व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरे मूल्य कशाला आहे?

खरे मूल्य कशाला आहे?

खरे मूल्य कशाला आहे?

एखादी मौल्यवान गोष्ट आपल्याजवळ असली तर आपल्याला किती आनंद होतो. पण मौल्यवान गोष्ट म्हणजे काय? अमाप पैसा? महाग किंवा कुणाजवळही नसतील असे दागिने? नाव आणि प्रसिद्धी? या गोष्टी अनेक लोकांना फार मौल्यवान वाटतात. त्यांमुळे उदरनिर्वाह होतो, जीवन अर्थपूर्ण बनते किंवा लोकांची स्वीकृती मिळवण्याची आणि काहीतरी साध्य करण्याची मनिषा पूर्ण होते. भविष्यासंबंधीची आपली ध्येये आणि आपल्या आकांक्षा पूर्ण होतील म्हणून आपण या गोष्टी मिळवण्यासाठी झटत आहोत का?

सहसा, आपल्या गरजा किंवा व्यक्‍तिगत इच्छा एखाद्या गोष्टीमुळे कितपत पूर्ण होतात याच्या आधारे तिचे मूल्य ठरवले जाते. सुखाची भावना देणाऱ्‍या आणि सुरक्षित भविष्याची आशा देणाऱ्‍या गोष्टी आपल्याला जास्त प्रिय वाटतात. तत्काळ दिलासा, सांत्वन किंवा मान्यता देणाऱ्‍या गोष्टींना आपण कवटाळून धरतो. परंतु, आपल्या चंचल इच्छा किंवा आकांक्षांनुसार एखाद्या गोष्टीला मौल्यवान समजणे म्हणजे वरकरणी आणि तात्पुरता दृष्टिकोन असणे होय. खरे म्हणजे, आपण आपली सर्वात मोठी गरज कशाला समजतो याच्या आधारे खरे मूल्य ठरवले जाते.

आपली सर्वात मोठी गरज काय आहे? जीवन हे सर्वात महत्त्वाचे आहे; ते नसले तर बाकी सगळे निरर्थक आहे. जीवनाशिवाय आपण अस्तित्वात असणार नाही. प्राचीन इस्राएलच्या राजा शलमोनाने लिहिले: “मृतास तर काहीच कळत नाही; . . . कारण अधोलोकात [मानवाची सामान्य कबर] काही उद्योग, युक्‍ति-प्रयुक्‍ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.” (उपदेशक ९:५, १०) आपल्यावर मृत्यू ओढवल्यास आपल्याला सगळे काही सोडून द्यावेच लागते. त्यामुळे, आपले जीवन ज्यामुळे वाचवले जाईल अशी गोष्ट प्राप्त करणे ही आपली सर्वात मोठी गरज आहे. आपले जीवन कशामुळे वाचेल?

आपले जीवन कशामुळे वाचेल?

राजा शलमोनाने म्हटले, ‘पैसा आश्रय देणारा आहे.’ (उपदेशक ७:१२) पुरेल इतका पैसा असल्यास, अन्‍न आणि आरामदायी घर मिळवता येते. पैसा असल्यामुळे दूरदूरच्या ठिकाणी प्रवास करण्याचा आनंद लुटता येतो. वार्धक्य किंवा दुर्बलतेमुळे काम करणे जमत नाही तेव्हा पैसा आपल्या गरजा भागवू शकतो. त्यामुळे पैशाचे अनेक फायदे आहेत. तरीपण, पैसा आपला जीव वाचवू शकत नाही. प्रेषित पौलाने तीमथ्याला असा सल्ला दिला: “प्रस्तुत युगातल्या धनवानांस निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव . . . त्याच्यावर आशा ठेवावी.” (१ तीमथ्य ६:१७) जगातला सर्व पैसा एकत्र केला तरी आपल्याला जीवन विकत घेता येऊ शकत नाही.

हितोशी नावाच्या एका मनुष्याचा अनुभव पाहा. हितोशीचे बालपण गरिबीत गेल्यामुळे, त्याला श्रीमंत बनायची खूप इच्छा होती. त्याला पैशांवर इतका विश्‍वास होता की, पैशाने मानवांनाही विकत घेता येऊ शकते असे त्याला वाटायचे. मग, एक मनुष्य हितोशीच्या घरी आला; त्याने त्याला विचारले, येशू ख्रिस्ताने तुझ्यासाठी आपला प्राण दिला हे तुला ठाऊक होते का? या प्रश्‍नामुळे हितोशीची उत्सुकता वाढली कारण त्याच्यासारख्या व्यक्‍तीसाठी आपला जीव कोण देईल असे त्याला वाटले. त्यानंतर, तो एका बायबल आधारित जाहीर भाषणासाठी उपस्थित राहिला; तेथे ‘डोळा निर्दोष ठेवा’ हा सल्ला दिला गेला. ते ऐकून त्याला आश्‍चर्य वाटले. वक्‍त्‌याने म्हटले की, “निर्दोष” डोळ्याला दूरदृष्टी असते आणि आध्यात्मिक गोष्टींवर तो केंद्रित असतो. (लूक ११:३४) परिणामतः, हितोशी, पैशाच्या मागे लागण्याऐवजी आपल्या जीवनात आध्यात्मिक मूल्यांना प्राधान्य देऊ लागला.

भौतिक वस्तुंमुळे काही प्रमाणात स्थिरता आणि सुरक्षा देखील मिळते. भौतिक गोष्टी विपुल असल्यास, आपल्याला दररोजच्या गरजांची चिंता वाटणार नाही. सुंदरशा परिसरात एखादे टुमदार घर म्हणजे काहीतरी साध्य केल्यासारखे वाटते. अत्याधुनिक फॅशनचे कपडे आणि नवीन मोटारगाडी असल्यावर इतरजण प्रशंसा करतात.

“सर्व उद्योग करून सुख मिळवावे” हा एक आशीर्वाद आहे. (उपदेशक ३:१३) आणि विपुलता असल्यास आपले प्रियजन ‘विसावा घेऊ शकतात, खाऊन, पिऊन, आनंद करू’ शकतात. परंतु, भौतिक वस्तू केवळ क्षणभंगुर असतात. लोभाबद्दल इशारा देताना येशू ख्रिस्त म्हणाला: “कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” (लूक १२:१५-२१) आपल्याजवळ कितीही वस्तू असल्या आणि त्या कितीही मूल्यवान असल्या तरी त्या जीवनाची शाश्‍वती देऊ शकत नाहीत.

उदाहरणार्थ, लिझचा विवाह एका धनाढ्य व्यक्‍तीशी झाला होता. ती म्हणते: “आमचं शानदार घर होतं, दोन मोटारी होत्या आणि आमच्याजवळ इतका पैसा होता की, सुखचैनीच्या बाबतीत आम्हाला कसलीच कमी नव्हती . . . पण विचित्र गोष्ट म्हणजे, मला तरीही पैशांची चिंता वाटायची.” ती म्हणते: “कारण आमच्याजवळ इतकं होतं की आमचं नुकसान झालं असतं तर ते खूप मोठं नुकसान झालं असतं. म्हणून, एका व्यक्‍तीकडे जितकं जास्त असतं तितकंच तिला असुरक्षित वाटतं.”

पुष्कळांना नाव आणि प्रसिद्धी देखील खूप मूल्याची वाटते कारण त्यामुळे स्तुती आणि सन्मान मिळू शकतो. आजच्या जगात, यशस्वी बनणे म्हणजे एक साध्यता वाटते आणि इतरजण अशा व्यक्‍तीचा हेवा करतात. असाधारण कुशलता किंवा कसब प्राप्त केल्यास आपले नाव प्रसिद्ध होऊ शकते. इतरजण आपली स्तुती करतील, आपल्या बोलण्याला फार महत्त्व देतील आणि आपले मन जिंकण्यासाठी आपल्या पुढेपुढे करतील. या सर्व गोष्टींमुळे एकप्रकारचा आनंद मिळतो, समाधान मिळते. पण, जास्त काळासाठी नाही. एखाद्या राजाकडे असते ते सर्व वैभव आणि अधिकार शलमोनाकडे होता; पण तरीही तो खेदाने म्हणाला: “मूर्खाप्रमाणेच ज्ञान्याची आठवण . . . राहणार नाही, कारण . . . सर्वांचे विस्मरण होणार आहे.” (उपदेशक २:१६) नाव किंवा प्रसिद्धी जीवन देऊ शकत नाहीत.

शेलो नामक एका शिल्पकाराला, प्रसिद्धीपेक्षाही मोलवान असलेल्या एका गोष्टीचे महत्त्व कळले. त्याच्याजवळ एक खास कौशल्य असल्यामुळे ते कौशल्य वाढवण्याचे प्रशिक्षण प्राप्त करण्यास तो पात्र ठरला. पाहता पाहता, प्रसारमाध्यम आणि कला क्षेत्रातील टीकाकार त्याचे कौतुक करू लागले. युरोपमधील प्रमुख शहरांमधून त्याच्या शिल्पकलेची प्रदर्शने भरवण्यात येऊ लागली. शेलो म्हणतो: “काही काळापर्यंत कला हेच माझ्या जीवनातलं उद्दिष्ट होतं हे मी मान्य केलं पाहिजे. पण, मला हे जाणवलं की, माझ्या करियरला महत्त्व देत राहणं म्हणजे दोन धन्यांची चाकरी करण्याचा प्रयत्न केल्यासारखं होईल. (मत्तय ६:२४) देवराज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट होती याची मला खात्री पटली होती. म्हणून, शिल्पकला सोडून द्यायचा व्यक्‍तिगत निर्णय मी घेतला.”

कशाला सर्वाधिक मूल्य आहे?

जीवन नसल्यावर कशालाही अर्थ किंवा मूल्य उरत नसल्यामुळे आपण सदा जिवंत राहू अशी हमी आपल्याला कशामुळे प्राप्त होईल? जीवनाचा स्रोत यहोवा देव आहे. (स्तोत्र ३६:९) “आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहो.” (प्रेषितांची कृत्ये १७:२८) त्याला प्रिय असलेल्या लोकांना तो सार्वकालिक जीवनाचे कृपादान देतो. (रोमकर ६:२३) हे कृपादान मिळवण्यास पात्र बनण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

यहोवाबरोबर निकटचा नातेसंबंध असण्यावर सार्वकालिक जीवनाचे बक्षीस मिळणे अवलंबून आहे. त्यामुळे, आपल्याजवळ असलेल्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याची कृपापसंती मिळवणे जास्त मोलाचे आहे. ती मिळाल्यास, खरा आणि चिरकालिक आनंद मिळण्याची आशा आपण बाळगू शकतो. परंतु, देवाची कृपापसंती नसल्यास अनंतकालिक नाश आपल्याला भोगावा लागेल. यावरून स्पष्ट होते की, यहोवासोबत चांगला नातेसंबंध निर्माण करण्यास मदत करणारी कोणतीही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे.

आपण काय करावे

आपले यश ज्ञान घेण्यावर अवलंबून आहे. यहोवाचे वचन, बायबल हा अचूक ज्ञानाचा स्रोत आहे. देवाला संतुष्ट करण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे केवळ त्यात सांगितले आहे. त्यामुळे आपण शास्त्रवचनांचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे. यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताविषयी शिकून घेण्याचा मनःपूर्वक प्रयत्न केल्यास ‘सार्वकालिक जीवन मिळवून देणारे ज्ञान’ आपण प्राप्त करू. (योहान १७:३, NW) असे ज्ञान अत्यंत मोलवान खजिना आहे!—नीतिसूत्रे २:१-५.

देवाच्या वचनातून मिळालेले ज्ञान पुढील पाऊल उचलण्यास अर्थात येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवण्यास आपल्याला तयार करते. यहोवाने अशी आज्ञा दिली आहे की, त्याच्याकडे येणाऱ्‍यांनी येशूच्या द्वारेच यावे. (योहान १४:६) खरे पाहता, “तारण दुसऱ्‍या कोणाकडून नाही.” (प्रेषितांची कृत्ये ४:१२) खरे पाहता, आपले तारण ‘सोने रुपे यांनी नव्हे तर ख्रिस्ताच्या मूल्यवान रक्‍ताने’ होणार आहे. (१ पेत्र १:१८, १९) येशूच्या शिकवणींवर विश्‍वास ठेवून आणि त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करून आपण आपला विश्‍वास प्रदर्शित केला पाहिजे. (इब्री लोकांस १२:१-३; १ पेत्र २:२१) आणि त्याचे बलिदान किती मोलाचे आहे! त्याचे फायदे सर्व मानवजातीला लागू केल्यावर सार्वकालिक भविष्य प्राप्त होईल. आपल्याकरता ते पूर्णपणे लागू केले जाईल तेव्हा आपल्याला सार्वकालिक जीवनाचे मौल्यवान दान देण्यात येईल.—योहान ३:१६.

येशू म्हणाला: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.” (मत्तय २२:३७) यहोवावर प्रीती करणे म्हणजे “त्याच्या आज्ञा पाळणे होय.” (१ योहान ५:३) त्याच्या आज्ञांनुसार, आपण जगापासून वेगळे राहावे, सात्विक वर्तन राखावे आणि त्याच्या राज्याला निष्ठापूर्वक आधार द्यावा अशी आपल्याकडून अपेक्षा केली जाते. अशातऱ्‍हेने मृत्यूऐवजी आपण “जीवन निवडून” घेतो. (अनुवाद ३०:१९) आपण ‘देवाजवळ आलो तर देव आपल्याजवळ येईल.’—याकोब ४:८.

देवाची कृपापसंती मिळण्याचे आश्‍वासन हेच जगातल्या सर्व धनापेक्षा कितीतरी मोलवान आहे. ज्यांना ती प्राप्त झाली आहे ते पृथ्वीतलावरील सर्वात धनवान लोक आहेत! तर मग आपण, खरे मूल्य असलेले धन अर्थात यहोवाची कृपापसंती मिळवण्याचा प्रयत्न करू या. होय, आपण प्रेषित पौलाच्या या सल्ल्याकडे कान देऊ या: “नीतिमत्त्व, सुभक्‍ति, विश्‍वास, प्रीति, धीर व सौम्यता ह्‍यांच्या पाठीस लाग. विश्‍वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर.”—१ तीमथ्य ६:११, १२.

[२१ पानांवरील चित्रे]

तुम्हाला सर्वात मोलवान काय वाटते? पैसा, भौतिक वस्तू, प्रसिद्धी की आणखी काही?

[२३ पानांवरील चित्र]

शास्त्रवचनांचा आपण काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे