व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूचा जन्म कसा व का घडून आला

येशूचा जन्म कसा व का घडून आला

येशूचा जन्म कसा व का घडून आला

“अशक्य!” येशूच्या जन्माची कहाणी ऐकून ख्रिस्ती नसलेले अनेक लोक असेच उद्‌गारतील. त्यांच्या मते, एखादी कुमारिका पुरुषाशी संबंध न येता गर्भवती राहून मुलाला जन्म देऊ शकते या गोष्टीला वैज्ञानिक आधार असू शकत नाही. तुम्हाला काय वाटते?

१९८४ साली, लंडनच्या द टाईम्सने या विषयावर कारणमीमांसा केलेले एक पत्र छापले ज्यात असे म्हटले होते: “चमत्कार शक्य नाहीत हे सिद्ध करण्यासाठी विज्ञानाचा आधार घेणे हे तर्काला पटण्यासारखे नाही. चमत्कार घडतात हे मान्य करायला जितका विश्‍वास लागतो तितकाच चमत्कार घडत नाहीत हे मान्य करायला लागतो.” या पत्रावर, ब्रिटिश विद्यापीठांमधील विज्ञान विषयांवरील १४ प्राध्यापकांनी सही केली होती. ते म्हणाले: “कुमारिकेने दिलेला जन्म, शुभवर्तमानातील चमत्कार आणि ख्रिस्ताचे पुनरुत्थान या सर्व ऐतिहासिक घटना आहेत असे आम्ही मानतो.”

कुमारिकेने येशूला जन्म दिल्याची गोष्ट पहिल्याच वेळी ऐकल्यावर एक व्यक्‍ती गोंधळून जाते हे समजण्याजोगे आहे. येशूची कुमारी माता देखील, “पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव,” असे देवाच्या दूताने तिला सांगितल्यावर गोंधळून गेली होती. हे ऐकून मरीयेने विचारले: “हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही.” तेव्हा, देवदूताने तिला समजावून सांगितले की, देव आपल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे हा चमत्कार घडवून आणणार होता व त्याने पुढे म्हटले: “देवाला काहीच अशक्य होणार नाही.” (लूक १:३१, ३४-३७) निश्‍चितच, ज्याने मानवी प्रजोत्पादनाच्या अद्‌भुत क्रियेची निर्मिती केली त्याला एका कुमारिकेला गर्भवती करून येशूचा जन्म घडवून आणणे देखील शक्य होते. जर देवाने विश्‍व आणि त्यातले अचूक नियम निर्माण केले तर मरीयेच्या गर्भाशयातील एका स्त्री-पेशीतून तो एक परिपूर्ण मानव पुत्र देखील बनवू शकत होता.

त्याची आवश्‍यकता का भासली

मरीयेला गर्भधारणा झाली तेव्हा योसेफ या धार्मिक पुरुषाशी तिची मागणी झाली होती. योसेफाला देवाच्या दूताने स्वप्नात येऊन कुमारिका असलेली त्याची भावी पत्नी गर्भवती का आहे हे सांगितले. देवदूताने म्हटले: “तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.” (मत्तय १:२०, २१) इब्री भाषेत येशू या नावाचा अर्थ “यहोवा तारण आहे” असा होतो. हे आपल्याला पाप आणि मृत्यूपासून तारण मिळवण्याची गरज असल्याची व यहोवा देवाने येशूकरवी या तारणाची तरतूद केल्याची आठवण करून देते.

पहिला मानव, आदाम याने पाप केल्यामुळे त्याची सर्व संतती अपरिपूर्ण, देवाच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रवृत्तीसह जन्मली. (रोमकर ५:१२) आदामाच्या संततीला पापापासून तारण आणि परिपूर्णता कशी लाभणार होती? न्यायाची मागणी पूर्ण करण्यासाठी, आदामाच्या जीवनाच्या तुल्य मोल असलेला आणखी एक परिपूर्ण मानवी जीव देण्याची गरज होती. त्यामुळे, देवाने परिपूर्ण मनुष्य येशू याचा चमत्कारिकरित्या जन्म घडवून आणला आणि म्हणूनच येशूने त्याच्या शत्रुंना त्याला ठार मारू दिले. (योहान १०:१७, १८; १ तीमथ्य २:५, ६) येशूचे पुनरुत्थान आणि स्वर्गीय आरोहण झाल्यावर तो आत्मविश्‍वासाने असे म्हणू शकला: “मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या [मानवजातीची सामान्य कबर] किल्ल्या माझ्याजवळ आहेत.”—प्रकटीकरण १:१८.

येशू, मृत्यू आणि अधोलोक यांच्या लाक्षणिक किल्ल्यांनी पापी मानवांकरता आदामाने गमावलेली गोष्ट मिळवण्याचे द्वार उघडतो. येशूने म्हटले: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्‍वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल; आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो तो कधीहि मरणार नाही.” (योहान ११:२५, २६) किती अद्‌भुत अभिवचन! पण येशूच्या जन्माला यापेक्षाही मोठे कारण आहे.

सर्वात महत्त्वाचे कारण

मरीयेच्या गर्भाशयात झालेली गर्भधारणा ही येशूच्या जीवनाची सुरवात नव्हती. “मी . . . स्वर्गातून उतरलो आहे,” असे तो स्पष्टपणे म्हणाला. (योहान ६:३८) अगदी निर्मितीच्या आधीपासूनच येशू त्याच्या स्वर्गीय पित्यासोबत आत्मिक जगात राहिला होता. किंबहुना, बायबलमध्ये त्याचे वर्णन “देवाच्या सृष्टीचे आदिकारण” असे करण्यात आले आहे. (प्रकटीकरण ३:१४) स्वर्गातून, येशूने प्रत्यक्षात एका दुष्ट देवदूताला बंड करताना पाहिले ज्याने पहिल्या मानवांना देवाच्या शासनाविरुद्ध भडकवले. यामुळे येशूला देवाचा एक परिपूर्ण मानवी पुत्र म्हणून जन्मण्यास सर्वात प्रमुख कारण मिळाले. यावरून काय सिद्ध करायचे होते?

त्याला हे सिद्ध करायचे होते की, त्याच्या स्वर्गीय पित्याला विश्‍वावर शासन करण्याचा अधिकार आहे. पृथ्वीवर असताना मरणापर्यंत विश्‍वासू राहून येशूने, आपल्या मनुष्यप्राण्यांवर शासन करण्याच्या यहोवाच्या पद्धतीला अधीन राहण्याची इच्छा दाखवली. देवाच्या शत्रूंच्या हातून मरण येण्याआधी आपल्या प्राणाची आहुती द्यायला आपण का तयार आहोत त्याचे कारण येशूने स्पष्टपणे सांगितले. त्याने म्हटले की, तो पित्यावर प्रीति करितो हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. (योहान १४:३१) पहिले दोन मानव, आदाम आणि हव्वा यांनी अशी प्रीती विकसित केली असती तर याच्या तुलनेत त्यांच्यावर आलेल्या सोप्या परीक्षेत ते विश्‍वासू ठरले असते.—उत्पति २:१५-१७.

येशूच्या विश्‍वासूपणामुळे दुष्ट देवदूत, सैतान हा लबाड आहे हे देखील उघडकीस आले. सैतानाने स्वर्गातल्या देवदूतांसमोर “मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल,” असे बोलून देवाची व मानवाची निंदा केली. (ईयोब २:१, ४) सैतानाने असा खोटा दोषारोप केला की, सर्व मानव आपला प्राण वाचवण्यासाठी देवाची अवज्ञा करतील.

या वादविषयांनी देवाच्या शासनाच्या योग्यतेला आव्हान दिले. ते मिटवण्यासाठी येशू मानवरूपात जन्म घेऊन मृत्यूपर्यंत स्वतःला विश्‍वासू शाबीत करायला तयार झाला.

त्यामुळे, पृथ्वीवर येशूचा जन्म होण्याचा सर्वात मुख्य उद्देश त्याने म्हटल्याप्रमाणे, “सत्याविषयी साक्ष द्यावी” हा होता. (योहान १८:३७) त्याने असेच केले; आपल्या शब्दांतून व कृतीतून त्याने हे दाखवून दिले की, देवाचे शासन पूर्णपणे योग्य आहे आणि त्याच्या अधीन राहिल्याने कायमचा आनंद मिळतो. येशूने हे देखील स्पष्ट केले की, “पुष्कळांच्या मुक्‍तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास” तो या जगात आला आहे; यामुळे पापी मानवांना परिपूर्णता आणि सार्वकालिक जीवन प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. (मार्क १०:४५) मानवांना हे महत्त्वाचे विषय समजण्याकरता येशूच्या जन्माचा अहवाल आवश्‍यक होता. शिवाय, येशूच्या जन्माच्या संदर्भातील घटनांमध्ये इतर महत्त्वाचे धडे देखील आहेत. हे पुढील लेखात दिले आहेत.

[४ पानांवरील चित्रे]

आदामाच्या संततीचा पापापासून बचाव होणे कसे शक्य होते?