व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ०३

बायबलमधल्या माहितीवर तुम्ही भरवसा ठेवू शकता का?

बायबलमधल्या माहितीवर तुम्ही भरवसा ठेवू शकता का?

बायबलमध्ये भविष्याबद्दल बरंच काही सांगितलंय. तसंच, त्यात पुष्कळ गोष्टींबद्दल सल्लाही दिलाय. कदाचित बायबलमधली माहिती जाणून घ्यायची तुमचीही इच्छा असेल. पण त्याच वेळेस, तुमच्या मनात काही शंकाही असतील. कदाचित तुम्ही म्हणाल, की बायबल तर खूप जुन्या काळातलं पुस्तक आहे; मग आपण त्यावर भरवसा ठेवू शकतो का? बायबल सांगतं, की आपण आज आणि भविष्यातही आनंदाने जगू शकतो. पण या गोष्टीवर खरंच भरवसा ठेवता येईल का? लाखो लोकांचा बायबलवर भरवसा आहे. पण तुम्हीही तो ठेवू शकता की नाही, हे ठरवण्यासाठी पुढे दिलेल्या गोष्टींवर विचार करा.

१. बायबलमधली माहिती खरी आहे की काल्पनिक?

बायबलमध्ये सांगितलंय की त्यात “सत्याची अचूक वचनं” लिहिलेली आहेत. (उपदेशक १२:१०) त्यात खऱ्‍या घटनांबद्दल आणि खरोखरच्या लोकांबद्दल सांगितलंय. (लूक १:३; ३:१, २ वाचा.) इतिहासाचा आणि जुन्या काळातल्या वस्तूंचा अभ्यास करणारे बरेच विद्वानही हे मान्य करतात. ते म्हणतात, की बायबलमध्ये उल्लेख केलेल्या तारखा, व्यक्‍ती, ठिकाणं आणि घटना अगदी खऱ्‍या आणि अचूक आहेत.

२. बायबल आजच्या काळातही उपयोगी आहे, असं आपण का म्हणू शकतो?

बायबलमध्ये अशा बऱ्‍याच गोष्टींबद्दल सांगितलंय, ज्या त्या काळातल्या लोकांना माहीत नव्हत्या; त्यांचा शोध नंतर लागला. जसं की, त्यात विज्ञानाशी संबंधित असलेल्या काही गोष्टींबद्दल सांगितलंय. या गोष्टी लिहिल्या गेल्या, तेव्हा बऱ्‍याच लोकांचा त्यांवर विश्‍वास नव्हता. पण आज विज्ञानाने जे शोध लावले आहेत त्यांवरून सिद्ध होतं, की बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी अचूक आहेत. “त्या आज आणि सर्वकाळासाठी भरवशालायक आहेत.”स्तोत्र १११:८.

३. बायबलमध्ये भविष्याबद्दल जे सांगितलंय त्यावर आपण भरवसा का ठेवू शकतो?

बायबलमध्ये बऱ्‍याच भविष्यवाण्या a दिल्या आहेत. म्हणजे “ज्या गोष्टी अजून घडल्याही नाहीत,” त्यांबद्दल त्यात सांगितलंय. (यशया ४६:१०) इतिहासातल्या कित्येक घटना घडायच्या बऱ्‍याच काळाआधी बायबलमध्ये त्यांबद्दल अचूकपणे सांगितलं होतं. तसंच, आज जगात जे घडत आहे, त्याबद्दलही बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं. या धड्यात आपण बायबलच्या काही भविष्यवाण्यांवर चर्चा करू या. त्या किती अचूक आहेत हे पाहून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल.

आणखी जाणून घेऊ या

बायबलमध्ये जे सांगितलं होतं ते विज्ञानाप्रमाणे कसं खरंय, ते पाहू या. तसंच, बायबलमधल्या काही अचूक भविष्यवाण्यांकडेही लक्ष देऊ या.

४. बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी विज्ञानाप्रमाणे खऱ्‍या आहेत

जुन्या काळातले बरेच लोक असं मानायचे, की पृथ्वी कशावर तरी टेकलेली आहे. व्हिडिओ पाहा.

जवळजवळ ३,५०० वर्षांआधी ईयोबच्या पुस्तकात काय म्हटलं होतं, याकडे लक्ष द्या. ईयोब २६:७ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • आपण आताच वाचलं की पृथ्वी “निराधार” टांगलेली आहे. पण बायबलमध्ये हे सांगितलंय, ही आश्‍चर्याची गोष्ट का आहे?

समुद्रातल्या पाण्याची वाफ होऊन पाऊस कसा पडतो, आणि हे जलचक्र कसं सुरू राहतं, याचा शोध फक्‍त २०० वर्षांआधी लागला. पण हजारो वर्षांआधी बायबलमध्ये काय म्हटलं होतं ते पाहा. ईयोब ३६:२७, २८ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • इथे जलचक्राबद्दल साध्या शब्दांत जे सांगितलंय, ते इतकं खास का आहे?

  • आपण आताच जी वचनं वाचली, त्यांमुळे बायबलवरचा तुमचा भरवसा वाढला का?

५. बायबलमध्ये काही महत्त्वाच्या घटनांबद्दल आधीच सांगितलं होतं

यशया ४४:२७–४५:२ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • बाबेल (बॅबिलॉन) शहराचा नाश होण्याच्या २०० वर्षांआधी बायबलमध्ये काय सांगितलं होतं?

इतिहास या गोष्टीचा पुरावा देतं, की इसवी सन पूर्व b ५३९ मध्ये पारसचा राजा कोरेशने बाबेल शहरावर कब्जा केला. त्याच्या सैनिकांनी शहराभोवती असलेल्या नदीचा प्रवाह दुसरीकडे वळवला आणि यामुळे नदीचं पाणी आटलं. तसंच, त्या दिवशी शहराचे दरवाजे चुकून उघडेच राहिल्यामुळे कोरेशचे सैनिक सहज शहरात घुसू शकले. आणि त्यांनी लढाई न करताच शहरावर विजय मिळवला. आज २,५०० पेक्षा जास्त वर्षांनंतरही बाबेल शहरात फक्‍त दगडमातीचे ढिगारे पाहायला मिळतात. याबद्दल बायबलमध्ये आधीच काय सांगितलं होतं, ते पाहू या.

यशया १३:१९, २० वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?

आज इराकमध्ये दिसणारे बॅबिलॉन शहराचे अवशेष

६. आज जे घडतंय त्याबद्दल बायबलमध्ये आधीच सांगितलं होतं

बायबल सांगतं की आज आपण “शेवटच्या दिवसांत” जगत आहोत. (२ तीमथ्य ३:१) या काळाबद्दल बायबलमध्ये कोणत्या गोष्टी सांगितल्या होत्या ते पाहू या.

मत्तय २४:६, ७ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • शेवटच्या दिवसांत कोणत्या मोठमोठ्या घटना घडतील असं बायबलमध्ये सांगितलं होतं?

२ तीमथ्य ३:१-५ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • शेवटच्या दिवसांत लोकांची वागणूक कशी असेल याबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं होतं?

  • या वचनांमध्ये दिलेल्या कोणत्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत?

काही जण म्हणतात: “बायबल फक्‍त कथा-कहाण्यांचं पुस्तक आहे.”

  • तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे असं वाटतं की आपण बायबलवर भरवसा ठेवू शकतो?

थोडक्यात

इतिहास, विज्ञान आणि भविष्यवाण्या दाखवतात, की आपण बायबलवर भरवसा ठेवू शकतो.

उजळणी

  • बायबलमधली माहिती खरी आहे की काल्पनिक?

  • बायबलमध्ये सांगितलेल्या कोणत्या गोष्टी विज्ञानाप्रमाणे खऱ्‍या आहेत?

  • तुम्हाला वाटतं का, की बायबल भविष्याबद्दल सांगू शकतं? तुम्ही असं का म्हणता?

ध्येय

हेसुद्धा पाहा

शेवटच्या दिवसांबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं होतं?

“बाइबल की ६ भविष्यवाणीयाँ जो पूरी हो रही हैं” (ऑनलाईन लेख)

ग्रीसच्या साम्राज्याबद्दल बायबलमधल्या भविष्यवाण्या कशा पूर्ण झाल्या ते जाणून घ्या.

भविष्यसूचक वचनामुळे धैर्य मिळतं  (५:२२)

भविष्यवाण्यांमुळे एका माणसाचं बायबलबद्दलचं मत कसं बदललं ते पाहा.

“मेरा तो मानना था कि ईश्‍वर है ही नहीं” (प्रहरीदुर्ग अंक ५ २०१७)

a भविष्यवाण्या म्हणजे भविष्यात होणाऱ्‍या घटनांबद्दल देवाने दिलेले संदेश.

b इसवी सन पूर्व म्हणजे “येशू ख्रिस्ताच्या जन्माआधीचा काळ” आणि इसवी सन म्हणजे “येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून सुरू होणारा काळ.”