व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ५८

यहोवाला नेहमी एकनिष्ठ राहा

यहोवाला नेहमी एकनिष्ठ राहा

खरे ख्रिस्ती कोणत्याही गोष्टीला किंवा कोणत्याही व्यक्‍तीला यहोवाच्या उपासनेच्या आड येऊ देत नाहीत. कारण यहोवाची उपासना त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. तुम्हालाही असंच वाटत असेल यात काही शंका नाही. आणि तुमची एकनिष्ठ उपासना यहोवालाही खूप मोलाची वाटते. (१ इतिहास २८:९ वाचा.) पण कोणत्या परिस्थितींमुळे तुमच्या एकनिष्ठतेची परीक्षा होऊ शकते? आणि तुम्ही या परिस्थितींना कसं तोंड द्याल?

१. इतरांमुळे आपल्या एकनिष्ठतेची परीक्षा कशी होऊ शकते?

आपण यहोवाची उपासना करू नये म्हणून काही लोक आपल्याला त्याच्यापासून दूर न्यायचा प्रयत्न करतील. हे कोण असू शकतात? असे काही जण आहेत, जे सत्य सोडून गेले आहेत आणि जे देवाच्या संघटनेबद्दल खोटी माहिती पसरवतात. आपण यहोवाची उपासना सोडून द्यावी हाच त्यांचा उद्देश असतो. त्यांना धर्मत्यागी असं म्हणण्यात आलंय. तसंच, काही धर्मपुढारीसुद्धा आपल्याबद्दल खोटी माहिती पसरवतात. आणि जर आपण सांभाळून राहिलो नाही, तर आपण त्यांच्या पाशात अडकू शकतो आणि सत्य सोडून जाऊ शकतो. अशा लोकांशी वाद घालणं, त्यांची पुस्तकं किंवा इंटरनेटवर त्यांचे ब्लॉग वाचणं, त्यांच्या वेबसाईटवर जाणं किंवा त्यांचे व्हिडिओ पाहणं हे आपल्यासाठी खूप धोकेदायक आहे. जे दुसऱ्‍यांना यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याबद्दल येशूने म्हटलं: “त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ते स्वतः आंधळे असून इतरांना रस्ता दाखवतात. एका आंधळ्याने दुसऱ्‍या आंधळ्याला रस्ता दाखवला तर दोघंही खड्ड्यात पडतील.”मत्तय १५:१४.

समजा एखाद्या व्यक्‍तीने यहोवाची उपासना सोडून द्यायचा निर्णय घेतला असेल, तर काय? एखादी जवळची व्यक्‍ती जेव्हा असा निर्णय घेते तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं. ‘एकतर मला निवड, किंवा यहोवाला निवड,’ असा निर्णय घ्यायला ती व्यक्‍ती आपल्याला भाग पाडू शकते. पण आपण कोणत्याही व्यक्‍तीपेक्षा यहोवाला एकनिष्ठ राहायचा पक्का निश्‍चय केला पाहिजे. (मत्तय १०:३७) आणि म्हणून अशा लोकांशी कोणताही संबंध ठेवू नका, अशी जी आज्ञा यहोवाने दिली आहे तिचं आपण पालन करू.—१ करिंथकर ५:११ वाचा.

२. आपल्या निर्णयांमुळे आपल्या एकनिष्ठतेची परीक्षा कशी होऊ शकते?

यहोवावर प्रेम असल्यामुळेच आपण खोट्या धर्माशी कोणताही संबंध ठेवत नाही. आपण जो नोकरी-धंदा निवडतो, ज्या संस्थांचा भाग बनतो किंवा जे काही करायचा निर्णय घेतो, त्यांपैकी कशाचाही खोट्या धर्माशी संबंध नाही याची आपण खातरी केली पाहिजे. यहोवा आपल्याला स्पष्टपणे सांगतो, ‘माझ्या लोकांनो, [मोठ्या बाबेलमधून] बाहेर या.’प्रकटीकरण १८:२, ४.

आणखी जाणून घेऊ या

यहोवाची एकनिष्ठपणे उपासना करण्याचा तुमचा निश्‍चय कोणीही कमजोर करू नये, म्हणून तुम्ही काय करू शकता हे जाणून घ्या. तसंच, मोठ्या बाबेलपासून दूर राहून तुम्ही तुमची एकनिष्ठा कशी दाखवू शकता हेसुद्धा पाहा.

३. खोट्या शिक्षकांच्या पाशात अडकू नका

यहोवाच्या संघटनेबद्दल चुकीच्या गोष्टी आपल्या ऐकण्यात आल्या तर आपण काय केलं पाहिजे? नीतिवचनं १४:१५ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर आपण विश्‍वास का ठेवू नये?

२ योहान १० वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • धर्मत्यागी लोकांशी आपण कसं वागलं पाहिजे?

  • आपण धर्मत्यागी लोकांशी प्रत्यक्ष बोलत नसलो, तरीसुद्धा त्यांच्या शिकवणींचा आपल्यावर कोणत्या मार्गांनी प्रभाव पडू शकतो?

  • यहोवाबद्दल किंवा त्याच्या संघटनेबद्दल बोलल्या जाणाऱ्‍या चुकीच्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं, तर यहोवाला कसं वाटेल?

४. एखाद्या भावाने पाप केलं तरीसुद्धा एकनिष्ठ राहा

मंडळीतल्या एखाद्या व्यक्‍तीने गंभीर पाप केलंय असं आपल्याला कळलं तर आपलं कर्तव्य काय आहे? देवाने इस्राएली लोकांना दिलेल्या नियमशास्त्रातल्या एका तत्त्वावर विचार करा. लेवीय ५:१ वाचा.

या वचनात सांगितल्याप्रमाणे, मंडळीतल्या एखाद्याने गंभीर पाप केलंय असं जर आपल्याला कळलं, तर आपल्याला जे माहीत आहे ते आपण वडिलांना सांगितलं पाहिजे. पण त्याआधी, आपण पाप करणाऱ्‍या त्या व्यक्‍तीला वडिलांकडे जाऊन त्याचं पाप कबूल करण्याचं प्रोत्साहन दिलं पाहिजे. असं करणं प्रेमळपणाचं ठरेल. पण जर त्याने तसं केलं नाही तर आपण स्वतः वडिलांकडे जाऊन त्यांना सगळं सांगितलं पाहिजे. यहोवावर आपलं प्रेम असल्यामुळे आपण असं करायला मागेपुढे पाहणार नाही. यावरून, पुढे सांगितलेल्या व्यक्‍तींबद्दल आपलं एकनिष्ठ प्रेम कसं दिसून येईल?

  • यहोवा देव.

  • पाप करणारी व्यक्‍ती.

  • मंडळीतले भाऊबहीण.

एखाद्या भावाचं यहोवासोबतचं नातं धोक्यात असेल तर त्याला मदत करा!

५. मोठ्या बाबेलपासून दूर राहा

लूक ४:८ आणि प्रकटीकरण १८:४, ५ वाचा, आणि मग या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • एखाद्या खोट्या धर्माच्या सदस्य यादीत अजूनही माझं नाव आहे का?

  • खोट्या धर्माशी संबंधित असलेल्या एखाद्या संघटनेचा मी भाग आहे का?

  • मी जो काही कामधंदा करतो त्यामुळे खोट्या धर्माला कोणत्याही प्रकारे मदत होते का?

  • खोट्या धर्माशी पूर्णपणे संबंध तोडण्यासाठी मला अजूनही काही पावलं उचलायची गरज आहे का?

  • यांपैकी कोणत्याही प्रश्‍नाचं जर मी ‘हो’ असं उत्तर दिलं असेल, तर मी कोणते बदल केले पाहिजेत?

कोणताही निर्णय घेताना असाच निर्णय घ्या, ज्यामुळे तुमचा विवेक शुद्ध राहील आणि तुम्ही यहोवाला एकनिष्ठ आहात हे दिसून येईल.

एखाद्या धार्मिक संघटनेकडून गरजू लोकांसाठी दान मागितलं जातं तेव्हा तुम्ही काय कराल?

काही जण म्हणतात: “मला जाणून घ्यायचंय की धर्मत्यागी लोक यहोवाच्या साक्षीदारांबद्दल नेमकं काय म्हणतात. म्हणजे मग मी त्यांना खोटं ठरवू शकेन.”

  • असा विचार करणं योग्य आहे का? तुम्ही असं का म्हणता?

थोडक्यात

यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी, त्याच्याशी नातं तोडलेल्या लोकांशी आपण कोणताही संबंध ठेवू नये. तसंच आपण खोट्या धर्माशीही कोणत्याच प्रकारे नातं ठेवू नये.

उजळणी

  • धर्मत्यागी लोकांचे विचार कोणत्याही माध्यमाने पाहणं, ऐकणं किंवा वाचणं धोकेदायक का आहे?

  • जर एखाद्या व्यक्‍तीने यहोवाची उपासना सोडून द्यायचा निर्णय घेतला असेल, तर तुम्ही तिच्याशी कसं वागलं पाहिजे?

  • खोट्या धर्मापासून दूर राहण्याची आज्ञा आपण कशी पाळली पाहिजे?

ध्येय

हेसुद्धा पाहा

यहोवाच्या साक्षीदारांबद्दल जर कोणी खोटी माहिती पसरवत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे हे जाणून घ्या.

“तुमच्याजवळ संपूर्ण माहिती आहे का?” (टेहळणी बुरूज,  ऑगस्ट २०१८)

मोठ्या बाबेलला सहकार्य करणारी संघटना किंवा काम तुम्ही कसं ओळखू शकता?

“शेवटल्या दिवसांच्या शेवटच्या भागात व्यस्त राहा!” (टेहळणी बुरूज,  ऑक्टोबर २०१९, परिच्छेद १६-१८)

काही जणांनी यहोवाच्या साक्षीदारांचा विश्‍वास कमजोर करायचा प्रयत्न कसा केला आहे?

धोखे में मत आइए  (९:३२)

“मी लहानपणापासून देवाला शोधत होतो” या अनुभवात एका शिंतो पुजाऱ्‍याबद्दल वाचा, ज्याने खोट्या धर्माशी सगळे संबंध तोडले.

“बायबलने बदललं जीवन” (ऑनलाईन लेख)