व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ४७

तुम्ही बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार आहात का?

तुम्ही बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार आहात का?

आतापर्यंत, बायबल अभ्यासातून तुम्हाला यहोवाबद्दल बऱ्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. कदाचित तुम्ही शिकलेल्या गोष्टींप्रमाणे आपल्या जीवनात काही बदलसुद्धा केले असतील. पण तरी अशी एखादी गोष्ट असेल, जी समर्पण करून बाप्तिस्मा घेण्यापासून तुम्हाला रोखत असेल. तर या धड्यात आपण अशा काही अडथळ्यांबद्दल आणि तुम्ही त्यांच्यावर कशी मात करू शकता, याबद्दल पाहणार आहोत.

१. बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्हाला बायबलचं किती ज्ञान असलं पाहिजे?

बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्हाला “सत्याचं अचूक ज्ञान” असणं गरजेचं आहे. (१ तीमथ्य २:४) पण याचा अर्थ असा होत नाही, की बायबलवर आधारित सगळ्याच प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला बाप्तिस्मा घेण्याआधी माहीत असली पाहिजेत. तरी, तुम्हाला बायबलच्या मूलभूत शिकवणींचं ज्ञान असलं पाहिजे हे मात्र नक्की. बाप्तिस्मा घेण्यासाठी तुमच्याकडे पुरेसं ज्ञान आहे की नाही हे जाणून घ्यायला मंडळीतले वडील तुम्हाला मदत करतील. बाप्तिस्मा घेऊन बरीच वर्षं झाल्यावरही खरे ख्रिस्ती बायबलचं सखोल ज्ञान घेतच राहतात.—कलस्सैकर १:९, १०.

२. बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्ही कोणती पावलं उचलली पाहिजेत?

बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्ही ‘पश्‍चात्ताप करून मागे वळलं पाहिजे.’ (प्रेषितांची कार्यं ३:१९ वाचा.) याचा अर्थ, तुमच्या हातून आजपर्यंत झालेल्या पापांबद्दल तुम्हाला मनापासून वाईट वाटलं पाहिजे आणि तुम्ही यहोवाला क्षमा मागितली पाहिजे. तसंच तुम्ही चुकीचं वागणं सोडून देवाला आवडेल अशा प्रकारे वागण्याचा निश्‍चय करणं गरजेचं आहे. यासोबतच तुम्ही सभांना नियमितपणे हजर राहिलं पाहिजे आणि मंडळीसोबत प्रचारही केला पाहिजे.

३. तुम्ही भीतीमुळे बाप्तिस्मा घ्यायला मागेपुढे का पाहू नये?

काही जणांना अशी भीती वाटते, की आपण यहोवाला दिलेलं वचन पूर्ण करू शकणार नाही. हे खरंय की तुमच्या हातून काही वेळा चुका होतील. बायबलमधल्या विश्‍वासू स्त्रीपुरुषांच्या हातूनही चुका झाल्या होत्या. खरंतर, आपल्या सेवकांकडून एकही चूक होणार नाही अशी अपेक्षा यहोवा करत नाही. (स्तोत्र १०३:१३, १४ वाचा.) उलट, जेव्हा तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा पुरेपूर प्रयत्न करता, तेव्हा त्याला खूप आनंद होतो. आणि तो तुम्हाला मदत करायला नेहमी तयार असतो. यहोवाने वचन दिलंय, की कोणतीही गोष्ट ‘आपल्याला त्याच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही.’रोमकर ८:३८, ३९ वाचा.

आणखी जाणून घेऊ या

तुम्ही यहोवाला चांगल्या प्रकारे जाणून घेतलं आणि त्याची मदत स्वीकारली, तर बाप्तिस्मा घेण्याच्या मार्गात येणाऱ्‍या अडथळ्यांवर तुम्ही मात करू शकता. ती कशी, हे आता आपण पाहू या.

४. यहोवाला चांगल्या प्रकारे जाणून घ्या

तुम्ही बाप्तिस्मा घेण्याआधी यहोवाला किती चांगल्या प्रकारे जाणून घेतलं पाहिजे? तुम्ही यहोवाला इतक्या चांगल्या प्रकारे जाणून घेतलं पाहिजे, की तुम्हाला त्याच्यावर प्रेम करता येईल आणि त्याच्या मनाप्रमाणे वागण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल. जगातल्या वेगवेगळ्या भागांत बायबल विद्यार्थ्यांनी हे कशा प्रकारे केलंय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा. मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काही जणांनी बाप्तिस्मा घेण्यासाठी कोणती पावलं उचलली?

रोमकर १२:२ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • बायबलमध्ये जे सांगितलंय किंवा यहोवाचे साक्षीदार जे शिकवतात त्याबद्दल तुमच्या मनात काही शंका आहेत का?

  • जर असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे?

५. अडथळ्यांवर मात करा

जेव्हा आपण यहोवाला समर्पण करून बाप्तिस्मा घ्यायचा निर्णय घेतो, तेव्हा आपल्या सगळ्यांनाच समस्यांचा सामना करावा लागतो. याचं एक उदाहरण पाहण्यासाठी व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • व्हिडिओमधल्या बहिणीला यहोवाची सेवा करण्यासाठी कोणत्या अडथळ्यांवर मात करावी लागली?

  • यहोवावर प्रेम असल्यामुळे त्या बहिणीला कशी मदत झाली?

नीतिवचनं २९:२५ आणि २ तीमथ्य १:७ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • समस्यांवर मात करण्यासाठी आपल्याला धैर्य कशामुळे मिळतं?

६. यहोवावर भरवसा ठेवा

यहोवा तुम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे वागायला मदत करेल. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • व्हिडिओमधल्या बायबल विद्यार्थ्याला बाप्तिस्मा घेण्यापासून कोणती गोष्ट रोखत होती?

  • कोणती गोष्ट समजल्यामुळे त्याला यहोवावर आणखी भरवसा ठेवायला मदत झाली?

यशया ४१:१०, १३ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • समर्पणाच्या वेळी दिलेलं वचन आपल्याला नक्की पूर्ण करता येईल, असा आत्मविश्‍वास तुम्ही का ठेवू शकता?

७. यहोवाच्या प्रेमाबद्दल तुमची कदर वाढवत राहा

यहोवा तुमच्यावर किती प्रेम करतो, यावर तुम्ही जितका जास्त विचार कराल तितकंच तुमच्या मनात त्याच्याबद्दल असलेली कदर आणि प्रेम वाढत जाईल. आणि यामुळे नेहमीसाठी त्याची सेवा करत राहण्याची इच्छा तुमच्या मनात वाढत जाईल. स्तोत्र ४०:५ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • यहोवाने तुम्हाला दिलेल्या कोणत्या आशीर्वादांसाठी तुम्ही खासकरून त्याचे आभारी आहात?

यिर्मया संदेष्ट्याचं यहोवावर प्रेम होतं आणि त्याचे शब्द त्याला प्रिय होते. तसंच यहोवाची सेवा करण्याच्या सन्मानाबद्दल त्याला मनापासून कदर होती. म्हणूनच तो म्हणाला: “[तुझ्या] संदेशामुळे मी अतिशय खूश झालो आणि माझं मन आनंदित झालं. कारण, हे . . . देवा यहोवा! मला तुझ्या नावाने ओळखलं जातं.” (यिर्मया १५:१६) आता, या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • यहोवाचा साक्षीदार असणं हा एक खास सन्मान का आहे?

  • तुम्हाला बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा एक साक्षीदार व्हायची इच्छा आहे का?

  • बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्हाला काही समस्या आहे का?

  • बाप्तिस्म्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं?

काही जण म्हणतात: “मला भीती आहे की बाप्तिस्मा घेतल्यावर, यहोवा मला जे सांगतो त्याप्रमाणे मी करू शकेन की नाही.”

  • तुम्हालाही असंच वाटतं का?

थोडक्यात

बाप्तिस्मा घेण्याच्या मार्गात येणाऱ्‍या कोणत्याही अडथळ्यांवर तुम्ही यहोवाच्या मदतीने मात करू शकता.

उजळणी

  • बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्हाला बायबलचं किती ज्ञान असलं पाहिजे?

  • बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्हाला कदाचित कोणते बदल करावे लागतील?

  • तुम्ही भीतीमुळे बाप्तिस्मा घ्यायला मागेपुढे का पाहू नये?

ध्येय

हेसुद्धा पाहा

तुम्ही कोणत्या गोष्टीमुळे बाप्तिस्मा घ्यायचा निर्णय घेतला पाहिजे?

“तुम्ही बाप्तिस्मा घ्यायला तयार आहात का?” (टेहळणी बुरूज,  मार्च २०२०)

अडथळ्यांवर तुम्ही मात कशी करू शकता, हे जाणून घ्या.

“मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?” (टेहळणी बुरूज,  मार्च २०१९)

बाप्तिस्मा घेण्यासाठी एका माणसाने मोठमोठ्या समस्यांवर कशी मात केली, हे पाहा.

‘बाप्तिस्मा घ्यायला तुम्ही का उशीर लावत आहात?’  (१:१०)

एक माणूस सुरुवातीला बाप्तिस्मा घ्यायला मागेपुढे पाहत होता. मग त्याला हे महत्त्वाचं पाऊल उचलायला कशामुळे प्रेरणा मिळाली, हे पाहा.

हे आशीर्वाद मला मिळालेत ही खूप मोठी गोष्टए  (७:२१)