व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ०९

देवाशी नातं मजबूत करण्यासाठी प्रार्थना करा

देवाशी नातं मजबूत करण्यासाठी प्रार्थना करा

कोणीतरी आपल्याला जीवनात योग्य मार्ग दाखवावा असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही काही महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं शोधत आहात का? तुम्हाला दिलासा हवा आहे का? तुम्हाला यहोवाशी जवळचं नातं जोडायचंय का? या सर्व बाबतींत प्रार्थनेमुळे तुम्हाला मदत मिळेल. पण प्रार्थना करायची योग्य पद्धत कोणती? देव सगळ्यांच्याच प्रार्थना ऐकतो का? त्याने तुमच्या  प्रार्थना ऐकाव्यात म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? चला पाहू या.

१. प्रार्थना कोणाला केली पाहिजे आणि आपण कशाबद्दल प्रार्थना करू शकतो?

येशूने शिकवलं की आपण फक्‍त यहोवालाच प्रार्थना केली पाहिजे आणि येशूसुद्धा यहोवालाच प्रार्थना करायचा. तो म्हणाला: “अशा प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्या स्वर्गातल्या पित्या . . . ’” (मत्तय ६:९) आपण यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा त्याच्यासोबतची आपली मैत्री दिवसेंदिवस घट्ट होते.

आपण कशासाठीही प्रार्थना करू शकतो, पण प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी आपल्या प्रार्थना देवाच्या इच्छेप्रमाणे असल्या पाहिजेत. बायबल म्हणतं: “[देवाच्या] इच्छेप्रमाणे असलेलं काहीही आपण मागितलं तरी तो आपलं ऐकतो.” (१ योहान ५:१४) आपण कोणकोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकतो, याची काही उदाहरणं येशूने सांगितली होती. (मत्तय ६:९-१३ वाचा.) गरजेच्या गोष्टींबद्दल प्रार्थना करण्यासोबतच, देवाने आपल्यासाठी जे काही केलंय त्याबद्दल आपण आभारही मानले पाहिजेत. तसंच आपण इतरांसाठीही प्रार्थना केली पाहिजे.

२. आपण प्रार्थना कशी केली पाहिजे?

बायबल सांगतं की आपण “[देवासमोर] आपलं मन मोकळं” केलं पाहिजे. (स्तोत्र ६२:८) म्हणून आपल्या प्रार्थना नेहमी मनापासून असल्या पाहिजेत. आपण मोठ्याने किंवा मनातल्या मनातही प्रार्थना करू शकतो. आपण एखाद्या खास पद्धतीने, म्हणजे गुडघे टेकून किंवा उभं राहून प्रार्थना करावी अशी यहोवा अपेक्षा करत नाही. पण आपण आदराने प्रार्थना केली पाहिजे. आपण केव्हाही आणि कुठेही प्रार्थना करू शकतो.

३. देव आपल्या प्रार्थनांचं उत्तर कसं देतो?

देव वेगवेगळ्या मार्गांनी प्रार्थनांचं उत्तर देतो. एक म्हणजे त्याचं वचन, बायबल. बायबल वाचल्यामुळे आपल्याला बऱ्‍याच प्रश्‍नांची उत्तरं मिळतात. स्तोत्र १९:७ मध्ये म्हटल्याप्रमाणे बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी “अनुभव नसलेल्यांना बुद्धिमान बनवतात.” (याकोब १:५ वाचा.) तसंच, कठीण परिस्थितीचा सामना करताना देव आपल्याला मनाची शांती देतो. शिवाय आपल्याला मदतीची गरज असते, तेव्हा कधीकधी तो त्याच्या इतर सेवकांना आपल्याला मदत करायला प्रवृत्त करतो.

आणखी जाणून घेऊ या

आपण देवाला आवडतील अशा प्रार्थना कशा करू शकतो आणि प्रार्थना केल्यामुळे आपल्याला काय फायदा होईल हे जाणून घेऊ या.

४. देव कोणाच्या प्रार्थना ऐकतो?

देवाने आपली प्रार्थना ऐकावी म्हणून आपण काय केलं पाहिजे? व्हिडिओ पाहा.

यहोवाची इच्छा आहे की आपण त्याला प्रार्थना करावी. स्तोत्र ६५:२ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • “प्रार्थना ऐकणाऱ्‍या” देवाला तुमचीही  प्रार्थना ऐकायची आहे, असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्हाला असं का वाटतं?

देवाने आपली प्रार्थना ऐकावी म्हणून आपण त्याच्या इच्छेप्रमाणे वागायचा प्रयत्न केला पाहिजे. मीखा ३:४ आणि १ पेत्र ३:१२ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • यहोवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात म्हणून आपण काय केलं पाहिजे?

युद्धात दोन्ही सैन्यं विजय मिळावा अशी प्रार्थना करतात. देव त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देईल, असं तुम्हाला वाटतं का?

५. आपल्या प्रार्थना अगदी मनापासून असल्या पाहिजेत

काही लोकांना तोंडपाठ केलेल्या प्रार्थना शिकवल्या जातात. पण आपण अशा प्रकारे प्रार्थना करावी अशी देवाची इच्छा आहे का? मत्तय ६:७ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • आपण प्रार्थना करताना “त्याच गोष्टी पुन्हापुन्हा” बोलायचं कसं टाळू शकतो?

तुम्ही दररोज, यहोवाने दिलेल्या कोणत्याही एका चांगल्या गोष्टीबद्दल त्याचे आभार मानू शकता. जर तुम्ही आठवडाभर असं केलं, तर प्रार्थनेत त्याच त्याच गोष्टी बोलण्याऐवजी तुमच्याकडे सात वेगवेगळे विषय असतील.

एका प्रेमळ पित्याला वाटतं की आपल्या मुलांनी आपल्याशी मनमोकळेपणाने बोलावं. यहोवाचीही इच्छा आहे की आपण त्याला मनापासून प्रार्थना करावी

६. प्रार्थना ही देवाकडून एक देणगी आहे

जीवनातल्या चांगल्या-वाईट काळात, प्रार्थनेमुळे कशी मदत मिळू शकते? व्हिडिओ पाहा.

बायबल सांगतं की प्रार्थनेमुळे आपल्याला मनाची शांती मिळेल. फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • प्रार्थनेमुळे नेहमीच आपल्या समस्या निघून जात नसल्या, तरी आपल्याला कशी मदत मिळते?

  • तुम्हाला कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करावीशी वाटते?

तुम्हाला माहीत होतं का?

“आमेन” या शब्दाचा अर्थ “असंच होवो” किंवा “खातरीने” असा होतो. बायबलच्या काळापासूनच प्रार्थनेच्या शेवटी “आमेन” म्हणायची पद्धत आहे.​—१ इतिहास १६:३६.

७. प्रार्थना करण्यासाठी वेळ काढा

कधीकधी आपण कामात इतके गुंतलेलो असतो, की प्रार्थना करायला विसरून जातो. येशू प्रार्थनेला महत्त्व द्यायचा हे कशावरून कळतं? मत्तय १४:२३ आणि मार्क १:३५ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • प्रार्थना करायला वेळ मिळावा म्हणून येशूने काय केलं?

  • तुम्ही प्रार्थना करण्यासाठी कधी वेळ काढू शकता?

काही जण म्हणतात: “प्रार्थना कोणीही ऐकत नाही, ते फक्‍त तुमच्या मनाचं समाधान असतं.”

  • तुम्ही काय म्हणाल?

थोडक्यात

मनापासून केलेल्या प्रार्थनांमुळे देवासोबत आपलं नातं मजबूत होतं, आपल्याला मनाची शांती मिळते आणि यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागायचं बळ मिळतं.

उजळणी

  • आपण कोणाला प्रार्थना केली पाहिजे?

  • प्रार्थना कशी केली पाहिजे?

  • प्रार्थना केल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात?

ध्येय

हेसुद्धा पाहा

प्रार्थनेबद्दल सहसा विचारल्या जाणाऱ्‍या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घ्या.

“प्रार्थना के बारे में 7 सवाल” (ऑनलाईन लेख)

प्रार्थना का करावी आणि ती आणखी चांगल्या प्रकारे कशी करता येईल हे पाहा.

“प्रार्थना केल्यामुळे काही फायदा होतो का?” (वेबसाईटवरचा लेख)

आपण कोणाला प्रार्थना केली पाहिजे? बायबलचं उत्तर जाणून घ्या.

“आपण संतांना प्रार्थना केली पाहिजे का?” (वेबसाईटवरचा लेख)

आपण कुठेही आणि केव्हाही प्रार्थना केली तरी यहोवा ती ऐकतो हे या गाण्यात पाहा.

कधीही प्रार्थना करा  (१:२२)