व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्पत्तीच्या पुस्तकातील ठळक मुद्दे—१

उत्पत्तीच्या पुस्तकातील ठळक मुद्दे—१

यहोवाचे वचन सजीव आहे

उत्पत्तीच्या पुस्तकातील ठळक मुद्दे—१

“उत्पत्ती” याचा अर्थ “उगम” किंवा “जन्म.” हे नाव, विश्‍व अस्तित्वात कसे आले, पृथ्वीला मानवांच्या वसतीकरता कसे तयार करण्यात आले आणि मानव त्यावर कसे राहू लागले याविषयी सांगणाऱ्‍या पुस्तकासाठी एकदम उचित आहे. मोशेने हे पुस्तक सिनायच्या अरण्यात लिहिले आणि सुमारे सा.यु.पू. १५१३ साली ते पूर्ण केले.

उत्पत्तीच्या पुस्तकात प्रलयाआधीच्या जगाविषयी, प्रलयानंतरचे युग सुरू झाल्यावर काय झाले त्याविषयी आणि यहोवाने अब्राहाम, इसहाक, याकोब व योसेफ यांच्याशी कसा व्यवहार केला याविषयी माहिती दिली आहे. उत्पत्ति १:१–११:९ मधील ठळक मुद्द्‌यांचा, विशेषकरून कुलपिता अब्राहामसोबत यहोवाने व्यवहार करायचे सुरू केले तोपर्यंतच्या काळाची या लेखात चर्चा केली आहे.

प्रलयाआधीचे जग

(उत्पत्ति १:१–७:२४)

उत्पत्तीच्या पुस्तकातील सुरवातीचा “प्रारंभी” हा शब्द, कोट्यवधी वर्षांपर्यंत गतकाळात जातो. सहा निर्मितीच्या ‘दिवसांतील’ किंवा खास निर्मिती कार्ये करण्यात आली त्या कालावधीतील घटनांचे वर्णन, त्या काळी कोणी मानव असता तर त्याला कसे दिसले असते त्याप्रकारे केले आहे. सहाव्या दिवसाच्या शेवटी, देवाने मानवाला निर्माण केले. मानवाच्या अवज्ञेमुळे परादीस लगेच नाहीसे झाले तरी यहोवाने आशा दिली. बायबलच्या पहिल्याच भविष्यवाणीत एका ‘संततिविषयी’ सांगितले आहे जी पापाचे विपरित परिणाम नाहीसे करून सैतानाला डोक्यात जखमी करील.

त्यानंतरच्या १६ शतकांमध्ये सैतानाला हाबेल, हनोख आणि नोहासारख्या क्वचित विश्‍वासू जणांना वगळता बाकीच्या सर्व मानवांना देवाच्या विरोधात करण्यात यश मिळते. उदाहरणार्थ, काईन आपला नीतिमान भाऊ हाबेल याचा खून करतो. मग “परमेश्‍वराच्या नावाने प्रार्थना” केली जाऊ लागते; हे स्पष्टतः अनादराने केले जाते. लामेखने स्वतःचे संरक्षण करताना एका तरुणाला कसे ठार मारले यावर तो एक काव्य रचतो; यावरून त्या काळची हिंसक प्रवृत्ती दिसून येते. परिस्थिती याहून बिकट होते; बंडखोर देवपुत्र स्त्रियांना आपल्या बायका बनवतात आणि त्यांना नेफिलीम ही आक्रमक व शक्‍तिशाली संताने होतात. तरीही, विश्‍वासू नोहा तारू बांधतो, धैर्याने येणाऱ्‍या प्रलयाविषयी इतरांना ताकीद देतो आणि आपल्या कुटुंबासोबत त्या नाशातून वाचतो.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:१६—चवथ्या दिवसापर्यंत सूर्यचंद्रादि तेजस्वी गोल निर्माण केले नसताना पहिल्या दिवशी देवाने प्रकाश कसा केला? १६ व्या वचनातला ‘करणे’ हा इब्री शब्द उत्पत्तिच्या पहिल्या अध्यायातील १, २१, आणि २७ वचनातील ‘निर्माण करणे’ या शब्दापेक्षा वेगळा आहे. तेजस्वी गोल ज्यात होते ते आकाश ‘पहिल्या दिवसाची’ सुरवात होण्याच्या कितीतरी आधीच निर्माण करण्यात आले होते. परंतु त्यांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहंचला नाही. पहिल्या दिवशी “प्रकाश झाला” कारण पसरलेला प्रकाश ढगांच्या थरांना छेदून पृथ्वीवर दिसू लागला होता. अशाप्रकारे वाटोळे फिरणाऱ्‍या पृथ्वीवर आळीपाळीने दिवस आणि रात्र होऊ लागली. (उत्पत्ति १:१-३, ५) त्या प्रकाशाचा उगम मात्र पृथ्वीवरून अद्यापही दिसत नव्हता. परंतु, चवथ्या निर्मिती काळात एक उल्लेखनीय बदल घडला. सूर्य, चंद्र आणि तारे यांनी “पृथ्वीवर प्रकाश पाडावा” असे करण्यात आले. (उत्पत्ति १:१७) “देवाने [त्या] केल्या” अर्थात आता त्या पृथ्वीवरून दिसू लागल्या.

३:८—यहोवा देव आदामाशी थेट बोलत होता का? बायबल प्रकट करते की, देव मानवांशी सहसा देवदूताकरवी बोलत असे. (उत्पत्ति १६:७-११; १८:१-३, २२-२६; १९:१; शास्ते २:१-४; ६:११-१६, २२; १३:१५-२२) देवाचा मुख्य प्रवक्‍ता म्हणजे केवळ त्याचा एकुलता एक पुत्र, ज्याला “शब्द” म्हटले आहे तो होता. (योहान १:१) देव आदाम आणि हव्वेशी या ‘शब्दाकरवी’ बोलला असेल याची शक्यता अधिक आहे.—उत्पत्ति १:२६-२८; २:१६; ३:८-१३.

३:१७—जमीन कोणत्या अर्थाने शापित होती, आणि किती काळापर्यंत? जमिनीला शाप देण्यात आला म्हणजे शेती करणे कठीण जाणार होते. आदामाच्या वंशाला काटे-कुसळ्यांच्या शापित जमिनीमुळे इतका त्रास झाला की, नोहाचा पिता लामेख याने “जी भूमि परमेश्‍वराने शापिली तिच्यासंबंधाने . . . आमच्या हातचे कष्ट” असे तिच्याविषयी उद्‌गार काढले. (उत्पत्ति ५:२९) प्रलयानंतर यहोवाने नोहा आणि त्याच्या पुत्रांना आशीर्वादित केले आणि त्यांनी पृथ्वी व्यापून टाकावी हा त्याचा उद्देश आहे हे सांगितले. (उत्पत्ति ९:१) नंतर देवाने जमिनीला दिलेला शाप रद्द केला असे दिसते.—उत्पत्ति १३:१०.

४:१५—यहोवाने काईनाला कशाप्रकारे “खूण नेमून दिली”? काईनाच्या शरीरावर कोणती खूण किंवा निशाण करण्यात आले होते असे बायबल सांगत नाही. ही खूण म्हणजे एक महत्त्वाची आज्ञा होती जी लोकांना ठाऊक होती व ते तिचे पालन करत होते; ही आज्ञा, कोणी त्याचा सूड उगवून त्याला ठार मारू नये म्हणून देण्यात आली होती.

४:१७—काईनाला आपली पत्नी कोठून मिळाली? आदामाला “आणखी मुलगे व मुली झाल्या.” (उत्पत्ति ५:४) त्यामुळे काईनाने आपल्याच एका बहिणीला नाहीतर कदाचित पुतणी अथवा भाचीला पत्नी म्हणून घेतले असावे. नंतर, देवाने इस्राएलांना दिलेल्या नियमशास्त्रानुसार सख्ख्या भाऊ-बहिणीच्या विवाहाला अनुमती नव्हती.—लेवीय १८:९.

५:२४—देवाने ‘हनोखला नेले’ ते कोणत्या अर्थाने? हनोखच्या जीवाला धोका होता परंतु देवाने त्याला त्याच्या शत्रूंच्या हाती दुःख सोसायला दिले नाही. “हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्‍वासाने लोकांतरी नेण्यात आले,” असे प्रेषित पौलाने लिहिले. (इब्री लोकांस ११:५) याचा अर्थ देवाने त्याला स्वर्गात नेले आणि तेथे तो जिवंत राहिला असे नाही. येशू हा स्वर्गात जाणारा पहिला होता. (योहान ३:१३; इब्री लोकांस ६:१९, २०) हनोखाला “मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला . . . लोकांतरी नेण्यात आले” म्हणजे देवाने त्याला, दृष्टान्त पाहताना संदेष्टे ज्या अवस्थेत असतात तशा मुर्च्छेत घातले आणि त्या अवस्थेत असतानाच त्याचे जीवन संपवले. अशा परिस्थितीत, हनोखला कसलाच त्रास झाला नाही किंवा त्याला शत्रूंच्या हाती “मरणाचा अनुभव” आला नाही.

६:६—कोणत्या अर्थी मानवाला उत्पन्‍न केल्याचा यहोवाला “अनुताप झाला”? येथे “अनुताप झाला” असे भाषांतरित केलेल्या इब्री शब्दाचा संबंध मनोवृत्तीत किंवा हेतूत बदल होण्याशी आहे. यहोवा परिपूर्ण आहे त्यामुळे मानवाला निर्माण करून त्याने कसलीही चूक केली नव्हती. परंतु, प्रलयापूर्वीच्या दुष्ट पिढीमुळे त्याची मनोवृत्ती निश्‍चितच बदलली. त्यांच्या दुष्टतेमुळे नाराज होऊन मानवांचा निर्माणकर्ता त्यांचा विनाशकर्ता बनला. त्याने काही मानवांना वाचवले यावरून दिसते की, त्याला फक्‍त दुष्ट लोकांचा अनुताप झाला होता.—२ पेत्र २:५, ९.

७:२—शुद्ध आणि अशुद्ध प्राण्यांमध्ये कोणत्या आधारे भेद केला जात होता? भेद करण्याचा आधार उपासनेत कोणत्या प्राण्यांचे अर्पण करावे यासंबंधी होता, कोणत्या प्राण्याचे मांस खाल्ले जाऊ शकते आणि कोणत्या प्राण्याचे मांस खाल्ले जाऊ शकत नाही यासंबंधी नव्हता. प्रलयापूर्वी मानवाच्या आहारात मांसाहाराचा समावेश नव्हता. अन्‍नाच्या बाबतीत “शुद्ध” आणि “अशुद्ध” हे मोशेच्या नियमशास्त्राकरवी सुरू झाले आणि नियमशास्त्र रद्द करण्यात आले तेव्हा ते देखील नाहीसे झाले. (प्रेषितांची कृत्ये १०:९-१६; इफिसकर २:१५) स्पष्टतः, यहोवाच्या उपासनेत कोणते बलिदान योग्य असेल हे नोहाला ठाऊक होते. तारवातून बाहेर पडताच त्याने “परमेश्‍वरासाठी वेदी बांधिली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्याचे होमार्पण केले.”—उत्पत्ति ८:२०.

७:११—जागतिक प्रलय झाला त्याचे पाणी कोठून आले? निर्मितीच्या दुसऱ्‍या काळात, किंवा ‘दिवशी’ पृथ्वीच्या वातावरणाचे “अंतराळ” करण्यात आले तेव्हा ‘अंतराळाखाली’ आणि ‘अंतराळावरती’ जल होते. (उत्पत्ति १:६, ७) ‘खालचे’ जल पृथ्वीवर आधीपासूनच होते. ‘वरचे’ जल म्हणजे पृथ्वीच्या पुष्कळ वरती मोठ्या प्रमाणात आर्द्रता तरंगत होती ज्याचे ‘महाजलाशय’ झाले होते. नोहाच्या काळात हेच पाणी पृथ्वीवर पडले.

आपल्याकरता धडे:

१:२६.देवाच्या प्रतिरूपात मानवांना निर्माण केलेले असल्यामुळे देवाचे गुण दाखवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आपण देखील आपल्या निर्माणकर्त्याप्रमाणे प्रीती, दया, नम्रता, चांगुलपणा आणि सहनशीलता हे गुण दाखवण्याचा प्रयत्न करावा.

२:२२-२४.विवाह ही देवाने केलेली व्यवस्था आहे. वैवाहिक बंधन कायमचे आणि पवित्र आहे ज्यात पती कुटुंबाचा प्रमुख असतो.

३:१-५, १६-२३.आपल्या व्यक्‍तिगत जीवनात आपण यहोवाच्या सार्वभौमत्वाला ओळखतो किंवा नाही यावर आपला आनंद निर्भर आहे.

३:१८, १९; ५:५; ६:७; ७:२३.यहोवाचे वचन नेहमी सत्य ठरते.

४:३-७.हाबेलच्या अर्पणाने यहोवा खूष होता कारण तो विश्‍वास बाळगणारा नीतिमान मनुष्य होता. (इब्री लोकांस ११:४) दुसऱ्‍या बाजूला पाहता, काईनाला विश्‍वास नव्हता हे त्याच्या कृत्यांवरून स्पष्ट झाले. त्याची कार्ये दुष्ट होती; ती मत्सर, द्वेष आणि खूनी प्रवृत्ती दर्शवणारी होती. (१ योहान ३:१२) शिवाय, त्याने आपल्या अर्पणाबद्दल फार विचार न करता फक्‍त ते सादर करायचे म्हणून केले. आपण यहोवाला स्तुतीयज्ञ अर्पण करतो तेव्हा ते मनापासून आणि योग्य मनोवृत्ती व उचित वर्तनासहित अर्पण करू नये का?

६:२२.नोहाला तारू बांधायला कित्येक वर्षे लागली तरीही त्याने देवाने जसे सांगितले तसेच केले. म्हणून नोहा आणि त्याच्या कुटुंबाला प्रलयातून वाचवण्यात आले. यहोवा आपल्याशी त्याच्या वचनाद्वारे बोलतो आणि त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला मार्गदर्शन देतो. त्याकडे लक्ष देऊन त्याचे पालन केल्यास आपलाच फायदा होईल.

७:२१-२४.यहोवा दुष्टांसोबत नीतिमानांनाही नष्ट करत नाही.

मानवजात नवीन युगात प्रवेश करते

(उत्पत्ति ८:१–११:९)

प्रलयापूर्वीच्या जगाचा नाश झाल्यावर मानवजात एका नवीन युगात प्रवेश करते. मानवांना मांस खाण्याच्या अनुमतीसह रक्‍त वर्ज्य करण्याची आज्ञा देण्यात येते. रक्‍तपाताची शिक्षा मृत्यू असे यहोवा ठरवतो आणि मेघधनुष्य करार प्रस्थापित करतो व पुन्हा कधीही प्रलय न आणण्याचे वचन देतो. नोहाचे तीन पुत्र संपूर्ण मानवजातीचे पूर्वज बनतात पण त्याचा पणतू “परमेश्‍वरासमोर बलवान पारधी” होतो. पृथ्वीवर लोकवस्ती वाढवण्याऐवजी लोक बाबेल नावाचे शहर व बुरूज बांधण्याचा विचार करतात व त्याद्वारे स्वतःचे नाव करण्याचा विचार करतात. परंतु यहोवा त्यांच्या भाषेत घोटाळा करतो आणि त्यांना पृथ्वीवर पांगवतो तेव्हा त्यांचा हा हेतू सफल होत नाही.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

८:११—प्रलयात सर्व झाडे नष्ट झाली तेव्हा पारव्याला जैतुनाच्या झाडाचे पान कोठून मिळाले? याला दोन शक्यता आहेत. जैतुनाचे झाड अत्यंत चिवट असल्यामुळे प्रलयादरम्यान ते कदाचित काही महिने पाण्याखाली जिवंत राहिले असेल. प्रलयाचे पाणी ओसरू लागल्यावर पाण्याखाली असलेले जैतुनाचे झाड पुन्हा वर दिसू लागले आणि त्याला पाने फुटली. पारव्याने नोहाला आणून दिलेले जैतुनाच्या झाडाचे पान प्रलयाचे पाणी ओसरल्यानंतर नव्याने कोंब फुटलेल्या झाडाचे पान असू शकते.

९:२०-२५—नोहाने कनानला शाप का दिला? कनानने कदाचित आपला आजोबा नोहा याच्यासोबत अपवर्तन किंवा विकृत व्यवहार केला होता. कनानचा पिता हाम याने हे पाहिले परंतु तो मध्ये पडला नाही; मात्र त्याने याविषयी इतरांना जाऊन सांगितले. परंतु, नोहाचे इतर दोन पुत्र शेम आणि याफेथ यांनी आपल्या पित्याला झाकले. याकरता त्यांना आशीर्वाद देण्यात आला पण कनानला शाप देण्यात आला आणि आपल्या संततीला लज्जित केल्यामुळे हामला याचा परिणाम भोगावा लागला.

१०:२५—पेलेगच्या काळात पृथ्वीची “वाटणी” कशी झाली होती? पेलेग सा.यु.पू. २२६९ पासून ते सा.यु.पू. २०३० पर्यंत जिवंत राहिला. ‘त्याच्याच वेळी’ यहोवाने बाबेल शहर बांधणाऱ्‍यांच्या भाषेत घोटाळा करून त्यांना पृथ्वीच्या पाठीवर पांगवले आणि त्या सर्वांना वेगळे केले. (उत्पत्ति ११:९) अशाप्रकारे, पेलेगच्या वेळी “पृथ्वीची [अथवा, पृथ्वीवरील लोकांची] वाटणी झाली.”

आपल्याकरता धडे:

९:१; ११:९.कोणताही मानवी डावपेच किंवा प्रयत्न यहोवाच्या उद्देशाला विफल करू शकत नाही.

१०:१-३२.प्रलयाच्या अहवालाआधी आणि नंतर नोंदून ठेवलेली वंशावळ—अध्याय ५ आणि १०—संपूर्ण मानवजातीला नोहाच्या तीन पुत्रांद्वारे पहिला पुरुष, आदाम याच्याशी जोडते. अश्‍शुरी, खास्दी, इब्री, सिरियन आणि काही अरेबियन जमाती हे सर्व शेमचे वंशज होते. इथियोपियन, ईजिप्शियन, कनानी आणि काही आफ्रिकन व अरेबियन जमाती हामचे वंशज होते. इंडो-युरोपियन हे याफेथचे वंशज आहेत. सर्व मानवांचे एकमेकांशी नाते आहे आणि देवासमोर हे सर्व समान आहेत. (प्रेषितांची कृत्ये १७:२६) हे सत्य जाणल्यावर इतरांना आपण कोणत्या दृष्टीने पाहतो व त्यांच्याशी कसा व्यवहार करतो याचा आपण विचार केला पाहिजे.

देवाचे वचन सजीव आहे

प्रारंभीच्या मानवी इतिहासाचा एकमेव अचूक अहवाल केवळ उत्पत्तिच्या पुस्तकातील पहिल्या भागात मिळतो. या अहवालातून, देवाने मानवाला या पृथ्वीवर ठेवण्याचा काय उद्देश होता त्याविषयी आपल्याला कळते. निम्रोदाप्रमाणे कोणत्याही मानवाने प्रयत्न केला तरी देवाचा उद्देश विफल होणार नाही ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे!

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेकरता तुम्ही साप्ताहिक बायबल वाचन करता तेव्हा, “शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे” या विभागात दिलेले साहित्य वाचल्यावर तुम्हाला शास्त्रवचनातील काही कठीण उतारे समजायला सोपे जाईल. सप्ताहाच्या बायबल वाचनाचा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो हे “आपल्याकरता धडे” यातील मजकुरातून तुम्हाला कळेल. उचित असेल तेव्हा हे साहित्य, सेवा सभेतील स्थानीय गरजा हा भाग हाताळण्याकरता आधार ठरू शकते. यहोवाचे वचन खरोखर सजीव आणि सक्रिय आहे ज्याचा परिणाम आपल्या जीवनात होऊ शकतो.—इब्री लोकांस ४:१२.