व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ३०

मरण पावलेल्या आपल्या प्रियजनांना आपण पुन्हा भेटू!

मरण पावलेल्या आपल्या प्रियजनांना आपण पुन्हा भेटू!

मृत्यूमुळे होणारं दुःख खूप मोठं असतं. म्हणूनच बायबलमध्ये मृत्यूला शत्रू म्हटलंय. (१ करिंथकर १५:२६) २७ व्या धड्यात आपण शिकलो की यहोवा या शत्रूचा नाश करणार आहे. पण ज्या लोकांचा आधीच  मृत्यू झालाय त्यांच्याबद्दल काय? त्यांच्यासाठी यहोवाने एक सुंदर वचन दिलंय. त्याने सांगितलंय की तो मरण पावलेल्या लाखो-करोडो लोकांना पुन्हा जिवंत करेल. तो त्यांचं पुनरुत्थान करेल! आणि तेही कायम जीवनाचा आनंद घेतील. पण हे खरंच शक्य आहे का? आणि पुन्हा जिवंत झाल्यावर ते कुठे राहतील, स्वर्गात की पृथ्वीवर? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं आपण या धड्यात पाहणार आहोत.

१. मरण पावलेल्या आपल्या प्रियजनांबद्दल यहोवाला कसं वाटतं?

मरण पावलेल्या या लोकांना पुन्हा उठवायला यहोवा खूप आतुर आहे. देवाच्या एका विश्‍वासू सेवकाला, ईयोबला ही खातरी होती, की त्याचा मृत्यू झाला तरी देव त्याला विसरणार नाही. म्हणूनच तो देवाला म्हणाला, “तू हाक मारशील आणि मी तुला [कबरेतून] उत्तर देईन.”ईयोब १४:१३-१५ वाचा.

२. मरण पावलेले लोक खरंच पुन्हा जिवंत होऊ शकतात का?

येशू जेव्हा पृथ्वीवर होता तेव्हा देवाने त्याला, मरण पावलेल्या लोकांना पुन्हा उठवण्याची शक्‍ती दिली होती. येशूने एका १२ वर्षांच्या मुलीला आणि एका विधवेच्या मुलाला पुन्हा जिवंत केलं होतं. (मार्क ५:४१, ४२; लूक ७:१२-१५) नंतर, येशूच्या एका मित्राचा, लाजरचा मृत्यू झाला. लाजरला मरून चार दिवस झाले होते तरी येशूने त्याला पुन्हा जिवंत केलं. येशू त्याच्या कबरेजवळ आला आणि देवाला प्रार्थना करून मोठ्याने म्हणाला, “लाजर, बाहेर ये!” तेव्हा “जो मेला होता, तो बाहेर आला.” (योहान ११:४३, ४४) कल्पना करा, लाजर जिवंत झालाय हे पाहून त्याच्या कुटुंबातल्या लोकांना आणि मित्रांना किती आनंद झाला असेल!

३. मरण पावलेल्या तुमच्या प्रियजनांसाठी कोणती आशा आहे?

बायबल असं वचन देतं, की ‘मेलेल्या लोकांना उठवलं जाणार आहे.’ (प्रेषितांची कार्यं २४:१५) येशूने पृथ्वीवर असताना, ज्यांना मेलेल्यांतून उठवलं होतं ते स्वर्गात गेले नव्हते. (योहान ३:१३) तर त्याने त्यांना पृथ्वीवरच जिवंत केलं होतं. आपल्या कुटुंबातल्या लोकांना आणि मित्रांना पुन्हा भेटून त्यांना किती आनंद झाला असेल! लवकरच येशू मरण पावलेल्या लाखो-करोडो लोकांना पृथ्वीवर पुन्हा जिवंत करेल आणि ते एका सुंदर परिस्थितीत कायम जीवनाचा आनंद घेतील. त्यांच्यापैकी काहींची आज कदाचित कोणालाही आठवण राहिली नसेल. पण येशू म्हणाला, की “स्मारक कबरींमध्ये असलेले सगळे” म्हणजे जे देवाच्या आठवणीत आहेत, त्या सगळ्यांना पुन्हा उठवलं जाईल.—योहान ५:२८, २९.

आणखी जाणून घेऊ या

मेलेल्या लोकांना नक्कीच पुन्हा उठवलं जाईल. यावर तुम्ही भरवसा का ठेवू शकता आणि या आशेमुळे तुम्हाला सांत्वन आणि दिलासा कसा मिळू शकतो हे बायबलमधून पाहू या.

४. येशूने दाखवून दिलं की तो मेलेल्या लोकांना उठवू शकतो

लाजरचा मृत्यू झाला तेव्हा येशूने काय केलं याबद्दल आणखी जाणून घ्या. योहान ११:१४, ३८-४४ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • लाजर खरोखरच मेला होता हे आपल्याला कसं कळतं?—३९ वं वचन पाहा.

  • जर लाजर स्वर्गात गेला असता तर येशूने त्याला पृथ्वीवर परत आणलं असतं का?

व्हिडिओ पाहा.

५. असंख्य लोकांना उठवलं जाईल!

स्तोत्र ३७:२९ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • पुनरुत्थान झालेले लाखो-करोडो लोक कुठे राहतील?

यहोवाच्या सेवकांसोबतच आणखी बऱ्‍याच लोकांचं येशू पुनरुत्थान करेल. प्रेषितांची कार्यं २४:१५ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • मेलेले लोक पुन्हा उठतील तेव्हा तुम्हाला कोणाला भेटायला आवडेल?

जरा विचार करा: आपल्या मुलाला झोपेतून उठवणं एका वडिलासाठी जितकं सोपं असतं, तितकंच मेलेल्या व्यक्‍तीला उठवणं येशूसाठी सोपं आहे

६. पुनरुत्थानाच्या आशेमुळे सांत्वन आणि दिलासा मिळतो

बायबलमधल्या याईरच्या मुलीच्या अहवालातून, दुःखात असलेल्या पुष्कळ जणांना सांत्वन आणि दिलासा मिळाला आहे. या खऱ्‍या घटनेबद्दल लूक ८:४०-४२, ४९-५६ यांत वाचा.

याईरच्या मुलीचं पुनरुत्थान करण्याआधी येशू त्याला म्हणाला, “घाबरू नकोस, फक्‍त विश्‍वास ठेव.”—५० वं वचन पाहा.

  • प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा पुनरुत्थानाच्या आशेमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?

  • जीव धोक्यात असतो तेव्हा या आशेमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?

व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • फेलिसीटीच्या आईवडिलांना पुनरुत्थानाच्या आशेमुळे सांत्वन आणि दिलासा कसा मिळाला?

काही जण म्हणतात: “गेलेली माणसं पुन्हा भेटतील, यावर विश्‍वासच बसत नाही.”

  • तुम्हाला याबद्दल काय वाटतं?

  • पुनरुत्थान खरंच होणार आहे हे समजावून सांगण्यासाठी तुम्ही कोणतं वचन दाखवाल?

थोडक्यात

बायबल असं वचन देतं की मरण पावलेल्या लाखो-करोडो लोकांना पुन्हा उठवलं जाणार आहे. त्यांनी पुन्हा जगावं अशी यहोवाची इच्छा आहे आणि त्यांना उठवण्याची ताकद यहोवाने येशूला दिली आहे.

उजळणी

  • मेलेल्या लोकांना पुन्हा उठवण्याबद्दल यहोवाला आणि येशूला कसं वाटतं?

  • पुनरुत्थान झालेले लाखो-करोडो लोक कुठे राहतील, स्वर्गात की पृथ्वीवर? तुम्ही हे कशावरून म्हणू शकता?

  • मरण पावलेली तुमची जवळची माणसं पुन्हा उठतील याची तुम्हाला खातरी वाटते का? आणि कशामुळे?

ध्येय

हेसुद्धा पाहा

आपल्या जवळच्या व्यक्‍तीला गमावल्याच्या दुःखातून सावरण्यासाठी आपण कोणती व्यावहारिक पावलं उचलू शकतो हे जाणून घ्या.

“शोक करणाऱ्‍यांसाठी मदत” (सावध राहा!  क्र. ३ २०१८)

बायबलची तत्त्वं एखाद्या व्यक्‍तीला दुःखातून सावरायला खरंच मदत करू शकतात का?

जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा  (५:०६)

लहान मुलं एखाद्या प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूच्या दुःखातून कशी सावरू शकतात?

खंडणी  (२:०७)

स्वर्गात राहण्यासाठीही काही जणांचं पुनरुत्थान होईल का? कोणाचं पुनरुत्थान होणार नाही?

“पुनरुत्थान म्हणजे काय?” (वेबसाईटवरचा लेख)