व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“धीर धरा, मी जगाला जिंकले आहे”

“धीर धरा, मी जगाला जिंकले आहे”

“धीर धरा, मी जगाला जिंकले आहे”

येशूच्या मृत्यूचा दिवस—निसान या यहुदी महिन्याचा १४ वा दिवस—गुरुवारी, मार्च ३१, सा.यु. ३३ साली सूर्यास्तानंतर सुरू झाला. त्या संध्याकाळी, येशू आणि त्याचे प्रेषित वल्हांडण साजरा करण्यासाठी जेरूसलेममधील एका घराच्या माडीवरील खोलीत जमले होते. “ह्‍या जगातून पित्याकडे जाण्याची” तयारी करत असताना आपण शेवटपर्यंत आपल्या प्रेषितांवर प्रीती केली हे येशूने दाखवून दिले. (योहान १३:१) कशाप्रकारे? त्याने त्यांना उत्तम धडे शिकवले आणि भविष्याकरता त्यांची तयारी केली.

रात्र सरत गेली तसे येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.” (योहान १६:३३) त्याच्या या साहसी वाक्याचा काय अर्थ होता? थोडक्यात त्याचा असा अर्थ होता: ‘जगातील दुष्टाईने मी कटू झालो नाही किंवा मला कधी बदला घ्यावासाही वाटला नाही. जगाचा प्रभाव मी स्वतःवर होऊ दिला नाही. तुमच्या बाबतीतही हे खरे ठरू शकते.’ येशूने त्याच्या पार्थिव जीवनाच्या शेवटल्या घटकेत आपल्या विश्‍वासू प्रेषितांना जे काही शिकवले त्याने त्यांना जगावर विजय मिळवण्यासही मदत होणार होती.

आज जगात दुष्टाई बोकाळत चालल्याचे कोण नाकारेल? अन्याय आणि अर्थहीन हिंसेप्रती आपण कशी प्रतिक्रिया दर्शवतो? या गोष्टींनी आपण कटू होऊन जशास तसे वागावे असे आपल्याला वाटते का? आपल्या भोवती लागलेल्या नैतिक कीडीचा आपल्यावर काय परिणाम होत आहे? शिवाय, यात आपल्या मानवी अपरिपूर्णता आणि पापी प्रवृत्तींचीही भर पडते. त्यामुळे आपल्याला जणू दुतर्फी युद्ध लढावे लागत आहे: बाहेरच्या दुष्ट जगासोबत आणि आपल्यात असलेल्या वाईट प्रवृत्तींसोबत. देवाच्या मदतीविना खरोखर आपण विजयी होण्याची आशा करू शकतो का? ही मदत आपल्याला कशी प्राप्त करता येईल? देहवासनांचा विरोध करण्यासाठी आपण कोणते गुण विकसित केले पाहिजेत? या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्याकरता, येशूने पृथ्वीवरील आपल्या शेवटल्या दिवशी आपल्या प्रिय शिष्यांना काय शिकवले याचा विचार करू या.

नम्रतेने गर्वावर विजय मिळवा

गर्व किंवा मगरूरीचे उदाहरण घ्या. त्या संदर्भात बायबल म्हणते: “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अधःपाताचे मूळ होय.” (नीतिसूत्रे १६:१८) शास्त्रवचने आपल्याला असाही सल्ला देतात की: “आपण कोणी नसता कोणी तरी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो.” (गलतीकर ६:३) होय, गर्विष्ठपणा हा विनाशकारक आणि फसवा आहे. “गर्व आणि अभिमान” यांचा द्वेष करणेच शहाणपणाचे आहे.—नीतिसूत्रे ८:१३.

येशूचे शिष्य गर्विष्ठ किंवा अभिमानी होते का? एकदा तर, त्यांच्यात, आपल्यापैकी सर्वात मोठा कोण यावरून वादविवाद झाला होता. (मार्क ९:३३-३७) दुसऱ्‍या एके प्रसंगी, याकोब आणि योहान यांनी आपल्याला राज्यात प्रमुख स्थाने मिळावीत म्हणून विनंती केली होती. (मार्क १०:३५-४५) आपल्या शिष्यांनी ही प्रवृत्ती सोडून द्यावी अशी येशूची इच्छा होती. म्हणून, वल्हांडण भोजनाच्या दरम्यान, तो उठला, त्याने टुवाल आपल्या कमरेला बांधला आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला. यातून त्याने त्यांना स्पष्ट धडा शिकवला. येशू म्हणाला, “मी प्रभु व गुरू असूनहि जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीहि एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.” (योहान १३:१४) गर्वाऐवजी नम्रता विकसित करण्याची गरज होती.

परंतु, गर्वावर मात करणे वाटते तितके सोपे नाही. त्या दिवशी संध्याकाळी, येशूने यहूदा इस्कार्योताला (जो त्याचा विश्‍वासघात करणार होता) पाठवून दिल्यावर, ११ प्रेषितांमध्ये संतप्त वादविवाद झाला. कशावरून? त्यांच्यापैकी सर्वात मोठा कोण यावरून! त्यांना रागवण्याऐवजी येशूने सहनशील राहून पुन्हा एकदा इतरांची सेवा करण्याच्या महत्त्वावर जोर दिला. तो म्हणाला: “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करितात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवितात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात; परंतु तुम्ही तसे नसावे; तर तुम्हांमध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवा करणाऱ्‍यासारखा असावा.” आपल्या आदर्शाची त्यांना आठवण देऊन तो म्हणतो: “मी . . . तुम्हांमध्ये सेवा करणाऱ्‍यासारखा आहे.”—लूक २२:२४-२७.

प्रेषितांना हा मुद्दा लक्षात आला का? पुराव्यावरून तसेच दिसते. कित्येक वर्षांनंतर प्रेषित पेत्राने लिहिले: “शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू नम्र मनाचे व्हा.” (१ पेत्र ३:८) आपणही गर्वाच्या जागी नम्रता विकसित करावी हे किती महत्त्वाचे आहे! प्रसिद्धी, सामर्थ्य किंवा स्थान मिळवण्यामागे आपण धावू नये यातच शहाणपण आहे. बायबल म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.” (याकोब ४:६) त्याचप्रमाणे, एक प्राचीन सुविचार असा आहे: “नम्रता व परमेश्‍वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय.”—नीतिसूत्रे २२:४.

द्वेषावर मात—कशाप्रकारे?

या जगात सामान्य असलेली आणखी एक प्रवृत्ती पाहा—द्वेष. द्वेषी प्रवृत्तीला भीती, अज्ञान, पूर्वग्रह, जुलूम, अन्याय, राष्ट्रीयवाद, वंशवाद किंवा जातीयवाद काहीही कारणीभूत असू शकते आणि ती सगळीकडे दिसून येते. (२ तीमथ्य ३:१-४) द्वेषी प्रवृत्ती येशूच्या दिवसांतील लोकांमध्ये दिसून येत होती. यहुदी समाजात कर वसूल करणाऱ्‍यांना बहिष्कृत लोकांप्रमाणे वागवले जात असे. यहुदी लोक शोमरोन्यांसोबत कसलेही संबंध ठेवत नव्हते. (योहान ४:९) विदेशी आणि गैर-यहुदी लोकांबद्दलही यहुद्यांच्या मनात तिटकारा होता. परंतु, येशूने सुरू केलेल्या उपासनापद्धतीत कालांतराने सर्व राष्ट्रांतील लोकांचा समावेश होणार होता. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; गलतीकर ३:२८) म्हणून त्याने प्रेमाने आपल्या शिष्यांना काहीतरी नवीन दिले.

येशूने म्हटले: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी.” त्यांना ही प्रीती दाखवायला शिकावेच लागले कारण तो पुढे म्हणाला: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३४, ३५) ही आज्ञा नवीन होती कारण “शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति” करण्यापलीकडे ती गेली. (लेवीय १९:१८) कशी? येशूने या गोष्टीची स्पष्टता देऊन म्हटले: “जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्‍यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही.” (योहान १५:१२, १३) एकमेकांकरता आणि इतरांकरता आपला जीव देण्यास त्यांना तयार असावयाचे होते.

अपरिपूर्ण मानव द्वेषी प्रवृत्तीवर मात कसे करू शकतात? आत्म-त्यागी प्रीती विकसित करण्याद्वारे. निरनिराळ्या वांशिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजनैतिक पार्श्‍वभूमीतून आलेले लाखो प्रामाणिक लोक अगदी हेच करत आहेत. सध्या ते एका संयुक्‍त, द्वेषमुक्‍त समाजाचा—यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक बंधुसमाजाचा भाग बनले आहेत. प्रेषित योहानाच्या प्रेरित शब्दांकडे ते लक्ष देतात: “जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करितो तो नरहिंसक आहे; आणि कोणाहि नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हांस माहीत आहे.” (१ योहान ३:१५) खरे ख्रिस्ती कोणत्याही युद्धात शस्त्र घेण्यास नकार देतात शिवाय ते एकमेकांना प्रीती दाखवण्याचाही खूप प्रयास करतात.

परंतु, जे विश्‍वासात नाहीत व जे आपला द्वेष करतात अशांबद्दल आपली काय मनोवृत्ती असावी? वधस्तंभावर असताना, येशूने त्याला दंड देणाऱ्‍यांसाठी अशी प्रार्थना केली: “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करितात हे त्यांना समजत नाही.” (लूक २३:३४) द्वेषपूर्ण माणसे, शिष्य स्तेफनाला दगडफेक करून ठार मारत होते तेव्हा त्याचे शेवटले शब्द असे होते: “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” (प्रेषितांची कृत्ये ७:६०) येशूने आणि स्तेफनाने त्यांचा द्वेष करणाऱ्‍या लोकांचेही भले इच्छिले. त्यांच्या मनात बदल्याची भावना निर्माण झाली नाही. बायबल आर्जवते, “आपण सर्वांचे . . . बरे करावे.”—गलतीकर ६:१०.

‘सदासर्वदाकरता कैवारी’

आपल्या ११ विश्‍वासू प्रेषितांसोबत एकत्र आल्यावर येशूने त्यांना सांगितले की, थोड्या वेळाने तो त्यांच्यासोबत शारीरिक रूपात राहणार नाही. (योहान १४:२८; १६:२८) पण त्याने त्यांना अशी खातरी दिली: “मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी . . . देईल; अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सदासर्वदा राहावे.” (योहान १४:१६) ज्याविषयी हे वचन दिले आहे तो कैवारी म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. तो त्यांना शास्त्रवचनांच्या गहन गोष्टी शिकवणार होता आणि येशूने आपल्या पार्थिव सेवेदरम्यान त्यांना शिकवलेल्या गोष्टींची आठवण करून देणार होता.—योहान १४:२६.

पवित्र आत्मा आज आपल्याला कशाप्रकारे मदत करू शकतो? बायबल हे देवाचे प्रेरित वचन आहे. भविष्यवाण्या करण्यासाठी आणि बायबल लिहिण्यासाठी ज्या पुरूषांचा उपयोग करण्यात आला ते “पवित्र आत्म्याने प्रेरित” झालेले होते. (२ पेत्र १:२०, २१; २ तीमथ्य ३:१६) शास्त्रवचनांचा अभ्यास केल्याने आणि शिकलेल्या गोष्टी लागू केल्याने आपल्याला ज्ञान, बुद्धी, समज, सूक्ष्मदृष्टी, निर्णयशक्‍ती आणि विचार क्षमता प्राप्त होते. तर मग, या दुष्ट जगाच्या दबावांना तोंड देण्यास आपण सुसज्ज नाही का?

पवित्र आत्मा हा आणखी एका मार्गाने आपला कैवारी आहे. देवाचा पवित्र आत्मा हा हितकारक आणि सामर्थ्यशाली प्रभाव आहे व त्याने प्रभावित होणाऱ्‍यांना तो ईश्‍वरी गुण प्रदर्शित करण्यास प्रेरित करतो. बायबल म्हणते, “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ, प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे.” याच गुणांची अनैतिक आचरण, कलह, मत्सर, राग यांसारख्या दैहिक प्रवृत्तींवर मात करण्यासाठी आपल्याला गरज नाही का?—गलतीकर ५:१९-२३.

देवाच्या आत्म्यावर विसंबून राहण्याद्वारे, आपल्यालाही कोणत्याही अडचणीला किंवा संकटाला तोंड देण्यासाठी “सामर्थ्याची पराकोटी” प्राप्त होऊ शकते. (२ करिंथकर ४:७) पवित्र आत्मा, आपल्यासमोर येणाऱ्‍या परीक्षा किंवा मोहपाश काढून टाकणार नाही पण त्या सहन करण्यास आपल्याला निश्‍चित मदत करेल. (१ करिंथकर १०:१३) प्रेषित पौलाने लिहिले, “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१३) पवित्र आत्म्याद्वारे देव अशाप्रकारचे सामर्थ्य देतो. पवित्र आत्म्याकरता आपण किती कृतज्ञ असावयास हवे! ज्यांची ‘येशूवर प्रीती आहे व जे त्याची आज्ञा पाळतील’ त्यांना पवित्र आत्मा मिळण्याचे वचन देण्यात आले आहे.—योहान १४:१५.

“माझ्या प्रीतीत राहा”

मानव रूपातील शेवटल्या रात्री, येशूने आपल्या प्रेषितांना म्हटले: “ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीति करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीति करितो त्याच्यावर माझा पिता प्रीति करील.” (योहान १४:२१) “तुम्ही माझ्या प्रीतीत राहा,” असे त्याने त्यांना उत्तेजन दिले. (योहान १५:९) पित्याच्या आणि पुत्राच्या प्रीतीत राहिल्याने आपल्यातील पापी प्रवृत्तींविरुद्ध आणि बाहेरील दुष्ट जगाविरुद्ध लढण्यास आपल्याला कशी मदत मिळेल?

विचार करा, आपल्याला वाईट प्रवृत्तींवर नियंत्रण करण्याची तीव्र इच्छाच नसेल तर आपण तसे खरोखर करू शकू का? यहोवा देव आणि त्याचा पुत्र यांच्यासोबत चांगल्या नातेसंबंधाची इच्छा, यापेक्षा अधिक प्रेरणा कशाने मिळू शकते? अर्नेस्टो * हा तरुण पुरुष, किशोरावस्थेत पदार्पण केल्यापासून अनैतिक जीवनशैली जगत होता; ती जीवनशैली सोडून देण्याकरता त्याला खूप संघर्ष करावा लागला. तो म्हणतो: “मला देवाला संतुष्ट करायचं होतं आणि बायबलमधून मला कळालं की माझी जीवनशैली देवाला मान्य नाही. म्हणून मी इतरांपासून वेगळे दिसण्याचा निर्णय घेतला, देवाच्या दर्जांनुसार जगण्याचा विचार केला. माझ्या मनात येणाऱ्‍या नकारात्मक, घाणेरड्या विचारांशी मला दररोज संघर्ष करावा लागत असे. पण हा लढा जिंकण्याचा मी चंग बांधला होता आणि देवाच्या मदतीसाठी मी निरंतर प्रार्थना करत राहिलो. यातून बाहेर पडायला मला दोन वर्षं लागली, पण आजही मला स्वतःशी कडक वागावे लागते.”

बाहेरील जगाशी संघर्ष करण्याच्या संदर्भात, जेरूसलेममधील त्या माडीवरच्या खोलीतून बाहेर पडण्याआधी येशूने केलेली शेवटची प्रार्थना लक्षात घ्या. आपल्या शिष्यांच्या वतीने त्याने आपल्या पित्याला प्रार्थना करून असे मागितले: “तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करितो. जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहान १७:१५, १६) किती दिलासा देणारे हे शब्द आहेत! यहोवाची ज्यांच्यावर प्रीती आहे त्यांच्यावर तो लक्ष ठेवतो आणि ते जगापासून वेगळे राहतात तेव्हा तो त्यांना शक्‍ती देतो.

“विश्‍वास ठेवा”

येशूच्या आज्ञा पाळल्याने दुष्ट जगाविरुद्ध आणि पापी प्रवृत्तींच्या आपल्या लढ्यात विजयी होण्यास आपल्याला मदत मिळू शकते. हे विजय जरी महत्त्वपूर्ण असले तरी त्यांनी जगाचा किंवा वारशात मिळालेल्या पापाचा नायनाट होऊ शकत नाही. पण आपल्याला नाउमेद होण्याची गरज नाही.

बायबल म्हणते, “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७) येशूने, “जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो” त्याला पाप आणि मृत्यूपासून मुक्‍त करण्यासाठी आपला जीव दिला. (योहान ३:१६) तर मग, देवाची इच्छा आणि उद्देश अधिकाधिक जाणून घेत असताना, आपण येशूचा सल्ला मनावर घेऊ या: “देवावर विश्‍वास ठेवा आणि माझ्यावरहि विश्‍वास ठेवा.”—योहान १४:१.

[तळटीप]

^ परि. 22 येथे पर्यायी नाव वापरले आहे.

[६, ७ पानांवरील चित्र]

“माझ्या प्रीतीत राहा,” असे येशूने आपल्या प्रेषितांना आर्जवले

[७ पानांवरील चित्र]

पापापासून आणि त्याच्या परिणामांपासून लवकरच मुक्‍तता मिळेल