व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल”

“सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल”

“सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल”

लहानशा ठिणगीमुळे ज्याप्रमाणे सबंध जंगलात वणवा पेटू शकतो त्याचप्रमाणे जीभ शरीरातला लहानसा अवयव असूनही ती एका व्यक्‍तीचे सबंध जीवन उद्‌ध्वस्त करू शकते. ती कधी अत्यंत विषारी असू शकते, तर कधी “जीवनाचा वृक्ष” ठरते. (नीतिसूत्रे १५:४) जीवन व मृत्यू तिच्या हाती आहेत. (नीतिसूत्रे १८:२१) आपल्या शरीरातला हा लहानसा अवयव अर्थात जीभ अत्यंत शक्‍तिशाली असून ती सर्व शरीर अमंगळ करू शकते. (याकोब ३:५-९) जिभेवर नियंत्रण ठेवणेच सुज्ञतेचे आहे.

बायबलमधील नीतिसूत्रांच्या पुस्तकातील १२ अध्यायाच्या दुसऱ्‍या भागात, प्राचीन इस्राएलाचा शलमोन राजा आपल्याला अतिशय मोलवान सल्ला देतो, जो आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्यास आपली मदत करू शकेल. अगदी संक्षिप्त परंतु अर्थपूर्ण नीतिसूत्रांच्या माध्यमाने बुद्धिमान राजा शलमोन दाखवतो की तोंडातून निघणाऱ्‍या शब्दांचे चांगले किंवा वाईट परिणाम होऊ शकतात आणि हे शब्द ज्याच्या तोंडून निघतात त्या व्यक्‍तीबद्दल ते बरेच काही सांगून जातात. ‘आपल्या वाणीचे द्वार संभाळू’ इच्छिणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीकरता शलमोनाचा प्रेरित सल्ला लाखामोलाचा आहे.—स्तोत्र १४१:३.

‘पाश ठरणारा अपराध’

शलमोन म्हणतो, “मुखातील वाणीचा अपराध दुर्जनाला पाश आहे, परंतु धार्मिक संकटांतून निभावतो.” (नीतिसूत्रे १२:१३) खोटे बोलणे हा असा अपराध आहे की ज्याला ही सवय लागते त्याच्याकरता तो एक मरणप्राय पाश ठरतो. (नीतिसूत्रे २१:८) अप्रामाणिकपणा हा शिक्षा टाळण्याचा किंवा एखाद्या अप्रिय प्रसंगातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग वाटू शकतो. पण, एकदा खोटे बोलल्यामुळे सहसा पुन्हा पुन्हा खोटे बोलावे लागत नाही का? हे लहानशा रकमेवर जुगार खेळण्यास सुरवात करणाऱ्‍या व्यक्‍तीसारखे आहे. गमावलेले पैसे परत मिळवण्याकरता त्याला अधिक मोठी रक्कम गुंतवण्याचा मोह होतो; त्याचप्रकारे खोटे बोलणारी व्यक्‍ती देखील एका दुष्टचक्रात अडकते.

मुखातील वाणीचा अपराध आणखी एका अर्थाने पाश ठरू शकतो, कारण इतरांशी खोटे बोलणारी व्यक्‍ती नकळत स्वतःशीही खोटे बोलू लागण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, खोटे बोलणारी व्यक्‍ती सहज स्वतःला असे पटवू शकते की आपण खूप ज्ञानी आणि हुशार आहोत, पण मुळात तिच्याकडे फार कमी ज्ञान असते. अशारितीने ही व्यक्‍ती एका खोट्या गोष्टीच्या आधारावर जगू लागते. किंबहुना, “आपले पाप उघडकीस येणार नाही, त्याचा कोणी तिटकारा करणार नाही, अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो.” (स्तोत्र ३६:२) खोटे बोलणे खरोखर किती जीवघेणे ठरू शकते! पण दुसरीकडे पाहता, एक नीतिमान व्यक्‍ती कधीही स्वतःवर अशी कठीण परिस्थिती ओढवणार नाही. दुःखद परिस्थितीतही तो कधी खोटेपणाचा आधार घेणार नाही.

‘मुखातून निघालेल्या गोष्टींच्या योगे तृप्त होणे’

प्रेषित पौलाने ताकीद दिली की “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” (गलतीकर ६:७) हे तत्त्व आपल्या कृतींसोबतच आपल्या शब्दांनाही लागू होते. शलमोन म्हणतो: “आपल्या मुखातून निघालेल्या गोष्टींच्या योगे मनुष्य तृप्त होतो, आणि मनुष्याला आपल्या हातच्या कर्माचे प्रतिफल मिळते.”—नीतिसूत्रे १२:१४.

‘सुज्ञान वदणारे’ मुख तृप्त करणारे प्रतिफळ उत्पन्‍न करते. (स्तोत्र ३७:३०) सुज्ञान असण्याकरता आधी ज्ञान असणे आवश्‍यक आहे आणि कोणत्याही मनुष्याकडे पूर्ण ज्ञान असू शकत नाही. सर्वांना उत्तम मार्गदर्शनाकडे लक्ष देण्याची आणि त्याचे पालन करण्याची गरज आहे. इस्राएलचा राजा म्हणतो: “मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो.”नीतिसूत्रे १२:१५.

यहोवा आपल्याला त्याच्या वचनाच्या माध्यमाने आणि त्याच्या संस्थेच्या माध्यमाने ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ पुरवलेल्या प्रकाशनांचा उपयोग करून उत्तम मार्गदर्शन देतो. (मत्तय २४:४५; २ तीमथ्य ३:१६) पण उत्तम सल्ल्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्याच मनाप्रमाणे वागण्याचा अट्टहास करणे किती मूर्खपणाचे आहे! “मानवांचा ज्ञानदाता” यहोवा आपल्या संचाराच्या मार्गाने मार्गदर्शन करतो तेव्हा आपण ‘ऐकण्यात तत्पर’ असावे.—याकोब १:१९; स्तोत्र ९४:१०.

कोणी अपमान करतो किंवा निराधार टीका करतो तेव्हा सुज्ञ आणि मूर्ख कशी प्रतिक्रिया दाखवतात? शलमोन उत्तर देतो: “मूर्खाची तळमळ तत्काळ कळते; शहाणा आपली लाज झाकून ठेवितो.”नीतिसूत्रे १२:१६.

मूर्ख व्यक्‍तीचा अपमान झाल्यास तो “तत्काळ” रागाने प्रतिक्रिया दाखवतो. पण सुज्ञ व्यक्‍ती आत्मनियंत्रण ठेवण्याकरता देवाच्या आत्म्याच्या मदतीसाठी प्रार्थना करतो. तो शांतपणे देवाच्या वचनातील मार्गदर्शनावर मनन करतो आणि येशूच्या पुढील शब्दांवर कृतज्ञपणे मनन करतो: “जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारितो, त्याच्याकडे दुसरा गाल कर.” (मत्तय ५:३९) “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड” न करण्याची इच्छा असल्यामुळे एक सुज्ञ व्यक्‍ती अविचारीपणे बोलण्यापासून स्वतःला आवरतो. (रोमकर १२:१७) त्याचप्रकारे आपला अपमान झाल्यास जेव्हा आपण तो झाकून ठेवतो तेव्हा आपण ते प्रकरण अधिक चिघळवण्याचे टाळतो.

‘आरोग्यदायी जिव्हा’

ओठांचा अपराध न्यायदानाच्या वेळी बरीच हानी करू शकतो. इस्राएलच्या राजाने म्हटले: “ज्याच्या तोंडून सत्याचे उद्‌गार श्‍वासाप्रमाणे बाहेर पडतात तो न्याय्यत्व प्रगट करितो, परंतु असत्य साक्षी कपट उच्चारितो.” (नीतिसूत्रे १२:१७) खरा साक्षी न्याय्यत्व प्रगट करतो कारण त्याची साक्ष विश्‍वासार्ह आणि भरवसालायक असते. त्याच्या तोंडून निघणाऱ्‍या शब्दांमुळे न्याय केला जातो. पण दुसरीकडे पाहता खोटा साक्षी पूर्णपणे कपटी असतो आणि अन्याय घडवून आणतो.

शलमोन पुढे म्हणतो, “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” (नीतिसूत्रे १२:१८) शब्दांचा वार तरवारीच्या वारांसारखा असू शकतो, कारण त्यामुळे मैत्री नष्ट होते आणि वितुष्टे निर्माण होतात. दुसरीकडे पाहता, शब्द आनंददायक आणि आल्हाददायक असू शकतात व ते मैत्रीसंबंधांना जीवनदायक ठरतात. दुसऱ्‍यांना नावे ठेवणे, कोणाच्या अंगावर ओरडणे, सतत टीका करणे, अपमानास्पद बोलणे हे सर्व तरवार भोसकण्यासारखेच नाही का, कारण यामुळे दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या मनावर तीव्र भावनिक आघात होतो. आपल्या तोंडून अशाप्रकारे चुकून काही निघाल्यास प्रामाणिकपणे क्षमा मागून लगेच समेट करणे किती चांगले ठरेल!

आपण कठीण काळात जगत आहोत आणि त्यामुळे अनेकजण “भग्नहृदयी” आणि “अनुतप्त” आहेत यात आश्‍चर्य नाही. (स्तोत्र ३४:१८) जेव्हा आपण ‘अल्पधीराच्या लोकांना धीर देतो’ आणि “अशक्‍तांना आधार” देतो तेव्हा खरे तर आपण शब्दांच्या आरोग्यदायी शक्‍तीचा उपयोग करत नसतो का? (१ थेस्सलनीकाकर ५:१४) मित्रमैत्रिणींच्या अपायकारक दबावाशी झुंजणाऱ्‍या किशोरवयीनांना सहानुभूतीपर शब्दांमुळे खरोखर खूप धैर्य मिळू शकते. विचारशील शब्द वयोवृद्धांना जाणीव करून देऊ शकतात की आपल्याला त्यांची गरज आहे आणि त्यांच्यावर आपले प्रेम आहे. आजारी व्यक्‍तीशी प्रेमाने बोललेले दोन शब्द तिला आनंदाने दिवस घालवण्यास मदत करू शकतात. ताडन देखील जेव्हा “सौम्य वृत्तीने” दिले जाते तेव्हा ते स्वीकारण्यास सोपे जाते. (गलतीकर ६:१) शिवाय, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगणाऱ्‍याची जिव्हा देखील ऐकणाऱ्‍यांना किती आरोग्यदायी ठरू शकते!

‘सर्वकाळ टिकणारी वाणी’

“वाणी” व “जिव्हा” समान अर्थाने वापरून शलमोन म्हणतो: “सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल; असत्य बोलणारी जिव्हा केवळ क्षणिक आहे.” (नीतिसूत्रे १२:१९) “सत्याची वाणी” ही संज्ञा इब्री भाषेत एकवचनी रूपात असून, त्याचा अर्थ केवळ सत्य भाषण इतकाच नाही तर अधिक गहन आहे. एका संदर्भ ग्रंथानुसार ‘या संज्ञेतून टिकाऊपणा, स्थिरता आणि विश्‍वासार्हता यांसारखे गुण सूचित होतात. हा गुण असलेली वाणी कायम टिकेल कारण क्षणभर फसवू शकणाऱ्‍या पण परीक्षेत कदापि टिकू न शकणाऱ्‍या खोट्या जिव्हेच्या तुलनेत ती विश्‍वासार्ह असल्याचे शाबीत होईल.’

सुज्ञ राजा म्हणतो, “वाईट योजणाऱ्‍यांच्या अंतःकरणांत कपट असते, परंतु शांतीची मसलत देणाऱ्‍यांच्या मनात हर्ष असतो.” तो पुढे म्हणतो, “धार्मिकाला विपत्ति येत नाही, पण दुर्जन अरिष्टांनी व्याप्त होतील.”—नीतिसूत्रे १२:२०, २१.

वाईट योजणारे केवळ दुःख व यातना देऊ शकतात. पण शांतीची मसलत देणारे योग्य ते करत असल्यामुळे समाधानी होतील. तसेच त्यांना उत्तम परिणाम पाहण्याचा आनंद प्राप्त होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांना देवाची संमती प्राप्त होते कारण, “असत्य वाणी परमेश्‍वराला वीट आणिते, परंतु सत्याने वागणारे त्यास आनंद देतात.”नीतिसूत्रे १२:२२.

‘ज्ञान लपवणारी वाणी’

विचारपूर्वक शब्द वापरणारा आणि अविचारीपणे बोलणारा यांत आणखी एक फरक दाखवून इस्राएलचा राजा म्हणतो: “शहाणा मनुष्य ज्ञान लपवून ठेवितो, परंतु मूर्खांचे मन मूर्खपणाचा पुकारा करिते.”—नीतिसूत्रे १२:२३.

शहाण्या अथवा समजदार व्यक्‍तीला केव्हा बोलावे व केव्हा बोलू नये हे कळते. तो आपल्या ज्ञानाचा इतरांसमोर दिखावा करण्यापासून स्वतःला आवरतो आणि अशारितीने ज्ञान लपवतो. याचा अर्थ तो नेहमीच आपले ज्ञान लपवतो असे नाही. तर तो ते विचारपूर्वक प्रकट करतो. दुसरीकडे पाहता, मूर्ख उतावळीने बोलतो आणि स्वतःचाच मूर्खपणा जाहीर करतो. तेव्हा आपण कमी बोलावे आणि बढाई मारण्यापासून स्वतःची जीभ आवरावी.

पुढेही काही फरक दाखवून शलमोन मेहनतीपणा आणि आळशीपणा यांविषयी एक जोरदार मुद्दा मांडतो. तो म्हणतो: “उद्योग्यांच्या हाती अधिकार येतो, पण जे आळशी आहेत त्यांना दास्य प्राप्त होते.” (नीतिसूत्रे १२:२४) कष्ट केल्याने प्रगती आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होते, तर आळशीपणामुळे मजुरी आणि दास्य. एका विद्वानाने म्हटले, “कालांतराने आळशी माणूस मेहनती माणसाचा दास बनतो.”

‘आनंदित करणारे गोड शब्द’

राजा शलमोन पुन्हा एकदा वाणीच्या विषयाकडे वळतो आणि आता तो मानवी स्वभावाविषयी एक निरीक्षण करतो. तो म्हणतो, “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करितो.”—नीतिसूत्रे १२:२५.

मनुष्याचे मन अनेक चिंता व विवंचनांमुळे दुःखाने दबू शकते. मनावरचा दबाव कमी करण्यासाठी आणि मन आनंदित करण्यासाठी एखाद्या समजूतदार व्यक्‍तीकडून प्रोत्साहनदायक शब्दांची गरज असते. पण जोपर्यंत आपण मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्‍त करणार नाही तोपर्यंत इतरांना आपल्या मनावर किती दबाव आहे हे कसे कळेल? होय, दुःख किंवा खिन्‍नता अनुभवताना आपण आपली मदत करू शकेल अशा एखाद्या व्यक्‍तीजवळ आपल्या भावना व्यक्‍त केल्या पाहिजेत. शिवाय, आपल्या भावना शब्दांत व्यक्‍त केल्यामुळे आपोआपच आपले दुःख हलके होते. म्हणूनच, विवाह जोडीदार, पालक किंवा समजूतदार व आध्यात्मिक योग्यता असलेल्या एखाद्या मित्राजवळ मन मोकळे करणे चांगले असते.

बायबलमध्ये सापडतात त्यापेक्षा अधिक उत्तेजनात्मक शब्द आपल्याला कोठे सापडतील? म्हणून आपण देवाच्या प्रेरित वचनावर कृतज्ञ मनोवृत्तीने मनन करून देवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशाप्रकारे मनन केल्यामुळे आपले चिंतीत मन आनंदित होऊन, दुःखी डोळ्यांत नव्याने चमक येईल. स्तोत्रकर्ता यास दुजोरा देऊन म्हणतो: “परमेश्‍वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करिते; परमेश्‍वराचा निर्बंध विश्‍वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करितो. परमेश्‍वराचे विधि सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करितात; परमेश्‍वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते.”—स्तोत्र १९:७, ८.

जीवनदायक मार्ग

सात्विक व दुष्ट मनुष्यांच्या मार्गांची तुलना करून इस्राएलचा राजा म्हणतो: “धार्मिक आपल्या कुरणावर पहारा लावतो, पण दुर्जनांचा मार्ग त्यांस बहकवितो.” (नीतिसूत्रे १२:२६, NW) धार्मिक आपल्या कुरणाविषयी सावध असतो, अर्थात आपले सोबती व मित्र निवडताना तो चोखंदळ असतो. तो सुज्ञतेने मित्र निवडतो आणि धोकेदायक ठरू शकतील अशाप्रकारचे संबंध टाळतो. पण दुष्टांच्या बाबतीत असे नसते. ते मार्गदर्शन स्वीकारत नाहीत आणि स्वतःच्याच मनाप्रमाणे वागण्याचा अट्टाहास करतात. अशारितीने बहकल्यामुळे ते मार्गभ्रष्ट होतात.

शलमोन राजा यानंतर आळशी व कष्टाळू माणसांतील फरक आणखी एका वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवतो. तो म्हणतो, “आळस हा आपली शिकार धरीत नाही, पण उद्योग हा मनुष्याचे मोलवान धन आहे.” (नीतिसूत्रे १२:२७) आळशी मनुष्य आपली शिकार “धरीत” नाही किंवा “भाजत” नाही. (न्यू इंटरनॅशनल व्हर्शन) याचा अर्थ, तो जे सुरू करतो ते पूर्ण करू शकत नाही. पण मेहनतीपणामुळे धन प्राप्त होते.

आळशीपणा इतका हानीकारक आहे की प्रेषित पौलाला याविषयी थेस्सलनीका येथील ख्रिश्‍चनांना लिहावे लागले आणि काही व्यक्‍तींना ताडन द्यावे लागले कारण ते ‘अव्यवस्थितपणे वागत’ होते आणि काही काम न करता, आपला संबंध नसलेल्या गोष्टींमध्ये लुडबूड करत होते. अशा लोकांमुळे इतरांवर अनावश्‍यक ओझे येत होते. त्यामुळे पौलाने त्यांना सर्वांदेखत सुधारणुकीचा सल्ला दिला आणि “स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्‍न खावे” असे सुचवले. आणि जर ते या सुस्पष्ट मार्गदर्शनाप्रमाणे वागले नाहीत तर पौलाने मंडळीतल्या इतरांना त्यांच्यापासून “दूर व्हावे” अर्थात त्यांच्याशी सामाजिक संबंध टाळावेत असे सांगितले.—२ थेस्सलनीकाकर ३:६-१२.

आपण उद्योगी होण्याविषयीच्या शलमोनाच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार केलाच पाहिजे पण त्याचसोबत आपल्या जिव्हेचा योग्यप्रकारे उपयोग करण्याच्या त्याच्या मार्गदर्शनाचेही पालन केले पाहिजे. आपल्या या लहानशा अवयवाचा आपण इतरांना आरोग्यदायक व आनंददायक ठरेल अशा रितीने उपयोग करण्याचा प्रयत्न करू या आणि वाणीचा अपराध टाळून सरळ मार्गाने चालू या. शलमोन आपल्याला आश्‍वासन देतो, की “न्याय्यत्वाच्या मार्गांत जीवन आहे; त्याच्या वाटेत मरण नाही.”—नीतिसूत्रे १२:२८.

[२७ पानांवरील चित्रे]

“जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो”

[२८ पानांवरील चित्रे]

“सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे”

[२९ पानांवरील चित्र]

भरवशाच्या माणसाजवळ मन मोकळे केल्याने सांत्वन मिळते

[३० पानांवरील चित्र]

देवाच्या वचनावर कृतज्ञ मनोवृत्तीने मनन केल्याने मन आनंदित होते