व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला प्रत्येक वेळी बायबलमधली आज्ञा हवी का?

तुम्हाला प्रत्येक वेळी बायबलमधली आज्ञा हवी का?

तुम्हाला प्रत्येक वेळी बायबलमधली आज्ञा हवी का?

तुम्ही लहान होता तेव्हा तुमच्या पालकांनी कदाचित तुम्हाला असंख्य नियम घालून दिले असतील. मोठे झाल्यावर तुम्हाला कळाले असेल की, त्यांना तुमच्या हिताची चिंता होती. कदाचित आता मोठे झाल्यावर त्यांनी घालून दिलेले काही नियम तुम्ही त्यांच्या अधिकाराखाली नाही तरी पाळत असाल.

आपला स्वर्गीय पिता, यहोवा आपल्याला त्याचे वचन अर्थात बायबल यातून अनेक थेट आज्ञा देतो. उदाहरणार्थ, त्याने मूर्तिपूजा, व्यभिचार, जारकर्म आणि चोरी यांना निषिद्ध ठरवले आहे. (निर्गम २०:१-१७; प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) आपण आध्यात्मिकरित्या ‘सर्व प्रकारे वाढतो’ तसे आपल्याला हे कळते की, यहोवा आपले हित चिंतितो आणि त्याच्या आज्ञा अनावश्‍यकपणे बंधनकारक नाहीत.—इफिसकर ४:१५; यशया ४८:१७, १८; ५४:१३.

परंतु, असे अनेक प्रसंग आहेत ज्यांच्यासंबंधी कोणतीही थेट आज्ञा नाही. त्यामुळे, काहींना वाटते की, बायबलचा थेट नियम नसल्यामुळे वाटेल तसे वागण्यास त्यांना मोकळीक आहे. ते म्हणतात की, देवाला आज्ञा देणे आवश्‍यक वाटले असते तर त्याने थेट आज्ञा देऊन आपली इच्छा प्रकट केली असती.

जे असा विचार करतात ते सहसा मूर्खपणाचे निर्णय घेतात ज्यामुळे त्यांना नंतर खूप पस्तावा होतो. त्यांच्या लक्षात ही गोष्ट येत नाही की, बायबलमध्ये केवळ नियमच नाहीत तर यहोवाची विचार करण्याची पद्धत देखील दिली आहे. बायबलचा अभ्यास केल्याने यहोवा काही गोष्टींविषयी कसा विचार करतो हे आपण समजून घेतो तेव्हा आपला विवेक बायबलप्रशिक्षित होतो आणि त्याच्या विचारांच्या एकवाक्यतेत निवड करण्यास आपल्याला मदत मिळते. असे करून आपण त्याला आनंदित करतो आणि आपल्यालाही सुज्ञ निर्णय घेतल्यामुळे फायदे प्राप्त होतात.—इफिसकर ५:१.

बायबलमधील उल्लेखनीय उदाहरणे

प्राचीन काळातील देवाच्या सेवकांचे बायबलमधील अहवाल पाहिल्यावर आपल्याला दिसेल की, काही प्रसंगांमध्ये थेट आज्ञा नसतानाही त्यांनी यहोवाच्या विचार करण्याच्या पद्धतीची दखल घेतली. योसेफाचेच उदाहरण पाहा. पोटीफरची पत्नी त्याला अनैतिक संबंधांकरता गळ घालत होती तेव्हा जारकर्म करू नये असा कोणताही लिखित नियम देवाने दिलेला नव्हता. पण असा थेट नियम नसतानाही योसेफाने हे समजून घेतले की, जारकर्म हा केवळ त्याच्या स्वतःच्या विवेकाविरुद्धच नव्हे तर “देवाच्या विरुद्ध” देखील पाप आहे. (उत्पत्ति ३९:९) यावरून स्पष्ट दिसते की, जारकर्म, देवाने एदेन बागेत प्रकट केलेल्या विचाराच्या आणि इच्छेच्या विरुद्ध होते हे योसेफाने ओळखले.—उत्पत्ति २:२४.

आणखी एक उदाहरण घ्या. प्रेषितांची कृत्ये १६:३ येथे आपण पाहतो की, पौलाने तीमथ्याला आपल्यासोबत ख्रिस्ती दौऱ्‍यांवर नेण्याआधी त्याची सुंता केली. परंतु, चवथ्या वचनात आपण वाचतो की, पौल व तीमथ्य नगरांमधून जाता जाता “यरुशलेमेतील प्रेषित व वडील ह्‍यांनी जे ठराव केले” ते सांगत गेले. या ठरावांपैकी एक निर्णय असा होता की, यापुढे ख्रिश्‍चनांना सुंता करण्याची गरज नाही! (प्रेषितांची कृत्ये १५:५, ६, २८, २९) मग तीमथ्याने सुंता करावी हे पौलाला जरूरीचे का वाटले? “कारण [तीमथ्याचा] बाप हेल्लेणी आहे हे सर्वांना ठाऊक होते.” लोकांना अनावश्‍यकपणे ठोकर व्हावी अशी पौलाची इच्छा नव्हती. तर ख्रिश्‍चनांनी ‘देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सद्‌द्विवेकाला आपणास पटवत’ राहावे असे त्याला वाटत होते.—२ करिंथकर ४:२; १ करिंथकर ९:१९-२३.

पौल आणि तीमथ्याची विचारशैली अशीच होती. रोमकर १४:१५, २०, २१ आणि १ करिंथकर ८:९-१३; १०:२३-३३ मधील उतारे वाचून पौलाला इतरांच्या आध्यात्मिक कल्याणाची किती चिंता होती ते पाहा. खासकरून, जे लोक नियमानुसार चूक नसलेल्या एखाद्या गोष्टीवर अडखळत त्यांची त्याला चिंता होती. आणि पौलाने तीमथ्याविषयी असे लिहिले: “तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही; कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात; पण त्याचे शील तुम्हाला माहीत आहे की, जसा मुलगा बापाची सेवा करितो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे.” (फिलिप्पैकर २:२०-२२) या दोन ख्रिस्ती पुरुषांनी आपल्याकरता किती उत्तम आदर्श मांडला आहे! विशिष्ट ईश्‍वरी आज्ञा नसताना त्यांनी व्यक्‍तिगत सोय किंवा पसंत पाहिली नाही तर आपल्या निर्णयांचा इतरांवर काय आध्यात्मिक परिणाम होईल हे विचारात घेऊन यहोवा आणि त्याचा पुत्र यांच्या प्रीतीचे अनुकरण केले.

आपला सर्वश्रेष्ठ आदर्श येशू ख्रिस्त याचे उदाहरण घ्या. आपल्या डोंगरावरील प्रवचनात त्याने स्पष्टपणे म्हटले की, देवाच्या नियमांचा अर्थ जो समजून घेईल तो आज्ञा दिलेल्या किंवा मना केलेल्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन आज्ञाधारकता दाखवेल. (मत्तय ५:२१, २२, २७, २८) येशू, पौल, तीमथ्य किंवा योसेफ यांच्यापैकी कोणीही असा तर्क केला नाही की, विशिष्ट ईश्‍वरी नियम नाही म्हणजे मनात येईल तसे करता येते. देवाच्या विचारपद्धतीच्या एकवाक्यतेत या पुरुषांनी येशूने दिलेल्या दोन सर्वश्रेष्ठ आज्ञांनुसार आपले जीवन व्यतीत केले; त्या आज्ञा म्हणजे, देवावर प्रीती करणे आणि शेजाऱ्‍यावर प्रीती करणे.—मत्तय २२:३६-४०.

आज ख्रिश्‍चनांविषयी काय?

याचा अर्थ स्पष्ट आहे की, आपण बायबलला एखाद्या कायदेशीर दस्तऐवजासारखे समजू नये अर्थात त्यामध्ये काय करावे आणि काय करू नये ही प्रत्येक गोष्टी नमूद असण्याची अपेक्षा आपण करू नये. आपल्या कार्यांसाठी खास असा नियम नसला तरी आपण निवडलेल्या कार्यातून यहोवाची विचारपद्धत प्रदर्शित होते तेव्हा त्याचे अंतःकरण खूष होते. दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, देवाने प्रत्येक बाबतीत आपल्याला काय करावे ते सांगण्याऐवजी आपण “प्रभूची इच्छा काय आहे हे समजून” घेऊ शकतो. (तिरपे वळण आमचे.) (इफिसकर ५:१७; रोमकर १२:२) यामुळे यहोवा का आनंदित होतो? कारण यावरून दिसून येते की, आपल्याला स्वतःच्या आवडीनिवडींपेक्षा आणि हक्कांपेक्षा त्याला संतुष्ट करण्याची चिंता आहे. यावरून हे देखील दिसते की, त्याने दाखवलेल्या प्रीतीची आपल्याला इतकी कदर आहे की, आपणही तशी प्रीती दाखवू इच्छितो व अशाने त्या प्रीतीने प्रेरित होऊन सर्वकाही करतो. (नीतिसूत्रे २३:१५; २७:११) शिवाय, शास्त्रवचनांमधील सूचनांनुसार कार्य केल्याने आध्यात्मिक आणि शारीरिक आरोग्य लाभते.

व्यक्‍तिगत बाबतीत हे तत्त्व कसे लागू करता येईल ते आपण पाहू या.

मनोरंजनाची निवड

एका तरुणाचे उदाहरण घ्या ज्याला एक विशिष्ट म्यूझिक अल्बम विकत घ्यायचा आहे. त्याने या अल्बमविषयी जे काही ऐकले त्यावरून तर तो अल्बम त्याला फार चांगला वाटतो. परंतु अल्बमच्या मागच्या कव्हरवरून त्यातील गीतांचे बोल कामोत्तेजक आणि अश्‍लील आहेत हे दिसत असल्यामुळे त्याला चिंता वाटते. शिवाय, त्याला याचीही जाणीव आहे की, या विशिष्ट कलाकाराची बहुतेक गीते क्रोध आणि संताप व्यक्‍त करणारी आहेत. हा तरुण यहोवावर प्रीती करणारा असल्यामुळे त्याला यहोवाचे विचार आणि भावना जाणून घेण्याची इच्छा होती. याबाबत देवाची काय इच्छा आहे हे तो कसे जाणू शकतो?

गलतीकरांच्या पत्रात, प्रेषित पौल देहाच्या कर्मांविषयी आणि देवाच्या आत्म्याच्या फळाविषयी सांगतो. देवाच्या आत्म्याच्या फळात काय समाविष्ट आहे हे कदाचित तुम्हाला माहीत असेल: प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन. परंतु शरीराची कर्मे कोणती आहेत? पौल लिहितो: “देहाची कर्मे तर उघड आहेत; ती ही: जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मुर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी; ह्‍याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की, अशी कर्मे करणाऱ्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ, प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.”—गलतीकर ५:१९-२३.

त्या यादीतील सर्वात शेवटी काय म्हटले ते पाहा: “अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.” (तिरपे वळण आमचे.) देहाची कर्मे कोणती असू शकतात आणि कोणती नाही याची लांबलचक यादी पौलाने दिली नाही. पण याचा अर्थ एका व्यक्‍तीने असा तर्क करू नये की, ‘देहाच्या कर्मांच्या पौलाने दिलेल्या यादीत नसलेले काम करायला मी शास्त्रवचनानुसार मुक्‍त आहे.’ तर, वाचकांना यादीत नसलेल्या परंतु ‘अशांसारख्या’ असलेल्या गोष्टी ओळखण्यासाठी आपल्या समजशक्‍तीचा उपयोग करावा लागेल. ज्या गोष्टींचा उल्लेख नाही परंतु ज्या ‘अशांसारख्या’ गोष्टी आहेत त्या करण्यात जे लोक पश्‍चात्ताप न दाखवता सामील होतात त्यांना देवाच्या राज्याचे आशीर्वाद प्राप्त होणार नाहीत.

अशाप्रकारे, यहोवाच्या नजरेत कोणती गोष्ट असंतुष्टकारक आहे ती आपण समजून किंवा जाणून घ्यावी. हे कठीण आहे का? समजा, तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला फळे आणि भाज्या अधिक खा परंतु मिठाई, आईस्क्रिम वर्ज्य करा असे सांगितले आहे. मग, केक कोणत्या यादीत बसेल हे ठरवणे तुम्हाला कठीण जाईल का? आता पुन्हा एकदा देवाच्या आत्म्याचे फळ आणि देहाची कर्मे यांकडे लक्ष द्या. वरचा म्यूझिक अल्बम कोणत्या वर्गात मोडतो? त्याचा प्रीती, चांगुलपणा, आत्मसंयम किंवा देवाच्या आत्म्याच्या फळाशी संबंधित असलेल्या इतर कोणत्याही गुणांशी मेळ बसत नाही एवढे निश्‍चित. अशाप्रकारचे संगीत देवाच्या विचारपद्धतीच्या एकवाक्यतेत नाही हे समजण्यासाठी वेगळा असा नियम असण्याची गरज नाही. हेच तत्त्व वाचन साहित्य, चित्रपट, टीव्हीवरील कार्यक्रम, कंप्युटर गेम्स, वेब साईट्‌स वगैरेंच्या बाबतीतही खरे ठरते.

स्वीकारयोग्य पेहराव

वेशभूषा व केशभूषा याबाबतीतही बायबलची तत्त्वे आहेत. या तत्त्वांचे पालन केल्याने प्रत्येक ख्रिश्‍चनाला स्वतःचे स्वरूप उचित व मनास भावेल असे ठेवण्यास मदत मिळेल. पण याबाबतीतही यहोवावर प्रीती करणाऱ्‍याला स्वतःच्या मनाप्रमाणे करण्याची नव्हे तर त्याच्या स्वर्गीय पित्याला कशामुळे संतोष होईल ते करण्याची संधी दिसते. आपण आधीच पाहिल्याप्रमाणे, यहोवाने एखाद्या गोष्टीविषयी खास नियम दिले नाहीत याचा अर्थ असा नाही की, त्याला आपल्या लोकांची काळजी नाही. प्रत्येक ठिकाणच्या पेहरावाची पद्धत वेगवेगळी असते आणि त्या त्या ठिकाणी देखील वेळोवेळी त्यात बदल होत राहतो. परंतु, देवाने काही मूलभूत तत्त्वे दिली आहेत ज्यांचा त्याच्या लोकांवर कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी परिणाम झाला पाहिजे.

उदाहरणार्थ, १ तीमथ्य २:९, १० म्हणते: “तसेच स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; केस गुंफणे आणि सोने, मोत्ये व मोलवान्‌ वस्त्रे ह्‍यांनी नव्हे, तर देवभक्‍ति स्वीकारलेल्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास शोभवावे.” अशाप्रकारे, ख्रिस्ती स्त्रियांनी—आणि पुरुषांनी—आपल्या क्षेत्रातील लोक ‘देवभक्‍ती स्वीकारलेल्यांकडून’ कोणत्या प्रकारच्या पेहरावाची अपेक्षा करतात याचा विचार केला पाहिजे. खासकरून, एका ख्रिश्‍चनाने याचा विचार करणे योग्य आहे की, त्याच्या पेहरावामुळे लोक त्याच्या बायबल संदेशाबद्दल काय विचार करतील. (२ करिंथकर ६:३) आदर्श ख्रिश्‍चनाला स्वतःच्या आवडीनिवडींची किंवा तथाकथित हक्कांची अधिक चिंता नसेल परंतु इतरांकरता विकर्षण ठरू नये किंवा अडखळण ठरू नये याची चिंता मात्र त्याला असेल.—मत्तय १८:६; फिलिप्पैकर १:१०.

व्यक्‍तिगत पेहरावाच्या एखाद्या स्टाईलामुळे इतरांना धक्का बसतो किंवा तिने ते अडखळतात हे पाहून एक ख्रिस्ती आपल्या आवडीनिवडींपेक्षा इतरांच्या आध्यात्मिक हिताची अधिक चिंता करून प्रेषित पौलाचे अनुकरण करील. पौल म्हणाला: “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा.” (१ करिंथकर ११:१) आणि येशूविषयी पौलाने लिहिले: “ख्रिस्तानेहि स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही.” पौलाने ख्रिश्‍चनांना दिलेला सल्ला स्पष्ट आहे: “आपण जे सशक्‍त आहो त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्‍तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे. आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्‍याची उन्‍नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे.”—रोमकर १५:१-३.

आपली समजशक्‍ती वाढवणे

यहोवाने एखाद्या गोष्टीसंबंधी खास निर्देशन दिलेले नसताना त्याला संतुष्ट करणे कसे शक्य आहे हे समजण्यासाठी आपण आपली समजशक्‍ती कशी वाढवू शकतो? आपण त्याचे वचन दररोज वाचले, त्याचा नियमित अभ्यास केला आणि वाचलेल्या गोष्टींवर मनन केले तर आपली समजशक्‍ती वाढेल. पण ही वाढ झपाट्याने होत नसते. लहान मुलाच्या शारीरिक वाढीप्रमाणेच आध्यात्मिक वाढ देखील हळूहळू होत असते आणि ती लगेच दिसून येत नाही. त्यामुळे सहनशीलतेची आवश्‍यकता आहे आणि आपल्याला तत्काळ सुधारणा दिसली नाही तर आपण चिडू नये. दुसऱ्‍या बाजूला पाहता, केवळ पुष्कळ वेळ दिल्यामुळे आपोआप आपली समजशक्‍ती वाढू शकत नाही. तर या वेळेत वरती सांगितल्याप्रमाणे देवाच्या वचनाचा नियमित विचार केला पाहिजे आणि जमेल तितके त्या वचनानुसार आपण जगले पाहिजे.—इब्री लोकांस ५:१४.

देवाचे नियम आपली आज्ञाधारकता पारखतात तर त्याची तत्त्वे आपल्या आध्यात्मिकतेची पातळी आणि देवाला संतुष्ट करण्याची आपली इच्छा तपासतात. आध्यात्मिकरित्या आपली वाढ होत असताना यहोवाचे आणि त्याच्या पुत्राचे अनुकरण करण्यावर आपण अधिक जोर देऊ. शास्त्रवचनात दाखवल्याप्रमाणे देवाच्या विचारपद्धतीनुसार निर्णय घेण्यास आपण उत्सुक असू. आपल्या प्रत्येक कार्यात आपण स्वर्गीय पित्याला आनंदित करू तसे आपलाही आनंद द्विगुणित झालेला आपण पाहू.

[२३ पानांवरील चित्रे]

प्रत्येक ठिकाणच्या पेहरावाची पद्धत वेगवेगळी असली तरी, बायबल तत्त्वांनुसार आपण निवड केली पाहिजे