व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ४०

देवाच्या नजरेत आपण शुद्ध कसं राहू शकतो?

देवाच्या नजरेत आपण शुद्ध कसं राहू शकतो?

कल्पना करा, की एक आई आपल्या मुलाला शाळेत जायला तयार करत आहे. त्याने आंघोळ केली आहे, त्याचे कपडे नीटनेटके आणि स्वच्छ आहेत, याची ती खातरी करते. यामुळे त्याचं आरोग्य तर चांगलं राहतंच पण इतरांनाही हे दिसून येतं, की त्याच्या आईवडिलांचं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांना त्याची काळजी आहे. अगदी तसंच, आपल्या प्रेमळ पित्याची, यहोवाचीही इच्छा आहे की आपण आपलं शरीर स्वच्छ ठेवावं. यासोबतच आपलं वागणं-बोलणं आणि विचारसुद्धा शुद्ध असावेत असं त्याला वाटतं. जेव्हा आपण सर्व बाबतींत शुद्ध असतो तेव्हा आपल्याला तर फायदा होतोच, पण यहोवाचाही गौरव होतो.

१. आपण स्वच्छता कशी ठेवू शकतो?

यहोवा आपल्याला सांगतो की “तुम्ही पवित्र असलं पाहिजे.” (१ पेत्र १:१६) पवित्र असण्यासाठी एका व्यक्‍तीचं शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ असलं पाहिजे. स्वच्छ राहण्यासाठी आपण दररोज आंघोळ करण्यासोबतच आपले कपडे, घर आणि गाडीसुद्धा स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवली पाहिजे. शिवाय, आपलं राज्य सभागृह स्वच्छ ठेवण्यासाठीही आपण मदत करू शकतो. आपण स्वच्छ राहतो तेव्हा यहोवाचा गौरव होतो.—२ करिंथकर ६:३, ४.

२. शुद्ध राहण्यासाठी आपण कोणत्या सवयींपासून दूर राहिलं पाहिजे?

बायबल आपल्याला सांगतं की “आपण शरीराला आणि मनाला दूषित करणाऱ्‍या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला शुद्ध” केलं पाहिजे. (२ करिंथकर ७:१) याचा अर्थ, आपण अशा प्रत्येक गोष्टीपासून दूर राहायचा प्रयत्न केला पाहिजे, ज्यामुळे आपलं शरीर किंवा आपलं मन अशुद्ध होईल. तसंच, आपण चुकीच्या विचारांना कधीही मनात थारा देऊ नये. कारण आपल्या मनातल्या विचारांनीही यहोवाला आनंद व्हावा अशी आपली इच्छा आहे. (स्तोत्र १०४:३४) यासोबतच, आपलं बोलणंही शुद्ध असलं पाहिजे.—कलस्सैकर ३:८ वाचा.

आणखी कोणत्या गोष्टींमुळे आपलं शरीर आणि मन अशुद्ध होऊ शकतं? तंबाखू, सुपारी, गुटखा आणि ड्रग्स यांसारख्या गोष्टींमुळे आपलं शरीर दूषित होतं. म्हणून आपण अशा गोष्टींपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे. असं केल्यामुळे आपलं आरोग्य तर चांगलं राहिलच, पण त्यासोबतच जीवनाच्या देणगीबद्दल आपल्याला कदर आहे हेही दिसून येईल. तसंच, हस्तमैथुन a करणं आणि पोर्नोग्राफी (अश्‍लील व्हिडिओ आणि साहित्य) पाहणं यांसारख्या अशुद्ध सवयी सोडायचाही आपण पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. (स्तोत्र ११९:३७; इफिसकर ५:५) या सवयी मोडणं खूप कठीण जाऊ शकतं, पण यहोवाच्या मदतीने ते शक्य आहे.—यशया ४१:१३ वाचा.

आणखी जाणून घेऊ या

स्वच्छता ठेवल्यामुळे यहोवाचा गौरव कसा होतो आणि अशुद्ध सवयींवर आपण कशी मात करू शकतो यावर विचार करू या.

३. स्वच्छता ठेवल्यामुळे यहोवाचा गौरव होतो

जुन्या काळात इस्राएली लोकांना यहोवाने ज्या आज्ञा दिल्या होत्या, त्यांवरून स्वच्छतेबद्दल तो कसा विचार करतो हे आपल्याला कळतं. निर्गम १९:१० आणि ३०:१७-१९ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • स्वच्छतेबद्दल यहोवाला काय वाटतं, याविषयी या वचनांमधून तुम्हाला काय कळलं?

  • स्वच्छ राहण्यासाठी आपण कोणत्या चांगल्या सवयी लावू शकतो?

स्वच्छता ठेवण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि मेहनत करावी लागते. पण आपण सर्वच जण असं करू शकतो; मग आपण कुठेही राहत असलो किंवा आपली आर्थिक स्थिती कशीही असली तरीही. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • आपल्या नीटनेटकेपणामुळे प्रचार कार्यात यहोवाचा गौरव कसा होतो?

४. व्यसनांवर विजय मिळवा

यहोवाच्या मदतीने आपण कोणत्याही वाईट सवयीवर विजय मिळवू शकतो

जर तुम्ही सिगरेट ओढत असाल किंवा दुसरी एखादी नशा करत असाल, तर हे व्यसन सोडणं किती कठीण आहे हे तुम्हाला माहीत असेल. पण ही व्यसनं सोडायला तुम्हाला कशामुळे मदत मिळू शकते? व्यसनाचा तुमच्यावर काय परिणाम होतो यावर विचार करा. मत्तय २२:३७-३९ वाचा, आणि खाली दिलेल्या मुद्द्‌यांचा उपयोग करून, तंबाखू किंवा इतर व्यसनांमुळे काय होऊ शकतं याबद्दल चर्चा करा:

  • यहोवासोबतच्या मैत्रीवर होणारा परिणाम.

  • कुटुंबावर आणि इतरांवर होणारा परिणाम.

तुमच्या व्यसनावर विजय मिळवण्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलाल हे ठरवा. b व्हिडिओ पाहा.

फिलिप्पैकर ४:१३ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • नियमितपणे प्रार्थना आणि बायबल अभ्यास केल्यामुळे तसंच, सभांना हजर राहिल्यामुळे एका व्यक्‍तीला व्यसन सोडायला मदत कशी मिळू शकते?

५. अशुद्ध विचार आणि सवयींविरुद्ध लढा

कलस्सैकर ३:५ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • पोर्नोग्राफी, अश्‍लील मेसेज आणि हस्तमैथुन या गोष्टी यहोवाच्या नजरेत अशुद्ध आहेत हे आपल्याला कसं कळतं?

  • यहोवाच्या अपेक्षेप्रमाणे आपल्या विचारांत आणि वागण्या-बोलण्यात शुद्ध राहणं शक्य आहे का? तुम्हाला असं का वाटतं?

अशुद्ध विचारांविरुद्ध आपण कसं लढू शकतो हे जाणून घ्या. व्हिडिओ पाहा.

येशूने एक उदाहरण देऊन सांगितलं की मनाने शुद्ध राहण्यासाठी आपण आवश्‍यक पावलं उचलायला मागेपुढे नाही पाहिलं पाहिजे. मत्तय ५:२९, ३० वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • आपण स्वतःच्या शरीराला इजा करावी असं येशू इथे सांगत नव्हता. तर पावलं उचलणं किती महत्त्वाचं आहे यावर तो भर देत होता. अशुद्ध विचार टाळण्यासाठी एक व्यक्‍ती कोणती पावलं उचलू शकते? c

जर तुम्ही अशुद्ध विचारांपासून दूर राहण्याचा मनापासून प्रयत्न करत असाल, तर यहोवा याची कदर करतो. स्तोत्र १०३:१३, १४ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • हे वचन अशुद्ध सवयीविरुद्ध लढणाऱ्‍या व्यक्‍तीला हार न मानण्याचं प्रोत्साहन कसं देतं?

पुन्हा चुकलात, तरी हार मानू नका!

आपल्या मनात असा विचार येऊ शकतो, की ‘इतके प्रयत्न करूनही ही सवय सुटत नाही. मग प्रयत्न करून काय उपयोग?’ पण जरा विचार करा. शर्यतीत भाग घेणारा धावक फक्‍त अडखळून खाली पडला म्हणून तो शर्यत हरतो का? किंवा मग त्याला शर्यत पुन्हा सुरू करावी लागते का? नाही. तसंच, एखाद्या वाईट सवयीविरुद्ध लढताना तुमच्या हातून पुन्हा तीच चूक झाली, तर तुम्ही या लढाईत हरलात असा याचा अर्थ होत नाही. तसंच, तुमचे आजपर्यंतचे सगळे प्रयत्न वाया गेले असाही याचा अर्थ होत नाही. एखाद्या वाईट सवयीविरुद्ध लढताना चुका होणं साहजिक आहे. स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी सहसा वेळ लागू शकतो. म्हणून हार मानू नका! यहोवाच्या मदतीने तुम्ही तुमच्या वाईट सवयीवर नक्कीच मात करू शकता!

काही जण म्हणतात: “मला नाही वाटत माझी सवय कधी सुटेल.”

  • यहोवाच्या मदतीने आपण वाईट सवयीवर नक्कीच मात करू शकतो, हे पटवून देण्यासाठी तुम्ही त्या व्यक्‍तीला कोणतं वचन दाखवाल?

थोडक्यात

आपण आपलं शरीर, मन आणि आपलं वागणं-बोलणं शुद्ध ठेवतो तेव्हा यहोवाला आनंद होतो.

उजळणी

  • स्वच्छ राहणं इतकं महत्त्वाचं का आहे?

  • आपण आपलं शरीर स्वच्छ कसं ठेवू शकतो?

  • आपण आपले विचार आणि आपलं वागणं-बोलणं शुद्ध कसं ठेवू शकतो?

ध्येय

हेसुद्धा पाहा

तुमच्याकडे पुरेशा सोयी नसतील तरी तुम्ही स्वच्छता ठेवण्यासाठी कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी करू शकता?

आरोग्य आणि स्वच्छता—हात धुणं  (३:०१)

सिगरेटच्या व्यसनावर मात करण्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलू शकता हे जाणून घ्या.

“सिगरेट की लत छोड़ने के लिए क्या करूँ?” (ऑनलाईन लेख)

पोर्नोग्राफीच्या वाईट परिणामांबद्दल माहिती घ्या.

“क्या गंदी तसवीरें या वीडियो देखने में कोई बुराई है?” (ऑनलाईन लेख)

पोर्नोग्राफी पाहण्याच्या सवयीवर एका माणसाने कशी मात केली याबद्दल वाचा.

“यशस्वी होण्याआधी मी बऱ्‍याचदा हरलो” (टेहळणी बुरूज  क्र. ४ २०१६)

a हस्तमैथुन म्हणजे लैंगिक सुख मिळवण्यासाठी स्वतःच्या गुप्तांगांना उत्तेजित करण्याची क्रिया.

b व्यसनांवर ताबा मिळवण्यासाठी कोणती व्यावहारिक पावलं उचलली जाऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी “सिगरेट की लत छोड़ने के लिए क्या करूँ?” हा लेख पाहा. हा लेख या धड्यातल्या ‘हेसुद्धा पाहा’ या भागात दिलेला आहे.

c हस्तमैथुनाच्या सवयीवर मात करण्यासाठी देवाच्या प्रेमात टिकून राहा  या पुस्तकातल्या परिशिष्टात पान क्रमांक २४९ पाहा, ज्यात “हस्तमैथुनाच्या सवयीवर विजय मिळवा” हा लेख दिला आहे.