व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

साओ टोमे आणि प्रिंसिप येथे सुवार्तेला फलप्राप्ती

साओ टोमे आणि प्रिंसिप येथे सुवार्तेला फलप्राप्ती

साओ टोमे आणि प्रिंसिप येथे सुवार्तेला फलप्राप्ती

कदाचित बहुतेक लोकांनी साओ टोमे आणि प्रिंसिप ही नावे ऐकली नसतील. सहसा सुटी विशेषांकांमध्ये या द्वीपांची जाहिरात केली जात नाही. जगाच्या नकाशावर ही दोन ठिकाणे आफ्रिकेच्या पश्‍चिम किनारपट्टीपासून दूर गिनीच्या आखातात केवळ दोन चिमुकल्या ठिंपक्यांसारखीच दिसतात; साओ टोमे अगदी विषुववृत्तावर आणि प्रिंसिप हे जरा ईशान्येकडे. पावसाळी, दमट हवामानामुळे तेथील पर्जन्यारण्ये २,००० मीटर उंचीच्या डोंगरकडांवरील घनदाट वने आहेत.

निळ्याशार पाण्याने घेरलेल्या आणि ताडाच्या झाडांची झालर असलेल्या समुद्रकिनाऱ्‍यांचे हे उष्णकटिबंधीय द्वीप मनमिळाऊ, प्रेमळ लोकांचे वस्तीस्थान असून तेथील मिश्रजातीय आफ्रिकन-युरोपियन लोकांमुळे एकरूप झालेल्या भिन्‍न संस्कृतींचे दर्शन घडते. १,७०,००० लोकसंख्या असलेल्या या देशातील रहिवासी काकाओची निर्यात करण्याचा मुख्य व्यवसाय करतात किंवा शेती आणि मच्छीमारी करतात. अलीकडील वर्षांमध्ये मात्र, दररोज पोटापाण्याची सोय करणे मुश्‍कील होऊन बसले आहे.

परंतु, २० व्या शतकाच्या शेवटल्या दशकात घडलेल्या एका घटनेचा या द्वीपांवरील अधिकाधिक लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडत आहे. जून १९९३ साली, यहोवाच्या साक्षीदारांना साओ टोमे आणि प्रिंसीप येथील सरकारने कायदेशीर मान्यता दिली आणि या द्वीपांवरील यहोवाच्या साक्षीदारांच्या इतिहासातील दीर्घकालीन व कठीण काळ संपला.

संकटकाळी पेरलेले बीज

असे दिसते की, सर्वात पहिले साक्षीदार १९५० च्या दशकाच्या सुरवातीला या देशात आले ज्या वेळी आफ्रिकेतील इतर पोर्तुगीज वसाहतींमधील कैद्यांना या द्वीपांवरील तुरुंगांमध्ये काम करायला पाठवण्यात आले होते. पायनियर किंवा पूर्ण-वेळेचा सेवक असलेल्या एका आफ्रिकन साक्षीदाराला मोझांबिक देशातून बाहेर पाठवण्यात आले कारण तो त्या देशात देवाच्या राज्याच्या सुवार्तेविषयी प्रचार करत होता. हा एकटाच साक्षीदार आपल्या कामात व्यस्त राहिला आणि सहा महिन्यांत आणखी १३ जण त्याच्यासोबत मिळून सुवार्तेचा प्रचार करू लागले. नंतर, याच परिस्थितीमुळे अंगोलाहून आणखी साक्षीदार आले. कैदेत असताना त्यांनी हरएक संधीचा फायदा उचलून स्थानीय लोकांना सुवार्ता सांगितली.

१९६६ सालापर्यंत, साओ टोमे येथे कारावासात असलेले सर्वजण आफ्रिकन मेनलँडला परतले होते. मागे राहिलेल्या राज्य प्रचारकांच्या लहानशा गटाने आपले काम धैर्याने जारी ठेवले. ते एकत्र भेटून बायबल अभ्यास करायचे म्हणून त्यांचा छळ करण्यात आला, त्यांना मारहाण करण्यात आली आणि कैदेतही टाकण्यात आले पण त्यांना भेटायला येणारे कोणी नव्हते किंवा उत्तेजन देणारे कोणी नव्हते. १९७५ साली हा देश पोर्तुगालपासून स्वतंत्र झाला आणि हळूहळू परंतु निश्‍चित रूपात राज्य सत्याचे बीज फळ देऊ लागले.

विस्तार आणि वाढ

१९९३ साली कायदेशीर मान्यता मिळाली त्याच महिन्यात १०० राज्य प्रचारकांचा उच्चांक गाठण्यात आला. त्याच वर्षी, पोर्तुगालहून खास पायनियर आले. पोर्तुगीज क्रिओल ही भाषा शिकण्याची त्यांची मेहनत पाहून स्थानीय लोकांना ते जवळचे वाटू लागले. मग राज्य सभागृहासाठी जागा शोधणे ही सर्वात महत्त्वाची एक गोष्ट बनली. याविषयी मारिया नावाच्या एका बहिणीला कळाल्यावर तिने आपल्या जमिनीचा निम्मा भाग दान केला ज्यावर तिचेही एक छोटेसे घर होते. पण ही जागा एक मोठे राज्य सभागृह बांधण्यासाठी पुरेशी होती. मारियाला ठाऊक नव्हते की, तिला कोणीही नातेवाईक नसल्यामुळे तिच्या या जमिनीवर काही आकांक्षी बिल्डर्सचा डोळा होता. एके दिवशी मारियाकडे एक मोठा व्यापारी आला.

“मी तुमच्याविषयी जे ऐकलंय ते बरं नाही!” अशी ताकीद त्याने तिला दिली. “तुम्ही तुमची जमीन दान केलीय असं मी ऐकलंय. ही जमीन अगदी शहरात असल्यामुळे तुम्हाला भरपूर पैसा मिळेल हे माहीत नाही का तुम्हाला?”

मारियाने विचारले: “तुम्हाला ही जमीन दिली, तर तुम्ही याचे किती पैसे द्याल?” या माणसाने काहीच उत्तर दिले नाही तेव्हा मारिया म्हणाली: “तुम्ही मला जगातला सर्व पैसा दिला तरी तो मला पुरणार नाही, कारण पैशाने मला जीवन मिळणार नाही.”

“तुम्हाला मूल-बाळसुद्धा नाही ना?” असे त्या मनुष्याने म्हटले.

हे संभाषण थांबवण्यासाठी मारियाने म्हटले: “ही जमीन यहोवाची आहे. त्याने कित्येक वर्षे ती मला दिली होती, आणि मी ती पुन्हा त्याला देत आहे. मी सर्वकाळ जगण्याची वाट पाहत आहे.” मग तिने त्याला विचारले: “तुम्ही मला सार्वकालिक जीवन देऊ शकाल का?” पुढे एक चकार शब्द न बोलता तो मनुष्य पाठमोरा झाला आणि निघून गेला.

परिणामस्वरूप, पोर्तुगालमधील कार्यक्षम बांधवांच्या मदतीने एक दिमाखदार दुमजली इमारत बांधण्यात आली. त्यात खालच्या बाजूला एक तळघर, एक ऐसपैस राज्य सभागृह आणि राहण्याच्या खोल्या देखील होत्या. त्यामध्ये वडील, सेवा सेवक आणि पायनियर यांच्या प्रशाला भरवण्यासाठी वर्ग देखील आहेत. सध्या दोन मंडळ्यांच्या सभा तेथे चालतात आणि अशातऱ्‍हेने राजधानीतील शुद्ध उपासनेचे ते उत्कृष्ट शैक्षणिक केंद्र बनले आहे.

मी-सोशी येथे ६० आवेशी प्रचारकांची एक मंडळी होती. या सभा केळीच्या शेतात उभारलेल्या एका तात्पुरत्या राज्य सभागृहात भरवल्या जात असल्यामुळे उचित राज्य सभागृहाची गरज होती. या आवश्‍यकतेविषयी नगरपालिकेला माहीत करून दिल्यावर काही सहानुभूतिशील अधिकाऱ्‍यांनी एका मुख्य रस्त्यावर मोक्यावरची जागा देऊ केली. मग, पोर्तुगालमधील बांधवांच्या मदतीने दोन महिन्यांच्या आत झटपट बांधकाम पद्धतीने एक सुरेख राज्य सभागृह बांधण्यात आले. स्थानीय लोकांचा विश्‍वासच बसेना. त्या शहरातील एका बांधकाम प्रकल्पात गोवलेला एक स्वीडीश इंजिनियर बंधू-बहिणींना काम करताना पाहून चाट पडला. त्याने असे उद्‌गार काढले: “माझा विश्‍वास बसत नाहीये! मी-सोशीमधील यहोवाचे साक्षीदार आणि झटपट बांधकाम पद्धत वापरताहेत? आम्हीसुद्धा आमचा प्रकल्प असाच पूर्ण करायला पाहिजे.” हे राज्य सभागृह जून १२, १९९९ रोजी समर्पित करण्यात आले आणि या प्रसंगासाठी २३२ लोकांची उपस्थिती होती. मी-सोशी शहरातील पर्यटकांकरता हे सभागृह एक मुख्य आकर्षण बनले आहे.

एक ऐतिहासिक अधिवेशन

साओ टोमे आणि प्रिंसिप येथील यहोवाच्या साक्षीदारांकरता जानेवारी १९९४ मधील “ईश्‍वरी शिक्षण” हे तीन दिवसीय प्रांतीय अधिवेशन म्हणजे एक ऐतिहासिक घटना होते—या द्वीपांवरील हे पहिलेवहिले अधिवेशन होते. देशातील सर्वात उत्तम वातानुकुलित प्रेक्षकागृहात ते भरवले होते. ४०५ जणांचा जमाव पाहून आणि पहिल्या वेळी बायबल नाटके व अधिवेशनातील नवीन प्रकाशनांचे अनावरण पाहून ११६ राज्य प्रचारकांच्या आनंदाची कल्पना तुम्ही करू शकता का? २० समर्पित लोकांना या उष्णकटिबंधीय किनारपट्टीवर बाप्तिस्मा देण्यात आला.

परंतु जनतेला खास आकर्षण वाटले ते लेपल बॅज कार्डांचे जे अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्यांनी लावले होते. पोर्तुगाल आणि अंगोलाहून आलेल्या २५ पाहुण्यांमुळे अधिवेशनाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. अल्पावधीत लोकांमध्ये ख्रिस्ती प्रेमामुळे जवळीक निर्माण झाली आणि कार्यक्रमाच्या शेवटी निरोप देण्याची वेळ आली तेव्हा कित्येकांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत होत्या.—योहान १३:३५.

नॅशनल रेडिओच्या पत्रकारांनी अधिवेशन पर्यवेक्षकांची मुलाखत घेतली. त्यांनी कित्येक भाषणांचे काही भागही प्रक्षेपित केले. ही खरोखर ऐतिहासिक घटना होती आणि कित्येक वर्षांपासून वेगळे असलेल्या या विश्‍वासू साक्षीदारांना हे पाहायला मदत झाली की, यहोवाच्या दृश्‍य संघटनेपासून ते दूर झाले नव्हते.

फलप्राप्तीने यहोवाचे गुणगान

राज्य संदेशाच्या फलप्राप्तीने सदाचरणाची उत्पत्ती होते आणि यामुळे यहोवाची स्तुती व महिमा होतो. (तीत २:१०) एका किशोरवयीन मुलीला आपल्या साप्ताहिक बायबल अभ्यासातून शिकायला मिळणाऱ्‍या गोष्टी आवडत होत्या. परंतु, तिच्या वडिलांनी तिला मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्यास मना केले. ख्रिस्ती सभा महत्त्वाच्या आहेत आणि त्यांना उपस्थित राहण्याची माझी इच्छा आहे हे तिने त्यांना आदराने समजावून सांगितले तेव्हा त्यांनी तडक तिला घराबाहेर काढले. त्यांना असे वाटले की, याप्रसंगी सहसा इतर तरुण जे करतात तेच तीही करेल अर्थात तिची काळजी घेणाऱ्‍या एका पुरुषासोबत राहायला लागेल. परंतु, ती आदर्श आणि शुद्धाचरणाचे ख्रिस्ती जीवन जगत आहे हे तिच्या वडिलांना कळाल्यावर त्यांनी तिला पुन्हा घरात घेतले आणि यहोवाची सेवा करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले.

दुसरे एक उदाहरण संगीत गटाच्या एका प्रमुखाचे आहे. स्वतःच्याच अनैतिक जीवनशैलीने त्याचे डोळे उघडले. जीवनाच्या उद्देशाच्या शोधात असताना साक्षीदारांनी त्याच्याशी संपर्क साधला. बायबलच्या नैतिक दर्जांनुसार तो जगू लागला तेव्हा सर्व लोकांमध्ये तो चर्चेचा विषय बनला. आपली अनुचित संगती देखील थांबवण्याची गरज आहे याची त्याला लगेच जाणीव झाली. (१ करिंथकर १५:३३) मग त्याने यहोवाला समर्पण केल्याचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.

पुष्कळ तरुण खऱ्‍या धर्माच्या शोधात होते. या शोधामुळे अनेक चर्च गटाच्या पादरींशी त्यांची चर्चा झाली पण यामुळे त्यांच्या मनात आणखीनच गोंधळ निर्माण झाला आणि त्यांना खरे काय ते दिसू लागले. यामुळे ते हिंसक बनले आणि धार्मिक गोष्टींची टीका करू लागले.

एके दिवशी, यहोवाचा साक्षीदार असलेले एक मिशनरी बांधव, बायबल अभ्यास घेण्यासाठी जात होते आणि त्यांना रस्त्यात ही तरुण मंडळी भेटली. या तरुणांना मिशनरी बांधवाकडून त्यांच्या काही प्रश्‍नांची उत्तरे हवी होती आणि त्यांनी या मिशनरी बांधवाला घरामागच्या अंगणात नेले; तेथे त्यांना एक स्टूल देऊन बसायला सांगितले. त्यानंतर त्यांनी, आत्मा, नरकाग्नी, स्वर्गातील जीवन आणि जगाचा शेवट यांविषयी एकापाठोपाठ एक प्रश्‍न विचारले. साक्षीदार बांधवाने, त्या तरुणांमधील जो नेता होता त्याने दिलेल्या बायबलमधून सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली. एका तासानंतर, लॉ नावाच्या त्या नेत्याने मिशनरी बांधवाला म्हटले: “आम्ही तुम्हाला आमच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यायला बोलावले तेव्हा खरे तर तुमची थट्टा करण्याचा आमचा हेतू होता कारण आम्ही इतर धर्माच्या लोकांना तेच केले आहे. आम्हाला वाटत होतं की, कोणालाही या प्रश्‍नांची उत्तरे देता येणार नाहीत. पण तुम्ही दिलीत, आणि तेही बायबलमधून! मला सांगा, बायबलविषयी मला अधिक माहिती कशी करून घेता येईल?” लॉच्या सोबत बायबल अभ्यास सुरू करण्यात आला आणि पाहता पाहता तो सभांना येऊ लागला. त्यानंतर लगेच त्याने टोळीशी आपले संबंध तोडले आणि हाणामारी करायचे सोडून दिले. एका वर्षाच्या आत, त्याने आपले जीवन यहोवाला समर्पित केले आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. सध्या तो एक सेवा सेवक म्हणून काम करत आहे.

स्थानीय क्षेत्रात कायदेशीररित्या विवाह न करता एकत्र राहण्याची एक प्रथा अगदी रूढ झाली आहे. अनेक जण अनेक वर्षांपासून एकत्र राहिले आहेत आणि त्यांना मुले देखील झाली आहेत. त्यांना या बाबतीत देवाचा दृष्टिकोन स्वीकारणे कठीण वाटते. पण एका व्यक्‍तीला या अडचणीवर मात करण्यासाठी देवाच्या वचनाने कशी मदत केली हे पाहून मन आनंदित होते.—२ करिंथकर १०:४-६; इब्री लोकांस ४:१२.

आन्टोन्यूला कळाले की आपल्या विवाहाची कायदेशीर नोंदणी करण्याची गरज आहे आणि मक्याची कापणी झाल्यावर त्याने ती करण्याचे ठरवले जेणेकरून विवाह सोहळ्याकरता त्याच्याजवळ पैसे असतील. पण कापणीच्या आदल्या रात्री चोर आले आणि त्यांनी त्याचे पीक चोरून नेले. मग त्याने पुढच्या वर्षापर्यंत थांबण्याचे ठरवले आणि पुढच्या वर्षी देखील तेच घडले. दुसऱ्‍या एका ठिकाणाहून पैशाची व्यवस्था करण्याचे प्रयत्न देखील फसले तेव्हा आपला खरा शत्रू कोण आहे हे आन्टोन्यूच्या लक्षात आले. तो म्हणाला, “सैतान मला फसवू शकणार नाही. दीड महिन्यात, सोहळा करून किंवा सोहळ्याविनाच आम्ही लग्न करू!” अशाप्रकारे त्यांनी लग्न केले, आणि आश्‍चर्य म्हणजे त्यांच्या मित्रमैत्रिणींनी विवाह सोहळ्याकरता कोंबड्या, बदके आणि एक बकरी दिली. विवाहाची कायदेशीर नोंदणी झाल्यावर, आन्टोन्यू, त्याची पत्नी आणि त्यांच्या सहा मुलांचा यहोवाला केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा झाला.

प्रिंसिप द्वीपावर एक कटाक्ष

प्रिंसिपच्या ६,००० रहिवाशांना साओ टोमे येथील विभागीय पर्यवेक्षक आणि पायनियरांनी अलीकडील वर्षांमध्ये अधूनमधून भेटी दिल्या आहेत. हे द्वीपवासी अत्यंत अतिथीप्रिय आणि साक्षीदारांचे बोलणे ऐकून घ्यायला उत्सुक होते. एका मनुष्याला एकदा एक हस्तपत्रिका दिल्यावर तो दुसऱ्‍या दिवशी पायनियरांना शोधू लागला आणि त्यांना भेटल्यावर हस्तपत्रिका वाटायला आपणही मदत करू असे सांगितले. पायनियरांनी समजावले की, हे काम त्यांनीच केले पाहिजे. पण मी तुमच्यासोबत घरोघरी येतो आणि घरमालकांशी तुमची ओळख करून देतो आणि त्यांना तुमचे बोलणे नीट ऐकायला सांगतो असा त्याने अट्टाहास धरला. शेवटी तो मनुष्य निघून गेला, पण जाण्याआधी त्याने पायनियर एक महत्त्वाचे काम करत होते अशी त्यांची तारीफ केली.

साओ टोमेहून १९९८ साली दोन पायनियर प्रिंसिपला राहायला गेले आणि पाहता पाहता त्यांना १७ गृह बायबल अभ्यास मिळाले. तेथील कार्य जोराने चालत होते आणि थोडक्याच अवधीत मंडळीच्या पुस्तक अभ्यासाकरता सरासरी १६ उपस्थिती होती व जाहीर भाषणाला ३० जणांची उपस्थिती होती. सभा भरवण्यासाठी एका ठिकाणी गरज असल्याचे नगरपालिकेला कळवण्यात आल्यावर आनंदाची गोष्ट म्हणजे, एक राज्य सभागृह बांधण्यासाठी एक जागा मान्य करण्यात आली. साओ टोमे येथील बांधवांनी, एक लहानसे राज्य सभागृह आणि दोन खास पायनियरांकरता राहण्याची व्यवस्था बांधून देण्यासाठी मदत केली.

या दूरवरच्या द्वीपांवर निश्‍चितच सुवार्तेला फलप्राप्ती होत आहे आणि ती वृद्धिंगत होत आहे. (कलस्सैकर १:५, ६) जानेवारी १९९० मध्ये साओ टोमे आणि प्रिंसिप येथे ४६ प्रचारक होते. २००२ सेवा वर्षादरम्यान, ३८८ राज्य प्रचारकांचा उच्चांक गाठण्यात आला! २० टक्क्यांहून अधिक प्रचारक पूर्ण-वेळेच्या सेवेत आहेत आणि सुमारे १,४०० गृह बायबल अभ्यास चालवले जात आहेत. २००१ स्मारकाच्या उपस्थितीने १,९०७ जणांचा नवीन उच्चांक गाठला. होय, या उष्णकटिबंधीय द्वीपांवर, यहोवाचे वचन वेगाने पुढे जात आहे आणि गौरविले जात आहे.—२ थेस्सलनीकाकर ३:१.

[१२ पानांवरील चौकट/चित्र]

लोकप्रिय रेडिओ प्रक्षेपण

या द्वीपांवर पुष्कळांना तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे * हे प्रकाशन फार आवडले. दोन आठवड्यांनी एकदा, त्या शीर्षकाचा एक १५ मिनिटांचा कार्यक्रम नॅशनल रेडिओवर सादर केला जातो. प्रसारक जेव्हा, “तरुणांनो, तुमचे प्रेम खरे आहे की फक्‍त प्रेमवेडेपणा आहे हे कसे ओळखाल?” असे विचारून मग पुस्तकातील एक भाग वाचून दाखवतो तेव्हा ऐकायला किती बरे वाटते! (अध्याय ३१ पाहा.) अशाच आणखी एका प्रक्षेपणात कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य * या पुस्तकातील काही निवडक भाग सादर केले जातात.

[तळटीपा]

^ परि. 33 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

^ परि. 33 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

[९ पानांवरील चित्र]

साओ टोमे येथील पहिले राज्य सभागृह, १९९४

[१० पानांवरील चित्र]

१. मी-सोशी येथील झटपट पद्धतीने बांधलेले राज्य सभागृह

२. या प्रेक्षकागृहात ऐतिहासिक प्रांतीय अधिवेशन भरवण्यात आले

३. अधिवेशनातील बाप्तिस्म्याचे आनंदी उमेदवार

[८ पानांवरील चित्राचे श्रेय]

पृथ्वी गोल: Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.