व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १३

“मंदिराचं वर्णन करून सांग”

“मंदिराचं वर्णन करून सांग”

यहेज्केल ४३:१०

अध्याय कशाबद्दल आहे: यहेज्केलने पाहिलेल्या वैभवशाली मंदिराच्या दृष्टान्ताचा काय अर्थ आहे

१-३. (क) एका अतिशय भव्य मंदिराचा दृष्टान्त पाहून यहेज्केलला दिलासा का मिळाला असेल? (सुरुवातीचं चित्र पाहा.) (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

 अशी कल्पना करा, की यहेज्केल आता ५० वर्षांचा आहे. बंदिवासात येऊन त्याला २५ वर्षं झाली आहेत. यरुशलेममधलं मंदिर बऱ्‍याच काळापासून उध्द्वस्त अवस्थेत पडून आहे. यहेज्केलने जर कधी असा विचार केला असेल, की एक दिवस आपण परत यरुशलेमला जाऊ आणि तिथल्या मंदिरात याजक म्हणून सेवा करू, तर त्याच्या या स्वप्नाचा चुराडा झाला असेल. कारण बंदिवास संपायला अजून ५६ वर्षं बाकी आहेत. त्यामुळे मंदिर पुन्हा बांधलेलं पाहण्याची गोष्ट तर दूरच, पण यहोवाचे लोक आपल्या मायदेशात परत जातील तो दिवस पाहायलाही आपण जिवंत असू का, असा प्रश्‍न त्याला पडला असेल. (यिर्म. २५:११) या गोष्टीचा विचार करून तो कदाचित खूप निराश झाला असेल, दुःखी झाला असेल.

पण नेमकं याच वेळी यहोवा त्याला असा एक दृष्टान्त दाखवतो ज्यामुळे त्याला खूप दिलासा आणि आशा मिळाली असेल. दृष्टान्तात यहोवा त्याला बऱ्‍याच गोष्टी दाखवतो. तो त्याला त्याच्या मायदेशात नेतो आणि एका अतिशय उंच डोंगरावर उभं करतो. तिथे यहेज्केलला “एक माणूस भेटतो. त्याचं स्वरूप तांब्यासारखं चकाकत” असतं. तो खरंतर एक स्वर्गदूत आहे. तो यहेज्केलला एक भव्य मंदिर आणि त्याचा परिसर फिरवून दाखवतो. (यहेज्केल ४०:१-४ वाचा.) हे सगळं यहेज्केलला खूप खरंखुरं वाटतं! त्या दृष्टान्तामुळे तो नक्कीच विस्मित झाला असेल आणि त्याचा विश्‍वास वाढला असेल. पण त्याच वेळी तो थोडा गोंधळूनही गेला असेल. कारण हे मंदिर, त्याने खूप वर्षांपूर्वी पाहिलेल्या यरुशलेममधल्या मंदिरापेक्षा फार वेगळं आहे. दृष्टान्तातल्या मंदिरात त्याला अनेक ओळखीच्या गोष्टी दिसत असल्या, तरी त्याला दोन्ही मंदिरांमध्ये खूप फरक जाणवतो.

हा रोमांचक दृष्टान्त आपल्याला यहेज्केल पुस्तकाच्या शेवटच्या नऊ अध्यायांमध्ये वाचायला मिळतो. पण या दृष्टान्ताचा अर्थ समजून घेताना आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे? यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलेलं मंदिर हे त्या महान लाक्षणिक मंदिराला सूचित करतं का, ज्याचा अनेक शतकांनंतर प्रेषित पौलने उल्लेख केला? आणि या दृष्टान्ताचं यहेज्केलसाठी आणि त्याच्यासोबत बंदिवासात असलेल्या लोकांसाठी काय महत्त्व होतं? चला, या प्रश्‍नांवर आपण एक-एक करून चर्चा करू या.

आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे?

४. दृष्टान्तातल्या मंदिराबद्दल आपण आधी काय विचार करायचो? पण आता आपण काय विचार करतो?

पूर्वी आपल्या प्रकाशनांमध्ये असं सांगितलं जायचं, की यहेज्केलने पाहिलेलं मंदिर हे त्या महान लाक्षणिक मंदिराला सूचित करतं, ज्याचा प्रेषित पौलने इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला आहे. a त्यामुळे आपण असा विचार करायचो, की यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या मंदिरातल्या बऱ्‍याचशा गोष्टींचा एक लाक्षणिक अर्थ असून त्या कशाला तरी सूचित करतात. पौलने उपासना मंडपाचं जे स्पष्टीकरण दिलं त्या आधारावर आपण असा विचार करायचो. पण नंतर सखोल अभ्यास, मनन आणि प्रार्थना केल्यावर असं कळून आलं, की यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या मंदिराचं अगदी साधंसुधं स्पष्टीकरण आहे; ते महान लाक्षणिक मंदिर असू शकत नाही.

५, ६. (क) उपासना मंडपातल्या काही गोष्टींबद्दल पौलने काय म्हटलं? (ख) उपासना मंडपाबद्दल चर्चा करताना त्याने नम्रता कशी दाखवली? (ग) दृष्टान्तातल्या मंदिराचा अर्थ समजून घेताना आपण पौलसारखी मनोवृत्ती कशी दाखवू शकतो?

दृष्टान्तातल्या मंदिरातल्या प्रत्येक गोष्टीचा काहीतरी लाक्षणिक अर्थ आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. ते का? हे समजण्यासाठी एक उदाहरण घ्या. पौलने उपासना मंडप आणि लाक्षणिक मंदिर यांबद्दल चर्चा करताना उपासना मंडपातल्या बऱ्‍याचशा गोष्टींचा उल्लेख केला. जसं की, धूप जाळण्याचं सोन्याचं पात्र, कराराच्या पेटीचं झाकण आणि मान्‍ना ठेवलेलं सोन्याचं पात्र. पण या गोष्टींचा एक लाक्षणिक अर्थ आहे आणि त्या कशाला तरी सूचित करतात असं त्याने म्हटलं का? नाही. कारण पवित्र शक्‍तीने त्याला तसं करण्याची प्रेरणा दिली नाही. उलट पौलने लिहिलं: “या गोष्टींबद्दल सविस्तर सांगण्याची ही वेळ नाही.” (इब्री ९:४, ५) यावरून पौलची नम्रता दिसून येते. तो यहोवाच्या पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करायला तयार होता. तसंच, त्या गोष्टींबद्दल यहोवा काही स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत थांबून राहायलाही तो तयार होता.—इब्री ९:८.

यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या मंदिराचा अर्थ समजून घेताना आपण पौलसारखीच मनोवृत्ती दाखवली पाहिजे. दृष्टान्तात मंदिराबद्दल भरपूर माहिती दिली आहे. त्यामुळे यहोवाला जर असं वाटलं, की याबद्दल पुढे आणखी काही समज द्यायची गरज आहे, तर तो ती देईपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे. (मीखा ७:७ वाचा.) मग याचा अर्थ असा होतो का, की याबद्दल यहोवाने आतापर्यंत कोणतीच समज दिली नाही? नाही, असं मुळीच नाही.

दृष्टान्तात यहेज्केलने महान लाक्षणिक मंदिर पाहिलं का?

७, ८. (क) दृष्टान्तातल्या मंदिराबद्दल आपली जी समज होती त्यात कोणता बदल झाला आहे? (ख) दृष्टान्तातलं मंदिर हे महान लाक्षणिक मंदिरापेक्षा कसं वेगळं आहे?

परिच्छेद ४ मध्ये सांगितल्याप्रमाणे, बऱ्‍याच वर्षांपासून आपल्या प्रकाशनांत असंच सांगण्यात आलं होतं, की यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलेलं मंदिर हे यहोवाच्या महान लाक्षणिक मंदिराला सूचित करतं. पण सखोल अभ्यास केल्यावर कळतं, की ते महान लाक्षणिक मंदिर असू शकत नाही. असं आपण का म्हणू शकतो?

एक कारण म्हणजे, यहेज्केलने दृष्टान्तातल्या मंदिराचं जे वर्णन केलं आणि पौलने महान लाक्षणिक मंदिराचं जे वर्णन केलं त्यांत खूप फरक आहे. उदाहरणार्थ, याचा विचार करा: पौलने म्हटलं, की मोशेच्या दिवसातला उपासना मंडप भविष्यातल्या एका महान गोष्टीला सूचित करतो. उपासना मंडपात “परमपवित्र स्थान” म्हटलेला एक भाग होता, जो पुढे शलमोन आणि जरूब्बाबेल यांनी बांधलेल्या मंदिरांतही होता. त्या भागाबद्दल बोलताना पौलने म्हटलं, की ते ‘हातांनी बनवलेलं परमपवित्र स्थान’ असून ‘खऱ्‍याचं फक्‍त प्रतिरूप’ होतं. मग ‘खरं’ काय आहे? पौलने समजावून सांगितलं, की तो ‘स्वर्ग’ आहे. (इब्री ९:३, २४) मग प्रश्‍न आहे, की मंदिराच्या दृष्टान्तात यहेज्केलला स्वर्ग दिसला का? नाही. दृष्टान्तात असं काहीच सुचवलेलं नाही, की त्याला स्वर्गातल्या गोष्टी दिसल्या. b

९, १०. बलिदानांच्या बाबतीत दृष्टान्तातलं मंदिर महान लाक्षणिक मंदिरापेक्षा वेगळं कसं होतं?

यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलेलं मंदिर आणि पौलने वर्णन केलेलं मंदिर यांत आणखी एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे, बलिदानं देण्याबद्दल. दृष्टान्तात यहेज्केलने ऐकलं, की बलिदानं देण्याच्या बाबतीत लोकांना, प्रधानांना आणि याजकांना बऱ्‍याच सूचना दिल्या गेल्या. त्यांना स्वतःच्या पापांसाठी बलिदानं द्यायची होती. तसंच, त्यांना शांती-अर्पणंही द्यायची होती; या बलिदानांचे काही भाग ते कदाचित मंदिरातल्या जेवणाच्या खोल्यांमध्ये बसून खाऊ शकत होते. (यहे. ४३:१८, १९; ४४:११, १५, २७; ४५:१५-२०, २२-२५) पण पौलने उल्लेख केलेल्या महान लाक्षणिक मंदिरात अशी वारंवार दिली जाणारी बलिदानं अर्पण केली जातात का?

यहेज्केलच्या दृष्टान्तातलं मंदिर हे महान लाक्षणिक मंदिर नाही

१० याचं उत्तर अगदी सरळसोपं आहे. पौलने म्हटलं: “ख्रिस्त हा आधीच घडून गेलेल्या चांगल्या गोष्टींचा महायाजक या नात्याने आला, तेव्हा तो आणखी श्रेष्ठ आणि आणखी परिपूर्ण अशा मंडपात गेला. हा मंडप हातांनी बांधलेला नाही, म्हणजे निर्माण केलेल्या गोष्टींपैकी नाही. बकऱ्‍यांचं किंवा वासरांचं रक्‍त नाही, तर स्वतःचं रक्‍त घेऊन ख्रिस्त एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने आपल्या सर्वांसाठी सर्वकाळाची सुटका मिळवली.” (इब्री ९:११, १२) यावरून स्पष्ट होतं, की महान लाक्षणिक मंदिरात एकच बलिदान अर्पण करण्यात आलं आणि तेही नेहमीसाठी. हे बलिदान कोणतं होतं? ते सगळ्यात मोठ्या महायाजकाने, येशू ख्रिस्ताने स्वतः दिलेलं खंडणी बलिदान होतं. याउलट मंदिराबद्दलच्या दृष्टान्तात बऱ्‍याचदा बकऱ्‍यांच्या आणि वासरांच्या बलिदानांचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून स्पष्ट होतं, की यहेज्केलने पाहिलेलं दृष्टान्तातलं मंदिर हे पौलने उल्लेख केलेल्या महान लाक्षणिक मंदिराला सूचित करत नाही.

११. यहेज्केलच्या दिवसांत महान लाक्षणिक मंदिराबद्दल सत्य सांगायची योग्य वेळ नव्हती असं का म्हणता येईल?

११ यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलेलं मंदिर हे महान लाक्षणिक मंदिर का असू शकत नाही याचं दुसरं कारण म्हणजे: यहेज्केलच्या दिवसापर्यंत महान लाक्षणिक मंदिराबद्दलची सत्यं सांगायची देवाची वेळ अजून आली नव्हती. हे लक्षात घ्या, की यहेज्केलचा दृष्टान्त हा मुळात यहुदी बंदिवानांना उद्देशून दिला होता. ते अजूनही मोशेचं नियमशास्त्र पाळत होते. बंदिवास संपल्यावर ते यरुशलेमला परत जाणार होते आणि मोशच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे शुद्ध उपासना करण्यासाठी मंदिर आणि वेदी पुन्हा बांधणार होते. मग तिथे ते बलिदानं अर्पण करणार होते आणि तसं घडलंही. यरुशलेमला परत गेल्यावर पुढे जवळजवळ सहाशे वर्षं ते बलिदानं अर्पण करत राहिले. त्यामुळे कल्पना करा, जर यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलेलं मंदिर हे महान लाक्षणिक मंदिराला सूचित करत असतं, तर त्या काळातल्या यहुद्यांवर त्याचा काय परिणाम झाला असता? त्यांना जर सांगितलं असतं, की महान लाक्षणिक मंदिरात महायाजक स्वतःचं जीवन बलिदान करतो आणि त्यानंतर बाकीची सगळी बलिदानं रद्द होतात, तर याचा त्यांनी काय अर्थ घेतला असता? त्यामुळे मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करण्याचा त्यांचा निर्धार कमजोर झाला नसता का? पण आपल्याला माहीत आहे, की एखाद्या गोष्टीवर यहोवा नेहमी योग्य वेळीच प्रकाश टाकतो; म्हणजे त्याचे लोक ती समजायला तयार असतात तेव्हाच.

१२-१४. यहेज्केलच्या दृष्टान्तातलं मंदिर आणि पौलने उल्लेख केलेलं महान लाक्षणिक मंदिर यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? (“दोन वेगळी मंदिरं आणि त्यांपासून मिळणारे धडे,” ही चौकटसुद्धा पाहा.)

१२ तर मग, यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलेलं मंदिर आणि पौलने वर्णन केलेलं लाक्षणिक मंदिर यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? हे लक्षात घ्या, की महान लाक्षणिक मंदिराचं स्पष्टीकरण देताना पौलच्या मनात यहेज्केलच्या दृष्टान्तातलं मंदिर नाही, तर मोशेच्या दिवसातला उपासना मंडप होता. हे खरं आहे, की पौलने अशा बऱ्‍याचशा गोष्टींचा उल्लेख केला ज्या शलमोन आणि जरूब्बाबेल यांनी बांधलेल्या मंदिरांतसुद्धा होत्या. शिवाय, त्या यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या मंदिरातही होत्या. पण एकंदरीत पाहिलं तर लक्षात येतं, की यहेज्केल आणि पौल यांनी आपापल्या लिखाणांत वेगवेगळ्या गोष्टींवर भर दिला. c त्यांनी एकसारख्याच गोष्टी लिहिल्या नाहीत. पण दोघांनी जे काही लिहिलं त्यावरून उपासनेच्या बाबतीत आपल्याला बऱ्‍याच गोष्टी आणखी स्पष्टपणे समजायला मदत होते. ते कसं?

१३ यहेज्केलने आणि पौलने जे म्हटलं त्यांचा एकमेकांशी अशा प्रकारे संबंध आहे: पौलने जे म्हटलं त्यावरून आपल्याला समजतं, की यहोवाने त्याची उपासना करण्यासाठी कोणती व्यवस्था घालून दिली आहे; तर यहेज्केलने जे म्हटलं त्यावरून आपण शिकतो, की उपासनेच्या बाबतीत यहोवाचे स्तर काय आहेत. शुद्ध उपासना करण्यासाठी यहोवाची व्यवस्था काय आहे हे समजावण्यासाठी पौलने उपासना मंडपातल्या काही गोष्टींचा अर्थ सांगितला; जसं की महायाजक, बलिदानं, वेदी आणि परमपवित्र स्थान. पण दुसरीकडे पाहता, शुद्ध उपासनेबद्दलचे यहोवाचे स्तर किती उच्च आहेत हे समजावण्यासाठी यहेज्केलच्या मंदिराबद्दलच्या दृष्टान्तात भरपूर माहिती दिली आहे. त्यामुळे यहोवाच्या स्तरांबद्दल बऱ्‍याच महत्त्वाच्या गोष्टी आपण शिकतो.

१४ मग यहेज्केलच्या दृष्टान्ताबद्दल आपल्याला जी सुधारित समज मिळाली आहे त्याचा अर्थ असा होतो का, की हा दृष्टान्त आपल्यासाठी तितका महत्त्वाचा नाही? नाही, असं मुळीच नाही. उलट, त्यातून आपण बऱ्‍याच गोष्टी शिकू शकतो. त्यासाठी यहेज्केलच्या काळातल्या आणि त्यानंतरच्या काळातल्या विश्‍वासू यहुद्यांना त्यातून काय शिकायला मिळालं ते आपण पाहू या.

दृष्टान्ताचा यहुदी बंदिवानांसाठी काय अर्थ होता?

१५. (क) या दृष्टान्तातून यहुद्यांना कोणता खास संदेश देण्यात आला? (ख) यहेज्केल अध्याय ८ आणि अध्याय ४० ते ४८ यांत कोणता फरक आहे?

१५ याचं बायबलमधून उत्तर मिळवण्यासाठी आपण या दृष्टान्ताशी संबंधित काही प्रश्‍न पाहू या. पहिला प्रश्‍न: या दृष्टान्ताद्वारे यहुदी लोकांना खासकरून कोणता संदेश सांगण्यात आला? थोडक्यात सांगायचं, तर शुद्ध उपासना पुन्हा सुरू होणार होती! मंदिराचा दृष्टान्त दाखवण्याच्या काही काळाआधी यहोवाने यहेज्केलला आणखी एक दृष्टान्त दाखवला होता. त्यात त्याला, यरुशलेमच्या मंदिरात कोण-कोणत्या वाईट गोष्टी घडत होत्या ते दाखवलं होतं. आणि त्याबद्दल यहेज्केलने लिहूनही काढलं होतं. याविषयी आपल्याला यहेज्केल पुस्तकाच्या ८ व्या अध्यायात वाचायला मिळतं. पण या वेळी मिळालेल्या दृष्टान्ताबद्दल लिहिताना त्याला खूप आनंद झाला असेल. कारण इथे त्याला एक खूप मोठा फरक जाणवतो. त्याला कळतं, की शुद्ध उपासना पुन्हा सुरू होणार आहे. दृष्टान्तात त्याला दिसतं, की शुद्ध उपासना आधीसारखी भ्रष्ट झालेली नाही, तर जशी करायला हवी तशीच केली जात आहे. खरंतर, मोशेच्या नियमशास्त्रानुसार उपासना कशी केली पाहिजे याचा हा एक उत्तम नमुना आहे. या दृष्टान्ताबद्दल आपल्याला यहेज्केल पुस्तकाच्या ४० ते ४८ अध्यायांत वाचायला मिळतं.

१६. यशयाने शंभरपेक्षा जास्त वर्षांपूर्वी जे म्हटलं होतं त्याला यहेज्केलच्या दृष्टान्ताने कसा दुजोरा दिला?

१६ शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्यासाठी तिला तिचं योग्य स्थान, म्हणजेच सगळ्यात उच्च स्थान देणं गरजेचं होतं. यहेज्केलच्या काळाच्या शंभरपेक्षा जास्त वर्षांपूर्वी यशया संदेष्ट्याने लिहिलं: “शेवटच्या दिवसांत, यहोवाच्या मंदिराचा पर्वत इतर पर्वतांहून उंच होईल, तो भक्कमपणे स्थापन केला जाईल. तो सर्व टेकड्यांहून उंच केला जाईल.” (यश. २:२) यशयाला याची स्पष्ट झलक मिळाली होती, की शुद्ध उपासना पुन्हा सुरू केली जाईल आणि तिला सर्वोच्च स्थान दिलं जाईल; जणू काय ती सगळ्यात उंच पर्वतावर आहे. आता यहेज्केलच्या दृष्टान्तातलं मंदिर कुठे होतं ते आठवा. ते “एका अतिशय उंच डोंगरावर” होतं. (यहे. ४०:२) अशा प्रकारे, शुद्ध उपासना पुन्हा सुरू होईल असं जे यशयाने म्हटलं त्याला यहेज्केलच्या दृष्टान्ताने दुजोरा दिला.

यहेज्केलने पाहिलेलं मंदिर एका अतिशय उंच डोंगरावर होतं (परिच्छेद १६ पाहा)

१७. यहेज्केल अध्याय ४० ते ४८ चा सारांश सांगा.

१७ यहेज्केल पुस्तकाच्या ४० ते ४८ अध्यायांत वर्णन केलेल्या मंदिराच्या दृष्टान्तावर आता आपण थोडक्यात एक नजर टाकू या. आणि यहेज्केलने काय पाहिलं आणि ऐकलं ते जाणून घेऊ या. त्याने पाहिलं, की एक स्वर्गदूत मंदिराच्या प्रवेश-इमारतींचं, भिंतीचं, अंगणांचं आणि पवित्र स्थानाचं माप घेत आहे. (यहे. ४०-४२) यानंतर एक अतिशय रोमांचक घटना घडते. मंदिरात यहोवाचा वैभवशाली प्रवेश होतो! मग यहोवा त्याच्यापासून दूर गेलेल्या लोकांना, याजकांना आणि प्रधानांना सुधारण्यासाठी काही सल्ले आणि सूचना देतो. (यहे. ४३:१-१२; ४४:१०-३१; ४५:९-१२) पुढे यहेज्केल पवित्र स्थानातून वाहणारी एक नदी पाहतो. ती जिथे कुठे वाहते तिथे लोकांना जीवन आणि आशीर्वाद मिळतात. शेवटी ती नदी मृत समुद्राला जाऊन मिळते. (यहे. ४७:१-१२) तसंच, यहेज्केल हेही पाहतो की सर्व वंशांमध्ये देशाच्या जमिनीची योग्य वाटणी केली जाते. शिवाय, देशाच्या मधोमध शुद्ध उपासनेचं ठिकाण आहे. (यहे. ४५:१-८; ४७:१३–४८:३५) हे सर्व दाखवून यहोवाला काय सांगायचं होतं? त्याला आपल्या लोकांना ही खातरी द्यायची होती, की शुद्ध उपासना नक्कीच पुन्हा सुरू होईल आणि उपासनेला जे सर्वोच्च स्थान मिळायला हवं ते मिळेल. तसंच, तो आपल्या मंदिरात उपस्थित असेल आणि तिथून तो आपल्या लोकांना आशीर्वाद देईल. तो त्यांना बरं करेल, जीवन देईल आणि देशात परत आलेल्या लोकांमध्ये शांती आणेल.

यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलेल्या वैभवशाली मंदिरावरून कळतं, की यहोवा कशा प्रकारे शुद्ध उपासना पुन्हा सुरू करेल (परिच्छेद १७ पाहा)

१८. दृष्टान्तातलं मंदिर खरोखर बांधलं जाणार होतं का? समजावून सांगा.

१८ दुसरा प्रश्‍न: दृष्टान्तातलं मंदिर खरोखर बांधलं जाणार होतं का? नाही. यहेज्केलच्या आणि त्याने ज्या यहुदी बंदिवानांना हा दृष्टान्त सांगितला त्यांच्या हे लगेच लक्षात आलं असेल, की असं मंदिर खरोखर बांधलं जाणार नाही. कारण दृष्टान्तातलं मंदिर कुठे होतं ते आठवा? ते “एका अतिशय उंच डोंगरावर” होतं. यशयाने भविष्यवाणीत उल्लेख केलेलं मंदिरसुद्धा एका उंच पर्वतावर होतं. पण यरुशलेममध्ये पूर्वी जिथे मंदिर होतं तिथे एवढं मोठं मंदिर बांधणं अशक्य होतं. हे खरं आहे, की यहुदी लोक आपल्या मायदेशात परत गेल्यावर शलमोनने जिथे मंदिर बांधलं होतं तिथेच, म्हणजे मोरिया डोंगरावर पुन्हा मंदिर बांधणार होते. पण मोरिया डोंगर हा सगळ्यात उंच डोंगर होता का? नाही. उलट त्याच्या आजूबाजचे बरेच डोंगर त्याच्या बरोबरीचे किंवा त्याहूनही उंच होते. इतकंच काय, तर दृष्टान्तातलं मंदिर आणि त्याचा परिसर खूप मोठा असून त्याच्या चारही बाजूंना भिंत होती. साहजिकच इतकं मोठं मंदिर मोरिया डोंगरावर मावू शकलं नसतं. आणि मोरिया डोंगरच काय, तर शलमोनच्या काळातल्या यरुशलेम शहरातसुद्धा इतकं भव्य मंदिर मावेल का याची शंका होती! तसंच, बंदिवांनांनी अशीही अपेक्षा केली नसेल, की मंदिराच्या पवित्र स्थानातून खरोखर एक नदी वाहून ती मृत समुद्रात जाऊन मिळेल आणि त्यातलं खारं पाणी निरोगी होईल. आणि शेवटी हेसुद्धा लक्षात घ्या, की वचन दिलेल्या देशातली जमीन डोंगराळ होती. पण दृष्टान्तातली जमीन सपाट होती आणि सर्व वंशांना वाटण्यात आलेल्या जमिनी एकाखाली एक होत्या आणि त्यांच्या सीमा एकमेकांना समांतर होत्या. d तेव्हा या सर्व गोष्टींवरून आपल्याला कळतं, की दृष्टान्तातलं मंदिर खरोखर बांधलं जाईल असा बंदिवानांनी विचार केला नसेल.

१९-२१. (क) यहेज्केलच्या काळातल्या लोकांना दृष्टान्तात का सांगण्यात आला? (ख) आणि त्यांना असं का वाटणार होतं?

१९ तिसरा प्रश्‍न: यहेज्केलच्या काळातल्या लोकांना दृष्टान्त का सांगण्यात आला? यहोवाच्या शुद्ध उपासनेचे स्तर किती उच्च आहेत यावर लोकांनी मनन करावं; तसंच, यहोवाच्या स्तरांपासून आपण किती दूर गेलो आहोत याचा विचार करून त्यांना स्वतःची लाज वाटावी म्हणून त्यांना हा दृष्टान्त सांगण्यात आला. यहोवाने यहेज्केलला सांगितलं होतं, की “इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांना मंदिराचं वर्णन करून सांग.” यहेज्केलला मंदिराचं वर्णन इतकं व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे करायचं होतं, की इस्राएली लोक जणू त्याच्या “रचनेचा अभ्यास” करू शकतील; म्हणजे आपल्या डोळ्यांपुढे त्याचं चित्र उभं करू शकतील, त्यावर मनन करू शकतील. पण त्यांना यावर मनन करायची का गरज होती? त्यांनी ते बांधावं म्हणून नाही, तर आधी पाहिल्याप्रमाणे “त्यांना स्वतःच्या अपराधांची लाज” वाटावी म्हणून.—यहेज्केल ४३:१०-१२ वाचा.

२० या दृष्टान्ताबद्दल ऐकून प्रामाणिक मनाच्या लोकांना दोषी का वाटलं असेल? त्यांना स्वतःची लाज का वाटली असेल? यहोवाने यहेज्केलला काय म्हटलं होतं त्याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं: “मनुष्याच्या मुला! लक्ष दे, मी तुला दाखवीन ते सगळं नीट बघ. आणि यहोवाच्या मंदिराचे कायदे आणि नियम यांच्याबद्दल मी तुला जे काही सांगीन ते सगळं कान देऊन ऐक.” (यहे. ४४:५) दृष्टान्तात यहेज्केलने अनेक वेळा कायद्यांबद्दल आणि नियमांबद्दल ऐकलं होतं. (यहे. ४३:११,१२; ४४:२४; ४६:१४) तसंच त्याला यहोवाच्या उच्च स्तरांची, इतकंच काय तर मोजमापाच्या प्रमाणांचीही वारंवार आठवण करून देण्यात आली होती; जसं की, एका हाताची लांबी किती असावी आणि वेगवेगळ्या वजनांच्या मापांचं प्रमाण काय असावं याचीही आठवण करून देण्यात आली होती. (यहे. ४०:५; ४५:१०-१२; नीतिवचनं १६:११ सोबत तुलना करा.) लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे, या एकाच दृष्टान्तात यहेज्केलने मूळ भाषेत “माप” आणि “मोजमाप” यांसारखे शब्द ५० पेक्षा जास्त वेळा वापरले आहेत.

२१ दृष्टान्तात मोजमाप, वजन, माप, कायदे, नियम अशा शब्दांचा वापर करून यहोवा आपल्या लोकांना काय सांगायचा प्रयत्न करत होता? कदाचित यहोवाला एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या लक्षात आणून द्यायची होती. ती म्हणजे, शुद्ध उपासनेसाठी स्तर ठरवण्याचा अधिकार फक्‍त त्यालाच आहे. जे लोक यहोवाच्या स्तरांपासून दूर गेले होते त्यांना स्वतःची लाज वाटावी म्हणून त्यांना हे सगळं सांगण्यात आलं होतं. पण प्रश्‍न येतो, की यहुदी लोकांना या दृष्टान्तातून हे कसं शिकायला मिळालं? पुढच्या अध्यायात आपण याची काही विशिष्ट उदाहरणं पाहू या. मग या दृष्टान्ताचा आज आपल्यासाठी काय अर्थ होतो हे आपल्याला आणखी स्पष्टपणे समजेल.

दृष्टान्तातल्या मंदिराबद्दल ऐकल्यानंतर प्रामाणिक मनाच्या लोकांना स्वतःचीच लाज का वाटणार होती? (परिच्छेद १९-२१ पाहा)

a महान लाक्षणिक मंदिर हे यहोवाने शुद्ध उपासनेसाठी केलेली एक व्यवस्था आहे. ती येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर करण्यात आली. ही व्यवस्था इ.स. २९ पासून अस्तित्वात आल्याचं आपण मानतो.

b यहेज्केलचा दृष्टान्त हा दानीएलने पाहिलेल्या दृष्टान्तापासून (दानीएल अध्याय ७) कसा वेगळा आहे हे लक्षात घ्या. दानीएलने दृष्टान्तात स्वर्ग पाहिला होता.—दानी. ७:९, १०, १३, १४.

c उदाहरणार्थ, पौलने महायाजकाचं वर्णन केलं आणि दरवर्षी महायाजक प्रायश्‍चित्ताच्या दिवशी काय करायचा हे त्याने स्पष्ट केलं. (इब्री २:१७; ३:१; ४:१४-१६; ५:१-१०; ७:१-१७, २६-२८; ८:१-६; ९:६-२८) पण यहेज्केलच्या दृष्टान्तात महायाजक किंवा प्रायश्‍चित्ताच्या दिवसाचा उल्लेख केलेला नाही.

d पृष्ठ २१२ वरचा नकाशा पाहा.