व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट १५क

वेश्‍या बनलेल्या दोन बहिणी

वेश्‍या बनलेल्या दोन बहिणी

देवाच्या लोकांनी जो अविश्‍वासूपणा केला त्याची यहेज्केलच्या २३ व्या अध्यायात यहोवाने कडक शब्दांत निंदा केली आहे. या आणि १६ व्या अध्यायात बऱ्‍याचशा समानता आहेत. १६ व्या अध्यायाप्रमाणेच २३ व्या अध्यायातसुद्धा वेश्‍येचं उदाहरण देण्यात आलं आहे. यरुशलेमला छोटी बहीण म्हणण्यात आलं आहे तर शोमरोनला तिची मोठी बहीण. दोन्ही अध्यायांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मोठ्या बहिणीनंतर तिच्या छोट्या बहिणीनेही वेश्‍येची कामं सुरू केली. पण त्यानंतर तिची दुष्टता आणि अनैतिक कामं तिच्या मोठ्या बहिणीपेक्षा जास्त वाढली. २३ व्या अध्यायात यहोवा या दोन्ही बहिणींना नावं देतो. मोठ्या बहिणीला तो अहला असं नाव देतो, तर लहान बहिणीला तो अहलीबा असं नाव देतो. मोठी बहीण दहा वंशांनी मिळून बनलेल्या इस्राएलच्या राजधानीला, म्हणजे शोमरोनला सूचित करते. तर लहान बहीण यहूदा राष्ट्राच्या राजधानीला, म्हणजे यरुशलेमला सूचित करते. aयहे. २३:१-४.

या अध्यायांमध्ये आणखीही काही समानता आहेत. यांतल्या काही सर्वात महत्त्वाच्या म्हणजे: या वेश्‍या आधी जणू यहोवासाठी पत्नींसारख्या होत्या आणि मग त्यांनी त्याचा विश्‍वासघात केला. पण या अध्यायांमध्ये यहोवाने त्या दोन्ही राष्ट्रांसाठी आशाही दिली होती. २३ व्या अध्यायात त्या आशेबद्दल कमी प्रमाणात सांगण्यात आलं आहे. पण १६ व्या अध्यायाप्रमाणेच २३ व्या अध्यायातही यहोवाने दिलेल्या आशेबद्दल आपल्याला वाचायला मिळतं. तिथे यहोवा म्हणतो, “तुझ्या वेश्‍येच्या कामांचा आणि अश्‍लील कृत्यांचा मी अंत करून टाकीन.”—यहे. १६:१६, २०, २१, ३७, ३८, ४१, ४२; २३:४, ११, २२, २३, २७, ३७.

या दोन्ही बहिणी ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करतात का?

आपल्या प्रकाशनांमध्ये आधी असं सांगितलं जायचं, की या दोन्ही बहिणी म्हणजे अहला आणि अहलीबा, ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करतात. एक बहीण कॅथलिक चर्चला तर दुसरी प्रोटेस्टंट चर्चला. पण प्रार्थनापूर्वक विचार केल्यामुळे आणि अभ्यास केल्यामुळे काही महत्त्वाचे प्रश्‍न समोर आले. विचार करा, ख्रिस्ती धर्मजगत कधीही यहोवाच्या पत्नीसारखं होतं का? ख्रिस्ती धर्मजगतासोबत यहोवाने कधीही करार केला होता का? नाही. इतकंच काय तर येशूने जेव्हा देवाच्या इस्राएलसोबत “नवीन करार” केला तेव्हा ख्रिस्ती धर्मजगत अस्तित्वातच नव्हतं. तसंच ते कधीही अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी मिळून बनलेल्या देवाच्या इस्राएलचं भाग नव्हतं. (यिर्म. ३१:३१; लूक २२:२०) खरंतर ख्रिस्ती धर्मजगताची सुरुवात प्रेषितांच्या मृत्यूनंतर बऱ्‍याच काळाने म्हणजे चौथ्या शतकात झाली. येशूने जे गहू आणि जंगली गवताचं उदाहरण दिलं, त्यात त्याने नकली ख्रिश्‍चनांची तुलना जंगली गवतासोबत केली. याच धर्मत्यागी नकली ख्रिश्‍चनांनी मिळून ख्रिस्ती धर्मजगत बनलं आहे.—मत्त. १३:२४-३०.

आणखी एक मुख्य फरक म्हणजे, यहोवाने यरुशलेम आणि शोमरोन या दोघांनाही अशी आशा दिली होती, की यहोवासोबत त्यांचं पुन्हा एक चांगलं नातं असेल. (यहे. १६:४१, ४२, ५३-५५) पण बायबलमध्ये ख्रिस्ती धर्मजगतासाठी अशा आशेबद्दल सांगितलं आहे का? मुळीच नाही. जशी मोठ्या बाबेलमधल्या इतर खोट्या धर्मांसाठी कोणतीही आशा नाही तशीच ख्रिस्ती धर्मजगतासाठीसुद्धा कोणतीही आशा नाही.

तर या गोष्टींवरून आपण म्हणू शकतो, की अहला आणि अहलीबा ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करत नाहीत. पण त्यांच्या उदाहरणामुळे आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. यहोवाच्या नावावर कलंक लावणाऱ्‍यांबद्दल आणि शुद्ध उपासनेच्या विरोधात वागणाऱ्‍यांबद्दल यहोवाला कसं वाटतं हे आपल्याला शिकायला मिळतं. आणि या दोन्ही गोष्टी करण्यात सर्वात मोठा दोष ख्रिस्ती धर्मजगताचा आहे. कारण त्यातले असंख्य चर्च असा दावा करतात, की ते बायबलमधल्या देवाची उपासना करतात पण ते त्याच्या स्तरांप्रमाणे चालत नाहीत. इतकंच काय तर ते असाही दावा करतात, की यहोवाचा प्रिय मुलगा येशू हा त्यांचा प्रमुख आहे. पण त्यांचा हा दावा साफ खोटा आहे, कारण येशू हा त्रैक्याचा भाग आहे असं ते मानतात. तसंच, ‘या जगाचा भाग’ न बनण्याची येशूने जी आज्ञा दिली होती, तीसुद्धा ते पाळत नाहीत. (योह. १५:१९) सतत मूर्तिपूजा करत असल्यामुळे आणि राजनैतिक वादविवादांमध्ये भाग घेत असल्यामुळे, ख्रिस्ती धर्मजगतही ‘मोठ्या वेश्‍येचाच’ भाग आहे हे सिद्ध होतं. (प्रकटी. १७:१) यात कोणतीच शंका नाही, की जी अवस्था जगभरात पसरलेल्या खोट्या धर्माची होणार आहे, तीच अवस्था ख्रिस्ती धर्मजगताचीही होणार आहे!

अध्याय १५, परिच्छेद १६, १७ वर परत जाण्यासाठी

a ही नावं देण्यामागे काही खास कारणं होती. अहलाचा अर्थ होतो, “तिचा [उपासनेचा] तंबू.” हे नाव कदाचित यासाठी देण्यात आलं असावं, कारण दहा वंशांनी मिळून बनलेल्या इस्राएल राष्ट्राने उपासना करण्यासाठी यरुशलेमला यायचं सोडून, स्वतःची उपासनेची स्थानं उभी केली होती. तर अहलीबा या नावाचा अर्थ “माझ्या [उपासनेचा] तंबू तिच्यामध्ये आहे” असा होतो. हे नाव यासाठी देण्यात आलं असावं, कारण यहोवाच्या उपासनेचं ठिकाण यरुशलेममध्ये होतं.