व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मनःशांती तुम्हाला कोठे लाभेल?

मनःशांती तुम्हाला कोठे लाभेल?

मनःशांती तुम्हाला कोठे लाभेल?

आधीच्या लेखात उल्लेख केलेला थरो याच्या आणि आपल्या काळात बराच फरक आहे. तो मोठा फरक हाच आहे की, मनःशांती कशी मिळवावी याविषयी सल्ला देणाऱ्‍या लोकांचा आज तुटवडा नाही. मानसशास्त्रज्ञ, लेखक इतकेच काय तर वृत्तपत्रांतही मोठ्या प्रमाणात सल्ले दिले जातात. हे खरे आहे, की अशाप्रकारच्या सल्ल्यांमुळे काही काळ शांती प्राप्त होते, पण खरी शांती मिळवायची असल्यास सर्वोत्तम सल्ल्याची आवश्‍यकता आहे. आधीच्या लेखात उल्लेखलेल्या व्यक्‍तींना सर्वोत्तम सल्ला प्राप्त झाला आणि त्यामुळे त्यांना खरी शांती मिळाली.

आन्टोन्यू, मार्कोस, गरझोन, व्हानिया आणि मार्सेलु हे सगळे वेगवेगळ्या परिस्थितींमधून आलेले लोक होते; त्यांच्या समस्यासुद्धा वेगवेगळ्या होत्या. पण त्यांच्यात तीन समान गोष्टी होत्या. पहिली गोष्ट, ते सगळे “आशाहीन व देवविरहित असे” होते. (इफिसकर २:१२) दुसरी गोष्ट, त्या सर्वांना मनःशांती हवी होती. तिसरी गोष्ट, यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास सुरू केल्यावर त्या सर्वांना मनःशांती लाभली. हळूहळू त्यांना कळू लागले की, देवाला त्यांची चिंता आहे. होय, पौलाने त्याच्या काळात अथेन्स येथील लोकांना म्हटल्याप्रमाणे देव “आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.” (प्रेषितांची कृत्ये १७:२७) या गोष्टीची पक्की खात्री मनुष्याला झाल्यास त्याला खरी शांती प्राप्त होते.

शांती का नाही?

आज जगातील लोक स्वतः समाधानी नाहीत आणि इतरांसोबतही त्यांचे शांतिपूर्ण संबंध नाहीत; बायबलमध्ये याची दोन कारणे दिली आहेत. पहिले कारण यिर्मया १०:२३ येथे दिले आहे: “हे परमेश्‍वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” मानव कोणाच्या मदतीशिवाय स्वतःवरच शासन करायला असमर्थ आहे; कारण त्याच्याजवळ तेवढी बुद्धी नाही आणि पुढे काय होणार याचे पूर्वज्ञानही नाही. फक्‍त देवाकडूनच खरी मदत मिळू शकते. देवाचे मार्गदर्शन नको असलेल्या लोकांना कायमची शांती कधीच प्राप्त होणार नाही. अशांततेचे दुसरे कारण, प्रेषित योहान सांगतो: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) देवाच्या मार्गदर्शनाविना शांती मिळवण्याचे मानवाचे सर्व प्रयत्न फोल ठरतील. कारण एक अदृश्‍य परंतु खरी आणि अत्यंत शक्‍तिशाली अशी ‘दुष्ट’ व्यक्‍ती अर्थात सैतान असे घडू देणार नाही.

आपण दोन कारणे पाहिली—पहिले, मनुष्य स्वबळावर या जगावर शासन करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसरे, जगावर सैतान राज्य करत आहे. यामुळेच जगाची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे. प्रेषित पौलाने या परिस्थितीविषयी असे म्हटले: “सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.” (रोमकर ८:२२) पौलाचे शब्द किती खरे आहेत! गरीब आणि श्रीमंत देशांतही कौटुंबिक समस्या, गुन्हेगारी, अन्याय, मतभेद, डळमळती आर्थिक स्थिती, जातीय आणि वांशिक द्वेषभाव, जुलूम, आजारपण आणि अशा अनेक समस्यांमुळे लोक निराश, दुःखी आहेत.

मनःशांती कोठून प्राप्त करावी

आन्टोन्यू, मार्कोस, गरझोन, व्हानिया आणि मार्सेलु यांनी देवाच्या वचनाचा अर्थात बायबलचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या जीवनात बदल झाला. त्यांना कळाले की, एके दिवशी संपूर्ण जगात शांती असेल आणि हे निव्वळ स्वप्न नाही तर एक वास्तविकता आहे. त्यांना हे देखील कळाले, की मनुष्याला निर्माण करण्यात देवाचा एक उद्देश होता आणि देवाच्या नीतिनियमाप्रमाणे चालल्यामुळे आजही आपल्याला खरी शांती प्राप्त होऊ शकते. त्यांनी बायबलमधून शिकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू केल्या आणि त्यांच्या जीवनात बदल घडून आला. त्यांनी कल्पनाही केली नव्हती इतका आनंद आणि इतकी शांती त्यांना प्राप्त झाली.

आन्टोन्यू आता पहिल्याप्रमाणे मोर्च्यांमध्ये आणि कामगारांच्या झगड्यांमध्ये भाग घेत नाही. कारण त्याला हे कळून चुकले आहे की, अशा तऱ्‍हेने प्राप्त होणारी शांती अल्प काळ टिकते. पूर्वी युनियन लीडर असलेल्या या व्यक्‍तीने देवाच्या राज्याविषयी शिकून घेतले. लाखो जण प्रभुची प्रार्थना (किंवा, आमच्या स्वर्गातील पित्या) म्हणतात तेव्हा याच राज्याचा उल्लेख करतात आणि देवाला म्हणतात: “तुझे राज्य येवो.” (मत्तय ६:१०अ) आन्टोन्यूला कळाले की, देवाचे राज्य खात्रीपूर्वक शांती आणणारे एक खरे स्वर्गीय सरकार आहे.

मार्कोस, बायबलमध्ये पतिपत्नीकरता दिलेल्या नियमाप्रमाणे वागण्याचे शिकला. त्यामुळे, पूर्वी राजकारणात गुरफटलेला मार्कोस आज आपल्या पत्नीसोबत पुन्हा एकदा आनंदाने राहू लागला आहे. तो देखील त्याच काळाची वाट पाहून आहे जेव्हा देवाचे राज्य या स्वार्थी, लोभी व्यवस्थेला काढून एक चांगली व्यवस्था स्थापन करील. “जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो” या प्रभुच्या प्रार्थनेचा अर्थ त्याला आता चांगल्याप्रकारे समजला आहे. (मत्तय ६:१०ब) सर्व गोष्टी देवाच्या इच्छेप्रमाणे होतील तेव्हा कोणी दुःखी नसेल; सर्वांना खऱ्‍या आनंदाचा, खऱ्‍या शांतीचा अनुभव घेता येईल.

गरझोनविषयी काय? बायबल अभ्यास केल्यानंतर त्याने चोऱ्‍यामाऱ्‍या करणे, उनाडक्या करणे सोडून दिले. त्याच्या जीवनाला अर्थ लाभला. तो आता इतरांना मनाची शांती कशी मिळवावी हे सांगतो. या अनुभवांवरून दिसून येते की, बायबलचा अभ्यास केल्याने आणि शिकलेल्या गोष्टी आचरणात आणल्याने कोणत्याही व्यक्‍तीच्या जीवनात फार मोठा बदल घडून येऊ शकतो.

त्रस्त जगात मनःशांती

देवाच्या उद्देशांमध्ये येशू ख्रिस्ताची मध्यवर्ती भूमिका आहे; म्हणून, यहोवाच्या साक्षीदारांकडून लोक बायबलचा अभ्यास घेतात तेव्हा त्यांना येशूविषयी अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्याचा जन्म झाला त्या रात्री देवदूतांनी देवाचा गौरव अशाप्रकारे केला: “ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांति.” (लूक २:१४) येशूने लोकांचे जीवन आनंदी व्हावे म्हणून त्यांना मदत केली. त्याला त्यांच्या भावना कळत होत्या. त्याला आजारी आणि दुःखी लोकांबद्दल जास्त कळवळा होता. आणि देवदूतांनी म्हटल्याप्रमाणे त्याने खरोखरच नम्र लोकांना मानसिक शांती दिली. आपल्या सेवाकार्याच्या शेवटी तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “मी तुम्हास शांति देऊन ठेवितो; मी आपली शांति तुम्हास देतो; जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.”—योहान १४:२७.

येशू फक्‍त परोपकारी नव्हता. त्याने स्वतःची तुलना एका मेंढपाळाशी आणि आपल्या नम्र अनुयायांची तुलना मेंढरांशी केली. त्याने असे म्हटले: “मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो.” (योहान १०:१०, ११) होय, स्वतःचे घर भरणाऱ्‍या आजच्या स्वार्थी नेत्यांप्रमाणे येशू नव्हता. त्या उलट, त्याने आपल्या मेंढरांकरता स्वतःचा जीव देखील दिला.

पण येशूने जे काही केले त्याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे? अनेकांना पुढील शब्द ठाऊक आहेत की, “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) येशूवर विश्‍वास ठेवायचा असेल तर सर्वात आधी त्याच्याविषयी आणि त्याचा पिता, यहोवा याच्याविषयी ज्ञान घेणे आवश्‍यक आहे. देवाचे आणि येशू ख्रिस्ताचे ज्ञान घेतल्यामुळे यहोवा देवासोबत आपला नातेसंबंध घनिष्ठ होईल आणि त्यामुळे आपल्याला खरी शांती लाभेल.

येशूने म्हटले: “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात; मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीहि नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही.” (योहान १०:२७, २८) किती प्रेमळ आणि दिलासा देणारे शब्द! येशूने जवळजवळ दोन हजार वर्षांआधी असे म्हटले होते, पण ते शब्द तेव्हा इतकेच आजही महत्त्वाचे आहेत. येशू ख्रिस्त आजही जिवंत आणि कार्यरत आहे हे कधीही विसरू नका. तो सध्या देवाच्या स्वर्गीय राज्याचा नियुक्‍त राजा आहे. आजसुद्धा त्याला मनःशांतीच्या शोधात असलेल्या नम्र जणांबद्दल काळजी वाटते. शिवाय, अजूनही तो आपल्या मेंढरांचा मेंढपाळ आहे. त्यामुळे आपण त्याच्या म्हणण्याप्रमाणे चालल्यास आपल्याला शांती प्राप्त होईल. तसेच, भवितव्यातही आपल्याला शांतीदायक जीवन मिळेल म्हणजेच, तेव्हा कोणत्याही प्रकारची हिंसा, युद्ध आणि गुन्हेगारी नसेल.

येशूच्या द्वारे यहोवा आपली मदत करील हे जाणून त्यावर विश्‍वास केल्याने खरा फायदा होईल. जबाबदाऱ्‍यांखाली दबलेली व्हानिया तुम्हाला आठवते का? देवाला आपली काळजी नाही असे तिला वाटत होते. पण आता ती म्हणते: “देव एक खरी व्यक्‍ती असून तो सर्व गुण संपन्‍न आहे. तो सर्वांवर प्रेम करतो. प्रेमामुळेच त्याने आपल्या पुत्राला आपल्याला जीवन देण्यासाठी या पृथ्वीवर पाठवलं. हे जाणल्यानंतर आपल्याला खरी शांती मिळते.”

मार्सेलु म्हणतो की, देवासोबत त्याचा घनिष्ठ नातेसंबंध निर्माण झाला आहे. पूर्वी राजकारणात असलेल्या मार्सेलुने म्हटले: “तरुणांना काय करावं ते माहीत नसतं आणि सहसा ते स्वतःचं नुकसान करून घेतात. माझ्यासारखे काहीजण मादक औषधं घेऊ लागतात. देवाबद्दलचं आणि त्याच्या पुत्राबद्दलचं सत्य जाणून अधिकाधिक लोकांना माझ्यासारखाच आशीर्वाद मिळावा हीच माझी सदिच्छा.”

बायबलचा तपशीलवार अभ्यास केल्यामुळे व्हानिया आणि मार्सेलु यांचा देवावरील विश्‍वास भक्कम झाला. देव त्यांच्या समस्या सोडवण्यात त्यांची मदत करील अशी त्यांची खात्री पटली. आपणही त्यांच्याप्रमाणे बायबलचा अभ्यास केला आणि शिकलेल्या गोष्टी आचरणात आणल्या तर त्यांच्याप्रमाणे आपल्यालाही मनःशांती लाभेल. मग, प्रेषित पौलाच्या पुढील शब्दांची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”—फिलिप्पैकर ४:६, ७.

आज खरी शांती मिळवणे

येशू ख्रिस्त, सत्यासाठी भुकेल्या लोकांना पृथ्वीवरील बगीच्यासमान परिस्थितीत नेत आहे. या मार्गाने सार्वकालिक जीवन प्राप्त होते. देवाच्या शुद्ध उपासनेकडे तो त्यांचे मार्गदर्शन करत असता त्यांना बायबलमध्ये वर्णन केलेल्या शांतीचा अनुभव होतो: “माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील.” (यशया ३२:१८) भवितव्यात अनुभवायला मिळणाऱ्‍या शांतीची ही केवळ एक छोटीशी पूर्वझलक आहे. आपल्याला असे वाचायला मिळते: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील. नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:११, २९.

पण आज आपल्याला मनःशांती लाभू शकते का? जरूर. एवढेच नव्हे तर, अगदी नजीकच्या भवितव्यात देव आज्ञाधारक मानवजातीला अभूतपूर्व शांती देईल अशी आपल्याला पक्की खात्री आहे. त्यामुळे त्याच्याकडे शांतीसाठी नेहमी प्रार्थना करत राहा. काही समस्यांमुळे तुमच्या मनाची शांती हिरावली जात असल्यास, राजा दावीदाप्रमाणे प्रार्थना करा: “माझ्या मनावरचे दडपण काढ; माझ्या संकटांतून मला सोडीव. माझी दैन्यावस्था व माझे कष्ट पाहा; माझ्या सर्व पापांची क्षमा कर.” (स्तोत्र २५:१७, १८) देव आपल्या प्रार्थनेकडे नक्की कान देईल. शांतीचा खरोखर शोध घेणाऱ्‍यांना मदत करायला तो नेहमी तयार असतो. त्याच्याकडून आपल्याला असे आश्‍वासन मिळते: “जे कोणी त्याचा धावा करितात, जे खऱ्‍या भावाने त्याचा धावा करितात, त्या सर्वांना परमेश्‍वर जवळ आहे. तो आपले भय धरणाऱ्‍यांची इच्छा पुरवितो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो.”—स्तोत्र १४५:१८, १९.

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

मानव कोणाच्या मदतीशिवाय स्वतःवरच शासन करायला असमर्थ आहे; कारण त्याच्याजवळ तेवढी बुद्धी नाही आणि पुढे काय होणार याचे पूर्वज्ञानही नाही. फक्‍त देवाकडूनच खरी मदत मिळू शकते.

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

देवाचे आणि येशू ख्रिस्ताचे ज्ञान घेतल्यामुळे यहोवा देवासोबत आपला नातेसंबंध घनिष्ठ होऊ शकतो; त्यामुळे आपल्याला मनाची शांती मिळेल

[७ पानांवरील चित्र]

बायबलमधील सल्ला अनुसरल्याने कौटुंबिक जीवनात शांती मिळते