घेऊन येतोय, त्याचे पाय डोंगरावरून येताना किती सुंदर दिसत आहेत!’ त्याने ही भविष्यवाणी ख्रिस्ताच्या सर्व शिष्यांना लागू केली, कारण ते देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश सांगत आहेत.—यश. ५२:७, ८; रोम. १०:१३-१५.

२२. प्रेषितांच्या मृत्यूनंतर काय झालं?

२२ भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे प्रेषितांच्या मृत्यूनंतर ख्रिस्ती मंडळीत धर्मत्याग खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेला. (प्रे. कार्यं २०:२९, ३०; २ थेस्सलनी. २:३-८) मग एका मोठ्या काळापर्यंत जंगली गवतासारख्या नकली ख्रिश्‍चनांची संख्या गव्हासारख्या खऱ्‍या ख्रिश्‍चनांपेक्षा खूप वाढत गेली. या नकली ख्रिश्‍चनांनी खोट्या शिकवणी इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरवल्या होत्या, की राज्याचा सुस्पष्ट संदेश लोकांना नीट समजत नव्हता. (मत्त. १३:३६-४३) पण जेव्हा यहोवाची कार्य करायची योग्य वेळ आली, तेव्हा त्याने लोकांना इशारा देण्यासाठी आणि आनंदाचा संदेश सांगण्यासाठी पहारेकरी नेमले. यावरून पुन्हा एकदा त्याच्या न्यायाचा आणि प्रेमाचा पुरावा मिळाला. मग यहोवाने नेमलेले हे पहारेकरी कोण होते?

दुष्टांना सावध करण्यासाठी यहोवाने पुन्हा पहारेकरी नेमले

२३. बंधू चार्ल्स रस्सल आणि त्यांच्या सोबत्यांनी कोणतं काम केलं?

२३ १९१४ च्या आधीच्या काही वर्षांमध्ये, बंधू चार्ल्स रस्सल आणि त्यांच्या सोबत्यांनी ‘दूत’ म्हणून काम केलं आणि मसीही राज्य सुरू होण्याआधी “मार्ग तयार” केला. b (मला. ३:१) त्यांनी लोकांना न्यायदंडाचा इशारा देण्यासाठी आणि आनंदाची बातमी सांगण्यासाठी पहारेकरी म्हणूनसुद्धा काम केलं. यासाठी त्यांनी झायन्स वॉच टॉवर ॲण्ड हेरल्ड ऑफ क्राइस्ट्‌स प्रेसेन्स (आजचं टेहळणी बुरूज) या मासिकाचा वापर केला.

२४. (क) विश्‍वासू दास कशा प्रकारे पहारेकऱ्‍याचं काम करतो? (ख) आधी होऊन गेलेल्या पहारेकऱ्‍यांकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? (“काही उल्लेखनीय पहारेकरी,” हा तक्‍ता पाहा.)

२४ पुढे देवाचं राज्य सुरू झाल्यावर, काही पुरुषांनी मिळून बनलेल्या एका छोट्या गटाला येशूने विश्‍वासू दास म्हणून नेमलं. (मत्त. २४:४५-४७) तेव्हापासून हा विश्‍वासू दास पहारेकरी म्हणून काम करत आहे. या दासाला आज आपण नियमन मंडळसुद्धा म्हणतो. हा दास लोकांना देवाचा संदेश सांगण्यात पुढाकार घेतो. तो यहोवाच्या ‘सूड उगवण्याच्या दिवसाबद्दल’ इशारा तर देतोच, पण त्यासोबतच ‘यहोवाच्या कृपेचं वर्षही’ जाहीर करतो.—यश. ६१:२; २ करिंथकर ६:१, २ सुद्धा पाहा.

२५, २६. (क) येशूच्या सगळ्याच शिष्यांनी कोणत्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे, आणि ते ही आज्ञा कशी पाळतात? (ख) पुढच्या अध्यायात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

२५ येशूने जरी विश्‍वासू दासाला पहारेकरी म्हणून जबाबदारी दिली असली, तरी त्याने आपल्या ‘सगळ्याच’ शिष्यांना “जागे राहा” अशी आज्ञा दिली आहे. (मार्क १३:३३-३७) आपण आध्यात्मिक रितीने जागं राहून आणि आपल्या काळातल्या पहारेकऱ्‍याला पूर्ण पाठिंबा देऊन ही आज्ञा पाळतो. प्रचाराची जबाबदारी पूर्ण करून आपण दाखवतो, की आपण जागे आहोत. (२ तीम. ४:२) पण आपण प्रचार का करतो? एक म्हणजे, लोकांचा जीव वाचावा अशी आपली इच्छा आहे. (१ तीम. ४:१६) कारण आजच्या काळातल्या पहारेकऱ्‍याच्या इशाऱ्‍याकडे जे लक्ष देत नाहीत, त्यांचा लवकरच नाश होणार आहे. (यहे. ३:१९) पण प्रचार करायचा आपला मुख्य उद्देश लोकांना सगळ्यात मोठी आनंदाची बातमी सांगणं हा आहे. ती म्हणजे, शुद्ध उपासना पुन्हा सुरू झाली आहे! आज ‘यहोवाच्या कृपेच्या वर्षात’ बऱ्‍याच लोकांना आपल्यासोबत मिळून आपल्या न्यायी आणि प्रेमळ देवाची उपासना करण्याची संधी आहे. लवकरच या दुष्ट जगाचा नाश होईल आणि जे या नाशातून वाचतील त्यांना आपला दयाळू राजा येशू याच्या राज्यात खूप आशीर्वाद मिळतील. आधुनिक काळातला पहारेकरी हीच बातमी आज जगभरात सांगत आहे. मग त्याला पाठिंबा देण्यात आपण मागे कसे राहू शकतो!—मत्त. २४:१४.

सगळ्यांना आनंदाचा संदेश सांगून आपण आजच्या काळातल्या पहारेकऱ्‍याला मनापासून साथ देतो (परिच्छेद २५ पाहा)

२६ आज यहोवाने एक खूप मोठा चमत्कार केला आहे. त्याने या जगाचा अंत होण्याआधीच आपल्या लोकांना एकत्र आणलं आहे. त्याने हे कसं केलं ते आपल्याला यहेज्केलच्या दोन काठ्यांबद्दलच्या भविष्यवाणीवरून कळतं. याविषयी आपण पुढच्या अध्यायात चर्चा करू या.

a यिर्मयाच्या पुस्तकात “संकट” हा शब्द जवळजवळ ६० वेळा आला आहे.

b ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली हे जाणून घेण्यासाठी परमेश्‍वर का राज हुकूमत कर रहा है! या पुस्तकातला दुसरा अध्याय पाहा. त्याचं शीर्षक आहे, “स्वर्ग में राज की शुरूआत.”