व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खऱ्‍या उपासनेचे पाठीराखे पूर्वी आणि आता

खऱ्‍या उपासनेचे पाठीराखे पूर्वी आणि आता

खऱ्‍या उपासनेचे पाठीराखे पूर्वी आणि आता

प्राचीन यरुशलेम शहरासाठी रडलेल्या व्यक्‍तीचे नाव तुम्हाला आठवते का? ‘येशू,’ तुम्ही म्हणाल—होय, तुमचे उत्तर बरोबर आहे. (लूक १९:२८, ४१) परंतु येशू पृथ्वीवर येण्याच्या अनेक शतकांआधी देवाचा आणखी एक सेवक यरुशलेमेसाठी रडला होता. त्याचे नाव होते, नहेम्या.—नहेम्या १:३, ४.

कोणत्या कारणासाठी नहेम्या इतका व्याकूळ झाला की तो यरुशलेमेसाठी रडला? यरुशलेम आणि तिच्या रहिवाशांच्या लाभासाठी त्याने काय केले? आणि त्याच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? या प्रश्‍नांच्या उत्तरासाठी आपण त्याच्या दिवसांतील काही घटनांवर पुनःविचार करू या.

भावनाप्रदान व कृती करणारा मनुष्य

नहेम्याला यरुशलेमेचा गव्हर्नर म्हणून नियुक्‍त करण्यात आले होते; परंतु त्याआधी तो शूशान शहरातील पर्शियन न्यायालयात उच्च-पदाधिकारी होता. तरीपण, त्याच्या आरामशीर जीवनशैलीमुळे, दूर यरुशलेमेतील आपल्या यहुदी बांधवांच्या कल्याणाबद्दल त्याला असलेली काळजी कमी झाली नाही. उलट, यरुशलेमहून यहुद्यांचे एक प्रतिनिधी मंडळ शूशानला भेट द्यायला आले होते तेव्हा नहेम्याने सर्वात पहिल्यांदा ‘बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी त्यांजकडे पुसतपास केला.’ (नहेम्या १:२) या लोकांनी जेव्हा त्याला सांगितले, की यरुशलेमेतील लोक “मोठ्या दुर्दशेत” आहेत व शहराचा “तटहि पडला आहे” तेव्हा नहेम्या ‘खाली बसून रडू लागला आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिला.’ त्यानंतर मग यहोवाला त्याने कळकळीने केलेल्या प्रार्थनेत आपल्या भावना व्यक्‍त केल्या. (नहेम्या १:३-११) नहेम्या इतका दुःखी का झाला? कारण, यरुशलेम हे पृथ्वीवरील यहोवाच्या उपासनेचे केंद्र होते आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झाले होते. (१ राजे ११:३६) शिवाय, शहराच्या पडझडीवरून, शहरांतील रहिवाशांची दयनीय आध्यात्मिक स्थिती दिसून येत होती.—नहेम्या १:६, ७.

यरुशलेमेबद्दल नहेम्याला असलेली काळजी आणि तेथे राहणाऱ्‍या यहुदी लोकांबद्दल त्याला असलेला कळवळा यांमुळे तो त्यांची सेवा करायला पुढे आला. पर्शियन राजाने नहेम्याला आपल्या जबाबदाऱ्‍यांतून सुटी घेण्याची परवानगी दिल्याबरोबर तो यरुशलेमेला जाण्याच्या लांब सफरीची तयारी करू लागला. (नहेम्या २:५, ६) तो आपली शक्‍ती, आपला वेळ, आपले कौशल्य डागडुजीच्या कामासाठी वापरू इच्छित होता. यरुशलेमेला आल्याबरोबर त्याने, यरुशलेमच्या संपूर्ण तटाच्या डागडुजीचे रेखाटन आधीच तयार केले होते.—नहेम्या २:११-१८.

तटाच्या दुरुस्तीचे प्रचंड काम त्याने अनेक कुटुंबांना वाटून दिले होते; आणि या सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम केले. * ४० पेक्षा अधिक विविध गटांना एक मोजलेला ‘भाग’ दुरुस्त करण्यासाठी देण्यात आला होता. यामुळे काय झाले? अनेक कामकऱ्‍यांनी, तसेच पालकांनी व मुलांनी, आपला वेळ आणि शक्‍ती खर्च करून अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवले. (नहेम्या ३:११, १२, १९, २०) दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर, संपूर्ण तटाची डागडुजी करण्यात आली! नहेम्याने लिहिले, की डागडुजीच्या कामाला विरोध करणाऱ्‍या लोकांनाही कबूल करावे लागले, की “हे काम आमच्या देवाकडून घडले.”—नहेम्या ६:१५, १६.

आठवणीत ठेवण्याजोगे उदाहरण

परंतु नहेम्याने केवळ आपला वेळ आणि नियोजन करण्याचे कौशल्यच या कामात वापरले नाही. तर, खऱ्‍या उपासनेसाठी त्याने आपल्या पैशाचा देखील वापर केला. स्वतःच्या खिशातील पैसे खर्चून त्याने आपल्या यहुदी बांधवांना दास्यत्वातून सोडवले. त्याने बिना व्याजाने पैसे उधार दिले. राज्यपाल या नात्याने त्याला यहुदी लोकांकडून पैसे गोळा करण्याचा हक्क होता तरीसुद्धा त्याने तसे करून त्यांच्यावर ‘बोजा लादला’ नाही. उलट, ‘दीडशे यहूदी व शास्ते, आणि त्यांच्या भोवतालच्या राष्ट्रांतले जे लोक त्यांच्याकडे येत तेहि त्यांच्या पंक्‍तीला असत.’ आपल्या पाहुण्यांसाठी तो ‘दररोज एक बैल व सहा चांगली मेंढरे आणि पांखरे शिजवीत.’ याशिवाय, दहा दिवसांतून एकदा तो “सर्व जातीचा द्राक्षारसहि” त्यांना देत असे—आणि हे सर्वकाही तो स्वखर्चाने करत असे!—नहेम्या ५:८, १०, १४-१८.

तेव्हाच्या आणि आताच्या देवाच्या सर्व सेवकांसाठी उदारतेच्या बाबतीत नहेम्याने किती उल्लेखनीय उदाहरण मांडले आहे! देवाच्या या धाडसी सेवकाने, खऱ्‍या उपासनेच्या वाढीसाठी काम करणाऱ्‍या लोकांना आधार देण्यासाठी आपल्या साधनसंपत्तीचा मुक्‍तहस्ते व स्वेच्छेने वापर केला. म्हणूनच अगदी उचितपणे तो यहोवाला विचारू शकला: ‘हे माझ्या देवा, जे काही मी या देशाच्या लोकांसाठी केले त्याचे तू स्मरण कर.’ (नहेम्या ५:१९) आणि यहोवा निश्‍चितच त्याचे स्मरण करील.—इब्री लोकांस ६:१०.

नहेम्याच्या उदाहरणाची आज नक्कल केली जाते

यहोवाचे लोक आज, खऱ्‍या उपासनेसाठी अशाप्रकारच्या प्रेमळ भावना, कार्य करण्याची स्वेच्छा आणि स्वार्थ-त्यागी मनोवृत्ती दाखवत आहेत हे पाहून किती बरे वाटते. आपल्या बांधवांना संकटांचा सामना करावा लागत आहे हे आपण ऐकतो तेव्हा आपल्याला त्यांच्या कल्याणाची काळजी वाटते. (रोमकर १२:१५) नहेम्याप्रमाणे आपण देखील, विश्‍वासांतील आपल्या बांधवांसाठी यहोवाकडे प्रार्थना करून आपले पाठबळ दर्शवतो; यहोवाला आपण अशी विनंती करतो, की “तू आपल्या ह्‍या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे.”—नहेम्या १:११; कलस्सैकर ४:२.

आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींच्या आध्यात्मिक व शारीरिक कल्याणाची आणि खऱ्‍या उपासनेच्या वाढीची आपल्याला फक्‍त काळजीच वाटत नाही. तर, या काळजीमुळे आपण कार्य करायला प्रवृत्त होतो. ज्यांची परिस्थिती अनुमती देते ते नहेम्याप्रमाणे आपली थोडीफार ऐषाआरामाची जीवनशैली सोडून देऊन गरजवंतांना मदत करण्यासाठी इतर ठिकाणी राहायला जातात. अशा स्वयंसेवकांना जगाच्या काही भागांमध्ये आरामाचे जीवन जगायला मिळत नसले तरी त्याची पर्वा न करता ते खऱ्‍या उपासनेच्या विकासाला पाठबळ देतात, आपल्या ख्रिस्ती बांधवांबरोबर खांद्याला खांदा लावून सेवा करतात. या स्वयंसेवकांचा हा निःस्वार्थ आत्मा खरोखरच प्रशंसनीय आहे!

आपल्या जवळपासच्या परिसरात सेवा करणे

आपल्यातील बहुतेक जण दुसऱ्‍या ठिकाणी राहायला जाऊ शकत नाहीत, हे समजण्याजोगे आहे. तेव्हा आपण आपल्या जवळपासच्या परिसरातच, खऱ्‍या उपासनेला पाठबळ देतो. नहेम्याच्या पुस्तकात याचे देखील उदाहरण आहे. डागडुजीच्या कामात काही विश्‍वासू कुटुंबांनी केलेल्या कामाविषयी नहेम्याने कोणता तपशील दिला तो पाहा. त्याने लिहिले: “यदाया बिन हरूमफ याने आपल्या घरासमोरच्या तटाची डागडुजी केली. . . . बन्यामीन व हश्‍शूब यांनी आपल्या घरासमोरच्या भागाची डागडूजी केली. त्याच्या शेजारी अजऱ्‍या बिन मासेया बिन अनन्या याने आपल्या घरानजीक डागडुजी केली.” (तिरपे वळण आमचे.) (नहेम्या ३:१०, २३, २८-३०) या पुरुषांनी व त्यांच्या कुटुंबांनी, खऱ्‍या उपासनेच्या विकासासाठी आपापल्या घराजवळ राहूनच बराच मोठा हातभार लावला.

आज, आपल्यातील बहुतेक लोक, विविध मार्गांनी आपल्याच ठिकाणी राहून खऱ्‍या उपासनेला पाठबळ देत आहेत. आपण, राज्य सभागृह बांधकाम प्रकल्पांत, आपत्ती साहाय्य प्रयत्नांत व सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्य प्रचार कार्यात भाग घेतो. याशिवाय, बांधकामात किंवा आपत्ती साहाय्य कामात आपण व्यक्‍तिगतरित्या भाग घेऊ शकत असलो किंवा नसलो तरी, नहेम्याने त्याच्या दिवसांत केले त्याप्रमाणे आपल्याला देखील आपल्या साधनसंपत्तीद्वारे खऱ्‍या उपासनेला पाठबळ देण्याची मनापासून इच्छा आहे.—“स्वैच्छिक दानाची वैशिष्ट्ये” हे कोष्टक पाहा.

वाढत चाललेले छापकाम, आपत्ती साहाय्य प्रयत्न व संपूर्ण विश्‍वात नाना प्रकारच्या इतर सेवांसाठी लागणारे आर्थिक साहाय्य मिळणे कधीकधी अशक्य वाटते. परंतु याची आठवण करा, की यरुशलेमेच्या प्रचंड तटाच्या डागडुजीचे काम अशक्यच वाटले होते. (नहेम्या ४:१०) तरीपण, हे काम अनेक स्वयंसेवक कुटुंबांमध्ये वाटून घेतल्यामुळे ते पूर्ण झाले. तसेच आजही, संपूर्ण जगभरांतील आपली कार्ये पूर्ण करण्यासाठी लागणारे आर्थिक साहाय्य, प्रत्येकजण आपला हिस्सा देत राहिल्यास नक्कीच पूर्ण होईल.

“अनुदान देण्याचे मार्ग” या कोष्टकात, राज्याच्या कार्याला आर्थिक साहाय्य देण्याच्या विविध मार्गांबद्दल सांगितले आहे. गेल्या वर्षी, देवाच्या लोकांपैकी अनेकांनी अशाप्रकारचे साहाय्य दिले आहे व यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ, स्वेच्छापूर्ण देणगी देण्यास ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ति झाली त्यांचे आभार व्यक्‍त करते. यासर्वाहून अधिक म्हणजे, आम्ही यहोवाचे आभार मानतो कारण संपूर्ण जगभरात खऱ्‍या उपासनेच्या वाढीसाठी ज्यांनी ज्यांनी पूर्ण मनाने प्रयत्न केले होते त्यांच्या प्रयत्नांवर त्याने उदंड आशीर्वाद दिला. होय, इतक्या वर्षांपासून यहोवाने आपल्याला कशाप्रकारचे मार्गदर्शन दिले आहे त्याचा आपण विचार करतो तेव्हा आपणही कृतज्ञ अंतःकरणाने नहेम्याप्रमाणे असे म्हणायला प्रवृत्त होतो, की “माझ्या देवाचा वरदहस्त मजवर आहे.”—नहेम्या २:१८.

[तळटीप]

^ परि. 7 नहेम्या ३:५ मध्ये म्हटले आहे, की काही प्रमुख यहुद्यांनी अर्थात “महाजनांनी” या कामात भाग घ्यायला नकार दिला; त्यांचाच तेवढा अपवाद. परंतु, विविध स्तरांतील लोकांनी—याजकांनी, सोनारांनी, गांध्यांनी अर्थात औषधे विकणाऱ्‍यांनी, अधिकाऱ्‍यांनी, व्यापाऱ्‍यांनी—या कामासाठी हातभार लावला.—वचने १, ८, ९, ३२.

[२८, २९ पानांवरील चौकट/चित्रे]

अनुदान देण्याचे मार्ग

जगभरात चाललेल्या कार्यासाठी

“जगभरात होणाऱ्‍या कार्यासाठी अनुदान—मत्तय २४:१४.” असे लिहिलेल्या दान पेटीत दान टाकण्यासाठी बरेच लोक ठराविक रक्कम बाजूला ठेवतात.

मग मंडळ्या, दर महिन्याला ही रक्कम यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयाला अथवा स्थानीय शाखा दफ्तराला पाठवतात. पैशाचे स्वेच्छिक दान सरळ The Watch Tower Bible and Tract Society of India, G-३७, South Avenue, Santacruz, Mumbai ४०० ०५४, किंवा तुमच्या देशातील शाखा दफ्तराच्या पत्त्यावर पाठवले जाऊ शकते. याशिवाय, दागदागिने किंवा इतर मोलवान वस्तूसुद्धा दान केल्या जाऊ शकतात. विशिष्ट वस्तू देणगी म्हणून दिल्या जात आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्रही त्यासोबत पाठवणे आवश्‍यक आहे.

धर्मदाय योजना

पैशाची देणगी आणि पैशांची सशर्त देणगी यांव्यतिरिक्‍त जगभरातील राज्य सेवेच्या लाभाकरता देणगी देण्याचे इतरही मार्ग आहेत. ते असे आहेत:

विमा: जेहोवाज विटनेसेस ऑफ इंडिया ट्रस्ट यास जीवन विमा पॉलिसीचे किंवा रिटायर्मेन्ट/पेन्शन योजनेचे हिताधिकारी बनवले जाऊ शकते.

बँक खाते: बँक खाते व जमा प्रमाण-पत्र बँकेच्या नियमांनुसार जेहोवाज विटनेसेस ऑफ इंडिया ट्रस्ट यास ट्रस्ट म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा मग मृत्यूनंतर ते संस्थेला मिळेल अशी व्यवस्था करू शकता.

स्टॉक्स आणि बाँड्‌स: स्टॉक्स आणि बाँड्‌स देखील जेहोवाज विटनेसेस ऑफ इंडिया ट्रस्ट यास थेट दान केले जाऊ शकतात.

जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला थेट जेहोवाज विटनेसेस ऑफ इंडिया ट्रस्ट यास भेटीच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा तो संस्थेच्या नावावर करून जिवंत आहात तोपर्यंत त्याचा वापर केला जाऊ शकतो. आपला जमीन-जुमला संस्थेच्या नावावर करण्याआधी तुमच्या देशातील शाखा दफ्तराशी संपर्क साधा.

इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा कायद्याने जेहोवाज विटनेसेस ऑफ इंडिया ट्रस्ट या नावावर करू शकता किंवा जेहोवाज विटनेसेस ऑफ इंडिया यास ट्रस्ट ॲग्रीमेंटचे हिताधिकारी बनवून आपले इच्छा-पत्र तयार करू शकता.

संस्थेला हिताधिकारी असे संबोधून इच्छा-पत्र तयार करताना, कृपया भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५ याच्या ११८ कलमाची नोंद घ्या. तिथे असे म्हटले आहे: “ज्या कोणा व्यक्‍तीला, भाचा किंवा भाची किंवा कोणीही जवळचे नातेवाईक आहेत तिला इच्छा-पत्र तयार न करता आपली संपत्ती किंवा पैसा कोणत्याही धार्मिक अथवा धर्मदाय संस्थेला देण्याचा अधिकार नाही. पण, हे इच्छा-पत्र त्या व्यक्‍तीच्या मृत्यूच्या कमीतकमी एका वर्षांआधी तयार केले पाहिजे आणि सहा महिन्यांच्या आत जिवंत व्यक्‍तींच्या इच्छा-पत्रांच्या सुरक्षित ताब्यासाठी (सेफ कस्टडीसाठी) कायद्याने सांगितलेल्या ठिकाणी ते दिले पाहिजे.”

तुमच्या इच्छा-पत्रात तुम्ही जेहोवाज विटनेसेस ऑफ इंडिया ट्रस्ट यास हिताधिकारी बनवू इच्छित असाल तर, इच्छा-पत्रात लिहिण्यासाठी कृपया संस्थेच्या संपूर्ण नावाची आणि पत्त्याची नोंद घ्या:

Jehovah’s Witnesses of India

९२७/१, Addevishwanathapura,

Rajanukunte, Bangalore ५६१ २०३,

Karnataka.

[३० पानांवरील चौकट]

“स्वैच्छिक दानाची वैशिष्ट्ये”

करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलाने स्वैच्छिक दानाच्या तीन महत्त्वपूर्ण वैशिष्ठ्यांचा उल्लेख केला. (१) वर्गणी गोळा झाल्याचे लिहून ठेवताना पौलाने सल्ला दिला: “आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने . . . आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे.” (१ करिंथकर १६:२अ) तेव्हा, वर्गणी देण्याची योजना ही आधीच केली पाहिजे आणि तीही पद्धतशीर असली पाहिजे. (२) पौलाने असेही लिहिले, की प्रत्येक व्यक्‍तीने “जसे आपणाला यश मिळाले असेल त्या मानाने” दिले पाहिजे. (१ करिंथकर १६:२ब) दुसऱ्‍या शब्दांत, स्वैच्छिक दान करू इच्छिणारी व्यक्‍ती प्रमाणशीर दान करू शकते. एखाद्या ख्रिश्‍चन व्यक्‍तीची कमाई खूप कमी असल्यामुळे ती कमीच दान टाकत असली तरी यहोवाच्या नजरेत ते दान खूप मूल्यवान आहे. (लूक २१:१-४) (३) पौलाने पुढे लिहिले: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये.” (२ करिंथकर ९:७) प्रामाणिक ख्रिस्ती मनापासून—आनंदाने देतात.

[२६ पानांवरील चित्रे]

नहेम्या भावनाप्रदान व कृती करणारा मनुष्य होता

[३० पानांवरील चित्रे]

स्वैच्छिक दानांमुळे संपूर्ण जगभरात, छपाईचे काम, आपत्तीग्रस्तांना साहाय्य, राज्य सभागृह बांधकाम व इतर लाभदायक कार्ये साध्य केली जातात