व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सुज्ञ निर्णय कसे घेता येतील?

सुज्ञ निर्णय कसे घेता येतील?

सुज्ञ निर्णय कसे घेता येतील?

“ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे,” असे प्राचीन इस्राएलच्या शलमोन राजाने म्हटले. आपल्यापैकी बहुतेकांनी केवळ इतरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही वेळा चुकीचे निर्णय घेतले असतील.—नीतिसूत्रे १:५.

शलमोनाचे ते शब्द त्याने तयार केलेल्या ‘तीन हजार नीतिसूत्रांसोबत’ नंतर बायबलमध्ये उतरवण्यात आले. (१ राजे ४:३२) त्याच्या सुज्ञ म्हणी जाणून त्यांचे पालन केल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो का? होय. त्या आपल्याला ‘ज्ञान व शिक्षण संपादण्यात; बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात; सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, धर्म नीति व सात्विकपण ही प्राप्त करून घेण्यात’ मदत करतात. (नीतिसूत्रे १:२, ३) आता आपण बायबल आधारित पाच मार्गदर्शक सूचनांची चर्चा करू या, ज्या आपल्याला उत्तम निर्णय घेण्यात मदत करू शकतात.

दूरगामी परिणामांचा विचार करा

काही निर्णयांचे परिणाम फार गंभीर असतील. त्यामुळे, हे परिणाम काय असतील याचा आधीच विचार करा. अल्पकालीन लाभांनी आकर्षित होऊन अनिष्ट दूरगामी परिणामांकडे डोळेझाक करण्याविषयी सावध असा. “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात,” अशी ताकीद नीतिसूत्रे २२:३ देते.

अल्पकालीन आणि दूरगामी परिणामांची यादी करणे सर्वात उत्तम. एखाद्या नोकरीमुळे मोठा पगार आणि आनंददायक काम हे अल्पकालीन फायदे मिळू शकतील. परंतु, भविष्यासाठी काहीच तरतूद नसणे यांसारखे त्याचे दूरगामी परिणाम असतील का? कदाचित त्यासाठी तुम्हाला मित्रांपासून किंवा कुटुंबापासून दूर जावे लागेल का? किंवा तुम्हाला आरोग्याला हितकर नसलेल्या वातावरणात काम करावे लागेल का अथवा ते काम कंटाळवाणे असल्यामुळे तुम्ही निराश व्हाल का? सर्व गोष्टींचा नीट विचार करा आणि मगच कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे ते ठरवा.

भरपूर वेळ घ्या

घाईघाईत घेतलेले निर्णय मूर्खपणाचे ठरू शकतात. नीतिसूत्रे २१:५ असा इशारा देते: “उद्योग्याचे विचार समृद्धि करणारे असतात. जो कोणी उतावळी करितो तो दारिद्र्‌याकडे धाव घेतो.” उदाहरणार्थ, प्रेमवेडे असलेल्या किशोरवयीनांनी लग्नाची घाई करण्याआधी नीट विचार करून निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर, १८ व्या शतकाच्या सुरवातीचे इंग्रज नाटककार विल्यम काँग्रीव यांच्या शब्दांचा प्रत्यय त्यांना येईल; त्यांनी म्हटले होते: “घाईघाईत लग्न करून सवडीने पस्तावा करावा लागेल.”

भरपूर वेळ घेणे याचा अर्थ निर्णय घेण्याचे टाळणे नव्हे. काही निर्णय इतके महत्त्वाचे असतात की, उचित असेल तितक्या लवकर ते घेण्यात शहापण असते. अनावश्‍यक टाळाटाळ केल्याने आपल्याला किंवा इतरांना नुकसान होऊ शकते. गरज नसताना एखादा निर्णय घेण्यात दिरंगाई करणे हाच एक निर्णय बनेल—आणि कदाचित तो इतक्या शहाणपणाचा ठरणार नाही.

सल्ला ग्रहण करणारे असा

दोन परिस्थिती केव्हाही सारख्या नसल्यामुळे एकप्रकारच्या समस्यांचा सामना करणाऱ्‍या दोन व्यक्‍ती क्वचितच सारखा निर्णय घेतील. तरीही, आपल्यासारख्या परिस्थितींचा सामना केलेल्यांनी कसा निर्णय घेतला हे जाणणे फायद्याचे ठरू शकते. त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आता त्यांना काय वाटते हे त्यांना विचारा. उदाहरणार्थ, एखादा पेशा निवडताना, त्याचा अनुभव असलेल्यांना त्या पेशाचे फायदे व तोटे काय हे विचारा. त्यांच्या निवडीचे फायदे किंवा तोटे अथवा संभवनीय धोके यांविषयी त्यांना विचारा.

“मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात,” असा इशारा आपल्याला दिला जातो. (नीतिसूत्रे १५:२२) अर्थात, सल्ला घेताना किंवा इतरांच्या अनुभवातून शिकताना, आपण याची पूर्ण जाणीव राखली पाहिजे की शेवटी निर्णय आपलाच आहे आणि घेणाऱ्‍या निर्णयाची जबाबदारी देखील आपण स्वीकारली पाहिजे.—गलतीकर ६:४, ५.

सुशिक्षित विवेकाचे म्हणणे ऐका

आपण ज्या मूलभूत तत्त्वांनुसार जीवन जगत असतो त्यांच्या एकवाक्यतेत निर्णय घेण्यास आपला विवेक आपल्याला मदत करू शकतो. एका ख्रिस्ती व्यक्‍तीने यासाठी देवाच्या विचारांनुसार आपल्या विवेकाला शिक्षित करण्याची गरज आहे. (रोमकर २:१४, १५) देवाचे वचन आपल्याला सांगते: “तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतिसूत्रे ३:६) अर्थात, काही बाबतीत दोन व्यक्‍ती (वेगळ्या मार्गाने सुशिक्षित विवेक असलेल्या) भिन्‍न निष्कर्षास पोहंचतील आणि त्यामुळे भिन्‍न निर्णय घेतील.

परंतु, सुशिक्षित विवेक, देवाच्या वचनाच्या थेट विरोधात असलेल्या बाबींमध्ये केव्हाही स्वतंत्रपणे निर्णय घेणार नाही. उदाहरणार्थ, बायबलच्या तत्त्वांनी शिक्षित नसलेला विवेक एखाद्या पुरुषाला आणि स्त्रीला विवाहाआधी आपली अनुरूपता सिद्ध करण्यासाठी एकत्र राहण्यास अनुमती देईल. आपण उचित निर्णय घेतला आहे व अविचारीपणे लग्नाची घाई आपण केली नाही असे त्यांना वाटेल. त्यांचा विवेक त्यांना बोचणार नाही. परंतु, शरीर संबंध व विवाह यांविषयी देवाचा दृष्टिकोन बाळगणारी कोणतीही व्यक्‍ती अशी तात्पुरती व अनैतिक व्यवस्था करण्याचा निर्णय घेणार नाही.—१ करिंथकर ६:१८; ७:१, २; इब्री लोकांस १३:४.

तुमच्या निर्णयांचा इतरांवर होणारा परिणाम

पुष्कळदा तुमच्या निर्णयांचा इतरांवर परिणाम होत असेल. म्हणूनच चुकूनही कधी चुकीचा—किंवा मूर्खपणाचा—निर्णय घेऊ नका ज्यामुळे तुमचे मित्र आणि नातेवाईक किंवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे देव यांच्यासोबतचे तुमचे संबंध तुटतील. नीतिसूत्रे १०:१ म्हणते: “मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुःखी.”

दुसऱ्‍या बाजूला, हे लक्षात ठेवा की, काही वेळा तुम्हाला कोणा एकाचीच मैत्री निवडावी लागेल. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, तुमची पूर्वीची धार्मिक मते शास्त्रवचनांच्या विरोधात आहेत हे कळल्यावर तुम्ही ती मते त्यागण्याचा निर्णय घ्याल. किंवा, तुम्ही नुकतेच स्वीकारलेल्या ईश्‍वरी मार्गदर्शनानुसार जीवन जगण्याच्या इच्छेपायी आपल्या व्यक्‍तिमत्त्वात बरेच बदल करण्याचा निर्णय कदाचित घ्याल. हा निर्णय तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना पसंत पडणार नाही परंतु देवाला पसंत असलेला कोणताही निर्णय शहाणपणाचाच असतो.

सर्वात मोठा निर्णय घेतेवेळी सुज्ञपणा दाखवा

आज जीवन-मृत्यूची निवड करण्याचा निर्णय प्रत्येकासमोर आहे परंतु सर्वसाधारणपणे लोकांना याची कल्पना नाही. सा.यु.पू. १४७३ मध्ये वाग्दत्त देशाच्या सीमेवर छावणी घालून असलेल्या प्राचीन इस्राएलांसमोर अशीच एक परिस्थिती होती. देवाचा वक्‍ता म्हणून कार्य करणाऱ्‍या मोशेने त्यांना म्हटले: “जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवली आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील. आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर प्रीति कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायु होशील; तसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्‍यांना जो देश देण्याची परमेश्‍वराने त्यांच्याशी शपथ वाहिली होती त्यात तुझी वस्ती होईल.”—अनुवाद ३०:१९, २०.

बायबलची भविष्यवाणी आणि कालगणना दाखवते की, आपण ‘कठीण दिवसांत’ जगत आहोत आणि “ह्‍या जगाचे बाह्‍य स्वरूप लयास जात आहे.” (२ तीमथ्य ३:१; १ करिंथकर ७:३१) भाकीत केलेल्या या बदलाच्या शेवटी दरिद्री मानवी व्यवस्थेचा नाश केला जाईल आणि त्याऐवजी नीतिमत्त्वतेचे देवाचे नवीन जग स्थापित केले जाईल.

त्या नवीन जगाच्या उंबरठ्यावर आपण आहोत. देवाच्या राज्याधीन असलेल्या पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचा आनंद लुटण्यासाठी तुम्हाला प्रवेश मिळेल का? की, सैतानाचे व्यवस्थीकरण मिटवण्यात आल्यावर पृथ्वीवरून तुम्हाला काढून टाकले जाईल? (स्तोत्र ३७:९-११; नीतिसूत्रे २:२१, २२) सध्या कोणता मार्ग निवडावा हा निर्णय तुमचा आहे आणि हा खरोखर जीवन मरणाचा निर्णय आहे. तुम्ही योग्य अर्थात सुज्ञ निर्णय घेण्यासाठी मदत स्वीकाराल का?

जीवन मिळवण्याकरता निर्णय घेण्यासाठी प्रथम देवाच्या अपेक्षा माहीत करून घेणे समाविष्ट आहे. या अपेक्षा अचूकपणे कळवण्यात चर्चेस बहुतांशी उणी पडली आहेत. त्यांच्या पुढाऱ्‍यांनी लोकांना मार्गभ्रष्ट करून त्यांना खोट्या शिकवणींवर विश्‍वास करायला आणि देवाला नापसंत असलेल्या गोष्टी करायला लावल्या आहेत. देवाची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” करण्याचा वैयक्‍तिक निर्णय घेण्याची गरज आहे हे त्यांनी सांगितलेले नाही. (योहान ४:२४) त्यामुळे बहुतेक लोक देवाची आत्म्याने व खरेपणाने उपासना करत नाहीत. पण येशूने काय म्हटले त्याकडे लक्ष द्या: “जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळून टाकितो.”—मत्तय १२:३०.

यहोवाचे साक्षीदार देवाच्या वचनाचे अधिकाधिक ज्ञान घेण्यास लोकांना आनंदाने मदत करतात. ते लोकांना सोयीस्कर असेल त्या वेळेला व ठिकाणी एका व्यक्‍तीसोबत किंवा अनेकांसोबत नियमित बायबल चर्चा करतात. या तरतुदीचा फायदा कोणाला घ्यायचा असल्यास त्यांनी एकतर स्थानीय साक्षीदारांशी संपर्क साधावा किंवा टेहळणी बुरूजच्या प्रकाशकांना पत्र लिहावे.

काहीजणांना देवाला आपल्याकडून काय अपेक्षा आहे याचे मूलभूत ज्ञान असेल. एवढेच नव्हे तर, बायबल हे सत्य आणि विश्‍वसनीय आहे ही खात्री देखील त्यांना असेल. तरीपण, पुष्कळांनी देवाला समर्पण करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. का? यासाठी अनेक कारणे असतील.

कदाचित याचे महत्त्व त्यांना माहीत नसावे का? येशूने स्पष्टपणे म्हटले: “मला प्रभुजी, प्रभुजी, असे म्हणणाऱ्‍या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.” (मत्तय ७:२१) केवळ बायबलचे ज्ञान पुरे नाही; तर कृती आवश्‍यक आहे. प्रारंभीच्या ख्रिस्ती मंडळीने याबाबतीत नमुना मांडला. पहिल्या शतकातील काहींविषयी आपल्याला असे वाचायला मिळते: “फिलिप्प देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्‍याविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्‍वास बसला आणि पुरुष व स्त्रिया ह्‍यांचा बाप्तिस्मा झाला.” (प्रेषितांची कृत्ये २:४१; ८:१२) यास्तव, एका व्यक्‍तीने देवाचे वचन मनापासून स्वीकारले असले, त्यावर त्याचा विश्‍वास असला आणि देवाच्या दर्जांनुरूप तो जीवन जगत असला तर समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेण्यापासून त्याला कसला त्रास असावा? (प्रेषितांची कृत्ये ८:३४-३८) पण, देवाला स्वीकारयोग्य होण्याकरता त्याने हे पाऊल स्वच्छेने आणि संतोषाने उचलले पाहिजे.—२ करिंथकर ९:७.

काहींना वाटेल की, त्यांचे ज्ञान फार सीमित असल्यामुळे ते देवाला आपले जीवन समर्पित कसे करू शकतील. परंतु, नवीन मार्गाक्रमण करणाऱ्‍या प्रत्येकाला सुरवातीला कमीच ज्ञान असते. आज आपल्या पेशात वाकबगार असलेला कोण असा दावा करू शकतो की, त्याने आपली कारकीर्द सुरू केली तेव्हा त्याला आजच्या इतकेच ज्ञान होते? देवाची सेवा करण्याचा निर्णय घेण्याकरता केवळ बायबलच्या मूलभूत शिकवणींचे व तत्त्वांचे ज्ञान असणे आणि त्यानुसार जगण्याची प्रामाणिक इच्छा असणे जरूरीचे आहे.

आपण आपल्या निर्णयानुसार जगू शकणार नाही या भीतीने काहीजण निर्णय घ्यायलाच दिरंगाई करत असावेत का? मानवांच्या पुष्कळ आश्‍वासनांमध्ये अपयशाविषयी माफक प्रमाणात चिंता वाटत असतेच. लग्न करून कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेणाऱ्‍या पुरुषाला थोडाफार अपुरेपणा जाणवत असेल परंतु वचनबद्धतेमुळे त्याच्या परीने होता होईल तितके करायचे प्रोत्साहन त्याला मिळते. त्याचप्रमाणे नुकतेच ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त केलेल्या तरुणाला अपघाताची भीती असेल—खासकरून, वयस्कर चालकांच्या तुलनेत तरुण चालकांचे जास्त अपघात होत असतात असे त्याला ठाऊक असल्यास ही भीती अधिकच बळावते. मात्र हे ज्ञान फायदेकारक ठरू शकते कारण तो अधिक सावधगिरीने गाडी चालवेल. पण लायसन्सच न घेणे हा त्याच्यावरचा उपाय ठरणार नाही!

जीवन निवडा!

बायबल दाखवते की, सध्याच्या जगातील राजकीय, आर्थिक आणि धार्मिक व्यवस्था आणि तिचे सर्व समर्थक लवकरच पृथ्वीवरून नाहीसे होतील. परंतु, ज्या व्यक्‍तींनी शहाणपणाने जीवन निवडले आहे आणि जे त्यानुसार कार्य करतात ते टिकतील. नवीन जागतिक संस्थेचे केंद्रस्थान असलेले हे लोक, देवाच्या मूळ उद्देशानुसार या पृथ्वीवर परादीसमय परिस्थिती आणण्यात भाग घेतील. देवाच्या मार्गदर्शनाखाली या आनंदमय कार्यात भाग घेण्यास तुम्हाला आवडेल का?

असल्यास, देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याचा निर्णय घ्या. देवाला संतुष्ट करण्यासाठी त्याच्या काय अपेक्षा आहेत हे शिकण्याचा निर्णय घ्या. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्णय घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपला निर्णय पूर्ण करण्याचा निर्णय घ्या. थोडक्यात सांगायचे म्हणजे, जीवन निवडा!

[४ पानांवरील चित्रे]

गंभीर निर्णय घेतेवेळी भरपूर वेळ घ्या

[५ पानांवरील चित्र]

एखादी कारकीर्द निवडताना इतरांचा सल्ला घ्या

[७ पानांवरील चित्रे]

जे लोक देवाची आता सेवा करण्याचा निर्णय घेतात ते पृथ्वीला परादीसमय बनवण्यात भाग घेतील