व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे राज्य—पृथ्वीवरील नवे शासन

देवाचे राज्य—पृथ्वीवरील नवे शासन

देवाचे राज्य—पृथ्वीवरील नवे शासन

“ते [राज्य] या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” —दानीएल २:४४.

१. बायबलबद्दल आपल्याला काय भरवसा असला पाहिजे?

बायबल हे देवाने मनुष्यांना प्रकट केलेले पुस्तक आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते असेच आहे.” (१ थेस्सलनीकाकर २:१३) देवाविषयी आपल्याला जे काही माहीत असले पाहिजे ती सगळी माहिती अर्थात त्याचे व्यक्‍तिमत्त्व, त्याचे उद्देश आणि आपल्याकडून तो काय अपेक्षितो हे सर्व बायबलमध्ये दिले आहे. कौटुंबिक जीवनात आणि दैनंदिन जीवनात आपण कसे वागावे याविषयी तर त्यात सर्वोत्तम सल्ला आहे. त्यामध्ये भविष्यवाण्या देखील आहेत—भूतकाळात पूर्ण झालेल्या, सध्या पूर्ण होत असलेल्या आणि भवितव्यात पूर्ण होणाऱ्‍या. होय, “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे. ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.”—२ तीमथ्य ३:१६, १७.

२. बायबलच्या मुख्य विषयावर येशूने कसा जोर दिला?

सबंध विश्‍वात देवच सर्वोच्च आहे (राज्य करण्याचा अधिकार देवाचाच आहे) हे स्वर्गीय राज्याकरवी सिद्ध करणे हा बायबलमधील सर्वात महत्त्वपूर्ण विषय आहे. येशूने आपल्या सेवाकार्यात याच गोष्टीवर जोर दिला. “येशू घोषणा करीत सांगू लागला की, ‘पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’” (मत्तय ४:१७) तसेच, आपल्या जीवनात त्याला कोणते स्थान द्यावे हे दाखवून त्याने अशी विनंती केली, “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा.” (मत्तय ६:३३) “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो,” अशी प्रार्थना करायला आपल्या अनुयायांना शिकवून ते राज्य किती महत्त्वाचे आहे हे त्याने दाखवले.—मत्तय ६:१०.

पृथ्वीवरील नवे शासन

३. देवाचे राज्य आता आपल्यासाठी महत्त्वाचे का आहे?

पण, देवाचे राज्य मानवांकरता इतके महत्त्वाचे का आहे? कारण लवकरच ते अशी कारवाई करील ज्यामुळे या पृथ्वीवरील अधिपत्य कायमचे बदलून जाईल. दानीएल २:४४ येथील भविष्यवाणी म्हणते: “त्या राजांच्या [सध्या पृथ्वीवर राज्य करत असलेल्या] अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची [स्वर्गात एका सरकाराची] स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे [पृथ्वीवरील सरकारांचे] चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” पृथ्वीचे सगळे कारभार पूर्णपणे देवाच्या राज्याच्या ताब्यात येतील तेव्हा मानव या पृथ्वीवर पुन्हा कधीच सत्ता गाजवू शकणार नाहीत. लोकांमध्ये फूट पाडणारे आणि पृथ्वीवर शांती आणण्यात अयशस्वी ठरलेले मानवी शासन कायमचे इतिहासजमा होईल.

४, ५. (अ) देवाच्या राज्याचा राजा होण्यासाठी येशूच सर्वात योग्य का आहे? (ब) नजीकच्या भविष्यात येशूला कोणती जबाबदारी मिळेल?

थेट देवाच्या निर्देशनाखाली स्वर्गीय राज्याचा कारभार सांभाळणारा प्रमुख शासक—ख्रिस्त येशू—या पदासाठी अगदी योग्य व्यक्‍ती आहे. तो देवाच्या निर्मितीत ज्येष्ठ आहे, आणि पृथ्वीवर येण्याआधी त्याने स्वर्गामध्ये देवाचा “कुशल कारागीर” म्हणून कार्य केले. (नीतिसूत्रे ८:२२-३१) “तो अदृश्‍य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पतींत ज्येष्ठ आहे; कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले . . . ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले.” (कलस्सैकर १:१५, १६) त्यानंतर देवाने त्याला पृथ्वीवर पाठवले तेव्हा त्याने नेहमी देवाच्या इच्छेप्रमाणेच केले. अतिशय कठीण परीक्षा त्याने सहन केल्या आणि मरेपर्यंत आपल्या पित्याला तो विश्‍वासू राहिला.—योहान ४:३४; १५:१०.

मरेपर्यंत देवाला निष्ठावान राहण्याचे येशूला प्रतिफळ मिळाले. देवाने त्याचे स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान करून त्याला स्वर्गीय राज्याचा राजा होण्याचा अधिकार दिला. (प्रेषितांची कृत्ये २:३२-३६) स्वर्गीय राज्याचा राजा या नात्याने ख्रिस्त येशूला पृथ्वीवरील मानवी शासन आणि दुष्टाई मिटवण्यासाठी शक्‍तिशाली असंख्य आत्मिक प्राण्यांच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची भारी जबाबदारी देवाकडून मिळेल. (नीतिसूत्रे २:२१, २२; २ थेस्सलनीकाकर १:६-९; प्रकटीकरण १९:११-२१; २०:१-३) त्यानंतर, ख्रिस्ताधीन असलेल्या देवाच्या स्वर्गीय राज्याचे नवीन शासन सुरू होईल; सबंध पृथ्वीवर तेव्हा एकच सरकार असेल.—प्रकटीकरण ११:१५.

६. देवराज्याच्या शासकाकडून आपण कशाप्रकारच्या शासनाची अपेक्षा करू शकतो?

पृथ्वीच्या नवीन शासकाबद्दल देवाचे वचन म्हणते: “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली.” (दानीएल ७:१४) येशू, देवाप्रमाणे प्रीतीने राज्य करणार असल्यामुळे त्याच्या राज्यात सर्वत्र सुख शांती असेल. (मत्तय ५:५; योहान ३:१६; १ योहान ४:७-१०) “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार . . . [तो] ते सर्वकाळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील.” (यशया ९:७) प्रीती, न्याय आणि सात्विकतेने राज्य करणारा शासक केवढा आशीर्वाद ठरेल! म्हणून, २ पेत्र ३:१३ भाकीत करते: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश [देवाचे स्वर्गीय राज्य] व नवी पृथ्वी [पृथ्वीवर एक नवीन मानवसमाज] ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.”

७. आज मत्तय २४:१४ ची पूर्णता कशी होत आहे?

ज्यांना न्यायाची, नीतिमत्त्वाची आवड आहे त्यांच्याकरता देवाचे राज्य सर्वात उत्तम सुवार्ता आहे. म्हणूनच, आपण या दुष्ट व्यवस्थेच्या ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत हे ओळखण्याकरता चिन्ह देताना येशूने असे भाकीत केले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (२ तीमथ्य ३:१-५; मत्तय २४:१४) ही भविष्यवाणी सध्या पूर्ण होत आहे. जवळजवळ साठ लाख यहोवाचे साक्षीदार २३४ देशांमध्ये देवाच्या राज्याबद्दल सांगण्यात दरवर्षी १,००,००,००,००० पेक्षा अधिक तास खर्च करतात. आणि जगभरातील त्यांच्या ९०,००० मंडळ्यांकरता असलेल्या उपासनास्थळांना राज्य सभागृह असे म्हटले जाते. तेथे जमा होऊन ते येणाऱ्‍या नव्या सरकाराविषयी शिकतात.

सहराजे

८, ९. (अ) ख्रिस्ताचे सहराजे कोठून घेतलेले आहेत? (ब) राजा आणि सहराजे यांच्या शासनाबद्दल आपण कोणता भरवसा बाळगू शकतो?

देवाच्या स्वर्गीय राज्यात ख्रिस्त येशूसोबत सहराजे असतील. प्रकटीकरण १४:१-४ मध्ये असे भाकीत केले होते की, १,४४,००० जणांना ‘माणसांतून विकत घेतले’ जाईल आणि स्वर्गातल्या जीवनासाठी त्यांचे पुनरुत्थान केले जाईल. या १,४४,००० व्यक्‍तींमधील स्त्री-पुरुषांनी स्वतःची सेवा करून घेण्याऐवजी नम्रपणे देवाची आणि सहमानवांची सेवा केली. “ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करितील.” (प्रकटीकरण २०:६) ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही’ आणि या व्यवस्थेच्या अंतातून बचावेल अशा ‘मोठ्या लोकसमुदायापेक्षा’ त्यांची संख्या फार कमी आहे. मोठ्या लोकसमुदायातील लोक देखील देवाची “अहोरात्र . . . सेवा करितात” परंतु त्यांना स्वर्गातील बोलावणे मिळालेले नाही. (प्रकटीकरण ७:९, १५) मात्र ते, देवाच्या स्वर्गीय राज्याची प्रजा या नात्याने नवीन पृथ्वीवर राहतील.—स्तोत्र ३७:२९; योहान १०:१६.

ख्रिस्तासोबत राज्य करण्याकरता यहोवाने विश्‍वासू मानवांची निवड केली ज्यांना जीवनाचा आणि जीवनात येणाऱ्‍या सर्व प्रकारच्या समस्यांचा अनुभव होता. जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक पैलूचा या राजे व याजकांना अनुभव आहे. पृथ्वीवरील जीवनाचा अनुभव असल्यामुळे मानवांवर राज्य करण्यासाठी ते अधिक पात्र असतील. येशूने देखील “जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला.” (इब्री लोकांस ५:८) प्रेषित पौलाने त्याच्याविषयी असे म्हटले: “आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूति वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.” (इब्री लोकांस ४:१५) देवाच्या नीतिमान नवीन जगामध्ये, सत्तेवर असलेले राजे आणि याजक प्रेमळ आणि सहानुभूतीशील असतील हे जाणल्याने केवढा दिलासा मिळतो!

देवाच्या उद्देशात आधीपासूनच राज्य होते का?

१०. स्वर्गीय राज्य हे देवाच्या मूळ उद्देशात का नव्हते?

१० देवाने आदाम आणि हव्वेला निर्माण केले तेव्हा त्याच्या मूळ उद्देशात स्वर्गीय राज्याचा समावेश होता का? उत्पत्तीमधील निर्मितीच्या अहवालात, अशा कोणत्याही राज्याचा उल्लेख नाही जे मानवजातीवर राज्य करील. खुद्द यहोवा त्यांचा राजा होता आणि त्याची आज्ञा त्यांनी पाळली असती तर त्यांना दुसऱ्‍या कोणाही शासकाची गरज नव्हती. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायातून असे दिसून येते की, यहोवा कदाचित आपल्या ज्येष्ठ स्वर्गीय पुत्राकरवी आदाम आणि हव्वेबरोबर व्यवहार करत होता. कारण त्या अहवालामध्ये, “देव त्यांस म्हणाला” आणि “देव म्हणाला” असे वाक्यांश वापरले आहेत.—उत्पत्ति १:२८, २९; योहान १:१.

११. मानवजातीची परिपूर्ण सुरवात कशी होती?

११ बायबल म्हणते: “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.” (उत्पत्ति १:३१) एदेन बागेतील सर्वकाही परिपूर्ण होते. आदाम आणि हव्वा तर परादीसात राहत होते. त्यांची मने आणि शरीरे परिपूर्ण होती. ते आपल्या निर्मात्याशी दळणवळण राखू शकत होते आणि निर्माणकर्ताही त्यांच्यासोबत दळणवळण करत होता. ते विश्‍वासू राहिले असते तर त्यांना परिपूर्ण मुले झाली असती. मग नवीन स्वर्गीय सरकाराची काही आवश्‍यकताच भासली नसती.

१२, १३. परिपूर्ण मानवजातीत वाढ झाल्यावरही देवाला त्या सगळ्यांशी दळणवळण राखता आले असते असे आपण का म्हणू शकतो?

१२ पण लोकसंख्या वाढल्यावर देवाने सर्वांसोबत दळणवळण कसे साधले असते? आकाशातल्या ताऱ्‍यांचा विचार करा. या ताऱ्‍यांचा समूह असतो आणि हे समूह आकाशगंगा म्हटल्या जाणाऱ्‍या वेगवेगळ्या विश्‍वांचा भाग असतात. काही आकाशगंगांमध्ये १०० कोटी तारे असतात. तर काहींमध्ये १ लाख कोटी तारे असतात. वैज्ञानिकांचा अंदाज आहे की, या विश्‍वातील दृश्‍य भागात सुमारे दहा हजार कोटी आकाशगंगा आहेत! आणि तरीही निर्माणकर्ता म्हणतो: “आपले डोळे वर करून पाहा; ह्‍यांना कोणी उत्पन्‍न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांस बाहेर आणितो; तो त्या सर्वांस नावांनी हाका मारितो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.”—यशया ४०:२६.

१३ या कोट्यवधी ग्रहताऱ्‍यांचा जर देव हिशेब ठेवू शकतो, तर मग मानवांना लक्षात ठेवणे त्याला निश्‍चितच कठीण नाही. आज देखील त्याचे लक्षावधी सेवक दररोज त्याला प्रार्थना करतात. या प्रार्थना देवाकडे अगदी क्षणभरात पोहंचतात. म्हणून परिपूर्ण मानवांशी दळणवळण राखणे त्याच्यासाठी काही अवघड ठरले नसते. त्यांची माहिती ठेवण्यासाठी त्याला स्वर्गीय राज्याची गरज भासली नसती. असे असते तर यहोवा आपला शासक असता, त्याच्याशी आपला थेट संपर्क असता आणि या बगीच्यासमान पृथ्वीवर आपण सर्वकाळापर्यंत राहिलो असतो. आपल्यावर मरण कधी आलेच नसते. ही केवढी उत्तम व्यवस्था होती!

‘हे मनुष्याच्या हाती नाही’

१४. मानवांना नेहमी यहोवाच्या शासनाची गरज का लागेल?

१४ परंतु, परिपूर्ण मानवांना देखील यहोवाच्या शासनाची नेहमीच गरज लागली असती. का? कारण त्याच्या शासनाविना स्वतंत्रपणे यशस्वी होण्याची क्षमता यहोवाने त्यांना मुळातच दिलेली नाही. संदेष्ट्या यिर्मयाने कबूल केल्याप्रमाणे मानवांच्या बाबतीत ही न बदलणारी एक वस्तूस्थिती आहे: “हे परमेश्‍वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही. हे परमेश्‍वरा, मला शिक्षा कर.” (यिर्मया १०:२३, २४) यहोवाच्या शासनाविना मानवी समाजावर नियंत्रण ठेवणे शक्य असेल असा विचार करणे मूर्खपणाचे ठरेल. कारण देवाने मानवांना ज्या पद्धतीने निर्माण केले त्याच्या विरुद्ध ते ठरेल. यहोवाच्या शासनाविना मानवांनी राहण्याचा प्रयत्न केला तर निश्‍चितच स्वार्थीपणा, द्वेष, क्रूरता, हिंसा, युद्धे आणि मृत्यू हे सर्व ठरलेले होते. ‘एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करील.’—उपदेशक ८:९.

१५. आपल्या पहिल्या पालकांनी चुकीची निवड केल्यामुळे काय परिणाम झाला?

१५ दुःखाची गोष्ट म्हणजे, आपल्या पहिल्या पालकांना देवाचे शासन नको होते आणि त्यांनी स्वतंत्रपणे राहण्याचे निवडले. परिणामस्वरूप, ते परिपूर्ण राहिले नाहीत. मग त्यांची दशा विद्युत पुरवठा बंद केल्यावर हळूहळू बंद पडणाऱ्‍या वीजेच्या उपकरणासारखी झाली. कालांतराने त्यांचा मृत्यू होणार होता. त्यामुळे ते खोट असलेल्या साच्यासारखे बनले आणि आपल्या संततीला देखील ते हेच देऊ शकले. (रोमकर ५:१२) “तो [यहोवा] दुर्ग आहे; त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; . . . हे बिघडले आहेत, हे त्याचे पुत्र नव्हत, हा त्यांचा दोष आहे.” (अनुवाद ३२:४, ५) अर्थात, आदाम आणि हव्वेला सैतानाने (बंडखोर बनलेल्या आत्मिक प्राण्याने) बहकावले होते. परंतु त्यांची मने परिपूर्ण होती आणि म्हणून सैतानाचा प्रतिकार ते करू शकले असते.—उत्पत्ति ३:१-१९; याकोब ४:७.

१६. देवाच्या शासनापासून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केल्यामुळे काय परिणाम झाला, याची इतिहास काय ग्वाही देतो?

१६ देवाच्या शासनापासून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे काय परिणाम झाला, याला इतिहास चांगला पुरावा देतो. हजारो वर्षांपासून, मानवांनी हर तऱ्‍हेची सरकारे चालवून पाहिली आहेत. वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था उपयोगात आणून पाहिल्या आहेत. तरीही, ‘दुष्टपणा अधिक सरसावत’ आहे. (२ तीमथ्य ३:१३) विसाव्या शतकाने तर हे सिद्ध करून दाखवले आहे. कारण २० व्या शतकाच्या इतिहासाची पाने भयंकर द्वेषभाव, भीषण हिंसा, युद्ध, उपासमार, दारिद्र्‌य, यातना यांनी रंगली आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कितीही प्रगती झाली तरीही आज ना उद्या लोक मरतातच. (उपदेशक ९:५, १०) स्वबळावर चालण्याचा प्रयत्न करून मानवांनी स्वतःला सैतानाचे आणि त्याच्या दुरात्म्यांचे भक्ष्य बनवले आहे. ते इतपत त्याच्या काबूत आहेत की, बायबलमध्ये सैतानाला ‘ह्‍या युगाचे दैवत’ म्हटले आहे.—२ करिंथकर ४:४.

इच्छास्वातंत्र्याचे दान

१७. देवाने दिलेल्या स्वतंत्र इच्छेच्या दानाचा उपयोग कसा करायचा होता?

१७ पण यहोवाने मानवांना असे स्वतंत्रपणे का वागू दिले? कारण त्याने मानवांची निर्मिती करते वेळी त्यांना स्वतंत्र इच्छा अर्थात स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची क्षमता दिली होती. “जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे,” असे प्रेषित पौल म्हणाला. (२ करिंथकर ३:१७) यंत्रमानवासारखे प्रत्येक गोष्टीसाठी आपण काय म्हणावे आणि काय करावे हे दुसऱ्‍याने सांगितलेले कोणालाही आवडणार नाही. तरीही, मानवाने जबाबदारीने स्वतंत्र इच्छेच्या दानाचा उपयोग करावा, देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात व त्याच्या अधीन राहण्यात शहाणपण आहे याची त्याला जाणीव असावी अशी यहोवाची इच्छा होती. (गलतीकर ५:१३) म्हणजेच स्वातंत्र्य मिळणार होते परंतु पूर्ण स्वातंत्र्य नाही कारण त्यामुळे अराजकता झाली असती. त्या स्वातंत्र्याला देवाच्या प्रेमळ नियमांची मर्यादा घालण्यात आली होती.

१८. मानवाला स्वतःच्या मर्जीनुसार वागायला अनुमती देऊन देवाने काय सिद्ध करून दाखवले आहे?

१८ मानवांना त्यांच्या मर्जीनुसार वागण्याची अनुमती देऊन देवाने एकदाचे हे सिद्ध करून दाखवले की, त्यांना त्याच्या शासनाची गरज आहे. त्याची शासनपद्धती आणि मानवांवर शासन करण्याचा त्याचा सर्वस्व अधिकार हाच योग्य मार्ग आहे. केवळ त्यामुळेच आनंद, समाधान आणि संपन्‍नता मिळू शकते. आणि यहोवाच्या नियमांचे पालन केल्यावरच आपल्याला हे सर्व लाभू शकते कारण आपल्या मनाची आणि शरीराची रचनाच त्याने तशी केली आहे. “तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.” (यशया ४८:१७) देवाच्या नियमांच्या चौकटीत स्वतंत्र इच्छेचा किंवा निवडीचा उपयोग करणे त्रासदायक वाटले नसते. उलट, त्यामुळे भोजन, संगीत व कलेचे वेगवेगळे प्रकार आणि घरांच्या वेगवेगळ्या रचना पाहायला मिळाल्या असत्या. स्वतंत्र इच्छेचा योग्य वापर केला असता तर बागेसमान पृथ्वीवर आपले जीवन आनंदमय आणि सदैव नाविन्यपूर्ण ठरले असते.

१९. मानवांचा स्वतःशी समेट घडवून आणण्यासाठी देव कोणत्या माध्यमाचा उपयोग करतो?

१९ पण मानवांनी चुकीची निवड करून यहोवापासून स्वतःला दूर केले. परिणामस्वरूप ते अपरिपूर्ण बनले, हळूहळू म्हातारे झाले आणि मरण पावले. या दुःखद अवस्थेतून त्यांची सुटका करण्याची व त्यांना पुन्हा देवाचे पुत्र व कन्या बनवण्याची गरज होती. हे देवाने आपल्या राज्याच्या माध्यमाने करायचे ठरवले आणि यासाठी त्याने येशू ख्रिस्ताचा उपयोग केला. (योहान ३:१६) या व्यवस्थेद्वारे येशूच्या दृष्टान्तातील उधळ्या पुत्राप्रमाणे मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांचा देवाशी समेट घडवला जाईल आणि तो पुन्हा एकदा त्यांना आपली मुले या नात्याने स्वीकारील.—लूक १५:११-२४; रोमकर ८:२१; २ करिंथकर ६:१८.

२०. देवाचा उद्देश राज्याकरवी कसा पूर्ण केला जाईल?

२० यहोवाची इच्छा या पृथ्वीवर निश्‍चितच पूर्ण केली जाणार आहे. (यशया १४:२४, २७; ५५:११) ख्रिस्ताला सोपवलेल्या आपल्या राज्याकरवी शासन करण्याचा अधिकार सर्वस्वी देवाचा आहे हे देव सिद्ध करून दाखवील. देवाचे राज्य या पृथ्वीवरील मानवांच्या आणि दुरात्म्यांच्या शासनाचा अंत करून स्वर्गातून एक हजार वर्षांसाठी शासन करील. (रोमकर १६:२०; प्रकटीकरण २०:१-६) परंतु त्या वेळेपर्यंत, यहोवाची शासनपद्धती सर्वात श्रेष्ठ आहे हे कसे सिद्ध केले जाईल? शिवाय, हजार वर्षे पूर्ण झाल्यावर राज्याची काय भूमिका असेल? या प्रश्‍नांची उत्तरे पुढील लेखात दिली जातील.

उजळणीसाठी मुद्दे

• बायबलचा विषय काय आहे?

• पृथ्वीवरील नवीन शासनात कोण कोण असतील?

• देवाच्या मदतीविना स्वतंत्रपणे शासन करणारे मानव कधीही यशस्वी का होऊ शकत नाहीत?

• स्वतंत्र इच्छेचा वापर कसा करावा?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

देव आपल्या राज्याकरवी शासन करील यावर येशूच्या शिकवणींमध्ये जोर देण्यात आला होता

[१२ पानांवरील चित्रे]

सर्व देशांमध्ये, यहोवाचे साक्षीदार राज्याविषयी प्रामुख्याने शिकवतात

[१४ पानांवरील चित्रे]

देवाच्या शासनापासून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे झालेल्या वाईट परिणामांची इतिहास ग्वाही देतो

[चित्राचे श्रेय]

डब्ल्यूडब्ल्यूआय सैनिक: U.S. National Archives photo; छळ छावणी: Oświęcim Museum; मूल: UN PHOTO १८६१५६/J. Isaac