व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नियमन मंडळाकडून पत्र

नियमन मंडळाकडून पत्र

“तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते.” (इब्री ५:१२) कल्पना करा! या विश्‍वातला सर्वात उत्तम शिक्षक यहोवा आपल्याला  त्याच्याविषयी इतरांना शिकवण्याचं आमंत्रण देत आहे! कुटुंबात, मंडळीत किंवा क्षेत्र सेवेत त्याच्याबद्दलचं सत्य शिकवण्याची कोणतीही नेमणूक, ही एक बहुमान व गंभीर जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण यशस्वी रीत्या कशी पार पाडू शकतो?

प्रेषित पौलने तीमथ्यला जे पत्र लिहिलं त्यात त्याने या प्रश्‍नाचं उत्तर दिलं. त्याने लिहिलं: “सार्वजनिक वाचन, मार्गदर्शन देणे व शिकवणे यांत स्वतःला वाहून घे.” आणि पुढे असं लिहिलं: “असे केल्याने तू स्वतःला आणि जे तुझे ऐकतात त्यांनाही वाचवशील.” (१ तीम. ४:१३, १६) तुमच्याजवळ लोकांचा जीव वाचवणारा संदेश आहे. त्यामुळे तुम्ही वाचन करण्यात व शिकवण्यात सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. या बाबतीत तुम्हाला मदत मिळावी म्हणून हे माहितीपत्रक तयार करण्यात आलं आहे. यातील काही वैशिष्ट्यं पुढीलप्रमाणे आहेत.

प्रत्येक पानावर एक वचन आहे; ते वचन अभ्यास मुद्द्‌याशी संबंधित असलेलं बायबल तत्त्व आहे किंवा ज्या अभ्यास मुद्यात सुधारणा केली पाहिजे त्याचं एक उदाहरण आहे

यहोवा महान शिक्षक आहे. (यश. ३०:२०) हे माहितीपत्रक तुम्हाला, एक वाचक व शिक्षक म्हणून तुमच्या कौशल्यात सुधारणा करायला मदत करेल. पण हे कधीही विसरू नका की आपण लोकांना सांगत असलेला संदेश हा खरंतर यहोवाकडून आहे आणि तोच लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो. (योहा. ६:४४) त्यामुळे मदतीसाठी पवित्र आत्मा मिळावा म्हणून नेहमी प्रार्थना करा. देवाच्या वचनाचा जास्तीत जास्त उपयोग करा. स्वतःकडे नव्हे तर यहोवाकडे लोकांचं लक्ष आकर्षित करा. जे लोक तुमचं बोलणं ऐकतात त्यांच्या मनात यहोवाबद्दल गाढ प्रेम वाढवण्याचा प्रयत्न करा.

आतापर्यंत लोकांना इतका महत्त्वाचा संदेश कधीही कोणी दिला नव्हता; पण तो संदेश इतरांना सांगण्याचं आमंत्रण तुम्हाला देण्यात येत आहे. आम्हाला याची पूर्ण खातरी आहे की “देव पुरवत असलेल्या सामर्थ्या” वर तुम्ही अवलंबून राहिलात तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.​—१ पेत्र ४:११.

तुमचे सहशिक्षक,

यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ