व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १४

“हाच मंदिराचा कायदा आहे”

“हाच मंदिराचा कायदा आहे”

यहेज्केल ४३:१२

अध्याय कशाबद्दल आहे: मंदिराच्या दृष्टान्तातून यहेज्केलच्या काळातल्या लोकांना काय शिकायला मिळालं आणि आज आपल्याला कोणते धडे शिकायला मिळतात

१, २. (क) मागच्या अध्यायात आपण मंदिराच्या दृष्टान्तातून काय शिकलो? (ख) या अध्यायात आपल्याला कोणत्या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील?

 आधीच्या अध्यायात चर्चा केल्याप्रमाणे यहेज्केलने दुष्टान्तात जे मंदिर पाहिलं ते महान लाक्षणिक मंदिर नव्हतं. तसंच आपण हेही पाहिलं, की शुद्ध उपासनेचे देवाचे स्तर किती महत्त्वाचे आहेत हे लोकांनी शिकावं म्हणून यहेज्केलला मंदिराचा दृष्टान्त दाखवण्यात आला होता. लोकांनी जर या स्तरांप्रमाणे यहोवाची उपासना केली तरच त्यांना त्याच्यासोबत पुन्हा एक चांगलं नातं जोडणं शक्य होणार होतं. आणि त्यामुळेच यहोवाने एकाच वचनात दोन वेळा असं म्हटलं: “हाच मंदिराचा कायदा आहे.”—यहेज्केल ४३:१२ वाचा.

आता आपण दोन प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत. पहिला, मंदिराच्या दृष्टान्तातून यहेज्केलच्या काळातल्या लोकांना शुद्ध उपासनेबद्दलच्या यहोवाच्या स्तरांतून कोणते विशिष्ट धडे शिकायला मिळाले? या प्रश्‍नाचं उत्तर मिळाल्यावर आपल्याला या दुसऱ्‍या प्रश्‍नाचंही उत्तर मिळेल: सध्याच्या या कठीण काळात या दृष्टान्तातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

या दृष्टान्तातून प्राचीन काळातल्या लोकांना काय शिकायला मिळालं?

३. दृष्टान्तातलं मंदिर एका उंच डोंगरावर आहे हे ऐकून लोकांना स्वतःची लाज का वाटली असेल?

पहिल्या प्रश्‍नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपण दृष्टान्तातल्या मंदिराच्या काही खास वैशिष्ट्यांवर लक्ष देऊ या. अतिशय उंच डोंगर. यहेज्केलने पाहिलं की दृष्टान्तातलं मंदिर एका अतिशय उंच डोंगरावर आहे. हे ऐकून लोकांना, शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दल यशयाने केलेली भविष्यवाणी आठवली असेल. (यश. २:२) यावरून लोकांना काय शिकायला मिळालं? हेच, की शुद्ध उपासनेला तिचं सर्वोच्च स्थान मिळालं पाहिजे. म्हणजे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा शुद्ध उपासनेला सर्वात जास्त महत्त्व मिळालं पाहिजे. खरंतर शुद्ध उपासना मुळातच सर्वोच्च स्थानावर आहे. कारण तिची व्यवस्था ‘इतर सर्व देवांपेक्षा खूप महान’ असलेल्या यहोवा देवाने केली आहे. (स्तो. ९७:९) पण लोक मात्र शुद्ध उपासनेला सर्वोच्च स्थान देण्यात कमी पडले. कित्येक शतकांपर्यंत त्यांनी वारंवार खोट्या दैवतांची उपासना करून तसंच दुष्ट कामं करून शुद्ध उपासना सोडून दिली होती, ती भ्रष्ट केली होती आणि तिला खालच्या स्तरावर आणलं होतं. पण यहेज्केलच्या दृष्टान्तातून त्यांना समजलं की यहोवाचं पवित्र मंदिर सर्वोच्च ठिकाणी आहे, म्हणजे त्याला जे वैभव आणि महत्त्व मिळालं पाहिजे ते त्याला मिळत आहे. आणि हे पाहून प्रामाणिक मनाच्या लोकांना आपल्या अपराधांची नक्कीच लाज वाटली असेल.

४, ५. मंदिराच्या उंच प्रवेश-इमारतींवरून यहेज्केलच्या काळातल्या लोकांना काय शिकायला मिळालं असेल?

उंच प्रवेश-इमारती. दृष्टान्ताच्या सुरुवातीला यहेज्केलने पाहिलं, की स्वर्गदूत प्रवेश-इमारतींचं मोजमाप घेत आहे. त्या इमारती जवळजवळ शंभर फूट उंच होत्या. (यहे. ४०:१४) तसंच, त्यांत पहारेकऱ्‍यांच्या खोल्याही होत्या. ज्या लोकांनी या उंच प्रवेश-इमारतींचा आणि त्यांतल्या पहारेकऱ्‍यांच्या खोल्यांचा बारकाईने अभ्यास केला असेल त्यांना काय शिकायला मिळालं असेल? त्यासाठी यहोवाने यहेज्केलला काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं: ‘मंदिराच्या प्रवेशाकडे बारकाईने लक्ष दे.’ पण यहोवाने असं का म्हटलं? कारण एकेकाळी लोक यहोवाच्या पवित्र मंदिरात ‘हृदयाची आणि शरीराची सुंता न झालेल्या लोकांना’ घेऊन येत होते. याबद्दल यहोवाला कसं वाटलं? त्याबद्दल त्याने म्हटलं: “ते माझं मंदिर अपवित्र करतात.”—यहे. ४४:५, ७.

सुंता करण्याबद्दल यहोवाने अब्राहामच्या काळापासूनच एक स्पष्ट आज्ञा दिली होती. पण “शरीराची सुंता न झालेल्या” लोकांनी या आज्ञेचं पालन केलं नाही. (उत्प. १७:९, १०; लेवी. १२:१-३) आणि ‘हृदयाची सुंता न झालेले लोक’ तर याहीपेक्षा वाईट होते. ते खूप बंडखोर होते. यहोवाने दिलेल्या सूचनांकडे आणि मार्गदर्शनाकडे ते जाणूनबुजून दुर्लक्ष करत होते. अशा लोकांना यहोवाच्या मंदिरात पाऊलसुद्धा ठेवायची परवानगी द्यायला नको होती. कारण यहोवाला कपटीपणा, ढोंगीपणा मुळीच आवडत नाही. पण त्याच्या लोकांनी त्याच्याच घरात या गोष्टींना बढावा दिला होता. दृष्टान्तातल्या प्रवेश-इमारतींवरून आणि पहारेकऱ्‍यांच्या खोल्यांवरून लोकांना एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला. तो म्हणजे, यापुढे यहोवाच्या मंदिरात अशा गोष्टी मुळीच खपवून घेतल्या जाणार नाहीत. जे देवाच्या उच्च स्तराचं पालन करतात फक्‍त तेच यहोवाच्या मंदिरात पाऊल ठेवू शकतात. आणि लोकांनी जर असं केलं, तरच तो त्यांची उपासना स्वीकारून त्यांना आशीर्वाद देणार होता.

६, ७. (क) मंदिराच्या चारही बाजूंना असलेली मोठी मोकळी जागा आणि त्याभोवती असलेली भिंत दाखवून यहोवाला आपल्या लोकांना काय सांगायचं होतं? (ख) यहोवाच्या लोकांनी त्याचं मंदिर कसं भ्रष्ट केलं होतं? (तळटीप पाहा.)

चारही बाजूंना असलेली भिंत. दृष्टान्तातल्या मंदिरातलं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे, मंदिराच्या संपूर्ण आवाराभोवती एक भिंत होती. प्रत्येक बाजूच्या भिंतीची लांबी ५०० काठी, म्हणजे ५,१०० फूट होती. (यहे. ४२:१५-२०) पण मंदिराच्या इमारती आणि अंगणं यांचा मिळून एक लहान चौकोन तयार झाला आणि त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी फक्‍त ५०० हात, म्हणजे ८५० फूट इतकी होती. (यहे. ४५:२) त्यामुळे मंदिराच्या चारही बाजूंना एक मोठी मोकळी जागा होती. आणि त्या जागेच्या सभोवती एक बाहेरची भिंत होती. a पण हे सर्व कशासाठी होतं?

यहोवाने म्हटलं: “आता त्यांनी इतर दैवतांची उपासना करायचं सोडून द्यावं आणि आपल्या राजांची प्रेतं माझ्यापासून दूर करावीत; मग मी कायम त्यांच्यामध्ये राहीन.” (यहे. ४३:९, तळटीप पाहा.) “राजांची प्रेतं” ही कदाचित मूर्तींना सूचित करत असावीत. दृष्टान्तातल्या मंदिराच्या चारही बाजूंना असलेली मोठी मोकळी जागा आणि त्याभोवती असलेली भिंत दाखवून यहोवाला काय सांगायचं होतं? त्याला हेच सांगायचं होतं, की ‘सर्व प्रकारची घाणेरडी कामं माझ्यापासून दूर ठेवा! ती अजिबात माझ्या जवळ येऊ देऊ नका!’ लोकांनी जर अशा प्रकारे आपली उपासना शुद्ध ठेवायची काळजी घेतली, तर यहोवा त्यांच्यामध्ये राहणार होता.

८, ९. जबाबदारी सांभाळणाऱ्‍या पुरुषांना यहोवाने कडक शब्दांत जो सल्ला दिला त्यावरून लोकांना काय शिकायला मिळालं असेल?

जबाबदारी सांभाळणाऱ्‍यांना कडक शब्दांत सल्ला. यहोवाने फक्‍त लोकांनाच नाही, तर मोठ्या जबाबदाऱ्‍या हाताळणाऱ्‍या त्यांच्यातल्या पुरुषांनाही कडक शब्दांत, पण प्रेमाने सल्ला दिला. लोक मूर्तिपूजा करू लागले तेव्हा जे लेवी यहोवापासून भरकटले त्यांना त्याने फटकारलं. पण सादोकच्या वंशजांची मात्र त्याने प्रशंसा केली. कारण जेव्हा इस्राएली लोक यहोवापासून भरकटले, तेव्हा सादोकच्या वंशजांनी त्याच्या “मंदिरातल्या जबाबदाऱ्‍या सांभाळल्या.” यहोवा लेव्यांशी आणि सादोकच्या वंशजांशी त्यांच्या-त्यांच्या कामांप्रमाणे न्यायाने आणि दयाळूपणे वागला. (यहे. ४४:१०, १२-१६) तसंच, त्याने इस्राएलमधल्या प्रधानांनासुद्धा कडक शब्दांत फटकारलं.—यहे. ४५:९.

अशा प्रकारे यहोवाने स्पष्टपणे दाखवलं, की ज्यांच्यावर लोकांची देखरेख करायची जबाबदारी होती त्यांनी ज्या प्रकारे आपलं काम केलं, त्याबद्दल त्यांना हिशोब द्यावा लागला. तसंच, गरज पडली तेव्हा त्यांनाही सुधारण्यात आलं आणि कडक शब्दांत सल्ला देण्यात आला. याचाच अर्थ, यहोवाच्या स्तरांचं पालन करण्याच्या बाबतीत त्यांनी लोकांसमोर एक चांगलं उदाहरण मांडायचं होतं.

१०, ११. कोणत्या गोष्टींवरून दिसून येतं, की बंदिवासातून परत आलेल्या काही लोकांनी दृष्टान्तातून शिकलेल्या गोष्टी लागू केल्या?

१० हे खरं आहे, की बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी या उल्लेखनीय दृष्टान्ताबद्दल काय विचार केला असेल हे आपण नक्की सांगू शकत नाही. पण त्या काळातल्या विश्‍वासू स्त्री-पुरुषांनी काय केलं आणि यहोवाच्या शुद्ध उपासनेबद्दल त्यांनी कसा दृष्टिकोन बाळगला याबद्दल बायबलमध्ये बरंच काही सांगितलं आहे. मग यहेज्केलच्या दृष्टान्तातून शिकलेले धडे त्यांनी लागू केले का? हो, काही प्रमाणात. असं का म्हणता येईल? कारण बाबेलच्या बंदिवासात जाण्याआधी त्यांच्या पूर्वजांनी खूप बंडखोर मनोवृत्ती दाखवली होती. पण त्यांच्या तुलनेत या लोकांनी एक चांगली मनोवृत्ती दाखवली.

११ यहेज्केलच्या दृष्टान्तातून जी अनेक तत्त्वं शिकायला मिळाली ती लोकांना शिकवण्यासाठी अनेक विश्‍वासू पुरुषांनी खूप मेहनत घेतली. जसं, की हाग्गय आणि जखऱ्‍या हे संदेष्टे, याजक आणि शास्त्री असलेला एज्रा, आणि राज्यपाल नहेम्या. (एज्रा ५:१, २) त्यांनी लोकांना शिकवलं, की आपण शुद्ध उपासनेला नेहमी सर्वोच्च स्थानावर ठेवलं पाहिजे. पैसा कमवणं किंवा स्वार्थी इच्छा पूर्ण करणं यापेक्षा शुद्ध उपासनेला आपण आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. (हाग्ग. १:३, ४) शुद्ध उपासनेबद्दल देवाच्या उच्च स्तरांचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे यावर त्यांनी भर दिला. उदाहरणार्थ, एज्रा आणि नहेम्या यांनी लोकांना खडसावलं आणि अशी सक्‍त ताकीद दिली, की त्यांनी त्यांच्या विदेशी बायकांना परत पाठवून द्यावं. कारण त्यांच्यामुळे लोक यहोवापासून दूर चालले होते. (एज्रा १०:१०, ११ वाचा; नहे. १३:२३-२७, ३०) आणि मूर्तिपूजेबद्दल काय? असं दिसतं, की बंदिवासातून परत आल्यावर इस्राएली लोकांना शेवटी मूर्तिपूजेचा तिटकारा वाटू लागला होता. पण त्याआधी कितीतरी शतकांपर्यंत ते वारंवार मूर्तिपूजेच्या पाशात अडकले होते. यहेज्केलच्या दृष्टान्तातून हेही दिसतं, की यहोवाने याजकांना, प्रधानांना आणि अधिकाऱ्‍यांना सुधारण्यासाठी कडक शब्दांत सल्ला दिला होता. (नहे. १३:२२, २८) याबद्दल त्यांनी कशी मनोवृत्ती दाखवली? त्यांच्यापैकी अनेकांनी यहोवाकडून मिळालेला सल्ला नम्रपणे स्वीकारला.—एज्रा १०:७-९, १२-१४; नहे. ९:१-३, ३८.

नहेम्याने लोकांसोबत काम करताना त्यांना शुद्ध उपासनेबद्दल शिकवलं (परिच्छेद ११ पाहा)

१२. बंदिवासातून परत आलेल्या लोकांना यहोवाने कोणकोणते आशीर्वाद दिले?

१२ लोकांमधला हा चांगला बदल पाहून यहोवाने त्यांना अनेक आशीर्वाद दिले. लोकांचं यहोवासोबत एक चांगलं नातं तयार झालं, त्यांचा देश पुन्हा सुंदर आणि सुपीक झाला आणि देशात भरपूर शांती होती. असे चांगले दिवस खूप काळानंतर त्यांना अनुभवायला मिळाले होते. (एज्रा ६:१९-२२; नहे. ८:९-१२; १२:२७-३०, ४३) पण त्यांना हे सगळे आशीर्वाद का मिळाले? कारण मंदिराच्या दृष्टान्तातून मिळालेले धडे अनेकांच्या अगदी मनापर्यंत पोहोचले होते. आणि लोक शेवटी यहोवाने ठरवून दिलेल्या स्तरांप्रमाणे त्याची उपासना करू लागले. थोडक्यात, मंदिराबद्दलच्या दृष्टान्तातून यहुद्यांना दोन महत्त्वाच्या मार्गांनी फायदा झाला: (१) शुद्ध उपासनेबद्दल असलेल्या उच्च स्तरांप्रमाणे कसं चालायचं याबद्दल त्यांना व्यावहारिक धडे शिकायला मिळाले. (२) त्यांना याची खातरी मिळाली, की शुद्ध उपासना पुन्हा सुरू केली जाईल. आणि जोपर्यंत लोक शुद्ध उपासना करत राहतील तोपर्यंत यहोवा त्यांना आशीर्वाद देत राहील. पण आता प्रश्‍न असा येतो, की दृष्टान्तातली ही भविष्यवाणी आजही पूर्ण होत आहे का?

यहेज्केलच्या दृष्टान्तातून आज आपल्याला काय शिकायला मिळतं?

१३, १४. (क) यहेज्केलच्या दृष्टान्ताची आज आपल्या काळातही पूर्णता होत आहे असं आपण का म्हणू शकतो? (ख) या दृष्टान्तातून आज कोणत्या दोन महत्त्वाच्या मार्गांनी आपल्याला फायदा होतो? (चौकट १३क सुद्धा पाहा: “दोन वेगळी मंदिरं आणि त्यांपासून मिळणारे धडे.”)

१३ मंदिराबद्दलच्या दृष्टान्तातून आज आपणही काही शिकू शकतो का? नक्कीच. आपल्याला आठवत असेल, की यहेज्केलने दृष्टान्तात जे पाहिलं होतं, तसंच काहीतरी यशयाच्या भविष्यवाणीतही सांगितलं आहे. यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलं, की यहोवाचं पवित्र मंदिर “एका अतिशय उंच डोंगरावर” आहे. आणि यशयानेही आपल्या भविष्यवाणीत म्हटलं, की “यहोवाच्या मंदिराचा पर्वत इतर पर्वतांहून उंच होईल. तो भक्कमपणे स्थापन केला जाईल.” शिवाय त्याने स्पष्टपणे सांगितलं, की ही भविष्यवाणी “शेवटच्या दिवसांत” पूर्ण होईल. (यहे. ४०:२; यश. २:२-४; मीखा ४:१-४ सुद्धा पाहा.) आणि नेमकं तेच घडत आहे. या दोन्ही भविष्यवाण्या शेवटच्या दिवसांत, १९१९ पासून पूर्ण होत आहे. तेव्हापासून शुद्ध उपासना पुन्हा सुरू झाली आणि ती एका सर्वोच्च स्थानावर, जणू काही एका उंच डोंगरावर स्थापित झाली आहे. b

१४ त्यामुळे आपण खातरीने म्हणू शकतो, की यहेज्केलच्या दृष्टान्तातून आपण नक्कीच खूप काही शिकू शकतो. प्राचीन काळातल्या यहुदी लोकांप्रमाणेच, आज आपल्यालाही या दृष्टान्तातून दोन महत्त्वाच्या मार्गांनी फायदा होतो: (१) शुद्ध उपासनेबद्दल असलेल्या उच्च स्तरांप्रमाणे कसं चालायचं याबद्दल आपल्याला व्यावहारिक धडे शिकायला मिळतात. (२) आपल्याला खातरी मिळते, की संपूर्ण पृथ्वीवर फक्‍त यहोवाची उपासना केली जाईल आणि यहोवाकडून आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतील.

आज शुद्ध उपासनेचे काय स्तर आहेत?

१५. दृष्टान्तातलं मंदिर पाहताना आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे?

१५ आता आपण यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या काही खास वैशिष्ट्यांकडे लक्ष देऊ या आणि त्यांतून आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहू या. अशी कल्पना करा, की आपण यहेज्केलसोबत दृष्टान्तातलं मंदिर फिरून पाहत आहोत. पण एक लक्षात असू द्या, की दृष्टान्तात आपण महान लाक्षणिक मंदिर पाहत नाही; तर उपासनेच्या बाबतीत आज आपल्याला काय शिकायला मिळतं एवढंच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आता या दृष्टान्तातून आपल्याला कोणते धडे शिकायला मिळतात ते आपण पाहू या.

१६. मंदिराच्या मोजमापाबद्दल जी बारीकसारीक माहिती दिली आहे त्यावरून आपण काय शिकू शकतो? (सुरुवातीचं चित्र पाहा.)

१६ इतकं सगळं मोजमाप कशासाठी? दृष्टान्तात यहेज्केल पाहतो, की तांब्यासारखं स्वरूप असलेला स्वर्गदूत मंदिरातल्या बऱ्‍याच गोष्टींचं मोजमाप घेत आहे. जसं की भिंतींचं, प्रवेश-इमारतींचं, पहारेकऱ्‍यांच्या खोल्यांचं, अंगणांचं आणि वेदीचं. त्याने ज्या-ज्या गोष्टींचं माप घेतलं त्यांबद्दल इतकी बारीकसारीक माहिती देण्यात आली आहे, की ती आपल्याला समजायला कदाचित कठीण जाऊ शकते. (यहे. ४०:१–४२:२०; ४३:१३, १४) पण त्यातून किती महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात याचा विचार करा. एक म्हणजे, यहोवाच्या उच्च स्तरांचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे ही गोष्ट यहोवा आपल्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकांना वाटतं, की ‘देवाची उपासना कशीही केली तरी चालते, त्याने काही फरक पडत नाही.’ पण खरंतर ते खूप चुकीचा विचार करतात. कारण उपासना कशी करायची याबद्दलचे स्तर ठरवण्याचा हक्क यहोवालाच आहे, कोणत्याही मानवाला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, मंदिराचं इतकं अचूक मोजमाप करायला सांगून यहोवा आपल्याला ही खातरी देतो, की शुद्ध उपासना नक्कीच पुन्हा सुरू होईल. मंदिरातल्या गोष्टींचं मोजमाप जितकं अचूक आहे, तितक्याच अचूकपणे यहोवा आपली अभिवचनं पूर्ण करेल. अशा प्रकारे, यहोवा यहेज्केलद्वारे आपल्याला आश्‍वासन देतो, की शेवटच्या दिवसांत शुद्ध उपासना पुन्हा नक्की सुरू होईल.

मंदिराच्या अचूक मोजमापांवरून तुम्हाला काय शिकायलं मिळालं? (परिच्छेद १६ पाहा)

१७. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीमुळे आपल्याला कोणती गोष्ट लक्षात ठेवायला मदत होते?

१७ चारही बाजूंना असलेली भिंत. आधी चर्चा केल्याप्रमाणे यहेज्केलने पाहिलं, की दृष्टान्तातल्या मंदिराच्या आवाराभोवती एक भिंत आहे. त्यावरून देवाच्या लोकांना कडक इशारा मिळाला, की त्यांनी खोट्या धर्माची अशुद्ध कामं देवाच्या शुद्ध उपासनेपासून फार दूर ठेवली पाहिजेत. (यहेज्केल ४३:७-९ वाचा.) हाच सल्ला आज आपणही मानला पाहिजे. देवाचे लोक बऱ्‍याच शतकांपर्यंत मोठ्या बाबेलच्या बंदिवासात होते. पण १९१९ मध्ये तिथून त्यांची सुटका झाली आणि त्याच वर्षी ख्रिस्ताने विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला नेमलं. खासकरून तेव्हापासून देवाच्या लोकांनी खोट्या धर्माच्या शिकवणी सोडून देण्यासाठी खूप मेहनत घेतली. तसंच, मूर्तिपूजा आणि खोट्या धर्माशी संबंधित असलेले रितीरिवाज सोडून देण्यासाठीही त्यांनी मेहनत घेतली. आज आपणही शुद्ध उपासनेत खोट्या धर्मातल्या दुष्ट कामांची भेसळ होणार नाही याची काळजी घेतो. इतकंच नाही, तर आपण राज्य सभागृहात बिझनेस किंवा व्यवहाराशी संबंधित असलेल्या इतर गोष्टीही करत नाही. अशा गोष्टी आपण आपल्या उपासनेपासून वेगळ्याच ठेवतो.—मार्क ११:१५, १६.

१८, १९. (क) दृष्टान्तातल्या मंदिराच्या उंच प्रवेश-इमारतींवरून आपण काय शिकू शकतो? (ख) कोणी जर आपल्याला यहोवाच्या उच्च स्तरांपासून बहकवण्याचा प्रयत्न केला तर आपण काय केलं पाहिजे? याचं एक उदाहरण द्या.

१८ उंच प्रवेश-इमारती. दृष्टान्तातल्या उंच प्रवेश-इमारतींवर मनन केल्यामुळे यहुदी बंदिवानांना नक्कीच हे शिकायला मिळालं असेल, की यहोवाचे नैतिक स्तर खूप उच्च आहेत. आज आपल्याबद्दल काय? त्यांवर मनन केल्यामुळे आपल्यालाही काही शिकायला मिळतं का? नक्कीच. आज आपण देवाच्या महान लाक्षणिक मंदिरात त्याची उपासना करत आहोत, त्यामुळे आपलं वागणं-बोलणं नेहमी देवाला आवडेल असंच असलं पाहिजे; त्यात कुठलाही ढोंगीपणा नसला पाहिजे. (रोम. १२:९; १ पेत्र १:१४, १५) या शेवटच्या दिवसांत, यहोवा त्याच्या लोकांना त्याच्या नैतिक स्तरांचं आणखी जवळून पालन करायला शिकवत आहे. c उदाहरणार्थ जे लोक चुकीचं काम करतात, पण त्याबद्दल पश्‍चात्ताप करत नाहीत त्यांना मंडळीतून बहिष्कृत केलं जातं. (१ करिंथ. ५:११-१३) याशिवाय, प्रवेश-इमारतींमध्ये असलेल्या पहारेकऱ्‍यांच्या खोल्यांवरूनही आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. ती म्हणजे, जो यहोवाला मान्य नाही त्याला लाक्षणिक मंदिरात पाऊल ठेवायची परवानगी नाही. उदाहरणार्थ, दुहेरी जीवन जगणारी एखादी व्यक्‍ती कदाचित राज्यसभागृहात येईलही. पण जोपर्यंत ती यहोवाच्या स्तरांप्रमाणे स्वतःमध्ये बदल करत नाही, तोपर्यंत ती यहोवाला मान्य नाही. (याको. ४:८) आज आपण जगात पाहतो, की नैतिकता अगदी खालच्या थराला गेली आहे. पण अशात यहोवा शुद्ध उपासना सुरक्षित ठेवत आहे हे पाहून आपल्याला किती आनंद होतो!

१९ बायबलमध्ये आधीच सांगितलं होतं, की शेवटच्या दिवसांत लोकांचं वागणं, त्यांची नैतिकता आणखीनच खालच्या थराला जाईल. त्यात म्हटलं आहे: “दुष्ट आणि फसवी माणसं दिवसेंदिवस आणखी वाईट होतील; ती स्वतः बहकतील आणि दुसऱ्‍यांनाही बहकवतील.” (२ तीम. ३:१३) हे जग लोकांना असा विचार करायला लावतं, की यहोवाचे उच्च स्तर जरा जास्तच कडक आहेत, ते जुन्या काळातले आहेत किंवा साफ चुकीचे आहेत. त्यामुळे आज बऱ्‍याच लोकांची फसवणूक होत आहे. पण तुमच्याबद्दल काय? तुम्ही या जगाला तुमची फसवणूक करू द्याल का? उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्‍तीने जर तुम्हाला असं पटवून द्यायचा प्रयत्न केला, की समलैंगिकतेबद्दल यहोवाचे जे स्तर आहेत ते साफ चुकीचे आहेत, तर तुम्ही काय म्हणाल? ती जे म्हणते ते बरोबर आहे असं म्हणाल, की यहोवा जे सांगतो ते बरोबर आहे असं म्हणाल? यहोवाने त्याच्या वचनात अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे, की समलैंगिक संबंध ठेवणारे खरंतर “अश्‍लील कामं” करतात. बायबल असंही म्हणतं, की कोणत्याही अनैतिक कामांना ‘पसंती दाखवणंही’ चुकीचं आहे. (रोम. १:२४-२७, ३२) त्यामुळे असे प्रश्‍न आपल्यासमोर येतात, तेव्हा यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलेल्या मंदिराच्या त्या उंच प्रवेश-इमारतींचं चित्र आपल्या डोळ्यांपुढे आणा, आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. ती म्हणजे, या दुष्ट जगाने वाईट कामांना कितीही योग्य ठरवण्याचा प्रयत्न केला, तरी यहोवा त्याचे उच्च स्तर कधीच खाली आणत नाही. आपणही आपल्या स्वर्गातल्या पित्यासारखाच विचार करतो का? आणि जे योग्य आहे त्याच्या बाजूने ठामपणे उभे राहतो का?

आपण शुद्ध उपासना करतो तेव्हा “स्तुतीचं बलिदान” अर्पण करत असतो

२०. ‘मोठ्या लोकसमुदायातल्या’ लोकांना यहेज्केलच्या दृष्टान्तातून कसं प्रोत्साहन मिळतं?

२० अंगणं: दृष्टान्तात यहेज्केलने पाहिलं, की मंदिराचं बाहेरचं अंगण बऱ्‍यापैकी मोठं आणि प्रशस्त आहे. ते पाहून त्याला नक्कीच खूप आनंद झाला असेल. कारण तो या गोष्टीची कल्पना करू शकत होता, की इथे खूप लोक एकत्र येऊन यहोवाची उपासना करू शकतील. आज खरे ख्रिस्ती महान लाक्षणिक मंदिरात यहोवाची उपासना करतात. या मंदिराच्या बाहेरच्या अंगणात ‘मोठ्या लोकसमुदायातले’ लोक उपासना करतात. यहेज्केलला दृष्टान्तातल्या मंदिराच्या बाहेरच्या अंगणात अशा काही गोष्टी दिसतात ज्यांमुळे आज मोठ्या लोकसमुदायातल्या लोकांना खूप प्रोत्साहन मिळतं. (प्रकटी. ७:९, १०, १४, १५) त्याने पाहिलं, की मंदिराच्या या अंगणात एकाला-एक लागून बऱ्‍याचशा जेवणाच्या खोल्या आहेत. देवाला शांती-अपर्णं देणारे लोक त्यातले काही भाग त्या खोल्यांमध्ये बसून खाऊ शकत होते. (यहे. ४०:१७) एका अर्थी, ते यहोवासोबत मिळून जेवणाचा आनंद घेत होते. त्यावरून यहोवासोबत त्यांची खूप चांगली मैत्री आहे हेच दिसून यायचं. प्राचीन काळात यहुदी लोक जशी मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे देवाला बलिदानं अर्पण करायचे तशी आज आपण देत नाही. त्याऐवजी आपण यहोवाला “स्तुतीचं बलिदान” देतो. (इब्री १३:१५) ते कसं? आपण जेव्हा शुद्ध उपासना करतो, म्हणजे लोकांना साक्ष देतो, तसंच सभांमध्ये उत्तरं देऊन, गीतं गाऊन आपला विश्‍वास व्यक्‍त करतो तेव्हा एका अर्थाने आपण देवाला बलिदानंच देत असतो. इतकंच काय, तर आज यहोवा आपल्याला भरपूर आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे आणि त्यामुळे आपल्याला ताकद मिळते. यामुळे कोरहच्या वंशजांना वाटलं होतं तसंच आज आपल्यालाही वाटतं. त्यांनी म्हटलं होतं: “तुझ्या अंगणांतला एक दिवस, इतर ठिकाणी घालवलेल्या हजार दिवसांपेक्षा चांगला आहे!”—स्तो. ८४:१०.

२१. यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या याजकांकडून अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना काय शिकायला मिळतं?

२१ याजकपद: दृष्टान्तात यहेज्केलने पाहिलं, की इतर लोकांसाठी बाहेरच्या अंगणात जशा प्रवेश-इमारती होत्या, तशाच प्रवेश-इमारती आतल्या अंगणातही होत्या. पण या प्रवेश-इमारतींतून फक्‍त याजक आणि लेवी आतल्या अंगणात येऊ शकत होते. त्यांवरून याजकांना याची आठवण व्हायची, की त्यांनीसुद्धा शुद्ध उपासनेबद्दल असलेल्या यहोवाच्या स्तरांचं पालन केलं पाहिजे. हे खरं आहे, की आज यहोवाच्या सेवकांपैकी कोणालाही वारशाने याजकपद मिळत नाही. पण अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांबद्दल बायबलमध्ये म्हटलं आहे: ‘तुम्ही एक निवडलेला वंश, राजे असलेले याजक आहात.’ (१ पेत्र २:९) प्राचीन इस्राएलमध्ये याजक एका वेगळ्या अंगणात उपासना करायचे. पण आज अभिषिक्‍त ख्रिस्ती एका वेगळ्या ठिकाणी नाही, तर यहोवाच्या इतर सेवकांसोबत मिळून उपासना करतात. यहोवाने त्यांना मुलं म्हणून दत्तक घेतलं आहे, त्यामुळे यहोवासोबत त्यांचं एक खास नातं आहे. (गलती. ४:४-६) असं असलं, तरी यहेज्केलच्या दृष्टान्तातून मिळणाऱ्‍या महत्त्वाच्या इशाऱ्‍यांकडे ते लक्ष देतात. उदाहरणार्थ ते ही गोष्ट नेहमी आठवणीत ठेवतात, की प्राचीन इस्राएलमधल्या याजकांप्रमाणेच आपल्यालाही गरज पडली तर सुधारण्यासाठी सल्ला दिला जाऊ शकतो. तर मग, आपण अभिषिक्‍त ख्रिस्ती असोत किंवा दुसऱ्‍या मेंढरांपैकी, आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण सगळे ‘एका कळपातले’ आहोत आणि ‘एका मेंढपाळाच्या’ अधीन राहून यहोवाची सेवा करतो.—योहान १०:१६ वाचा.

२२, २३. (क) यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या प्रधानाकडून आज मंडळीतले वडील काय शिकू शकतात? (ख) भविष्यात काय होण्याची शक्यता आहे?

२२ प्रधान. दृष्टान्तात यहेज्केलने पाहिलं, की प्रधानाचीही एक खास भूमिका आहे. तो याजकांच्या वंशापैकी नव्हता, आणि मंदिरात कदाचित याजकांच्या अधीन राहून काम करायचा. पण तो यहोवाच्या लोकांची देखरेख करायचा आणि बलिदानं पुरवण्यात त्यांची मदत करायचा. (यहे. ४४:२, ३; ४५:१६, १७; ४६:२) आज ख्रिस्ती मंडळीत जे बांधव जबाबदाऱ्‍या हाताळतात त्यांच्यासाठी प्रधानाचं खूप चांगलं उदाहरण आहे. कारण सगळ्याच ख्रिस्ती वडिलांना, ज्यांत प्रवासी पर्यवेक्षकसुद्धा येतात, त्यांना विश्‍वासू दासाच्या अधीन राहून काम करावं लागतं. (इब्री १३:१७) प्रधानांसारखंच आज ख्रिस्ती वडीलही देवाच्या लोकांना सभांमध्ये आणि प्रचारकार्यात स्तुतीची बलिदानं द्यायला मदत करण्यासाठी खूप मेहनत घेतात. (इफिस. ४:११, १२) तसंच, ख्रिस्ती वडील हेही लक्षात ठेवतात, की इस्राएलमधल्या प्रधानानांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला तेव्हा यहोवाने त्यांना फटकारलं होतं. (यहे. ४५:९) त्यामुळे ते कधीही असा विचार करत नाहीत, की आपल्याकडून कधीच चूक होणार नाही आणि आपल्याला कधीच सल्ल्याची गरज पडणार नाही. याउलट, यहोवा त्यांना सुधारण्यासाठी काही सल्ला देतो तेव्हा ते तो आनंदाने स्वीकारतात. कारण ते हे ओळखतात, की मेंढपाळ आणि देखरेख करणारे म्हणून आपली जबाबदारी चागंल्या प्रकारे पार पाडायला यहोवा आपल्याला शिकवत आहे.—१ पेत्र ५:१-३ वाचा.

२३ येणाऱ्‍या नवीन जगातही यहोवा आपल्या लोकांसाठी जबाबदार आणि प्रेमळ मेंढपाळ नेमेल. खरंतर, मेंढपाळ म्हणून देवाच्या लोकांची चांगली काळजी घेता यावी म्हणून आत्तापासूनच वडिलांना प्रशिक्षण दिलं जात आहे. यांच्यापैकी अनेकांना कदाचित नवीन जगातही ही जबाबदारी दिली जाईल. (स्तो. ४५:१६) अशा जबाबदार बांधवांमुळे नवीन जगात आपल्याला किती आशीर्वाद मिळतील, याचा विचार करून आपल्याला आनंद होत नाही का? पुढे शुद्ध उपासनेबद्दलच्या इतर भविष्यवाण्यांबद्दल आणि यहेज्केलच्या या दृष्टान्ताबद्दल यहोवा कदाचित आपल्याला आणखी जास्त माहिती देईल. कदाचित आपल्याला अजून काही व्यावहारिक धडे शिकायला मिळतील. आणि या भविष्यवाणीतल्या पैलूंची वेगळ्या प्रकारे पूर्णता होऊ शकते. पण त्याबद्दल आपण आताच काही सांगू शकत नाही. त्यासाठी आपण यहोवाच्या वेळेची वाट पाहिली पाहिजे.

उंच प्रवेश-इमारतींवरून आणि अंगणांवरून उपासनेबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं? (परिच्छेद १८-२१ पाहा)

शुद्ध उपासनेवर यहोवाचे आशीर्वाद

२४, २५. यहेज्केलच्या दृष्टान्तातून यहोवाच्या आशीर्वादांची झलक कशी मिळते?

२४ आता शेवटी, यहेज्केलने दृष्टान्तात जी खास घटना पाहिली ती आठवायचा प्रयत्न करू या. ती खास घटना म्हणजे, मंदिरात यहोवाचा वैभवशाली प्रवेश! यहोवा मंदिरात येतो आणि आपल्या लोकांना वचन देतो, की जोपर्यंत ते शुद्ध उपासनेबद्दलच्या त्याच्या स्तरांचं प्रामाणिकपणे पालन करत राहतील तोपर्यंत तो मंदिरात राहील. (यहे. ४३:४-९) यहोवा मंदिरात असल्यामुळे लोकांना आणि त्यांच्या देशाला कोण-कोणते आशीर्वाद मिळतात?

२५ यहोवाकडून कोण-कोणते आशीर्वाद मिळतील याची झलक देण्यासाठी दृष्टान्तातल्या या भविष्यवाणीत दोन गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. (१) मंदिराच्या पवित्र स्थानातून वाहत असलेली एक नदी. त्या नदीमुळे संपूर्ण देशाला जीवन मिळतं आणि देशाची जमीन सुपीक होते. (२) देशाच्या जमिनीची अगदी व्यवस्थित आणि योग्य प्रकारे वाटणी केली जाते. आणि देशाच्या मधोमध मंदिर आणि मंदिराच्या आसपास मोकळी जागा आहे. आज या दोन गोष्टींचा काय अर्थ होतो? हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आज आपण अशा काळात जगत आहोत जेव्हा यहोवाने त्याच्या महान लाक्षणिक मंदिरात प्रवेश केला आहे, त्याने ते शुद्ध केलं आहे आणि त्याला ते मान्य आहे. (मला. ३:१-४) भविष्यवाणीतल्या या दोन गोष्टींचा काय अर्थ होतो ते आपण या पुस्तकाच्या १९-२१ अध्यायांमध्ये पाहणार आहोत.

a यावरून यहोवा हे सूचित करत होता, की त्याच्या लोकांनी पूर्वी जसं त्याच्या पवित्र घराला अशुद्ध केलं होतं तसं आता पुन्हा होणार नाही. आधी जे घडलं त्याबद्दल यहोवा म्हणतो: “त्यांनी [खोट्या दैवतांच्या] मंदिरांचे उंबरठे माझ्या मंदिराच्या उंबरठ्याशेजारी बांधले. त्यांनी [खोट्या दैवतांच्या] मंदिरांच्या दाराच्या चौकटी माझ्या मंदिराच्या दाराच्या चौकटीशेजारी बांधल्या; माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फक्‍त एक भिंत होती. अशी सगळी घृणास्पद कामं करून त्यांनी माझं पवित्र नाव अशुद्ध केलं.” (यहे. ४३:८) प्राचीन यरुशलेममध्ये, यहोवाचं मंदिर आणि लोकांची घरं यांमध्ये फक्‍त एका भिंतीचं अंतर होतं. त्यामुळे लोक जेव्हा यहोवाच्या नीतिमान स्तरांविरुद्ध वागू लागले, तेव्हा ते खरंतर यहोवाच्या मंदिराच्या अगदी जवळ मूर्तिपूजा आणि अशुद्ध कामं करत होते. हे सगळं यहोवाच्या सहनशक्‍तीच्या पलीकडे होतं.

b यहेज्केलने मंदिराचा जो दृष्टान्त पाहिला, तो शेवटच्या दिवसांत पूर्ण होत असलेल्या शुद्ध उपासनेबद्दलच्या इतर भविष्यवाण्यांसोबत चांगल्या प्रकारे जुळतो. उदाहरणार्थ, यहेज्केल ४३:१-९ आणि मलाखी ३:१-५ यांत, तसंच यहेज्केल ४७:१-१२ आणि योएल ३:१८ यांत कोणत्या समानता आहेत ते लक्षात घ्या.

c महान लाक्षणिक मंदिर इ.स. २९ मध्ये, म्हणजे येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तो महायाजक म्हणून सेवा करू लागला तेव्हा अस्तित्वात आलं. पण प्रेषितांच्या मृत्यूनंतर बऱ्‍याच शतकांपर्यंत लोकांनी शुद्ध उपासनेकडे खूप दुर्लक्ष केलं. मग खासकरून १९१९ पासून, शुद्ध उपासना जशी व्हायला हवी तशी होऊ लागली आणि तिला तिचं सर्वोच्च स्थान मिळू लागलं.