व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परादीस पृथ्वीवर तुम्ही विश्‍वास करू शकता

परादीस पृथ्वीवर तुम्ही विश्‍वास करू शकता

परादीस पृथ्वीवर तुम्ही विश्‍वास करू शकता

संपूर्ण इतिहासभरात, लाखो लोकांनी असा विश्‍वास केला आहे की, ते शेवटी पृथ्वी सोडून स्वर्गात जातील. काहींच्या मते, पृथ्वी आपले कायमचे वस्तीस्थान असावे ही निर्माणकर्त्याची इच्छा कधीच नव्हती. वैराग्यांनी तर दुसरे टोक गाठले आहे. त्यांच्यापैकी पुष्कळांना वाटते की, पृथ्वी आणि त्यातील सर्व भौतिक वस्तू वाईट आहेत—आध्यात्मिक संतुष्टी प्राप्त करण्यात आणि देवाच्या जवळ जाण्यात ती एक बाधा आहे.

वरीलप्रमाणे ज्यांचे विचार होते त्यांना एकतर देवाने परादीसमय पृथ्वीविषयी काय म्हटले ते माहीत नव्हते किंवा त्याकडे त्यांनी मुद्दामहून दुर्लक्ष केले होते. इतकेच काय तर, आज अनेकांना हे जाणून घेण्याची इच्छा देखील नाही की, या विषयाबद्दल देवाने आपल्या वचनात अर्थात बायबलमध्ये मानवांना प्रेरित करून काय लिहिले आहे. (२ तीमथ्य ३:१६, १७) परंतु, मानवांचे सिद्धान्त स्वीकारण्यापेक्षा देवाच्या वचनावर विश्‍वास ठेवणे अधिक शहाणपणाचे नव्हे का? (रोमकर ३:४) हे करणे फार महत्त्वाचे आहे कारण बायबल अशी ताकीद देते की, अदृश्‍य असलेली एक शक्‍तिशाली दुष्ट व्यक्‍ती लोकांना आध्यात्मिकरित्या अंधळे करत आहे आणि सध्या ती ‘सर्व जगाला ठकवित’ आहे.—प्रकटीकरण १२:९; २ करिंथकर ४:४.

गोंधळ कशासाठी?

आत्म्याविषयी लोकांच्या परस्परविरोधी कल्पना असल्यामुळे पृथ्वीविषयी देवाच्या उद्देशाबद्दल लोक गोंधळलेल्या स्थितीत आहेत. अनेकांचा असा विश्‍वास आहे की, आपल्या देहात एक वेगळी वस्तू आहे जी मृत्यूनंतर जिवंत राहते. इतरांचा असा विश्‍वास आहे ही अदृश्‍य वस्तू मानवी शरीराला निर्माण करण्याआधीपासूनच अस्तित्वात होती. एका संदर्भ ग्रंथानुसार ग्रीक तत्त्वज्ञानी प्लेटो याचे असे मत होते की, स्वर्गात असताना केलेल्या पापांची शिक्षा म्हणून मानवातील हा अदृश्‍य भाग आपल्या देहात बंदिस्त असतो.” अशाचप्रकारचे मत तिसऱ्‍या शतकातील धर्मशास्त्रवेत्ता ऑरिजेन याने व्यक्‍त केले; त्याने म्हटले की, मानवातील या अदृश्‍य भागाने देहाशी मिलन होण्याआधी स्वर्गात पाप केले होते आणि या पापांची शिक्षा म्हणून तो पृथ्वीवर देहामध्ये कैद होता. शिवाय, लाखो लोकांचा विश्‍वास आहे की, मानवाच्या स्वर्गाकडील प्रवासादरम्यान ही पृथ्वी केवळ एखाद्या परीक्षा स्थळासारखी आहे.

एक व्यक्‍ती मेल्यावर तिचे काय होते याविषयी देखील भिन्‍न भिन्‍न कल्पना आहेत. पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास (इंग्रजी) या पुस्तकानुसार, ईजिप्शियन लोक असा विश्‍वास करू लागले की, “मेलेले लोक पाताळात जातात.” नंतर तत्त्वज्ञानांनी असा वाद मांडला की, मेलेले लोक अंधकारमय पाताळात जात नाहीत तर वरच्या आत्मिक क्षेत्रात प्रवेश करतात. ग्रीक तत्त्वज्ञानी सॉक्रेटीसचा असा विश्‍वास होता म्हणतात की, एका व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यावर “ती [एखाद्या] अदृश्‍य क्षेत्रात निघून जाते . . . आणि आपले उरलेले अस्तित्व देवांच्या वास्तव्यात घालवते.”

बायबल काय म्हणते?

देवाचे प्रेरित वचन, बायबल कोठेही असे सांगत नाही की, मानवांमधील एक अदृश्‍य भाग अमर असतो. तुम्ही स्वतःच उत्पत्ति २:७ मधील अहवाल वाचून पाहा. तेथे म्हटले आहे: “परमेश्‍वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्‍वास फुंकिला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी [इब्री भाषेत शब्दशः, “श्‍वास घेणारा”] झाला.” हे फार स्पष्ट आहे आणि याने कसलाही गैरसमज होऊ शकत नाही. देवाने पहिला मनुष्य आदाम याला निर्माण केले तेव्हा त्याने त्याच्यामध्ये अशरीरी असे काहीही घातले नाही. कारण बायबल म्हणते की, “जीवनाचा श्‍वास” त्याच्या अचेतन शरीरात फुंकण्यात आला आणि मग ते शरीर एक मनुष्य किंवा जिवंत व्यक्‍ती बनले.

पृथ्वीला निर्माण करताना मानवजातीने मरावे हा देवाचा उद्देश कधीच नव्हता. मानवांनी परादीसमय परिस्थितीत पृथ्वीवर सर्वदा जगावे हा देवाचा उद्देश होता. आदामाने देवाच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे आदाम मरण पावला. (उत्पत्ति २:८, १५-१७; ३:१-६; यशया ४५:१८) पहिला मनुष्य मेला तेव्हा तो कोणत्या आत्मिक क्षेत्रात गेला का? नाही! तो—आदाम—ज्या निर्जीव मातीतून निर्माण करण्यात आला होता त्यातच पुन्हा गेला.—उत्पत्ति ३:१७-१९.

आपला पूर्वज आदाम याच्याकडून आपल्या सर्वांना पाप आणि मृत्यूचा वारसा मिळाला आहे. (रोमकर ५:१२) हा मृत्यू म्हणजे आदामाच्या बाबतीत घडले त्याचप्रमाणे अस्तित्वाचा अंत आहे. (स्तोत्र १४६:३, ४) बायबलच्या सर्व ६६ पुस्तकांमध्ये असेही कोठे दाखवलेले नाही की, मानवामधील अमर असे काहीतरी मृत्यूनंतर जिवंत राहते. याच्या विरोधात, शास्त्रवचनांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, एक व्यक्‍ती मरते तेव्हा तिचे जीवन पूर्णतः संपते.—उपदेशक ९:५, १०.

भौतिक वस्तू वाईट आहेत का?

भौतिक वस्तू, त्याचप्रमाणे पृथ्वी वाईट आहे या कल्पनेविषयी काय? मानीकेझमच्या अनुयायांचे असे मत होते—मानी नावाच्या एका व्यक्‍तीने सा.यु. तिसऱ्‍या शतकात पर्शियात सुरू केलेली ही धार्मिक चळवळ आहे. दि न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका म्हणतो: “मानवांच्या पीडामय स्थितीमुळे मानीकेझम मतप्रणालीची सुरवात झाली.” मानी यांचा असा विश्‍वास होता की, मानव असणे “हे अनैसर्गिक, सहनशक्‍ती पलीकडील व पूर्णतः दुष्ट” होते. त्यांचा असाही विश्‍वास होता की, या ‘पीडेतून’ सुटका मिळवायची असल्यास देहातील त्या अदृश्‍य भागाला देहातून मुक्‍ती मिळवून, पृथ्वी सोडून आत्मिक जगात आध्यात्मिक अस्तित्व प्राप्त करावे लागेल.

याच्या उलट, बायबल आपल्याला सांगते की, देवाने पृथ्वी व मानवजातीला निर्माण करताना जे काही ‘केले’ ते सर्व त्याच्या दृष्टीने “फार चांगले” होते. (उत्पत्ति १:३१) त्या वेळी, मानव आणि देव यांच्यामध्ये कसलीही बाधा नव्हती. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचा आपल्या स्वर्गीय पित्यासोबत जवळचा नातेसंबंध होता त्याचप्रमाणे आदाम आणि हव्वा यांची यहोवाशी जवळीक होती.—मत्तय ३:१७.

आपले पहिले माता-पिता, आदाम आणि हव्वा यांनी पापी मार्ग अवलंबिला नसता तर परादीस पृथ्वीवर त्यांना यहोवा देवाशी सर्वकाळाकरता निकटचा नातेसंबंध ठेवता आला असता. त्यांच्या जीवनाची सुरवात परादीसात झाली, कारण शास्त्रवचने आपल्याला सांगतात: “परमेश्‍वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लाविली आणि तीत आपण घडिलेल्या मनुष्याला ठेविले.” (उत्पत्ति २:८) त्या परादीसमय बागेत हव्वेला अस्तित्वात आणण्यात आले. आदाम आणि हव्वेने पाप केले नसते, तर त्यांनी व त्यांच्या परिपूर्ण संततीने एकत्र मिळून संपूर्ण पृथ्वीचे परादीसात रूपांतर करण्यात भाग घेतला असता. (उत्पत्ति २:२१; ३:२३, २४) पार्थिव परादीस सर्वकाळापर्यंत मानवजातीचे घर बनले असते.

काहीजण स्वर्गात का जातात?

तुम्ही म्हणाल, ‘पण, बायबलमध्ये काही लोक स्वर्गात जातील असे म्हटले आहे, नाही का?’ ते खरे आहे. आदामाने पाप केल्यावर देवाने एक स्वर्गीय राज्य स्थापण्याचे ठरवले ज्यात आदामाचे काही वंशज येशू ख्रिस्तासोबत “पृथ्वीवर राज्य करितील.” (प्रकटीकरण ५:१०; रोमकर ८:१७) स्वर्गातील अमर जीवनाकरता त्यांचे पुनरुत्थान केले जाणार होते. त्यांची एकूण संख्या १,४४,००० असून त्यातील पहिले, पहिल्या शतकातील येशूच्या विश्‍वासू शिष्यांपैकी होते.—लूक १२:३२; १ करिंथकर १५:४२-४४; प्रकटीकरण १४:१-५.

परंतु, सात्विक मानवांनी पृथ्वी सोडून स्वर्गात जावे हा देवाचा मूळ उद्देश नव्हता. उलट, येशू या पृथ्वीवर असताना म्हणाला होता: “स्वर्गातून उतरलेला (व स्वर्गात असलेला) जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीहि स्वर्गात चढून गेला नाही.” (योहान ३:१३) “मनुष्याचा पुत्र,” येशू ख्रिस्त, याच्याद्वारे देवाने खंडणीची व्यवस्था केली ज्याकरवी येशूच्या बलिदानावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना सार्वकालिक जीवन शक्य होते. (रोमकर ५:८) परंतु, असे लाखो मानव सर्वकाळ कोठे राहतील?

देवाचा मूळ उद्देश पूर्ण होईल

मानवजातीतील काहींनी स्वर्गीय राज्यात येशू ख्रिस्तासोबत सहराजे बनावे असे देवाने उद्देशिले असले तरी याचा अर्थ सर्वच चांगले लोक स्वर्गात जातात असे नव्हे. मानवी कुटुंबाचे परादीस घर म्हणून देवाने पृथ्वीची निर्मिती केली. आता लवकरच, देव तो मूळ उद्देश पूर्ण करणार आहे.—मत्तय ६:९, १०.

येशू ख्रिस्ताच्या आणि त्याच्या स्वर्गीय सहराजांच्या शासनाखाली पृथ्वीवर शांती व आनंदाचे राज्य असेल. (स्तोत्र ३७:९-११) देवाच्या स्मरणातील लोकांचे पुनरुत्थान होईल आणि ते परिपूर्ण आरोग्य अनुभवतील. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) देवाला विश्‍वासू राहिल्यामुळे, आपल्या मूळ पालकांनी जे गमावले—परादीस पृथ्वीवर मानवी परिपूर्णतेतील सार्वकालिक जीवन—ते आज्ञाधारक मानवांना बहाल केले जाईल.—प्रकटीकरण २१:३, ४.

यहोवा देवाने जे उद्देशिले ते पूर्ण करण्यास तो कधीही चुकत नाही. आपला संदेष्टा यशया याच्याद्वारे त्याने म्हटले: “पाहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणाऱ्‍यास बीज, खाणाऱ्‍यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत; त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:१०, ११.

बायबलमधील यशयाच्या पुस्तकात, परादीस पृथ्वीवरील जीवन कसे असेल याची पूर्वझलक आपल्याला मिळते. परादीसातील एकही रहिवासी “मी रोगी आहे” असे म्हणणार नाही. (यशया ३३:२४) प्राण्यांपासून मानवांना काही धोका नसेल. (यशया ११:६-९) लोक टुमदार घरे बांधतील आणि त्यांत राहतील; ते पेरणी करतील व तृप्त होईपर्यंत त्याचे फळ खातील. (यशया ६५:२१-२५) शिवाय, देव ‘मृत्यु कायमचा नाहीसा करील व प्रभु परमेश्‍वर सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रु पुसेल.’—यशया २५:८.

लवकरच, आज्ञाधारक मानवजात अशा उत्तम परिस्थितींमध्ये जगेल. ती ‘नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता’ प्राप्त करेल. (रोमकर ८:२१) पृथ्वीवरील वाग्दत्त परादीसात सर्वकाळ जगणे किती उत्तम असेल! (लूक २३:४३) शास्त्रवचनांतील अचूक ज्ञानानुसार तुम्ही कार्य केले आणि यहोवा देव व येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवला तर तुम्ही तेथे जाऊ शकाल. आणि आता तुम्ही हा आत्मविश्‍वास बाळगू शकता की, परादीस पृथ्वीवर विश्‍वास करण्यात अर्थ आहे.

[५ पानांवरील चित्र]

आदाम आणि हव्वा यांना परादीस पृथ्वीवर सर्वकाळ जगण्यासाठी निर्माण करण्यात आले होते

[७ पानांवरील चित्रे]

 थ्वीवरील परादीसात . . .

ते घरे बांधतील

ते द्राक्षमळे लावतील

त्यांना यहोवा आशीर्वादित करेल

[४ पानांवरील चित्राचे श्रेय]

U.S. Fish & Wildlife Service, Washington, D.C./NASA