व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

“आत्म्याने” यहोवाची उपासना करण्याचा काय अर्थ होतो?

सूखार शहराजवळ याकोबाच्या झऱ्‍यातून पाणी भरण्यासाठी आलेल्या एका शोमरोनी स्त्रीला साक्ष देताना येशू ख्रिस्ताने म्हटले: “देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” (योहान ४:२४) “खरेपणाने” उपासना करण्याचा अर्थ असा होतो, की खरी उपासना यहोवा देवाने स्वतःविषयी व आपल्या उद्देशांविषयी बायबलमध्ये प्रकट केलेल्या माहितीच्या एकवाक्यतेत असली पाहिजे. तसेच आत्म्याने यहोवाची सेवा करण्याचा असा अर्थ होतो की आपण आवेशाने, प्रीती व विश्‍वासाने प्रेरित झालेल्या अंतःकरणाने सेवा केली पाहिजे. (तीत २:१४) पण संदर्भावरून असे दिसून येते की ‘आत्म्याने व खरेपणाने देवाची उपासना’ करण्याविषयी येशूचे हे विधान, केवळ कोणत्या मनोवृत्तीने आपण यहोवाची सेवा करावी याच्याशी संबंधित नव्हते.

त्या विहिरीजवळ येशूने शोमरोनी स्त्रीशी केलेले संभाषण उपासनेत आवेश असण्या-नसण्याबद्दल नव्हते. खोटी उपासना देखील आवेशी व समर्पित वृत्तीने केली जाऊ शकते. पण, आपल्या पित्याची उपासना शोमरोनातील पर्वत किंवा जेरूसलेमेतील मंदिर या दोन्ही ठिकाणी (जी दोन्ही भौगोलिक स्थाने होती) केली जाणार नाही असे सांगितल्यावर येशूने देवाची उपासना एका नव्या पद्धतीने करण्याविषयी सांगितले. ही पद्धत देवाच्या खऱ्‍या स्वभावावर आधारित होती. (योहान ४:२१) त्याने म्हटले: “देव एक आत्मिक व्यक्‍ती आहे.” (योहान ४:२४, चार्ल्स बी. विल्यम्स) खरा देव शारीरिक नाही, त्याला पाहता किंवा स्पर्श करता येत नाही. त्याची उपासना कोणत्या मंदिरात किंवा पर्वतावर, अर्थात कोणत्या भौगोलिक ठिकाणात केंद्रित नाही. म्हणूनच येशूने उपासनेच्या एका अशा पैलूविषयी सांगितले ज्याचा संबंध डोळ्यांनी दिसणाऱ्‍या गोष्टींशी नाही.

देवाला स्वीकार्य असणारी उपासना खरेपणाने केली जाण्यासोबतच, पवित्र आत्म्याने—म्हणजेच देवाच्या अदृश्‍य कार्यकारी शक्‍तीने मार्गदर्शित असली पाहिजे. प्रेषित पौलाने लिहिले, “[पवित्र] आत्मा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाहि शोध घेतो.” पुढे त्याने म्हटले: “आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे; ह्‍यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे.” (१ करिंथकर २:८-१२) देवाची स्वीकार्य पद्धतीने उपासना करण्यासाठी आपल्यावर त्याचा आत्मा असला पाहिजे आणि आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार आपण चालले पाहिजे. तसेच, त्याची उपासना करताना आपला आत्मा, अर्थात आपली मनोवृत्ती त्याच्या वचनाचा अभ्यास व पालन करण्याद्वारे त्याच्या आत्म्याच्या सुसंगतेत असली पाहिजे.

[२८ पानांवरील चित्र]

देवाची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” करा