व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तो तुम्हाजवळ येईल”

“तो तुम्हाजवळ येईल”

“तो तुम्हाजवळ येईल”

“[देव] आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.”—प्रेषितांची कृत्ये १७:२७.

१, २. (अ) आकाशातील असंख्य तारे पाहिल्यावर निर्माणकर्त्याविषयी कोणता प्रश्‍न मनात येण्याची शक्यता आहे? (ब) यहोवा मनुष्यांना कधीही तुच्छ लेखत नाही याविषयी बायबल आपल्याला कशाप्रकारे आश्‍वासन देते?

एखाद्या रात्री निरभ्र आकाशात असंख्य तारे पाहून कधी तुम्ही विस्मित झाला आहात का? कोट्यवधी तारे आणि तो विस्तृत आसमंत पाहून आपल्याला निश्‍चितच अचंबा वाटतो. अतिविशाल अशा या विश्‍वात पृथ्वी ही केवळ एका बिंदूप्रमाणे आहे. “सर्व पृथ्वीवर परात्पर” असणारा निर्माणकर्ता इतका महान आहे, की मानवांबद्दल त्याला काळजीच नाही किंवा मानवांना त्याची ओळख घडणे शक्यच नाही इतका तो त्यांच्यापासून दूर आहे असा याचा अर्थ होतो का?—स्तोत्र ८३:१८.

बायबल आपल्याला आश्‍वासन देते की यहोवा देव मानवांना कधीही तुच्छ लेखत नाही. उलट देवाचे वचन आपल्याला असे म्हणून त्याचा शोध घेण्याचे प्रोत्साहन देते की: “तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.” (प्रेषितांची कृत्ये १७:२७; १ करिंथकर २८:९) देवाजवळ येण्याकरता आपण सुरवातीची पावले उचलल्यास तो आपल्या प्रयत्नांना प्रतिसाद देईल. कशाप्रकारे? २००३ सालाचे वार्षिक वचन आपल्याला हे प्रेममय आश्‍वासन देते की “तो तुम्हाजवळ येईल.” (याकोब ४:८) यहोवाच्या जवळ असणाऱ्‍यांवर तो कोणकोणत्या अद्‌भुत आशीर्वादांचा वर्षाव करतो याची आपण चर्चा करू या.

यहोवाकडून एक खास देणगी

३. यहोवा त्याच्याजवळ जाणाऱ्‍यांना कोणती देणगी देतो?

सर्वप्रथम, यहोवाच्या सेवकांना देवाकडून एक खास मोलवान देणगी मिळाली आहे जी त्याने केवळ आपल्या लोकांकरता राखून ठेवली आहे. या व्यवस्थीकरणात ज्यांच्याजवळ अमाप सत्ता, धनसंपत्ती आणि शिक्षण आहे त्यांना सुद्धा ही देणगी मिळवता येत नाही. ही एक खास देणगी आहे जी यहोवा केवळ अशा व्यक्‍तींना देतो जे त्याच्या जवळ आहेत. ही कोणती देणगी आहे? देवाचे वचन उत्तर देते: “जर तू . . . सुज्ञतेची आराधना करिशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करिशील, व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढिशील, तर परमेश्‍वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान परमेश्‍वर देतो.” (नीतिसूत्रे २:३-६) कल्पना करा, अपरिपूर्ण मनुष्यांना खुद्द “देवाविषयीचे ज्ञान” प्राप्त होईल! या देणगीची, अर्थात देवाच्या वचनातील ज्ञानाची तुलना ‘गुप्त निधीशी’ किंवा धनाशी करण्यात आली आहे. का?

४, ५. ‘देवाविषयीच्या ज्ञानाची’ तुलना ‘गुप्त निधीशी’ का करता येते? स्पष्ट करा.

एक गोष्ट म्हणजे, देवाचे ज्ञान अत्यंत मोलवान आहे. त्याच्याकरवी मिळणाऱ्‍या सर्वात बहुमोल आशीर्वादांपैकी एक म्हणजे सार्वकालिक जीवनाची आशा. (योहान १७:३) पण या ज्ञानामुळे आजही आपल्या जीवनाचा दर्जा सुधारतो. उदाहरणार्थ, देवाच्या वचनाच्या लक्षपूर्वक अभ्यासातून आपल्याला काही महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरे कळून आली आहेत. जसे, देवाचे नाव काय आहे? (स्तोत्र ८३:१८) मृतांची खरी स्थिती काय आहे? (उपदेशक ९:५, १०) पृथ्वी व मानव यांच्याविषयी देवाचा काय उद्देश आहे? (यशया ४५:१८) आपल्याला जीवनाचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जीवनात बायबलच्या सुज्ञ सल्ल्याचे पालन करण्याचा आहे हे देखील आपल्याला कळून आले आहे. (यशया ३०:२०, २१; ४८:१७, १८) अशारितीने, जीवनाच्या ताणतणावांना तोंड देत, खऱ्‍या आनंदाच्या व समाधानाच्या मार्गाने जीवन व्यतीत करण्याकरता उपयुक्‍त मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला यहोवाच्या अद्‌भुत गुणांविषयी जाणून घेऊन त्याच्या जवळ येण्यास मदत मिळाली आहे. ‘देवाविषयीच्या ज्ञानावर’ असलेल्या त्याच्यासोबतच्या घनिष्ट नातेसंबंधापेक्षा अधिक मोलाचे काय असू शकेल?

देवाविषयीच्या ज्ञानाची ‘गुप्त निधीशी’ तुलना करण्यामागे आणखी एक कारण आहे. गुप्त धनाप्रमाणे हे ज्ञान देखील या जगात दुर्मिळ आहे. पृथ्वीवरील सहाशे कोटी रहिवाशांपैकी, जवळजवळ ६० लाख यहोवाच्या उपासकांनाच, म्हणजे दर १,००० व्यक्‍तींमागे केवळ एका व्यक्‍तीला “देवाविषयीचे ज्ञान” प्राप्त झाले आहे. देवाच्या वचनातील सत्य जाणून घेणे हा किती मोठा विशेषाधिकार आहे हे स्पष्ट करण्याकरता बायबलमधील केवळ एक प्रश्‍न विचारात घ्या: मृत्यूनंतर मानवांचे काय होते? शास्त्रवचनांतून आपल्याला कळून आले आहे की जिवात्मा मरतो आणि मृतांना कशाचीही जाणीव राहात नाही. (यहेज्केल १८:४) पण जगाच्या बहुतेक धर्मांत असा विश्‍वास केला जातो की व्यक्‍तीच्या आत वसणारे काहीतरी, तिच्या मृत्यूनंतरही इतरत्र अस्तित्वात राहते. ख्रिस्ती धर्मजगतातील ही एक मूलभूत शिकवणूक आहे. तसेच बौद्ध, हिंदू, मुस्लिम, जैन, यहुदी, शिन्टो, शीख आणि टाओ या सर्व धर्मांत ही शिकवणूक आढळते. जरा विचार करा—या एका खोट्या शिकवणुकीमुळे कोट्यवधी लोकांची फसवणूक होत आहे!

६, ७. (अ) “देवाविषयीचे ज्ञान” केवळ कोणाला मिळू शकते? (ब) “ज्ञानी व विचारवंत” लोकांना न उमगलेले सूक्ष्मज्ञान देऊन यहोवाने आपल्याला आशीर्वादित केले आहे हे कोणत्या उदाहरणावरून दिसून येते?

पण “देवाविषयीचे ज्ञान” इतक्या कमी लोकांना का मिळाले आहे? कारण देवाच्या मदतीशिवाय एक व्यक्‍ती त्याच्या वचनाची पूर्ण समज मिळवू शकत नाही. हे ज्ञान म्हणजे यहोवाची एक देणगी आहे हे विसरू नका. आणि यहोवा ही देणगी केवळ अशा लोकांना देतो जे प्रामाणिकपणे आणि नम्रतापूर्वक त्याच्या वचनात शोध घेण्याची तयारी दाखवतात. हे लोक कदाचित “जगाच्या दृष्टीने ज्ञानी” नसतील. (१ करिंथकर १:२६) किंबहुना, त्यांच्यापैकी कित्येकांना जगीक दृष्टीकोनातून “निरक्षर व अज्ञानी” समजले जाईल. (प्रेषितांची कृत्ये ४:१३) पण यामुळे काही फरक पडत नाही. यहोवा आपल्या अंतःकरणातील गुण पाहून आपल्याला ‘त्याच्या ज्ञानाचे’ प्रतिफळ देतो.

एक उदाहरण लक्षात घ्या. ख्रिस्ती धर्मजगतातील कित्येक विद्वानांनी बायबलवर लांबलचक भाष्ये लिहिली आहेत. या संदर्भग्रंथांत कदाचित ऐतिहासिक पार्श्‍वभूमी, इब्री आणि ग्रीक शब्दांचा अर्थ वगैरे कदाचित स्पष्ट केलेला असेल. पण हे सर्व ज्ञान मिळवूनही या विद्वानांना “देवाविषयीचे ज्ञान” खरोखर प्राप्त झाले आहे का? त्यांना यहोवाच्या स्वर्गीय राज्याद्वारे त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन या बायबलच्या मुख्य विषयाची स्पष्ट समज आहे का? यहोवा देव त्रैक्याचा एक भाग नाही हे त्यांना माहीत आहे का? पण आपल्याला या सर्व गोष्टींविषयी अचूक माहिती आहे. का? कारण यहोवाने या “ज्ञानी व विचारवंत” लोकांना न उमगलेले आध्यात्मिक सत्यांविषयीचे सूक्ष्मज्ञान देऊन आपल्याला आशीर्वादित केले आहे. (मत्तय ११:२५) आपल्याशी जवळचा संबंध असणाऱ्‍यांना यहोवा किती अद्‌भुतरितीने आशीर्वादित करतो!

“यहोवा त्याच्यावर प्रीति करणाऱ्‍यांचे रक्षण करतो”

८, ९. (अ) यहोवाच्या जवळ असलेल्यांना मिळणाऱ्‍या आणखी एक आशीर्वादाचे दावीदाने कशाप्रकारे वर्णन केले? (ब) खऱ्‍या ख्रिश्‍चनांना देवाच्या संरक्षणाची गरज का आहे?

यहोवाशी जवळचा संबंध असलेल्यांना आणखी एक आशीर्वाद मिळतो—देवाकडील संरक्षण. स्तोत्रकर्त्या दाविदाने जीवनात अनेक संकटांना तोंड दिले होते. तो लिहितो: “जे कोणी त्याचा धावा करितात, जे खऱ्‍या भावाने त्याचा धावा करितात, त्या सर्वांना परमेश्‍वर जवळ आहे. तो आपले भय धरणाऱ्‍यांची इच्छा पुरवितो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो. परमेश्‍वर आपल्यावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांचे रक्षण करितो.” (स्तोत्र १४५:१८-२०) होय, जे यहोवावर प्रेम करतात त्यांच्या तो जवळ असतो आणि त्यामुळे त्यांच्या मदतीच्या याचनेकडे तो लगेच लक्ष देऊ शकतो.

आपल्याला देवाच्या संरक्षणाची का गरज आहे? खरे ख्रिस्ती या ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसांच्या’ परिणामांना तर तोंड देतच आहेत, पण यासोबत ते यहोवाचा प्रमुख वैरी, दियाबल सैतान याचे खास लक्ष्य आहेत. (२ तीमथ्य ३:१) हा कावेबाज शत्रू आपल्याला ‘गिळंकृत’ करण्याच्या सतत प्रयत्नात असतो. (१ पेत्र ५:८) सैतान आपल्याला छळतो, आपल्यावर दबाव आणतो आणि आपल्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो. तसेच आपल्या मनातल्या व अंतःकरणातल्या विशिष्ट प्रवृत्तींचा गैरफायदा घेण्याचाही तो प्रयत्न करत असतो. आपला विश्‍वास कमकुवत करून आध्यात्मिकरित्या आपला नाश करणे हे त्याचे एकच लक्ष्य आहे. (प्रकटीकरण १२:१२, १७) इतक्या शक्‍तिशाली शत्रूला तोंड द्यायचे असल्यामुळे “परमेश्‍वर आपल्यावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांचे रक्षण करितो” हे जाणून दिलासा मिळत नाही का?

१०. (अ) यहोवा आपल्या लोकांचे कशाप्रकारे संरक्षण करतो? (ब) कोणते संरक्षण सर्वात महत्त्वाचे आहे आणि का?

१० पण यहोवा कशाप्रकारे आपल्या लोकांचे रक्षण करतो? संरक्षणाचे आश्‍वासन दिले आहे त्याअर्थी या व्यवस्थीकरणातील जीवनात आपल्याला समस्याच येणार नाहीत अशी हमी त्याने दिलेली नाही; किंवा तो आपल्याकरता चमत्कार करेल असाही याचा अर्थ होत नाही. पण एक समूह या नात्याने आपल्या लोकांकरता यहोवा निश्‍चितच शारीरिक संरक्षण देतो. काही झाले तरी, तो सैतानाला त्याच्या लोकांना या पृथ्वीवरून नाहीसे करण्यात यश मिळू देणार नाही! (२ पेत्र २:९) पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवा आध्यात्मिक अर्थाने आपले संरक्षण करतो. परीक्षांना तोंड देण्याकरता आणि त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध टिकवून ठेवण्याकरता जे काही आवश्‍यक असेल ते तो आपल्याला पुरवतो. दीर्घ पल्ल्याचा विचार केल्यास, आध्यात्मिक संरक्षणच इतर कोणत्याही संरक्षणापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. का? कारण जोपर्यंत यहोवासोबतचा आपला नातेसंबंध शाबूत आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट—मृत्यूसुद्धा आपले कायमचे नुकसान करू शकत नाही.—मत्तय १०:२८.

११. यहोवाने आपल्या लोकांच्या आध्यात्मिक संरक्षणाकरता कोणत्या तरतुदी केल्या आहेत?

११ यहोवाने आपल्या समीप राहणाऱ्‍यांच्या आध्यात्मिक संरक्षणाकरता मुबलक तरतुदी केल्या आहेत. त्याच्या वचनाच्या, अर्थात बायबलच्या माध्यमाने निरनिराळ्या परीक्षांना तोंड देण्याकरता लागणारी सुबुद्धी त्याने पुरवली आहे. (याकोब १:२-५) शास्त्रवचनांतील व्यावहारिक मार्गदर्शनाचे पालन केल्यामुळे आपल्याला संरक्षण मिळते. शिवाय, ‘पित्याजवळ जे मागतात त्यास तो पवित्र आत्मा देतो.’ (लूक ११:१३) हा आत्मा या विश्‍वातील सर्वात शक्‍तीशाली प्रभाव आहे आणि त्यामुळे तो आपल्याला आपल्या मार्गात येणाऱ्‍या कोणत्याही परीक्षेला किंवा मोहाला यशस्वीरित्या तोंड देण्यास सुसज्ज करू शकतो. ख्रिस्ताद्वारे यहोवाने “मानवरूपी देणग्या” दिल्या आहेत. (इफिसकर ४:८, NW) हे आध्यात्मिकरित्या योग्यताप्राप्त पुरुष आपल्या सहउपासकांना मदत करताना यहोवाच्या मनःपूर्वक संवेदनशीलतेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.—याकोब ५:१४, १५.

१२, १३. (अ) यहोवा कशाच्या माध्यमाने आपल्याला यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न पुरवतो? (ब) यहोवाने आपल्या आध्यात्मिक आरोग्याकरता पुरवलेल्या तरतुदींविषयी तुम्हाला काय वाटते?

१२ आपल्या संरक्षणाकरता यहोवा आणखी काही पुरवतो: यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न. (मत्तय २४:४५) टेहळणी बुरूज सावध राहा! यांसारखी छापील प्रकाशने, सभा, संमेलने आणि अधिवेशने यांच्या माध्यमाने, आपल्याला जे आवश्‍यक आहे ते आणि जेव्हा आवश्‍यक असते तेव्हा यहोवा पुरवतो. तुम्हाला असा एखादा प्रसंग आठवतो का जेव्हा ख्रिस्ती सभेत, संमेलनात किंवा अधिवेशनात सांगितलेला एखादा मुद्दा तुमच्या मनाला स्पर्शून गेला किंवा ज्यामुळे तुम्हाला विशेष प्रोत्साहन किंवा सांत्वन मिळाले? वर उल्लेखलेल्या मासिकांतला एखादा लेख वाचल्यावर, तो आपल्यासाठीच लिहिलेला आहे असे कधी तुम्हाला वाटले आहे का?

१३ सैतानाचे एक सर्वात परिणामकारक शस्त्र म्हणजे निरुत्साह आणि याच्या दुष्परिणामांतून कोणीही सुटलेला नाही. सैतानाला चांगले ठाऊक आहे की दीर्घकाळापर्यंत खिन्‍न राहिलेली व्यक्‍ती दुर्बळ बनते आणि ती सहज मोहात पडू शकते. (नीतिसूत्रे २४:१०) सैतान आपल्या नकारात्मक भावनांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आपल्याला मदतीची गरज आहे. टेहळणी बुरूज सावध राहा! नियतकालिकांत अनेकदा निरुत्साहाच्या भावनांना तोंड देण्यास मदत करणारे लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. अशाच एका लेखासंबंधी एका ख्रिस्ती भगिनीने असे लिहिले: “मी दररोज तो लेख वाचते आणि प्रत्येक वेळी वाचताना माझे डोळे भरून येतात. मी ते मासिक माझ्या उशाजवळच ठेवते, म्हणजे मला उदास वाटू लागताच मला तो लेख वाचता येईल. असे लेख वाचल्यानंतर वाटतं जणू यहोवा देवाने मला त्याच्या अगदी जवळ घेतलं आहे आणि आता घाबरण्याचं काहीच कारण नाही.” * यहोवा आपल्याला यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न पुरवतो याबद्दल आपण त्याचे कृतज्ञ आहोत. नेहमी आठवणीत असू द्या, की आपल्या आध्यात्मिक कल्याणाकरता त्याने केलेल्या तरतुदी, तो आपल्या जवळ असल्याचा आणि आपल्यावर पाखर घालत असल्याचा पुरावा आहेत.

‘प्रार्थना ऐकणाऱ्‍याच्या’ सान्‍निध्यात

१४, १५. (अ) यहोवा आपल्या समीप असणाऱ्‍यांना कोणता वैयक्‍तिक आशीर्वाद देतो? (ब) प्रार्थनेच्या माध्यमाने केव्हाही यहोवाच्या सान्‍निध्यात येण्याचा हा आशीर्वाद इतका बहुमोल विशेषाधिकार का आहे?

१४ मनुष्याला जसजशी सत्ता व अधिकार मिळू लागतो तसतसे त्याच्या खालच्या लोकांना त्याच्याशी भेटणे-बोलणे कठीण होऊन बसते. असा अनुभव कधी तुम्हाला आला आहे का? पण यहोवा देवाबद्दल काय? तुच्छ मानवांच्या तोंडचे उद्‌गार ऐकण्यात त्याला रस वाटू नये इतका तो त्यांच्यापासून दुरावलेला आहे का? मुळीच नाही! उलट यहोवाने त्याच्या जवळ राहणाऱ्‍यांकरता दिलेली आणखी एक देणगी म्हणजे प्रार्थना. ‘प्रार्थना ऐकणाऱ्‍याच्या’ सान्‍निध्यात येण्याचा हा मार्ग आपल्याला देण्यात आला आहे हा खरोखर एक बहुमान आहे. (स्तोत्र ६५:२) का?

१५ उदाहरणार्थ: एका मोठ्या उद्योगाच्या मुख्य अधिकाऱ्‍याकडे अनेक जबाबदाऱ्‍या असतात. यातल्या कोणत्या जबाबदाऱ्‍या स्वतः हाताळायच्या आणि कोणत्या इतरांवर सोपवायच्या हे तो अधिकारी ठरवतो. त्याचप्रकारे या विश्‍वाचा सार्वभौम शासक देखील हे ठरवू शकतो की कोणत्या गोष्टींची तो स्वतः दखल घेईल आणि कोणत्या गोष्टी इतरांवर सोपवील. यहोवाने त्याचा परमप्रिय पुत्र येशू याला किती अधिकार सोपवला आहे याचा विचार करा. त्याला ‘न्यायनिवाडा करण्याचा’ अधिकार देण्यात आला आहे. (योहान ५:२७) देवदूतांनाही “त्याच्या स्वाधीन” करण्यात आले आहे. (१ पेत्र ३:२२) पृथ्वीवरील आपल्या शिष्यांच्या मार्गदर्शनाकरता यहोवाचा शक्‍तीशाली पवित्र आत्मा देखील येशूच्या हाती देण्यात आला आहे. (योहान १५:२६; १६:७) म्हणूनच येशू असे म्हणू शकला: “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.” (मत्तय २८:१८) तरीपण प्रार्थना ऐकण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा यहोवा स्वतः हे कार्य करण्याचे निवडतो. म्हणूनच बायबल आपल्याला केवळ यहोवाला व येशूच्या नावाने प्रार्थना करण्याचे निर्देशन देते.—स्तोत्र ६९:१३; योहान १४:६, १३.

१६. यहोवा खरच आपल्या प्रार्थना ऐकतो याची आपण खात्री का बाळगू शकतो?

१६ यहोवा खरच आपल्या प्रार्थना ऐकतो का? त्याला आपल्या प्रार्थनांविषयी पर्वा नसती किंवा त्यांकडे तो दुर्लक्ष करत असता तर त्याने आपल्याला “प्रार्थनेत तत्पर राहा” किंवा आपले सर्व भार व चिंता माझ्यावर टाका असे कधीही आर्जवले नसते. (रोमकर १२:१२; स्तोत्र ५५:२२; १ पेत्र ५:७) बायबल काळांत राहणाऱ्‍या विश्‍वासू सेवकांना पूर्ण खात्री होती की यहोवा त्यांच्या प्रार्थना ऐकतो. (१ योहान ५:१४) म्हणूनच स्तोत्रकर्ता दावीद याने म्हटले: “[यहोवा] माझी वाणी ऐकेल.” (स्तोत्र ५५:१७) आपणही पूर्ण खात्री बाळगली पाहिजे की यहोवा आपल्या जवळ असून आपला प्रत्येक विचार आणि चिंता ऐकून घेण्यास तयार आहे.

यहोवा आपल्या सेवकांना आशीर्वादित करतो

१७, १८. (अ) आपण निर्माण केलेल्या सुजाण प्राण्यांच्या विश्‍वासू सेवेविषयी यहोवाला कसे वाटते? (ब) आपण दाखवलेल्या दयेची यहोवा दखल घेतो हे नीतिसूत्रे १९:१७ या वचनावरून कशाप्रकारे दिसून येते हे स्पष्ट करा.

१७ मानव जे करतात किंवा करत नाहीत त्यामुळे विश्‍वाचा सार्वभौम असलेल्या यहोवाच्या पदावर काहीही परिणाम होत नाही. पण यहोवा प्रशंसा करणारा देव आहे. त्याने निर्माण केलेल्या बुद्धिमान प्राण्यांच्या विश्‍वासू सेवेची तो कदर बाळगतो, त्यांची प्रशंसा करतो. (स्तोत्र १४७:११) यहोवाच्या समीप राहणाऱ्‍यांना मिळणारे हे आणखी एक प्रतिफळ आहे: तो त्याच्या सेवकांना आशीर्वादित करतो.—इब्री लोकांस ११:६.

१८ बायबल स्पष्टपणे दाखवते की यहोवा आपल्या उपासकांच्या सेवेची कदर बाळगतो. उदाहरणार्थ, आपण असे वाचतो: “जो दरिद्र्‌यावर दया करितो तो परमेश्‍वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्याची फेड तो करील.” (नीतिसूत्रे १९:१७) दीनदुबळ्यांबद्दल यहोवाला वाटणारी दया व कळकळ मोशेच्या नियमशास्त्रावरून स्पष्ट दिसून येते. (लेवीय १४:२१; १९:१५) मग आपणही दीनदुबळ्यांशी दयेने वागतो तेव्हा यहोवाला कसे वाटते? जेव्हा एखाद्या दरिद्र्‌याला आपण कोणताही स्वार्थ न बाळगता मदत देतो तेव्हा यहोवा, स्वतःला दिलेल्या कर्जाप्रमाणे समजतो. आणि या कर्जाची परतफेड तो त्याच्या कृपेच्या व आशीर्वादांच्या रूपात देण्याचे आश्‍वासन देतो. (नीतिसूत्रे १०:२२; मत्तय ६:३, ४; लूक १४:१२-१४) होय, आपण एखाद्या गरजू बांधवाला मदत करतो तेव्हा यहोवाला मनस्वी आनंद होतो. आपल्या दयेच्या कृत्यांची आपला स्वर्गीय पिता दखल घेतो हे जाणण्यास आपण किती कृतज्ञ आहोत.—मत्तय ५:७.

१९. (अ) आपण प्रचार कार्यात व शिष्य बनवण्याच्या कार्यात जे काही योगदान देतो त्याची यहोवा कदर बाळगतो असे आपण खात्रीने का म्हणू शकतो? (ब) यहोवा त्याच्या राज्याच्या कार्याकरता केलेल्या सेवेचे कशाप्रकारे प्रतिफळ देतो?

१९ विशेषतः देवाच्या राज्याच्या वाढीकरता जेव्हा आपण काही करतो तेव्हा यहोवा याची खास कदर बाळगतो. आपण यहोवाच्या जवळ येतो तेव्हा आपल्याला राज्याच्या प्रचाराकरता आणि शिष्य बनवण्याच्या कार्याकरता आपला वेळ, शक्‍ती आणि धन उपयोगात आणण्याची साहजिकच उत्सुकता वाटते. (मत्तय २८:१९, २०) आपण फारसे साध्य करू शकत नाही असे कधीकधी आपल्याला वाटू शकते. यहोवा आपल्या प्रयत्नांनी संतुष्ट आहे की नाही असाही कधीकधी आपल्या अपरिपूर्ण मनात विचार येऊ शकतो. (१ योहान ३:१९, २०) पण आपण प्रेमाने प्रेरित झालेल्या अंतःकरणापासून काही देतो तेव्हा यहोवा आपल्या प्रत्येक अर्पणाची कदर करतो, मग ते कितीही नगण्य असले तरीसुद्धा. (मार्क १२:४१-४४) बायबल आपल्याला आश्‍वासन देते: “तुमचे कार्य व . . . तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. (इब्री लोकांस ६:१०) राज्याच्या कार्याला पाठबळ देण्याकरता केलेल्या क्षुल्लक सेवेचीही यहोवा आठवण ठेवतो व त्याकरता प्रतिफळ देतो. आता भरपूर आध्यात्मिक आशीर्वाद मिळण्यासोबतच आपण येणाऱ्‍या नव्या जगातील आनंदी जीवनाचीही वाट पाहतो जेव्हा यहोवा उदारपणे आपली मूठ उघडून त्याच्या समीप असणाऱ्‍या सर्वांच्या नीतिमान इच्छा पुऱ्‍या करील!—स्तोत्र १४५:१६; २ पेत्र ३:१३.

२०. सबंध २००३ सालादरम्यान आपण आपल्या वार्षिक वचनातील शब्द कशाप्रकारे आठवणीत ठेवू शकतो आणि यामुळे काय परिणाम होईल?

२० सबंध २००३ सालादरम्यान आपण आपल्या स्वर्गीय पित्याच्या जवळ येण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत किंवा नाही याची स्वतःला आठवण करून देत राहू या. जर आपण असे करत असू, तर मग त्याने प्रतिज्ञा केल्याप्रमाणे तो देखील अवश्‍य प्रतिसाद देईल. कारण काही झाले तरी, ‘देव असत्य बोलत नाही.’ (तीत १:२) तुम्ही त्याच्या जवळ गेला तर तोही तुमच्या जवळ येईल. (याकोब ४:८) याचा काय परिणाम होईल? आजही तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळतील आणि सर्वकाळ यहोवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याची अद्‌भुत आशा तुम्हाला प्राप्त होईल!

[तळटीप]

^ परि. 13 टेहळणी बुरूज मे १, २००० अंकात पृष्ठ २८-३१ वरील “आपल्या मनापेक्षा यहोवा फार थोर आहे” या लेखाच्या प्रशंसेखातर लिहिलेले एक पत्र.

तुम्हाला आठवते का?

• यहोवा त्याच्या जवळ येणाऱ्‍यांना कोणती देणगी देतो?

• आपल्या लोकांच्या आध्यात्मिक संरक्षणाकरता यहोवा कोणत्या तरतुदी करतो?

• प्रार्थनेद्वारे केव्हाही यहोवाच्या सान्‍निध्यात येण्याचा बहुमान अत्यंत उल्लेखनीय आहे असे का म्हणता येईल?

• आपण निर्माण केलेल्या सुजाण प्राणिमात्रांच्या विश्‍वासू सेवेची यहोवा कदर बाळगतो हे बायबल कशाप्रकारे दाखवून देते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

यहोवाने आपल्याला आध्यात्मिक सत्यांविषयी समज देऊन आशीर्वादित केले आहे

[१६, १७ पानांवरील चित्रे]

यहोवा आध्यात्मिक संरक्षण पुरवतो

[१८ पानांवरील चित्र]

यहोवा आपल्या जवळ असून आपली प्रत्येक प्रार्थना ऐकतो