व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ४२

लग्न करणं किंवा न करणं याबद्दल बायबलमध्ये काय सांगितलंय?

लग्न करणं किंवा न करणं याबद्दल बायबलमध्ये काय सांगितलंय?

काही संस्कृतींमध्ये असं मानलं जातं की लग्न केलं तरच एक व्यक्‍ती आनंदी राहू शकते. पण खरं पाहिलं, तर लग्न झालेले सगळेच आनंदी नसतात आणि लग्न न झालेले सगळेच दुःखीही नसतात. बायबलमध्ये म्हटलंय की अविवाहित राहणं आणि लग्न करणं या दोन्ही गोष्टी देणग्या आहेत.

१. लग्न न केल्यामुळे कोणते फायदे होतात?

बायबलमध्ये म्हटलंय, “जो लग्न करतो तो चांगलं करतो, पण जो लग्न करत नाही तो आणखी चांगलं करतो.” (१ करिंथकर ७:३२, ३३, ३८ वाचा.) लग्न न झालेली व्यक्‍ती ‘आणखी चांगलं करते’ असं आपण का म्हणू शकतो? कारण ज्यांचं लग्न झालेलं नसतं, त्यांच्यावर जोडीदाराची काळजी घेण्याची जबाबदारी नसते. त्यामुळे सहसा त्यांना जास्त मोकळीक असते. जसं की, त्यांच्यापैकी काही जण प्रचारासाठी दुसऱ्‍या ठिकाणी जाऊन आपली सेवा वाढवू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यहोवासोबतचं नातं मजबूत करण्यासाठी ते जास्त वेळ देऊ शकतात.

२. कायदेशीर लग्न करण्याचे कोणते काही फायदे आहेत?

जसं अविवाहित राहण्याचे काही फायदे आहेत, तसंच लग्न करण्याचेही काही खास फायदे आहेत. बायबलमध्ये म्हटलंय, “एकापेक्षा दोघं चांगले.” (उपदेशक ४:९) खासकरून जे लोक आपल्या वैवाहिक जीवनात बायबल तत्त्वांचं पालन करतात, त्यांच्या बाबतीत ही गोष्ट खरी आहे. कायद्याप्रमाणे रीतसर लग्न करणारी जोडपी एकमेकांवर प्रेम करण्याचं, एकमेकांचा आदर करण्याचं आणि एकमेकांची काळजी घेण्याचं वचन देतात. त्यामुळे या नात्यात त्यांना सुरक्षित वाटतं. पण जी जोडपी लग्न न करताच सोबत राहतात त्यांच्या बाबतीत असं नसतं. शिवाय, लग्न केलेल्या जोडप्यांच्या मुलांनाही कुटुंबात सुरक्षित वाटतं.

३. विवाहाबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे?

पहिल्या जोडप्याला विवाहाच्या बंधनात एकत्र आणताना यहोवा म्हणाला, “माणूस आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या बायकोला जडून राहील.” (उत्पत्ती २:२४, तळटीप) यहोवाची अशी इच्छा आहे की पतीपत्नींनी आयुष्यभर एकमेकांवर जिवापाड प्रेम करावं आणि एकमेकांना विश्‍वासू राहावं. आणि जर दोघांपैकी एका जोडीदाराने व्यभिचार केला, तरच तो घटस्फोट घेण्याची त्यांना परवानगी देतो. पण अशा परिस्थितीतही घटस्फोट घ्यायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार यहोवा निर्दोष जोडीदाराला देतो. a (मत्तय १९:९) शिवाय, यहोवाने खऱ्‍या ख्रिश्‍चनांना एकापेक्षा जास्त लग्नं करायची परवानगी दिलेली नाही.—१ तीमथ्य ३:२.

आणखी जाणून घेऊ या

लग्न झालेलं असो किंवा नसो, तुम्ही आनंदी कसं राहू शकता आणि यहोवाचं मन कसं आनंदित करू शकता यावर चर्चा करू या.

४. अविवाहित राहण्याच्या देणगीचा चांगला उपयोग करा

येशूने म्हटलं की अविवाहित राहणं ही एक देणगी आहे. (मत्तय १९:११, १२) मत्तय ४:२३ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • येशू अविवाहित होता. मग त्याने आपल्या पित्याची सेवा करण्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी या देणगीचा कसा वापर केला?

मंडळीत ज्यांचं लग्न झालेलं नाही, तेसुद्धा येशूचं अनुकरण करून आनंदी राहू शकतात. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांना यहोवाच्या सेवेत कोणकोणत्या संधी आहेत?

तुम्हाला माहीत होतं का?

बायबलमध्ये लग्न करण्याचं ठरावीक वय दिलेलं नाही. पण ‘ऐन तारुण्याचा काळ ओसरेपर्यंत’ एका व्यक्‍तीने थांबलं पाहिजे असा सल्ला ते देतं. कारण या काळात लैंगिक इच्छा खूप तीव्र असल्यामुळे तरुणांना योग्य निर्णय घ्यायला कठीण जातं.—१ करिंथकर ७:३६.

५. विचार करून जोडीदार निवडा

जोडीदार निवडणं हा तुमच्या जीवनातला एक खूप महत्त्वाचा निर्णय आहे. मत्तय १९:४-६, वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • लग्न करायची घाई का करू नये?

जोडीदार निवडताना कोणते गुण पाहिले पाहिजेत, याविषयी बायबल आपल्याला सल्ला देतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्‍तीचं यहोवावर प्रेम असलं पाहिजे. b १ करिंथकर ७:३९ आणि २ करिंथकर ६:१४ वाचा. मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • यहोवाची उपासना करणाऱ्‍या व्यक्‍तीशीच आपण लग्न का केलं पाहिजे?

  • ज्या व्यक्‍तीचं यहोवावर प्रेम नाही तिच्याशी आपण लग्न केलं, तर यहोवाला कसं वाटेल?

जर दोन वेगवेगळ्या प्राण्यांना सोबत जुंपलं तर त्या दोघांनाही त्रास होईल. त्याच प्रकारे यहोवाची उपासना करत नसलेल्या व्यक्‍तीसोबत लग्न केल्यामुळे बऱ्‍याच समस्या येऊ शकतात

६. विवाहाकडे यहोवाच्या नजरेने पाहा

जुन्या काळात इस्राएलमध्ये काही पुरुष स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या बायकोला घटस्फोट द्यायचे. मलाखी २:१३, १४, १६ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • व्यभिचाराशिवाय इतर कारणांसाठी घेतलेल्या घटस्फोटाची यहोवाला घृणा का वाटते?

व्यभिचारामुळे आणि घटस्फोटामुळे निर्दोष जोडीदाराला आणि मुलांना खूप दुःख सहन करावं लागतं

व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • यहोवाची उपासना करत नसलेल्या व्यक्‍तीशी तुमचं आधीच लग्न झालं असेल, तरी तुम्ही तुमचं वैवाहिक जीवन सुखी कसं करू शकता?

७. विवाहाबद्दल यहोवाच्या स्तरांचं पालन करा

विवाहाबद्दल असलेल्या यहोवाच्या स्तरांचं पालन करण्यासाठी एखाद्या व्यक्‍तीला तिच्या जीवनात कदाचित खूप फेरबदल करावे लागतील. आणि कधीकधी हे सोपं नसतं. c पण जे असं करतात त्यांना यहोवा भरपूर आशीर्वाद देतो. व्हिडिओ पाहा.

इब्री लोकांना १३:४ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • विवाहाबद्दल असलेल्या यहोवाच्या स्तरांचं पालन करणं शक्य आहे असं तुम्हाला वाटतं का? का वाटतं, किंवा का नाही वाटत?

यहोवाची अशी इच्छा आहे की त्याच्या उपासकांनी लग्नाची आणि घटस्फोटाची कायदेशीर नोंदणी करावी. कारण बहुतेक देशांमध्ये सरकारचा तसा कायदा असतो. तीत ३:१ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • जर तुमचं लग्न झालेलं असेल, तर तुमच्या विवाहाला कायद्याची मान्यता आहे, याची तुम्हाला खातरी आहे का?

कदाचित कोणी विचारेल: “लग्न न करता सोबत राहण्यात काय चुकीचंय?”

  • तुम्ही काय उत्तर द्‌याल?

थोडक्यात

अविवाहित राहणं आणि लग्न करणं या दोन्ही यहोवाने दिलेल्या देणग्या आहेत. जर आपण यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागलो तर आपण जीवनात सुखी आणि समाधानी राहू शकतो, मग आपलं लग्न झालेलं असो किंवा नसो.

उजळणी

  • आपण अविवाहित राहण्याच्या देणगीचा चांगला उपयोग कसा करू शकतो?

  • यहोवाची उपासना करणाऱ्‍या व्यक्‍तीशीच आपण लग्न केलं पाहिजे असं बायबल का म्हणतं?

  • बायबलप्रमाणे फक्‍त कोणत्या कारणासाठी घटस्फोट घेतला जाऊ शकतो?

ध्येय

हेसुद्धा पाहा

“फक्‍त प्रभूमध्ये” लग्न करण्याचा काय अर्थ होतो?

“वाचकांचे प्रश्‍न” (टेहळणी बुरूज,  १ जुलै, २००४)

जोडीदार निवडण्याच्या किंवा विवाहाच्या बाबतीत चांगले निर्णय कसे घेता येतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.

वैवाहिक जीवनाची तयारी  (११:५३)

जे गमावलं त्यापेक्षा यहोवाने जे दिलं ते सगळ्यात जास्त मौल्यवान आहे, असं एका भावाला का वाटलं ते जाणून घ्या.

मला सारखं वाटायचं की एक दिवस तीपण बायबल अभ्यास करेल  (१:५६)

घटस्फोट घेण्याचा किंवा विभक्‍त (वेगळं) होण्याचा निर्णय घेण्याआधी एका व्यक्‍तीने कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?

“‘देवाने जे जोडलं आहे’ त्याचा आदर करा” (टेहळणी बुरूज,  डिसेंबर २०१८)

a व्यभिचार झालेला नसतानाही पतीपत्नी कोणत्या कारणांमुळे विभक्‍त (वेगळे) होऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी काही विषयांवर स्पष्टीकरण क्र. ४ पाहा.

b काही ठिकाणी, आईवडिलांनी मुलांसाठी जोडीदार निवडण्याची रीत आहे. अशा परिस्थितीत, त्या व्यक्‍तीच्या पैशांकडे किंवा प्रतिष्ठेकडे पाहण्याऐवजी, तिचं किंवा त्याचं यहोवावर प्रेम आहे का, हे आधी पाहणं महत्त्वाचं आहे.

c जर तुम्ही लग्न न करताच एखाद्या व्यक्‍तीसोबत राहत असाल, तर तिच्यापासून वेगळं व्हायचं की लग्न करायचं हा तुमचा वैयक्‍तिक निर्णय आहे.