व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

याकोबाला आध्यात्मिक मूल्यांची कदर होती

याकोबाला आध्यात्मिक मूल्यांची कदर होती

याकोबाला आध्यात्मिक मूल्यांची कदर होती

याकोबाचे जीवन संघर्ष आणि संकटांनी ग्रस्त आहे. आपल्या जुळ्या भावाच्या खुनी क्रोधामुळे याकोबाला आपला जीव मुठीत धरून पळावे लागते. तो जिच्या प्रेमात पडला ती मुलगी त्याला मिळण्याऐवजी त्याला फसवले जाऊन त्याचे दुसऱ्‍या मुलीशी लग्न करून दिले जाते. शेवटी त्याच्या चार बायका होतात आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. (उत्पत्ति ३०:१-१३) २० वर्षे तो एका मनुष्याकडे काम करतो जो त्याचा पुरेपूर फायदा घेतो. देवदूताशी त्याची झुंज होते आणि त्याला कायमची दुखापत होते. त्याच्या मुलीचा बलात्कार होतो, त्याचे मुलगे जाऊन अनेकांची हत्या करतात आणि आपला प्रिय मुलगा व पत्नी यांच्या मृत्यूने तो अति खेदित होतो. वृद्धापकाळी दुष्काळापासून वाचण्याकरता त्याला जबरदस्तीने स्थलांतर करावे लागते आणि तो मान्य करतो की, त्याचे आयुष्य “अल्प असून दुःखाचे” होते. (उत्पत्ति ४७:९) हे सर्व असूनही याकोब एक आध्यात्मिक पुरुष होता ज्याचा देवावर भरवसा होता. त्याचा हा विश्‍वास चुकीचा आहे का? याकोबाच्या केवळ काही अनुभवांतून आपल्याला काय शिकायला मिळू शकते?

भावापासून एकदम वेगळा

याकोबाचे आपल्या भावाशी भांडण होण्याचे कारण होते, की याकोबाला आध्यात्मिक संपत्तीची कदर होती; त्याच्या भावाने आध्यात्मिक गोष्टींना तुच्छ मानले होते. अब्राहामासोबत केलेल्या कराराबद्दल जाणून घ्यायला याकोबाला आस्था होती आणि देवाने ज्यांना वारस नेमले होते त्या कुटुंबाची काळजी घेण्याकरता त्याने स्वतःला वाहून दिले होते. म्हणून यहोवाला तो “आवडता” होता. याकोब “साधा” होता; तो शब्द नैतिक सदाचरणाला सूचित करतो. याच्या विरोधात, एसावाला आपल्या आध्यात्मिक वारशाची पर्वा नव्हती आणि त्याने अगदी किरकोळ गोष्टीसाठी तो वारसा याकोबाला विकून टाकला. जेव्हा ईश्‍वरी मान्यतेने याकोबाने इसावाचा हक्क घेतला आणि त्याच्याकरता असलेला आशीर्वाद मिळवला तेव्हा तो संतप्त होऊन बदला घेण्याचा विचार करू लागला. मग याकोबाने आपल्या सर्व प्रिय वस्तू मागे सोडल्या पण त्यानंतर त्याला जे प्राप्त झाले त्याने त्याची निराशा निश्‍चितच दूर झाली.—मलाखी १:२, ३; उत्पत्ति २५:२७-३४; २७:१-४५.

एका स्वप्नात, देवाने याकोबाला स्वर्ग आणि पृथ्वीमध्ये लावलेल्या शिडीवरून किंवा दगडांच्या राशीवरून देवदूत चढत-उतरत असल्याचे दाखवले व त्याला सांगितले की याकोब आणि त्याच्या संततीचे तो रक्षण करील. “तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पाहा, मी तुजबरोबर आहे; आणि जिकडेजिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन; तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही.”—उत्पत्ति २८:१०-१५.

किती सांत्वनदायक गोष्ट! यहोवाने खात्री केली की, अब्राहाम आणि इसहाकाला दिलेली अभिवचने याकोबाच्या कुटुंबाला आध्यात्मिकरित्या संपन्‍न करतील. याकोबाला याची जाणीव करून देण्यात आली की, देवाची स्वीकृती असलेल्यांची सेवा देवदूत करू शकतात आणि त्याला ईश्‍वरी संरक्षणाची हमी देण्यात आली. याबद्दल कदर बाळगून, याकोबाने यहोवाला विश्‍वासू राहण्याची शपथ खाल्ली.—उत्पत्ति २८:१६-२२.

याकोबाने एसावाचा वारसा हिसकावून घेतला नाही. ही मुले जन्मण्याआधीच यहोवाने म्हटले होते की, “वडील धाकट्याची सेवा करील.” (उत्पत्ति २५:२३) ‘मग देवाने याकोबालाच पहिल्यांदा जन्माला घातले असते तर सोपे नसते का झाले?’ असा प्रश्‍न कोणाच्या मनात येईल. परंतु, जे काही नंतर घडले त्यातून महत्त्वाची सत्ये शिकायला मिळाली. जे लोक आशीर्वादांवर आपला हक्क जमवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकरता देव आशीर्वाद देत नाही परंतु आपल्या निवडलेल्या लोकांवर तो अपात्र कृपा दर्शवतो. त्याकरता, ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबाला मिळाला, थोरल्या भावाला नाही कारण त्याला त्याची कदर नव्हती. त्याचप्रमाणे, नैसर्गिक यहुद्यांनी राष्ट्र या नात्याने एसावसारखी मनोवृत्ती दर्शवल्यामुळे त्यांची जागा आत्मिक इस्राएलने घेतली. (रोमकर ९:६-१६, २४) आजही यहोवासोबत चांगल्या नातेसंबंधाचा वारसा प्रयासाविना प्राप्त होत नाही; केवळ एका देव-भीरू कुटुंबात किंवा वातावरणात जन्म घेतल्याने तो प्राप्त होत नाही. ज्यांना ईश्‍वरी आशीर्वाद हवे आहेत त्यांनी धर्मी असण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आध्यात्मिक गोष्टींबद्दल खरी कदर बाळगली पाहिजे.

लाबानने स्वीकारले

पदन-अराम येथे आपल्या नातेवाईकांमध्ये पत्नी शोधण्यासाठी याकोब आला तेव्हा त्याची भेट लाबानची मुलगी अर्थात त्याची मामे बहीण राहेल हिच्याशी एका विहिरीपाशी झाली आणि त्याने त्या विहिरीच्या तोंडावरचा वजनदार धोंडा बाजूला लोटून तिच्या मेंढरांना पाणी पाजले. * राहेलने लगबगीने घरी जाऊन याकोब आल्याचे सांगितले आणि लाबान त्याला भेटायला धावत गेला. अब्राहामाच्या सेवकाने आणलेल्या किंमती वस्तूंबद्दल लाबान विचार करत असेल तर त्याची निराशा झाली असेल कारण याकोबाने असे काहीच आणले नव्हते. परंतु लाबानला असे काही दिसले असावे ज्याचा तो फायदा घेऊ शकत होता—कष्टाळु कामगार.—उत्पत्ति २८:१-५; २९:१-१४.

याकोब जे काही घडले ते सर्व सांगतो. ज्येष्ठत्वाचा हक्क प्राप्त करण्यासाठी वापरलेल्या युक्‍तीविषयी देखील तो सांगतो का हे स्पष्ट नाही, पण “सर्व वृत्तान्त” ऐकल्यावर लाबान म्हणतो: “तू खरोखर माझ्या हाडामांसाचा आहेस.” एका विद्वानाच्या मते, हे वाक्य याकोबाला राहण्याचे आमंत्रण होते किंवा नातेसंबंधापायी त्याचे संरक्षण करण्याच्या लाबानच्या कर्तव्याची कबुली होती असे म्हणता येईल. काहीही असले तरी, आपल्या भाच्याचा फायदा कसा उचलावा याचा तो लागलीच विचार करू लागला.

लाबानने मग असा एक विषय काढला ज्यामुळे पुढील २० वर्षे त्यांच्यात वादविवाद निर्माण झाला. “तू माझा आप्त म्हणून माझी चाकरी फुकट करावी की काय?” असे त्याने विचारले. “तुझे वेतन काय ते मला सांग.” लाबानने, परोपकारी मामा असल्याचा आव आणला तरी याकोबासोबतच्या रक्‍ताच्या नातेसंबंधाला त्याने केवळ व्यावसायिक करारात बदलून टाकले. याकोबाचे राहेलवर प्रेम असल्यामुळे त्याने उत्तर दिले: “आपली धाकटी मुलगी राहेल हिजसाठी मी सात वर्षे आपली चाकरी करीन.”—उत्पत्ति २९:१५-२०.

वधूच्या कुटुंबाला वधू-किंमत देऊन मागणी पक्की केली जात होती. नंतरहून मोशेच्या नियमशास्त्रात फसवलेल्या कुमारिकांकरता ५० शेकेल रुपे इतकी किंमत ठरवण्यात आली होती. विद्वान गॉर्डन वेनम यांच्या मते, ही “सर्वाधिक विवाह किंमत” होती परंतु सहसा किंमत “बरीच कमी” असे. (अनुवाद २२:२८, २९) याकोबाला ही किंमत देणे शक्य नव्हते. म्हणून त्याने लाबानकडे सात वर्षे चाकरी करण्याचे ठरवले. वेनम पुढे म्हणतात की, “नेहमीच्या मजुरांना प्राचीन बॅबिलोनी काळात दर महिन्याला दीड शिक्के मिळत होते (पूर्ण सात वर्षांमध्ये सुमारे ४२ ते ४८ शिक्के) त्यामुळे याकोब राहेलच्या बदल्यात लाबानला अत्यंत मोठी विवाह किंमत देत होता.” लाबान लगेच तयार झाला.—उत्पत्ति २९:१९.

याकोबाला राहेलवर इतके प्रेम होते की, सात वर्षे त्याला “केवळ थोड्या दिवसांसारखी” वाटली. त्यानंतर, बुरख्यातील वधू आपल्याला देण्याची त्याने मागणी केली; लाबान त्याला फसवेल याची त्याला जराही शंका वाटली नाही. परंतु, दुसऱ्‍या दिवशी सकाळी त्याला जेव्हा कळाले की, तो राहेलसोबत नव्हे तर तिची बहीण लेआ हिच्यासोबत निजला होता तेव्हा त्याला किती धक्का बसला असावा याची कल्पना करा! याकोबाने विचारले: “आपण मजशी हे काय केले? मी राहेलीसाठी आपली चाकरी केली ना? मला का फसविले?” लाबान म्हणाला: “वडील मुलीच्यापूर्वी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे चाल नाही. हा सप्ताह पुरा होऊ दे, मग आम्ही तीहि तुला देऊ त्याबद्दल तुला आणखी सात वर्षे माझी चाकरी करावी लागेल.” (उत्पत्ति २९:२०-२७) असहाय आणि कचाट्यात सापडलेल्या याकोबाला नाइलाजाने ही अट मान्य करावी लागली कारण त्याशिवाय त्याला राहेल मिळणार नव्हती.

पहिल्या सात वर्षांसारखी पुढील वर्षे नव्हती; ती फार कठीण होती. लाबानची ही फसवणूक तो कसा विसरू शकत होता? आणि यात लेआने जी साथ दिली होती तेही तो कसे विसरू शकत होता? अर्थात, लेआ आणि राहेलकरता लाबानने जे खडतर भविष्य करून ठेवले होते त्याची त्याला मुळीच पर्वा नव्हती. स्वार्थ हेच त्याच्याकरता महत्त्वाचे होते. लेआला एकापाठोपाठ चार मुलगे झाले परंतु राहेल मात्र वांझ राहिली तेव्हा तिच्या रागात ईर्ष्येची भर पडली. बाळ होण्यासाठी उतावीळ झालेल्या राहेलने मग आपल्या दासीला पर्यायी माता म्हणून सादर केले आणि लेआने देखील स्पर्धात्मक भावनेने तेच केले. अशातऱ्‍हेने याकोबाच्या ४ पत्नी, १२ मुले झाली आणि त्याचे कुटुंब मुळीच सुखी नव्हते. तरीही, यहोवा याकोबाच्या वंशातून एक मोठे राष्ट्र निर्माण करत होता.—उत्पत्ति २९:२८–३०:२४.

यहोवाद्वारे आशीर्वादित

संकटे असतानाही, देवाने आपल्याला वचन दिल्याप्रमाणे तो आपल्यासोबत आहे हे याकोबाने पाहिले. लाबानने देखील हे पाहिले कारण याकोब आला होता तेव्हा त्याच्याजवळ फार कमी जनावरे होती परंतु त्याच्या भाच्याच्या सांभाळानंतर त्यांची संख्या फार वाढली. याकोबाला पाठवून देण्याची इच्छा नसल्यामुळे लाबानने त्याला अधिक सेवेचे किती पैसे होतात ते मागायला सांगितले; यावर याकोबाने लाबानच्या कळपात जन्माला आलेल्या असाधारण रंगाच्या प्राण्यांची मागणी केली. असे म्हटले जाते की, त्या भागात, मेंढरे सहसा पांढरी आणि बकऱ्‍या काळ्या असत किंवा गडद तपकिरी रंगाच्या असत; फक्‍त काही मोजकेच मिश्र रंगाचे असत. यात आपलाच फायदा आहे असे समजून लाबान एका पायावर तयार झाला आणि त्याने लगेच असाधारण खुणा असलेल्या आपल्या प्राण्यांना वेगळे केले म्हणजे याकोबाकडे असलेल्या कळपाशी त्यांचा संपर्क येणार नाही. त्याला निश्‍चितच अशी खात्री होती की, याकोबाला या करारातून फारसा फायदा होणार नाही आणि प्राचीन मेंढपाळांना वेतन म्हणून मिळणारे २० टक्के नवीन जन्मलेली बकरीची आणि मेंढरांची पिले तर मुळीच मिळणार नाहीत. परंतु लाबानचा हा गैरसमज होता कारण यहोवा याकोबासोबत होता.—उत्पत्ति ३०:२५-३६.

ईश्‍वरी मार्गदर्शनाखाली, याकोबाला त्या हव्या असलेल्या रंगात उत्कृष्ट प्रतीचे प्राणी वाढवता आले. (उत्पत्ति ३०:३७-४२) प्राण्यांचे प्रजोत्पादन करण्यासंबंधी त्याच्या कल्पना योग्य नव्हत्या. तथापि, विद्वान नेहूम सारना म्हणतात की, ‘वैज्ञानिकदृष्ट्या पाहिल्यास, ठिपक्यांसाठी जबाबदार असलेली अप्रभावी जनुके असलेल्या एकरंगी प्राण्यांचे लगातार अंतराप्रजानन केल्याने हवे असलेले परिणाम मिळवता येऊ शकतात आणि असे प्राणी संकरित जातीच्या जोमदार गुणामुळे ओळखता येतात.’

याचे परिणाम पाहिल्यावर, लाबानने आपल्या भाच्यासोबत त्याला कोणते प्राणी गेले पाहिजेत—बांडे, करडे, ठिपकेदार, कबरे—यासंबंधी केलेला करार बदलण्याचा प्रयत्न केला. लाबान स्वतःचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न करत होता परंतु त्याने आपला करार कसाही बदलला तरी याकोबाची वृद्धी होईल याची यहोवाने खात्री केली. लाबान दातओठ खाण्याशिवाय काही करू शकत नव्हता. पाहता पाहता याकोबाकडे अमाप पैसा, जनावरांचे कळप, दास-दासी, उंट, गाढव झाले, पण हे सर्व त्याने स्वतःच्या हिकमतीवर नव्हे तर यहोवाच्या मदतीने जमा केले. नंतर त्याने राहेल आणि लेआला म्हटले: “तुमच्या बापाने मला फसवून दहादा माझ्या वेतनात फेरबदल केला; पण देवाने त्याला माझी काही हानि करू दिली नाही. . . . देवाने तुमच्या बापाची जनावरे हिरावून मला दिली आहेत.” यहोवाने याकोबाला अशी हमी देखील दिली की, लाबानचे सर्व कारनामे आपल्याला ठाऊक आहेत म्हणून तू चिंता करण्याची गरज नाही. देवाने म्हटले, “तू आपल्या देशी, आपल्या भाऊबंदांत परत जा; मी तुझे कल्याण करीन.”—उत्पत्ति ३१:१-१३; ३२:९.

शेवटी, फसवणाऱ्‍या लाबानपासून मुक्‍त होऊन याकोब घरी निघतो. २० वर्षे होऊन गेल्यावरही याकोबाला अजूनही एसावची भीती वाटते. एसाव चारशे पुरुषांसोबत त्याला भेटायला येत आहे अशी खबर मिळाल्यावर तर त्याला आणखीनच भीती वाटते. आता याकोब काय करणार? देवावर सतत भरवसा ठेवणाऱ्‍या आध्यात्मिक पुरुषाप्रमाणे त्याने विश्‍वासाने कार्य केले. त्याने प्रार्थना केली, यहोवाचे उपकार मिळवण्यास आपण लायक नाही हे कबूल केले आणि त्याला व त्याच्या कुटुंबाला एसावच्या हातून वाचवण्याविषयी देवाने त्याला दिलेल्या वचनाच्या आधारे देवाला मदतीकरता विनंती केली.—उत्पत्ति ३२:२-१२.

मग अनपेक्षित गोष्ट घडली. एक अनोळखी व्यक्‍ती, जो देवदूत असल्याचे नंतर समजले, त्याने याकोबाशी रात्रभर झुंज केली व त्याच्या एकाच स्पर्शाने त्याची जांघ उखळली. देवदूत याकोबाला आशीर्वाद देत नव्हता म्हणून तो त्याला जाऊ देत नव्हता. संदेष्टा होशेयने नंतर म्हटले की, “त्याने रडून देवाची करुणा भाकिली.” (होशेय १२:२-४; उत्पत्ति ३२:२४-२९) याकोबाला ठाऊक होते की, देवदूतांच्या पूर्वी झालेल्या दर्शनांचा, अब्राहामासोबत केलेल्या कराराचा त्याच्या संततीद्वारे पूर्णता होण्याशी संबंध होता. म्हणून त्याने आपल्या सर्व ताकदीनिशी झुंज करून आशीर्वाद मिळवला. या वेळी, देवाने त्याचे नाव बदलून इस्राएल ठेवले; त्याचा अर्थ “देवासोबत झगडणारा (दीर्घ प्रयत्न करणारा)” किंवा “देव झगडतो” असा होतो.

झुंज देण्यास तुम्ही तयार आहात का?

देवदूताशी झुंज करणे आणि एसावाशी पुनर्मिलन हेच केवळ याकोबाच्या जीवनातील कठीण प्रसंग नव्हते. परंतु, येथे चर्चा केलेल्या घटनांवरून तो कशाप्रकारचा मनुष्य होता याची कल्पना मिळते. एसाव आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काकरता थोडा वेळही उपाशी राहू शकला नाही तर याकोब आशीर्वाद मिळवण्याकरता संपूर्ण आयुष्यभर झटला, त्याकरता त्याने देवदूतासोबतही झोंबी केली. देवाने वचन दिल्याप्रमाणे, याकोबाला ईश्‍वरी मार्गदर्शन आणि संरक्षण प्राप्त झाले; तो मोठ्या राष्ट्राच्या वाडवडिलांपैकी एक आणि मशीहाचा पूर्वज बनला.—मत्तय १:२, १६.

यहोवाची कृपा प्राप्त करण्यास, त्यासाठी जणू झुंज करण्यास तुम्ही तयार आहात का? देवाची इच्छा करण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांचे जीवन अडचणींनी आणि समस्यांनी ग्रस्त आहे आणि काही वेळा योग्य निर्णय घेणे फार मुश्‍कीलीचे असते. तथापि, याकोबाचे उत्तम उदाहरण, यहोवाने आपल्यासमोर ठेवलेल्या प्रतिफळाची आशा दृढ ठेवण्यास आपल्याला जोरदार प्रेरणा देते.

[तळटीप]

^ परि. 9 याकोबाची आई रिबका हिने एलीयजरच्या उंटांना पाणी घातले होते त्याच प्रसंगासारखी ही भेट होती. तेव्हा रिबका एक व्यक्‍ती आल्याची खबर घेऊन घरी पळत जाते. आपल्या बहिणीला मिळालेले सोनेनाणे पाहून लाबान एलीयजरचे स्वागत करायला पळत जातो.—उत्पत्ति २४:२८-३१, ५३.

[३१ पानांवरील चित्रे]

याकोब आशीर्वाद मिळवण्याकरता आयुष्यभर झटला