व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१९१९ मध्ये झालेल्या ऐतिहासिक अधिवेशनावरून हा पक्का पुरावा मिळाला, की देवाने आपल्या लोकांना शेवटी मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून सोडवलं होतं

चौकट ९ख

१९१९ हेच वर्ष का?

१९१९ हेच वर्ष का?

देवाच्या लोकांची १९१९ मध्ये मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून सुटका झाली असं आपण का म्हणू शकतो? बायबलच्या भविष्यवाण्या आणि इतिहासातल्या घटना यांवरून आपण हे म्हणू शकतो.

बायबलच्या भविष्यवाण्या आणि इतिहासातल्या घटना दाखवतात, की १९१४ मध्ये येशू स्वर्गात राजा बनला. आणि तेव्हापासून सैतानाच्या या दुष्ट जगाचे शेवटचे दिवस सुरू झाले. राजा बनल्यावर येशूने काय केलं? त्याने लगेचच पृथ्वीवरच्या आपल्या सेवकांची मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून सुटका केली का? त्याने १९१४ मध्येच ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला’ नेमलं का? आणि तेव्हापासूनच कापणीचं मोठं काम सुरू केलं का?—मत्त. २४:४५.

नाही, पुराव्यांवरून तसं दिसत नाही. प्रेषित पेत्रने देवाच्या प्रेरणेने काय म्हटलं ते आठवा. त्याने म्हटलं, “देवाच्या घरापासून न्यायाची सुरुवात” होईल. (१ पेत्र ४:१७) तसंच, मलाखी संदेष्ट्यानेही सांगितलं होतं, की पुढे अशी एक वेळ येईल जेव्हा यहोवा ‘कराराच्या दूतासोबत,’ म्हणजे आपल्या मुलासोबत आपल्या मंदिरात येईल. (मला. ३:१-५) त्या वेळी देवाच्या लोकांना शुद्ध केलं जाणार होतं आणि त्यांच्या विश्‍वासाची परीक्षा होणार होती. मग या भविष्यवाण्या पूर्ण झाल्या का?

इतिहासावरून कळतं, की त्या नक्कीच पूर्ण झाल्या. १९१४ ते १९१९ चा सुरुवातीचा काळ बायबल विद्यार्थ्यांसाठी (त्या काळात यहोवाच्या साक्षीदारांना बायबल विद्यार्थी म्हटलं जायचं) खूप कठीण होता. त्या काळात त्यांच्या विश्‍वासाची परीक्षा झाली आणि त्यांना शुद्ध करण्यात आलं. देवाच्या लोकांपैकी अनेकांना असं वाटत होतं, की १९१४ मध्ये या दुष्ट जगाचा अंत होईल. पण तसं झालं नाही आणि त्यामुळे ते खूप निराश झाले. पुढे १९१६ मध्ये संघटनेत पुढाकार घेणारे बंधू चार्ल्स टी. रस्सल यांचा मृत्यू झाला, तेव्हा तर ते आणखीनच निराश झाले. काही लोक बंधू रस्सलच्या जागी दुसऱ्‍या कोणाचा विचारच करू शकत नव्हते. म्हणून जेव्हा बंधू रस्सलनंतर बंधू जोसफ एफ. रदरफर्ड संघटनेत पुढाकार घेऊ लागले तेव्हा त्यांना ते मुळीच आवडलं नाही. आणि त्यांनी त्यांचा खूप विरोध केला. त्यामुळे वेगवेगळे गट निर्माण झाले आणि १९१७ मध्ये संघटनेत फूट पडली. मग, १९१८ मध्ये चर्चच्या पाळकांनी भडकवल्यामुळे बंधू रदरफर्ड आणि त्यांच्यासोबत आणखी सात बांधवांवर खटला चालवण्यात आला, त्यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यामुळे ब्रुकलीनमधलं मुख्यालय बंद झालं. या गोष्टींवरून अगदी स्पष्ट होतं, की देवाच्या लोकांची अजूनही मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून सुटका झाली नव्हती!

पण मग १९१९ मध्ये काय झालं? एका झटक्यात संपूर्ण चित्र बदललं. त्या वर्षाच्या सुरुवातीला बंधू रदरफर्ड आणि त्यांच्यासोबत असलेल्या बांधवांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटका झाल्यावर ते लगेच कामाला लागले. त्यांनी एका मोठ्या अधिवेशनाची योजना केली. हे अधिवेशन पुढे कायम साक्षीदारांच्या लक्षात राहणार होतं. तसंच, गोल्डन एज (आजचं सावध राहा!) नावाचं एक नवीन मासिकही ते तयार करू लागले. प्रचाराच्या मोहिमांमध्ये वापरता येईल अशा प्रकारे या मासिकाची रचना करण्यात आली होती. याशिवाय, प्रचारकार्य सुव्यवस्थितपणे करण्यासाठी आणि भाऊबहिणींना ते जास्तीत जास्त करायचं प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक मंडळीत एका पर्यवेक्षकाला नेमण्यात आलं. प्रचार काम आणखी सुव्यवस्थितपणे करण्यासाठी त्याच वर्षी बुलेटीन (आजचं आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका) प्रकाशित करण्यात आलं.

या सगळ्या घटनांवरून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसून येते. ती म्हणजे, १९१९ मध्ये येशूने आपल्या लोकांना मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून सोडवलं. तसंच, त्याने विश्‍वासू आणि बुद्धिमान दासालाही नेमलं आणि तेव्हापासून कापणीचं काम सुरू होऊन खूप वेगाने पुढे जाऊ लागलं.

अध्याय ९, परिच्छेद २५, २६ वर परत जाण्यासाठी