व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा २४

स्वर्गदूतांबद्दल बायबल काय शिकवतं?

स्वर्गदूतांबद्दल बायबल काय शिकवतं?

यहोवाची इच्छा आहे की आपण स्वर्गातल्या त्याच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यावं. या कुटुंबात स्वर्गदूतही आहेत. त्यांना ‘देवाची मुलं’ असं म्हटलंय. (ईयोब ३८:७) बायबल स्वर्गदूतांबद्दल काय सांगतं? ते आपल्या जीवनावर काही प्रभाव पाडू शकतात का? आणि सगळेच स्वर्गदूत देवाच्या कुटुंबाचा भाग आहेत का?

१. स्वर्गदूत कोण आहेत?

पृथ्वी बनवण्याआधी यहोवाने स्वर्गदूतांना बनवलं. जसं आपण यहोवाला पाहू शकत नाही, तसंच या स्वर्गदूतांनाही आपण पाहू शकत नाही. (इब्री लोकांना १:१४) स्वर्गात करोडो स्वर्गदूत आहेत आणि प्रत्येक स्वर्गदूत दुसऱ्‍यापेक्षा वेगळा आहे. (प्रकटीकरण ५:११) ते ‘यहोवाच्या आज्ञेप्रमाणे चालतात आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे वागतात.’ (स्तोत्र १०३:२०) जुन्या काळात यहोवा कधीकधी संदेश पोहोचवण्यासाठी, आपल्या लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना संकटांतून सोडवण्यासाठी स्वर्गदूतांना पाठवायचा. आजही स्वर्गदूत देवाच्या लोकांचं मार्गदर्शन करतात. ते त्यांना अशा लोकांपर्यंत पोहोचायला मदत करतात, ज्यांना देवाबद्दल शिकून घ्यायचंय.

२. सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत कोण आहेत?

काही स्वर्गदूत यहोवाला विश्‍वासू राहिले नाहीत. यहोवाविरुद्ध बंड करणाऱ्‍या पहिल्या स्वर्गदूताला “दियाबल आणि सैतान” म्हटलं आहे. तो ‘संपूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना फसवतो.’ (प्रकटीकरण १२:९) सैतानाला इतरांवर अधिकार गाजवायची इच्छा होती. म्हणून त्याने पहिल्या मानवी जोडप्याला आणि नंतर काही स्वर्गदूतांना आपल्यासोबत यहोवाविरुद्ध बंड करायला प्रवृत्त केलं. यहोवाविरुद्ध बंड करणाऱ्‍या त्या स्वर्गदूतांना दुष्ट स्वर्गदूत म्हटलंय. यहोवाने त्यांना स्वर्गातून पृथ्वीवर हाकलून लावलं आणि लवकरच तो त्यांचा नाश करणार आहे.—प्रकटीकरण १२:९, १२ वाचा.

३. सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत लोकांना कसं बहकवतात?

सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत, भूतविद्या आणि इतर प्रकारच्या जादूटोण्याद्वारे लोकांना बहकवण्याचा प्रयत्न करतात. काही लोक ज्योतिषी, मांत्रिक आणि बाबाबुवांकडे जातात. तर इतर काही जण आपले आजार बरे करण्यासाठी मंत्रतंत्र करणाऱ्‍यांकडे जातात. बऱ्‍याच लोकांना असं सांगून फसवलं जातं की ते मेलेल्या लोकांशी बोलू शकतात. पण यहोवा आपल्याला ताकीद देतो, की “भूतविद्या करणाऱ्‍यांकडे आणि ज्योतिष्यांकडे” जाऊ नका. (लेवीय १९:३१) सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून देवाने आपल्याला ही ताकीद दिली आहे. कारण ते देवाचे शत्रू आहेत आणि आपलं नुकसान करायची त्यांची इच्छा आहे.

आणखी जाणून घेऊ या

स्वर्गदूत कोणत्या चांगल्या गोष्टी करतात, भूतविद्येचे कोणते धोके आहेत आणि आपण सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांपासून स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो हे जाणून घेऊ या.

४. स्वर्गदूत लोकांना यहोवाबद्दल शिकायला मदत करतात

स्वर्गदूत स्वतः लोकांकडे जाऊन प्रचार करत नाहीत. तर ते देवाच्या उपासकांचं मार्गदर्शन करतात. ते बऱ्‍याचदा त्यांना अशा लोकांकडे जायला मदत करतात, ज्यांना देवाबद्दल शिकून घ्यायचंय. प्रकटीकरण १४:६, ७ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • प्रचार कार्यात आपल्याला स्वर्गदूतांच्या मदतीची गरज का आहे?

  • बायबलबद्दल शिकून घ्यायची इच्छा असलेल्या लोकांपर्यंत पोहोचायला स्वर्गदूत आपल्याला मदत करू शकतात, हे समजल्यावर तुम्हाला आनंद होतो का? आणि का आनंद होतो?

५. भूतविद्येशी कोणताही संबंध ठेवू नका

सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत यहोवाचे शत्रू आहेत आणि म्हणून ते आपलेही शत्रू आहेत. लूक ९:३८-४२ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • दुष्ट स्वर्गदूत लोकांना कसा त्रास देतात?

आपल्याला असं काहीही करण्याची इच्छा नाही, ज्यामुळे दुष्ट स्वर्गदूत आपल्या जीवनावर नियंत्रण करतील. अनुवाद १८:१०-१२ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • दुष्ट स्वर्गदूत कोणकोणत्या मार्गांनी आपल्यावर प्रभाव पाडायचा आणि आपल्याशी संपर्क करायचा प्रयत्न करतात? तुमच्या भागात भूतविद्येचे कोणते प्रकार सर्रासपणे पाहायला मिळतात?

  • यहोवाने भूतविद्या करायची मनाई केली आहे हे तुम्हाला योग्य वाटतं का? आणि तुम्हाला असं का वाटतं?

व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • पलेसाच्या मुलीच्या हातावर जे ताईत बांधलं होतं त्यामुळे काही धोका होता का? आणि तुम्हाला असं का वाटतं?

  • दुष्ट स्वर्गदूतांपासून संरक्षणासाठी पलेसाने काय करण्याची गरज होती?

पूर्वीपासूनच खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी दुष्ट स्वर्गदूतांशी कोणताही संबंध ठेवलेला नाही. प्रेषितांची कार्यं १९:१९ आणि १ करिंथकर १०:२१ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • जर आपल्याजवळ भूतविद्येशी संबंधित कोणतीही वस्तू असेल, तर ती नष्ट करणं महत्त्वाचं का आहे?

६. सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांवर विजय मिळवा

दुष्ट स्वर्गदूत सैतानाच्या अधिकाराखाली आहेत. पण विश्‍वासू स्वर्गदूतांचं नेतृत्व प्रमुख स्वर्गदूत, म्हणजे मीखाएल करतो. हे येशूचं दुसरं नाव आहे. मीखाएल किती शक्‍तिशाली आहे? प्रकटीकरण १२:७-९ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • कोण जास्त शक्‍तिशाली आहे, मीखाएल आणि त्याचे स्वर्गदूत की सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत?

  • आज येशूच्या अनुयायांनी सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांना घाबरण्याची काही गरज आहे का? तुम्हाला असं का वाटतं?

सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांवर तुम्ही नक्कीच विजय मिळवू शकता. याकोब ४:७ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • सैतान आणि दुष्ट स्वर्गदूतांपासून तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं करू शकता?

काही जण म्हणतात: “भूतांचे पिक्चर बघण्यात किंवा तसले गेम्स खेळण्यात काय चुकीचंय? ते तर फक्‍त मज्जेसाठी असतं.”

  • पण असा विचार करणं धोक्याचं का आहे?

थोडक्यात

विश्‍वासू स्वर्गदूत आपल्याला मदत करतात. पण सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत यहोवाचे शत्रू आहेत आणि ते भूतविद्येद्वारे लोकांना बहकवतात.

उजळणी

  • यहोवाचे स्वर्गदूत लोकांना त्याच्याबद्दल शिकून घ्यायला कशी मदत करत आहेत?

  • सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत कोण आहेत?

  • आपण भूतविद्येपासून दूर राहायला पाहिजे असं तुम्हाला का वाटतं?

ध्येय

हेसुद्धा पाहा

येशूच प्रमुख स्वर्गदूत मीखाएल आहे याचा पुरावा पाहा.

“प्रमुख स्वर्गदूत मीखाएल कोण आहे?” (वेबसाईटवरचा लेख)

सैतान एक खरी व्यक्‍ती आहे याच्या पुराव्यांवर विचार करा.

“सैतान एक खरी व्यक्‍ती आहे का?” (वेबसाईटवरचा लेख)

एक स्त्री दुष्ट स्वर्गदूतांच्या तावडीतून कशी सुटली हे पाहा.

“उसे जीने की वजह मिल गयी” (ऑनलाईन लेख)

भूतविद्येद्वारे सैतान लोकांना कसं फसवतो हे जाणून घ्या.

“जादू-टोने और डायन के बारे में सच्चाई” (ऑनलाईन लेख)