व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय २१

“त्या शहराचं नाव ‘यहोवा तिथे आहे’ असं असेल”

“त्या शहराचं नाव ‘यहोवा तिथे आहे’ असं असेल”

यहेज्केल ४८:३५

अध्याय कशाबद्दल आहे: शहराचा आणि दान म्हणून वेगळ्या काढलेल्या जमिनीचा अर्थ

१, २. (क) देशाच्या जमिनीचा पट्टा कोणत्या खास कारणासाठी वेगळा काढायचा होता? (सुरुवातीचं चित्र पाहा.) (ख) या दृष्टान्तामुळे बंदिवानांना कोणती खातरी मिळते?

 यहेज्केलला शेवटच्या दृष्टान्तात कळतं, की देशातल्या जमिनीचा एक पट्टा एका खास कारणासाठी वेगळा काढायचा आहे. हा जमिनीचा पट्टा इस्राएली लोकांसाठी नाही, तर यहोवासाठी वेगळा काढायचा होता. याच दृष्टान्तात यहेज्केलला एक शहरसुद्धा दिसतं. या शहराचं एक अनोखं नाव आहे. दृष्टान्ताच्या या भागामुळे बंदिवानांना एका गोष्टीची पक्की खातरी पटते. ती म्हणजे, ते जेव्हा आपल्या प्रिय मायदेशात परत जातील तेव्हा यहोवा त्यांच्यासोबत असेल.

जमिनीचा जो पट्टा दान म्हणून वेगळा काढायचा होता, त्याचं यहेज्केलने सविस्तरपणे वर्णन केलं. चला, आता आपण त्या अहवालाचा अभ्यास करू या. कारण यहोवाचे खरे उपासक असल्यामुळे आपल्याला त्या अहवालातून खूप काही शिकायला मिळेल.

‘शहरासोबत तुम्ही हा भाग पवित्र दान म्हणून वेगळा काढा’

३. (क) यहोवाने जमिनीचा जो पट्टा वेगळा काढला होता त्याचे पाच भाग कोणते आहेत? (ख) ते पाच भाग कशासाठी आहेत? (“जमिनीतून काही भाग दान म्हणून वेगळा काढा,” ही चौकट पाहा.)

जमिनीचा जो पट्टा वेगळा काढण्यात आला होता (चौकट २१क, १), त्याच्या आत असलेल्या चौकोनी भागाचं मोजमाप दृष्टान्तात देण्यात आलं होतं. या चौकोनी भागाचं माप उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत २५,००० हात (१३ किलोमीटर) आणि पूर्वेपासून पश्‍चिमेपर्यंत २५,००० हात होतं. या भागाला ‘दान केलेल्या जमिनीचा संपूर्ण भाग’ म्हटलं आहे (चौकट २१क, २). या चौकोनी भागाचे तीन भाग करण्यात आले होते. वरचा भाग लेव्यांसाठी होता, तसंच मधला भाग मंदिरासाठी आणि याजकांसाठी वेगळा काढण्यात आला होता. या दोन्ही भागांना मिळून ‘पवित्र दान’ म्हटलं आहे (चौकट २१क, ४). खालचा छोटा भाग किंवा ‘उरलेला भाग’ हा “सार्वजनिक” वापरासाठी होता (चौकट २१क, ५). आणि तो शहरासाठी असणार होता.—यहे. ४८:१५, २०.

४. यहोवासाठी जमिनीचा जो पट्टा वेगळा काढायचा होता त्याबद्दलच्या अहवालावरून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो?

यहोवासाठी जमिनीचा जो पट्टा वेगळा काढायचा होता, त्याबद्दलच्या अहवालातून आपण कोणता धडा शिकू शकतो? यहोवाने आधी जमिनीचा हा पट्टा दान म्हणून वेगळा काढला. आणि मग बाकीची जमीन इस्राएलच्या वंशांमध्ये वाटली. यावरून कळतं, की खास दान म्हणून वेगळ्या काढलेल्या या जमिनीच्या पट्ट्याला सर्वात जास्त महत्त्व दिलं पाहिजे, असं यहोवाला सांगायचं होतं. कारण ही जागा उपासनेचं खास ठिकाण असणार होती. (यहे. ४५:१) देशाच्या जमिनीची वाटणी ज्या क्रमाने करण्यात आली, त्यावरून यहुदी बंदिवानांना एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे, त्यांना यहोवाच्या उपासनेला आपल्या जीवनात सर्वात पहिली जागा द्यायची होती. आजसुद्धा आध्यात्मिक गोष्टींबद्दल आपण असाच विचार केला पाहिजे. बायबलचं वाचन करणं, सभांना जाणं आणि प्रचार करणं या गोष्टींना आपण आपल्या जीवनात पहिली जागा दिली पाहिजे. योग्य गोष्टींना महत्त्व देण्याच्या बाबतीत जेव्हा आपण यहोवाचं अनुकरण करतो, तेव्हा आपल्याला त्याच्या उपासनेला आपल्या जीवनात पहिली जागा देता येते.

“या भागाच्या मधोमध शहर असेल”

५, ६. (क) शहराची जागा कोणासाठी होती? (ख) हे शहर कोणत्या गोष्टींना सूचित करत नाही? आणि का?

यहेज्केल ४८:१५ वाचा. “शहर” आणि त्याच्या आसपासची जमीन कोणासाठी होती? (यहे. ४८:१६-१८) यहोवाने यहेज्केलला दृष्टान्तात सांगितलं, की शहराची ही “जागा इस्राएलच्या संपूर्ण घराण्याची असेल.” (यहे. ४५:६, ७) म्हणजेच, ‘यहोवासाठी पवित्र दान म्हणून वेगळ्या काढलेल्या भागात,’ शहर आणि त्याच्या आसपासची जमीन सामील नव्हती. (यहे. ४८:९) तर आतापर्यंत आपण पाहिलं, की या अहवालात कोणती गोष्ट कशाला सूचित करते. मग चला, या शहराच्या व्यवस्थेवरून आज आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहू या.

या शहराच्या व्यवस्थेपासून आपण कोणते धडे शिकू शकतो हे आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी आपण ही गोष्ट माहीत करून घेतली पाहिजे, की हे शहर कशाला सूचित करत नाही. हे शहर पुन्हा बांधण्यात आलेल्या यरुशलेम शहराला आणि तिथल्या मंदिराला सूचित करत नाही. का नाही? कारण यरुशलेममधलं मंदिर शहराच्या आत होतं. पण यहेज्केलच्या दृष्टान्तातलं मंदिर हे शहराबाहेर होतं. तसंच, हे शहर पुन्हा वसवण्यात आलेल्या इस्राएलच्या दुसऱ्‍या कोणत्याही शहराला सूचित करत नाही. का नाही? कारण परत आलेल्या बंदिवानांनी किंवा त्यांच्या वंशजांनी कोणतंच असं शहर बांधलं नव्हतं, जे यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या शहरासारखं होतं. शिवाय, हे शहर स्वर्गालाही सूचित करू शकत नाही. का? कारण हे शहर “सार्वजनिक” वापरासाठी असलेल्या जागेत बांधलं गेलं होतं. पण यहोवाची शुद्ध उपासना जिथे केली जात होती ते ठिकाण सार्वजनिक जागेत नव्हतं.—यहे. ४२:२०.

७. (क) यहेज्केलने पाहिलेलं शहर नेमकं काय आहे? (ख) ते शहर कशाला सूचित करतं? (सुरुवातीचं चित्र पाहा.)

मग यहेज्केलने दृष्टान्तात जे शहर पाहिलं ते नेमकं काय आहे? लक्षात असू द्या, की यहेज्केलने ज्या दृष्टान्तात देशाची जमीन पाहिली, त्याच दृष्टान्तात हे शहरसुद्धा पाहिलं. (यहे. ४०:२; ४५:१, ६) बायबलमधून आपल्याला कळतं, की हा देश एका आध्यात्मिक देशाला सूचित करतो. याचाच अर्थ हे शहरसुद्धा एक आध्यात्मिक शहर आहे. सहसा “शहर” या शब्दावरून आपल्या मनामध्ये कोणतं चित्र उभं राहतं? आपल्या मनामध्ये कदाचित, बरेच लोक संघटितपणे आणि सुव्यवस्थितपणे एकत्र राहत असल्याचं चित्र येऊ शकतं. मग यहेज्केलने जे शहर पाहिलं ते नेमकं कशाला सूचित करतं? असं दिसतं की ते चौकोनी शहर एका सुव्यवस्थित प्रशासनाला सूचित करतं.

८. शहराचं प्रशासन कुठे काम करत आहे? आणि आपण असं का म्हणू शकतो?

हे प्रशासन कुठे कार्य करतं? यहेज्केलच्या दृष्टान्तावरून कळतं, की शहराचं हे प्रशासन आध्यात्मिक देशामध्ये कार्य करतं. म्हणजेच आज हे प्रशासन देवाच्या लोकांमध्ये काम करत आहे आणि त्यांच्या कामाचं मार्गदर्शन करत आहे. तसंच, शहर जमिनीच्या पवित्र भागावर नाही, तर सार्वजनिक भागावर उभं आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, की हे शहर स्वर्गातल्या नाही तर पृथ्वीवरच्या प्रशासनाला सूचित करतं. आणि ते आध्यात्मिक नंदनवनात राहणाऱ्‍या सगळ्यांच्या भल्यासाठी काम करत आहे.

९. (क) पृथ्वीवरच्या प्रशासनात आज कोण काम करतं? (ख) येशू हजार वर्षांच्या राज्यात काय करणार आहे?

पृथ्वीवरच्या या प्रशासनात कोण काम करतं? यहेज्केलच्या दृष्टान्तात शहराच्या प्रशासनात पुढाकार घेणाऱ्‍याला “प्रधान” असं म्हटलं आहे. (यहे. ४५:७) तो लोकांची देखरेख करायचं काम करतो, पण तो याजक किंवा लेवी नाही. या प्रधानाचा विचार केल्यावर, कदाचित आज मंडळीत सेवा करणारे वडील आपल्याला आठवतील. हे भाऊ ‘दुसऱ्‍या मेंढरांमधले’ आहेत आणि देवाच्या लोकांची सेवा करतात. (योहा. १०:१६) हे मेंढपाळ, नम्रपणे ख्रिस्ताच्या स्वर्गातल्या सरकाराच्या अधीन राहतात आणि प्रेमाने आपली काळजी घेतात. येशूच्या येणाऱ्‍या हजार वर्षांच्या राज्यात तो “संपूर्ण पृथ्वीवर” योग्यता असलेले वडील किंवा “प्रधान” नेमेल. (स्तो. ४५:१६) त्या हजार वर्षांमध्ये ते स्वर्गातल्या राज्याच्या मार्गदर्शनाखाली, देवाच्या लोकांचं भलं करण्यासाठी काम करतील.

“यहोवा तिथे आहे”

१०. शहराचं नाव काय आहे? आणि त्यामुळे कोणती खातरी मिळते?

१० यहेज्केल ४८:३५ वाचा. त्या शहराचं नाव “यहोवा तिथे आहे” असं आहे. या नावावरून अशी खातरी मिळते, की यहोवा या शहरातल्या लोकांसोबत असेल. देशाच्या मध्यभागी असलेलं हे शहर यहोवाने यहेज्केलला का दाखवलं? यहोवा एका अर्थाने यहुदी बंदिवानांना असं सांगत होता, “मी पुन्हा तुमच्यासोबत राहीन.” या गोष्टीमुळे त्यांना खरंच खूप दिलासा मिळाला असेल.

११. यहेज्केलच्या दृष्टान्तात शहराबद्दल आणि त्याच्या नावाच्या अर्थाबद्दल जे सांगितलं आहे त्यातून आपण कोणते धडे शिकू शकतो?

११ यहेज्केलच्या दृष्टान्ताच्या या भागातून आपल्याला कोणते धडे शिकायला मिळतात? शहराच्या या नावामुळे, आज देवाच्या लोकांना एका गोष्टीची खातरी मिळते. ती म्हणजे, आज यहोवा पृथ्वीवरच्या त्याच्या विश्‍वासू लोकांसोबत आहे आणि कायम राहील. शहराच्या या नावामुळे आपल्याला आणखी एक महत्त्वाचं सत्य कळतं. ते म्हणजे, शहराचं प्रशासन मानवांना स्वतःच्या बुद्धीप्रमाणे निर्णय घ्यायचा अधिकार देत नाही. तर ते मानवांद्वारे यहोवाचे नियम लागू करतं. आणि यहोवाचे नियम हे नेहमी प्रेमळ आणि पाळायला सोपे असतात. उदाहरणार्थ, यहोवाने या प्रशासनातल्या माणसांना देशाची वाटणी करायचा अधिकार दिला नाही. याउलट, त्याने एका अर्थाने आध्यात्मिक देशात आपल्या सगळ्या सेवकांना वाटे दिले आहेत. या सेवकांमध्ये असेही लोक सामील आहेत जे जगाच्या दृष्टीने क्षुल्लक आहेत. पण या आध्यात्मिक नंदनवनात प्रत्येकाची एक जागा आहे. आणि प्रशासनातल्या लोकांनी या गोष्टीचा आदर करावा अशी यहोवाची अपेक्षा आहे.—यहे. ४६:१८; ४८:२९.

१२. (क) शहराचा आणखी एक महत्त्वाचा पैलू कोणता आहे? आणि यावरून आपल्याला शहराबद्दल काय कळतं? (ख) दृष्टान्तातल्या या भागातून मंडळीतल्या वडिलांना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीची आठवण होते?

१२ “यहोवा तिथे आहे” असं नाव असलेल्या शहराचा आणखी एक महत्त्वाचा पैलू कोणता आहे? शहर सुरक्षित राहावं म्हणून जुन्या काळात शहराच्या भिंतीला शक्य तितकी कमी फाटकं असायची. पण लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे, की या शहराला १२ फाटकं होती. (यहे. ४८:३०-३४) शहराला इतकी फाटकं (म्हणजेच, या चौकोनी शहराच्या प्रत्येक बाजूला ३ फाटकं) असण्यावरून कळतं, की देवाचे लोक निःसंकोचपणे किंवा न घाबरता प्रशासनातल्या लोकांकडे जाऊ शकत होते. तसंच, प्रशासनातले लोक नेहमी देवाच्या लोकांची मदत करण्यासाठी तयार असायचे. शिवाय, या शहराला असलेल्या १२ फाटकांवरून कळतं, की ते सगळ्यांसाठी म्हणजे ‘इस्राएलच्या संपूर्ण घराण्यासाठी’ उघडं होतं. (यहे. ४५:६) आणखीन एक गोष्ट म्हणजे, या शहराच्या फाटकातून सगळे जण आत जाऊ शकत होते. या गोष्टीवरून आज ख्रिस्ती मंडळीतल्या वडिलांना एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण होते. ती म्हणजे, त्यांनी प्रेमळ आणि मनमिळाऊ असलं पाहिजे. त्यामुळे आध्यात्मिक नंदनवनात राहणाऱ्‍या सगळ्यांना त्यांच्याकडे निःसंकोचपणे किंवा न घाबरता येता येईल. तसंच, त्यांनी सगळ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असलं पाहिजे.

मंडळीतल्या वडिलांकडे कोणीही निःसंकोचपणे जाऊ शकतं आणि ते सगळ्यांना मदत करायला तयार असतात (परिच्छेद १२ पाहा)

देवाचे लोक “उपासना” करायला आणि “शहराची सेवा” करायला येतात

१३. यहोवाने सांगितल्याप्रमाणे लोक मंदिरात कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करणार होते?

१३ चला, आता आपण यहेज्केलच्या काळात पुन्हा जाऊ या. आणि जमिनीची वाटणी करण्याबद्दलच्या या दृष्टान्तात त्याने आणखी कोणत्या गोष्टी लिहून ठेवल्या ते पाहू या. यहोवाने या दृष्टान्तात सांगितलं, की लोक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करतील. उदाहरणार्थ, याजक मंदिरात सेवा करतील. म्हणजे, ते बलिदानं अर्पण करतील आणि यहोवाजवळ येऊन त्याची सेवा करतील. तर लेवी मंदिरात सेवेची इतर कामं करतील. (यहे. ४४:१४-१६; ४५:४, ५) शिवाय, शहराच्या आसपासही काही लोक वेगवेगळी कामं करतील. पण हे लोक कोण होते?

१४. शहराच्या आसपास काम करणाऱ्‍या लोकांचा विचार केल्यावर आपल्याला कोणती गोष्ट आठवते?

१४ शहराच्या आसपास काम करणारे लोक हे ‘इस्राएलच्या सर्व वंशांमधून’ येणार होते. त्यांना शेती करून शहरात काम करणाऱ्‍यांसाठी ‘अन्‍नधान्य पिकवायचं होतं’ आणि अशा प्रकारे त्यांना त्यांची मदत करायची होती. (यहे. ४८:१८, १९) या व्यवस्थेचा विचार केल्यावर, आज आपल्याकडे कोणती संधी आहे, हे तुम्हाला आठवतं का? आज आध्यात्मिक नंदनवनात राहणाऱ्‍या आपल्या सर्वांना ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांना पाठिंबा देण्याची संधी आहे. तसंच, ‘मोठ्या लोकसमुदायातल्या’ ज्या लोकांना यहोवाने पुढाकार घेण्यासाठी नेमलं आहे, त्यांच्या कामात हातभार लावायची संधीसुद्धा आपल्याजवळ आहे. (प्रकटी. ७:९, १०) आणि ही मदत करण्याचा एक मुख्य मार्ग म्हणजे, विश्‍वासू दासाकडून येणाऱ्‍या मार्गदर्शनाचं मनापासून पालन करणं.

१५, १६. (क) यहेज्केलच्या दृष्टान्तातून आपल्याला आणखीन कोणती महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते? (ख) आपल्याकडे आज कोणती कामं करण्याची संधी आहे?

१५ यहेज्केलच्या या दृष्टान्तातून आपल्याला आपल्या प्रचार कार्याबद्दल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. ती कोणती? यहोवाने सांगितलं होतं, की लेवी नसलेले १२ वंशातले लोक दोन ठिकाणी सेवा करतील. एक म्हणजे, मंदिराच्या अंगणात आणि दुसरं म्हणजे, शहराच्या आसपास असलेल्या कुरणांमध्ये आणि शेतांमध्ये. यांपैकी प्रत्येक ठिकाणी ते कोणती सेवा करतील? यहोवाला बलिदानं देण्यासाठी सर्व वंशातल्या लोकांना मंदिराच्या अंगणात येऊन त्याची “उपासना” करायची होती. (यहे. ४६:९, २४) तसंच, त्यांना शहराच्या आसपासच्या जमिनीवर धान्य उगवण्यासाठी शेती करायची होती आणि अशा प्रकारे शहराला मदत करायची होती. या लोकांच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

१६ यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या लोकांनी ज्या प्रकारे सेवा केली, त्याच प्रकारची सेवा करण्याची संधी आज मोठ्या लोकसमुदायातल्या लोकांना मिळाली आहे. यहोवाला स्तुतीची बलिदानं देऊन ते त्याच्या “मंदिरात” त्याची उपासना करतात. (प्रकटी. ७:९-१५) म्हणजेच ते प्रचार कामात भाग घेतात, सभांमध्ये उत्तरं देतात आणि स्तुतीची गीतं गातात. अशा रितीने यहोवाची उपासना करणं ही त्यांची सर्वात मोठी जबाबदारी आहे असं ते मानतात. (१ इति. १६:२९) शिवाय हे लोक बऱ्‍याच व्यावहारिक मार्गांनी देवाच्या संघटनेला मदत करतात. उदाहरणार्थ, ते राज्य सभागृहं आणि शाखा कार्यालयं बांधण्यासाठी आणि त्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात. तसंच, यहोवाची संघटना जे वेगवेगळे प्रकल्प सुरू करते त्यांतसुद्धा ते भाग घेतात. इतर काही जण या प्रकल्पांसाठी पैसे दान देऊन मदत करतात. या सर्व गोष्टी करून ते एका अर्थाने शहराच्या जमिनीवर शेती करत आहेत आणि त्यांच्या या कामांमुळे ‘देवाचा गौरव होतो.’ (१ करिंथ. १०:३१) यहोवाला ‘अशा बलिदानांमुळे खूप आनंद होतो,’ हे माहीत असल्यामुळे ते आवेशाने आणि आनंदाने ही कामं करतात. (इब्री १३:१६) अशा प्रकारच्या कामांमध्ये भाग घेऊन तुम्हीसुद्धा मिळालेल्या संधीचं सोनं करत आहात का?

यहेज्केलने शहराच्या आत आणि आसपास होणाऱ्‍या कामांबद्दल जे वर्णन केलं त्यावरून आपण कोणते धडे शिकू शकतो? (परिच्छेद १४-१६ पाहा)

आपण एका “नवीन पृथ्वीची वाट पाहत आहोत”

१७. (क) जमिनीच्या वाटणीबद्दल असलेल्या यहेज्केलच्या दृष्टान्ताची भविष्यात मोठी पूर्णता कशी होणार आहे? (ख) येशूच्या हजार वर्षांच्या शासनात शहराच्या प्रशासनामुळे कोणाला फायदा होईल?

१७ जमिनीच्या वाटणीबद्दलचा जो दृष्टान्त यहेज्केलने पाहिला त्याची आपल्याला भविष्यात मोठी पूर्णता पाहायला मिळेल का? हो नक्कीच. विचार करा, यहेज्केलने पाहिलं की “पवित्र दान” म्हटलेला भाग हा देशाच्या मधे होता. म्हणजेच, यहोवा त्या लोकांच्या सोबत होता. (यहे. ४८:१०) यावरून आपल्याला खातरी मिळते, की हर्मगिदोननंतर आपण पृथ्वीवर कुठेही राहत असलो तरी यहोवा आपल्यासोबत असेल. (प्रकटी. २१:३) येशूच्या हजार वर्षांच्या राज्यात शहराचं प्रशासन संपूर्ण पृथ्वीवर कार्य करेल. देवाच्या लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी ज्या लोकांवर आहे ते लोक या प्रशासनात असतील. या प्रशासनातले लोक ‘नवीन पृथ्वीवरच्या’ लोकांचं, म्हणजे देवाची मान्यता असलेल्या लोकांचं प्रेमाने मार्गदर्शन करतील.—२ पेत्र ३:१३.

१८. (क) शहराचं प्रशासन देवाच्या राज्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालेल असं आपण खातरीने का म्हणू शकतो? (ख) शहराच्या नावामुळे आपल्याला कोणती पक्की खातरी मिळते?

१८ शहराचं प्रशासन नेहमी देवाच्या राज्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालेल, असं आपण खातरीने का म्हणू शकतो? बायबलमधून आपल्याला स्पष्टपणे कळतं, की १२ फाटकं असलेलं हे पृथ्वीवरचं शहर स्वर्गातल्या नवीन यरुशलेमसारखंच आहे. कारण स्वर्गातल्या नवीन यरुशलेमलासुद्धा १२ फाटकं आहेत. आणि ते शहर ख्रिस्ताच्या १,४४,००० सहराजांनी मिळून बनलेलं आहे. (प्रकटी. २१:२, १२, २१-२७) यावरून कळतं, की देवाच्या राज्यात स्वर्गात घेतलेल्या निर्णयांप्रमाणेच पृथ्वीवरचं प्रशासन कार्य करेल. आणि ते निर्णय संपूर्ण पृथ्वीवर काळजीपूर्वक लागू करेल. खरंच, “यहोवा तिथे आहे” या शहराच्या नावावरून आपल्यापैकी प्रत्येकाला एक खातरी मिळते. ती म्हणजे, शेवटी नंदनवनात सगळीकडे आनंदाने यहोवाची शुद्ध उपासना केली जाईल. यात काहीच शंका नाही की एक सुंदर भविष्य आपल्या सगळ्यांची वाट पाहत आहे!