तरुणांना समयोचित मार्गदर्शन
संपूर्ण आणि दृढनिश्चयी असे स्थिर राहा
तरुणांना समयोचित मार्गदर्शन
पहिल्या शतकात एपफ्रास नावाचा एक ख्रिस्ती रोमला गेला होता. पण त्याला वारंवार कलोसेची आठवण येत होती. कलोसे हे आशिया मायनरमध्ये असलेले एक शहर होते. येथे त्याने सुवार्तेचा प्रचार केला होता आणि काही कलस्सैकरांना येशू ख्रिस्ताचे शिष्य बनण्यास मदत केली होती. (कलस्सैकर १:७) एपफ्रासला कलोसे येथील सहविश्वासू बांधवांची खूप काळजी वाटत होती. हे आपल्याला कळून येते कारण प्रेषित पौलाने रोमहून त्यांना लिहिले: “एपफ्रास . . . तुम्हास सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनामध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहावे.”—कलस्सैकर ४:१२.
त्याचप्रमाणे, आजच्या काळातही ख्रिस्ती माता-पिता आपल्या मुलांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जीव तोडून प्रार्थना करतात. ते आपल्या लहान मुलांच्या मनात देवाबद्दल प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून ते विश्वासात दृढ होतील.
अनेक ख्रिस्ती तरुण, शाळेत किंवा इतरत्र तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्या यशस्वीपणे सोडवण्यासाठी साहाय्य मागतात. १५ वर्षांच्या एका मुलीने म्हटले: “आमच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. जीवनात पदोपदी आम्हाला भीती वाटत असते. आम्हाला मदतीची गरज आहे!” या तरुणांच्या व त्यांच्या देवभीरू पालकांच्या प्रार्थनांचे त्यांना उत्तर मिळाले आहे का? हो, मिळाले आहे! त्यांना ‘विश्वासू व बुद्धिमान दासाच्या’ माध्यमाने बायबल आधारित शिक्षण मिळाले आहे. (मत्तय २४:४५) सोबत दाखवलेल्या काही प्रकाशनांनी लाखो तरुणांना ‘संपूर्ण आणि दृढनिश्चयी असे स्थिर राहण्यास’ मदत केली आहे. यांपैकी काही उदाहरणे पाहू या.
“पाहा . . . १५,००० नवे साक्षीदार!”
अमेरिकेतील मिसूरी राज्याच्या सेंट लुईस शहरात १९४१ सालच्या ऑगस्ट महिन्यात यहोवाच्या साक्षीदारांनी भरवलेल्या अधिवेशनाला १,१५,००० लोक उपस्थित राहिले. हे तेव्हापर्यंत भरवण्यात आलेले सर्वात मोठे अधिवेशन होते. शेवटचा दिवस, जो “मुलांसाठी खास दिवस” होता, त्या दिवशी जवळजवळ १५,००० लहान मुले स्टेजच्या समोरच्या ओळींत बसून जोसेफ एफ. रदरफोर्ड यांचे “राजाची मुले” या शीर्षकाचे भाषण कान देऊन ऐकत होते. भाषण संपत आले असताना ७१ वर्षांच्या बंधू रदरफोर्डनी सर्व मुलांना संबोधून मोठ्या मायेने असे म्हटले:
‘देवाची आणि त्याच्या नियुक्त राजाची आज्ञा पाळण्याचा निश्चय केलेल्या सर्व मुलांनी कृपा करून उभे राहावे.’ सर्व मुले एकसाथ उभी राहिली. बंधू रदरफोर्डनी मग उपस्थितांना उद्देशून उत्साहाने म्हटले: “पाहा! राज्याचे १५,००० नवे साक्षीदार! सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला. पुढे ते म्हणाले, ‘देवाच्या राज्याविषयी इतरांना सांगण्याचा जे मनापासून प्रयत्न करू इच्छितात त्या सर्वांनी कृपा करून हो असे म्हणावे.’ मुलांनी मोठ्याने “हो” असे म्हणून प्रतिसाद दिला! मग बंधू रदरफोर्ड यांनी मुले (इंग्रजी) नावाचे एक नवे पुस्तक अनावृत्त केले. सर्वांनी बराच वेळ टाळ्या वाजवून या नव्या प्रकाशनाबद्दल आनंद व्यक्त केला.
या भावोद्दीपक भाषणानंतर सर्व मुलामुलींनी ओळीने स्टेजवर जाऊन बंधू रदरफोर्ड यांच्या हातून नवीन पुस्तकाची एकेक प्रत भेट म्हणून स्वीकारली. ते दृश्य पाहून उपस्थितांपैकी कित्येकांच्या डोळ्यात पाणी तरळले. या प्रसंगी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्ष साक्षीदाराने सांगितले: “यहोवा देवावर पूर्ण भरवसा आणि विश्वास [दाखवणाऱ्या] तरुणांचे दृश्य ज्याच्या मनाला स्पर्शले नाही तो पाषाणहृदयीच असावा!”
त्या संस्मरणीय अधिवेशनात, १,३०० तरुणांनी यहोवाला समर्पण केल्याचे सूचक म्हणून बाप्तिस्मा घेतला. त्यांच्यापैकी बरेचजण आजपर्यंत विश्वासात दृढ आहेत. काही स्थानिक मंडळ्यांतील कारभाराला हातभार लावत आहेत, बेथेलमध्ये स्वयंसेवक म्हणून कार्य करत आहेत, किंवा परदेशांत मिशनरी म्हणून सेवा करत आहेत. खरोखर “मुलांचा दिन” आणि मुले या पुस्तकाची कित्येक कोवळ्या मनांवर कायमची छाप पडली!
“अगदी वेळेवर येतात”
यहोवाच्या साक्षीदारांनी १९७० च्या दशकात आणखी तीन अशी पुस्तके प्रकाशित केली ज्यांनी लाखो तरुणांच्या हृदयाचा ठाव घेतला. ही पुस्तके होती, थोर शिक्षकाचे ऐका, तुमचे तारुण्य—त्याचा चांगला उपयोग करणे, आणि बायबल कथांचं माझं पुस्तक. १९८२ साली “तरुण लोक विचारतात . . .” ही लेखमालिका सावध राहा! नियतकालिकात प्रकाशित होऊ लागली. हे लेख केवळ तरुणांच्याच नव्हे तर वयस्कांच्याही प्रशंसेस पात्र ठरले आहेत. १४ वर्षांचा एक मुलगा म्हणतो, “हे
लेख प्रकाशित केल्याबद्दल दररोज रात्री मी देवाचे आभार मानतो.” एका १३ वर्षांच्या मुलीने म्हटले: “मला हे लेख खूपच आवडतात. आणि मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा हे अगदी वेळेवर येतात.” बरेच पालक आणि नियुक्त ख्रिस्ती वडील देखील या गोष्टीशी सहमत आहेत की हे लेख अतिशय समयोचित आणि फायदेकारक असतात.“तरुण लोक विचारतात . . . ” या लेखमालिकेत १९८९ सालापर्यंत जवळजवळ २०० लेख प्रकाशित करण्यात आले होते. त्याच वर्षी झालेल्या “ईश्वरी भक्ती” प्रांतीय अधिवेशनात तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. या पुस्तकाने तरुणांना विश्वासात मजबूत राहण्यास मदत केली आहे का? तीन तरुणांनी असे लिहिले: “आमच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी हे पुस्तक अनमोल ठरले आहे. आमच्याविषयी काळजी व्यक्त करण्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो.” जगभरातील असंख्य तरुण वाचक या विधानाशी सहमत होतील.
“आम्ही तृप्त झालो”
तरुणांना मार्गदर्शन देण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी १९९९ साली आणखी एक समयोचित व्हिडिओ निर्माण केला. याचे शीर्षक होते, तरुण लोक विचारतात—मला खरे मित्र कसे बनवता येतील? (इंग्रजी) या व्हिडिओचे सर्वत्र उत्साहाने स्वागत करण्यात आले. १४ वर्षांच्या एका मुलीने म्हटले, “या व्हिडिओने माझ्या मनाला स्पर्शले.” एकटी पालक असलेल्या एका मातेने म्हटले “आमच्या आध्यात्मिक आहारात आम्ही याचा नियमित फायदा घेऊ.” दुसऱ्या एका तरुणीने म्हटले: “आपला सर्वात जवळचा मित्र, यहोवा त्याच्या जागतिक संघटनेतील तरुणांवर किती प्रीती करतो आणि त्यांची किती काळजी करतो हे पाहून खूप आनंद मिळतो.”
या व्हिडिओमुळे कोणत्या प्रकारची मदत मिळाली? तरुण सांगतात: “यामुळे मला मित्रमैत्रिणी जपून निवडायला, मंडळीतल्या सर्व लोकांशी मैत्री करायला आणि यहोवाला आपला मित्र बनवायला मदत मिळाली.” “मला आपल्या मित्रांच्या दबावापुढे खंबीर राहण्याचे साहाय्य मिळाले.” “यहोवाची माझ्याने होईल तितकी चांगली सेवा करण्याच्या माझ्या दृढनिश्चयाला यामुळे पुष्टी मिळाली.” आणि एका विवाहित जोडप्याने लिहिले: “हे आध्यात्मिक अन्न ‘खावयास’ दिल्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. आम्ही खरोखर तृप्त झालो.”
अभिषिक्त ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ देवाकडून त्यांच्यावर सोपवलेले काम विश्वासूपणे पार पाडत आहेत. जे कोणी स्वीकारतील त्यांच्यासाठी ते समयोचित आध्यात्मिक अन्न पुरवत आहेत. शास्त्रवचनावर आधारित असलेल्या या मार्गदर्शनामुळे तरुणांना आज ‘देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहण्यासाठी’ मदत मिळत आहे हे पाहून खरोखर किती आनंद होतो!