व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“जगाची नाभी” म्हटलेल्या ठिकाणी एकत्रित होणे

“जगाची नाभी” म्हटलेल्या ठिकाणी एकत्रित होणे

“जगाची नाभी” म्हटलेल्या ठिकाणी एकत्रित होणे

“टे पिटो ओ टे हेन्वा?” हे शब्द कधी तुमच्या ऐकण्यात आले आहेत का? रापा नुई या ईस्टर बेटावर बोलल्या जाणाऱ्‍या मूळ भाषेत त्यांचा अर्थ “जगाची नाभी” असा होतो. येथे झालेले संमेलन इतके विशेष का होते?

एकाकी, रहस्यमय, नवलाईने भरपूर. ईस्टर बेटाचे—मूळ रहिवाशांच्या भाषेत रापा नुईचे वर्णन करण्यासाठी अशी वेगवेगळी विशेषणे वापरण्यात आली आहेत. चिली देशातल्या सॅन्टियागो शहरापासून ३,७९० किलोमीटर अंतरावर, दक्षिण प्रशांत समुद्रात वसलेले हे बेट खरोखरच एकाकी आहे. सप्टेंबर ९, १८८८ रोजी ते चिली देशाच्या क्षेत्रात एक प्रांत म्हणून सामावण्यात आले.

एकशे सहासष्ट चौरस किलोमीटरचा परिसर असलेले हे त्रिकोणी बेट खरे तर तीन मृत ज्वालामुखींपासून बनलेले आहे. किंबहुना, प्रशांत महासागरातील अनेक बेटांप्रमाणे हे बेट म्हणजे पाण्याखालील विशाल पर्वतांच्या माथ्यांपासून तयार झाले आहे. सबंध बेटाला एक नैसर्गिक स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. अर्थात या बेटाचे सर्वात सुप्रसिद्ध वैशिष्ठ्य म्हणजे येथील रहस्यमय मोआय पाषाणमूर्ती. *

मनोवेधक देखावे व ऐतिहासिक स्थाने यांव्यतिरिक्‍त ईस्टर बेटावर निरनिराळ्या बहारदार खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. येथे पेरू, अननस, नारळ, ॲव्हकाडो, रताळी, पपई व नऊ प्रकारची केळी पिकतात. शिवाय, समुद्रातून निरनिराळ्या प्रकारचे मासे व इतर समुद्री खाद्य प्राप्त होते.

ईस्टर बेटावरील हवामान बेताचे आहे. पाऊस वेळोवेळी हजेरी लावतो आणि मेघधनुष्यही वरचेवर पाहायला मिळतात, त्यामुळे पर्यटकांना ताजी हवा मिळते शिवाय, नेत्रदीपक देखावे सुद्धा. सध्या येथे सुमारे ३,८०० लोकांची वस्ती आहे. या बेटावर येऊन स्थाईक झालेल्या मूळ रहिवाशांच्या वंशजांसोबतच युरोपियन, चिलीयन आणि इतर देशांचे लोक येथे आज राहतात. शिवाय, युरोप व आशिया येथून शेकडो पर्यटक येतात व त्यामुळे पर्यटन उद्योगाची येथील अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका आहे.

राज्याची पहिलीवहिली बीजे पेरण्यात आली

यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक, १९८२ (इंग्रजी) यात असा उल्लेख होता: “ईस्टर बेटावर आतापर्यंत एकच एकाकी प्रचारक होती. तिला [चिली] शाखा दफ्तरातून एका मिशनरी बहिणीने पत्रव्यवहाराद्वारे आध्यात्मिक मदत पुरवली. ही प्रचारक आता चिली मेनलँडवर स्थाईक झाली आहे पण बेटावर राहणाऱ्‍या अनेक टेहळणी बुरूज वर्गणीदारांची नावे आमच्या रेकॉर्डमध्ये आहेत. १९८० साली एप्रिल महिन्यात या बेटावरून आम्हाला एका आस्थेवाईक व्यक्‍तीचा फोन आला तेव्हा आम्हाला आश्‍चर्य वाटले. या व्यक्‍तीला स्मारकविधी केव्हा साजरा करायचा हे जाणून घ्यायचे होते. त्याच वर्षी वालपारायसो येथून एक विवाहित जोडपे बेटावर स्थाईक झाले आणि त्यांनी अनेक आस्थेवाईक लोकांसोबत बायबल अभ्यास सुरू केले आहेत. १९८१ सालच्या एप्रिल महिन्यात या बेटावर पहिल्यांदा स्मारकविधीची सभा भरवण्यात आली आणि या सभेला १३ जण हजर होते. या दूरस्थ प्रदेशातही ‘सुवार्ता’ पोचत आहे हे पाहून अत्यंत समाधान वाटते!”

नंतर, जानेवारी ३०, १९९१ साली शाखा दफ्तराने डार्यो व विनी फरनॅन्डज या खास पायनियर जोडप्याला ईस्टर बेटावर पाठवले. बंधू फरनॅन्डज सांगतात: “विमानाने पाच तास प्रवास केल्यानंतर आम्ही पृथ्वीग्रहावरील एका अत्यंत एकाकी प्रदेशात, एका रहस्यमय संस्कृतीच्या लोकांमध्ये येऊन पोचलो.” एक स्थानिक बांधव आणि नुकतीच आपल्या दोन मुलांसोबत येथे येऊन स्थाईक झालेली एक बहीण यांच्या मदतीने सभा व प्रचार कार्य सुनियोजित पद्धतीने सुरू करण्यात आले. कुटुंबाकडून दबाव, धर्माभिमान आणि पॉलिनेशियन संस्कृतीत सर्वसामान्य असणारी विशिष्ट जीवनशैली यांसारखे अडथळे असूनही या बांधवांना त्यांच्या प्रयत्नांवर यहोवाचा आशीर्वाद असल्याची प्रचिती झाली. फरनॅन्डज दांपत्य आता खास पायनियर नाहीत पण ते अजूनही या बेटावर राहतात; त्यांना एक मुलगा आहे ज्याचा येथेच जन्म झाला. आज येथे एकूण ३२ आनंदी राज्य प्रचारक आहेत. त्यांपैकी काही मूळ रापा नुई रहिवासी देखील आहेत तसेच बेटावर येऊन स्थाईक झालेले व राज्य प्रचारकांची जास्त गरज असल्यामुळे येथे सेवा करण्यासाठी आलेले बांधव देखील आहेत.

विभागीय संमेलनाची तयारी

दक्षिण अमेरिकेच्या खंडापासून अतिशय दूर असल्यामुळे ईस्टर बेटावरील मंडळीकरता वर्षातून तीन वेळा खास संमेलन दिन, विभागीय संमेलन आणि प्रांतीय अधिवेशन कार्यक्रमांच्या व्हिडिओ टेप्स पाठवल्या जायच्या. पण २००० सालच्या उत्तरार्धात चिली येथील शाखा समिती, बेटावर स्वतंत्र संमेलन पहिल्यांदाच भरवण्याचा विचार करू लागली. शेवटी, २००१ सालच्या नोव्हेंबर महिन्यात येथे संमेलन भरवायचे ठरले आणि या विशेष प्रसंगासाठी चिलीच्या वेगवेगळ्या भागांतून मर्यादित संख्येत बंधू भगिनींना निमंत्रित करण्यात आले. विमानांच्या वेळापत्रकामुळे संमेलन रविवारी व सोमवारी आयोजित करण्यात आले.

निमंत्रण मिळालेले ३३ प्रतिनिधी, या एकाकी प्रदेशात पहिल्यांदाच होत असलेल्या विभागीय संमेलनात सामील होण्याच्या केवळ विचारानेच रोमांचित झाले. प्रशांत महासागरावरून अनेक तासांच्या प्रवासानंतर शेवटी विमातळावर पोचल्यावर स्थानिक बांधवांनी या बांधवांचे स्वागत केले तेव्हा त्यांना अक्षरशः हायसे झाले. पाहुण्यांच्या गळ्यात फुलांच्या पाकळ्यांचे हार (लीस) घालून ईस्टर बेटावरील पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. नंतर त्यांना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी नेण्यात आले आणि बेटावरील प्रेक्षणीय ठिकाणांना धावती भेट दिल्यानंतर, संमेलन कार्यक्रमात भाग हाताळणारे राज्य सभागृहात सभेसाठी एकत्र झाले.

अनपेक्षित प्रसिद्धी

संमेलनाच्या ठिकाणी मोटारीने जात असताना काही प्रतिनिधींनी रेडिओवर त्यांच्या भेटीसंबंधी एका स्थानिक पाळकाची घोषणा ऐकली तेव्हा त्यांना आश्‍चर्य वाटले. पाळकाने मेनलँडवरून आलेल्या पर्यटकांचा उल्लेख केला व ते घरोघरी जाऊन जगाच्या येणाऱ्‍या नाशाबद्दल सांगणार आहेत असेही श्रोत्यांना सांगितले. या पाहुण्यांचे ऐकून घेऊ नका असे त्याने आपल्या चर्चच्या सदस्यांना बजावले; काहीही असो, त्याच्या घोषणेमुळे बेटावर यहोवाचे साक्षीदार मोठ्या संख्येने एकत्रित होत आहेत हे निदान सर्वांना कळले. यामुळे रहिवाशांचे कुतूहल वाढले आणि पुढील काही दिवस प्रतिनिधींनी व्यवहारचातुर्याचा वापर करून त्यांना सुवार्तेचा सांत्वनदायक संदेश सांगितला.

संमेलनाला सुरवात

रविवारी सकाळी, प्रतिनिधी संमेलनाच्या पहिल्या दिवशी राज्य सभागृहात आले तेव्हा स्थानिक बांधव प्रवेशद्वाराजवळ त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. इयोराना कोई! इयोराना कोई! “सुस्वागतम!” काही भगिनींनी पारंपरिक पोशाख घातले होते आणि अस्सल पॉलिनेशियन पद्धतीने केसांत सुरेख फुले गुंफली होती.

सुरवातीला सुरेल संगीतानंतर शंभर उपस्थितांनी “बी स्टेडफास्ट, अन्मुवेबल” हे गीत एकसुरात गायिले. येथे पूर्वी कधीच इतक्या जणांनी एकसाथ राज्यगीत गायिले नव्हते. कार्यक्रमाच्या अध्यक्षकांनी रापा नुई या स्थानिक भाषेत सर्वांचे स्वागत केले तेव्हा स्थानिक बांधवांना अक्षरशः भरून आले. दुपारच्या अंतरालात तीन नवीन साक्षीदारांनी देवाला केलेले समर्पण पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन जाहीर केले. पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपला तेव्हा सर्वांना यहोवाबद्दल आणि सबंध बंधुवर्गाबद्दल एक विशेष आत्मीयता जाणवली.—१ पेत्र ५:९.

प्रातःकालीन साक्षकार्य

बेटावरील काही विशेष परिस्थितीमुळे, विभागीय संमेलनाच्या दुसऱ्‍या दिवसाचा कार्यक्रम दुपारच्या जेवणानंतर सुरू झाला. त्यामुळे प्रतिनिधींनी सकाळच्या वेळेचा क्षेत्र सेवेकरता सदुपयोग केला. त्यांना कशाप्रकारचे अनुभव आले?

आठ मुलेमुली असलेल्या एका वयस्क स्त्रीने, साक्षीदारांना सांगितले की ती त्यांच्याशी बोलू शकत नाही कारण ती कॅथलिक आहे. पण साक्षीदारांनी सर्वांना तोंड द्याव्या लागणाऱ्‍या समस्यांविषयी, उदाहरणार्थ अंमली पदार्थांचे व्यसन आणि कौटुंबिक समस्या यांसारख्या विषयांवर आपल्याला बोलायचे आहे असे सांगितले तेव्हा ती ऐकायला तयार झाली.

एका वयस्क स्थानिक स्त्रीनेही एका साक्षीदार जोडप्याला अगदी थंड प्रतिसाद दिला. ती त्यांना म्हणाली की त्यांनी जाऊन दक्षिण अमेरिकेच्या खंडात राहणाऱ्‍या लोकांशी बोलावे कारण ते अतिशय क्रूर आहेत. दांपत्याने तिला सांगितले की ‘राज्याची सुवार्ता’ सर्वांकरता आहे. त्यांनी सांगितले की ते ईस्टर बेटावर एका संमेलनाला उपस्थित राहण्याकरता आले आहेत व हे संमेलन लोकांना देवाबद्दल अधिक प्रेम उत्पन्‍न करण्यास मदत करेल. (मत्तय २४:१४) त्यांनी तिला विचारले की बेटावर आहे त्यासारखे रम्य वातावरण, पूर्ण पृथ्वीवर आले व तेथे आजारपण व मृत्यूही नसल्यास, तिला तेथे दीर्घकाळ राहायला आवडेल का? ज्वालामुखी पर्वताचे मुख किती वर्षांपासून बेटावर अस्तित्वात आहे याविषयी तिच्यासोबत तर्क केल्यानंतर ती जीवनाच्या अल्पावधीविषयी विचार करू लागली आणि तिने विचारले: “आपले आयुष्य इतके कमी का?” तिने स्तोत्र ९०:१० वाचले तेव्हा तिला आश्‍चर्य वाटले.

तेवढ्यात, साक्षीदारांना शेजारच्या घरातून ओरडाओरड ऐकू आली. ओरडणारे नेमके काय म्हणत होते हे त्यांना कळले नाही, पण त्या स्त्रीने त्यांना सांगितले की शेजारचे लोक साक्षीदारांची निंदानालस्ती करत होते आणि आपल्याकडे साक्षीदारांनी येऊ नये असे सांगत होते. पण ही स्त्री त्या कुटुंबाची “नूआ” अर्थात सर्वात थोरली मुलगी होती. तिच्या वडिलांचा मृत्यू झालेला असल्यामुळे कुटुंबाच्या हितांविषयी निर्णय घेण्याची जबाबदारी तिच्यावर होती. तिने आपल्या नातेवाईकांदेखत आपल्या मातृभाषेत साक्षीदारांचे समर्थन केले आणि तिला देण्यात आलेली प्रकाशने विनम्रपणे स्वीकारली. नंतर त्याच आठवडी एकदा आपल्या कारमधून जात असताना तिने साक्षीदारांना पाहिले तेव्हा तिने आपल्या भावाला कार थांबवण्यास सांगितले. त्याला ते अर्थातच आवडले नाही. पण तरीसुद्धा तिने बांधवांना निरोप दिला आणि त्यांच्या सेवेत यश मिळण्याकरता शुभेच्छाही दिल्या.

बेटावरील काही रहिवाशांनी सुरवातीला दक्षिण अमेरिकेहून आलेल्या साक्षीदारांचा संदेश स्वीकारला नाही तरीसुद्धा आलेल्या बांधवांना रापा नुई येथील लोक स्वाभाविकरित्या प्रेमळ व मैत्रीपूर्ण असल्याचे आढळले. त्यांच्यापैकी बऱ्‍याच जणांनी आनंदाने सुवार्ता ऐकून घेतली. बेटावर बाप्तिस्मा घेतलेल्या एकूण २० जणांपैकी ६ जण स्थानिक रहिवासी आहेत. त्यांच्यापैकी एकाने तर आपल्या पत्नीसोबत बायबल अभ्यास घेतला जात असताना शेजारच्या खोलीतून ऐकण्याद्वारे बायबलचे सत्य शिकून घेतले. तो व त्याची पत्नी आता बाप्तिस्मा घेतलेले साक्षीदार आहेत आणि तो मंडळीत सेवा सेवक आहे.

आध्यात्मिक कार्यक्रमाचा उर्वरित भाग

दुपारच्या जेवणानंतर दुसऱ्‍या दिवसाचा कार्यक्रम सुरू झाला. पुन्हा एकदा ३२ स्थानिक बंधुबहिणी आणि ३३ पाहुण्यांसोबत अनेक आस्थेवाईक लोक एकत्रित झाले. जवळजवळ शंभर लोक कार्यक्रम ऐकायला आले आणि “प्रीती व विश्‍वास कशाप्रकारे जगावर विजय मिळवतात” हे जाहीर भाषण त्यांनी ऐकले. उपस्थितांना यहोवाच्या लोकांमध्ये विविध संस्कृती असूनही जे प्रेम आहे ते या संमेलनादरम्यान प्रत्यक्ष पाहायला मिळाले.—योहान १३:३५.

विभागीय संमेलनाच्या प्रसंगी विभागीय व प्रांतीय पर्यवेक्षकांनी पायनियर सेवकांसोबत एक खास सभा घेतली. बेटावरील तीन सामान्य पायनियरांसोबत पाहुण्यांपैकी जे सामान्य अथवा खास पायनियर होते ते देखील या सभेला हजर राहिले. सर्वांना मोठे प्रोत्साहन मिळाले.

दुसऱ्‍या दिवशी स्थानिक बांधवांपैकी जे पर्यटकांकरता गाईडचे काम करतात त्यांनी पाहुण्यांना बेटावर फिरायला नेले. मोआय पाषाणमूर्ती जेथे घडवल्या जात होत्या अशी एक दगडाची खाण, तसेच प्राचीन स्पर्धा जेथे संपन्‍न व्हायच्या ते ज्वालामुखींचे ठिकाण, आणि अर्थातच सुप्रसिद्ध सोनेरी वाळुचा सुंदर आनाकेना समुद्रकिनारा पाहायला त्यांना नेण्यात आले; या बेटावर येऊन स्थाईक झालेल्या पहिल्या रहिवाशांनी याच समुद्रकिनाऱ्‍यातून बेटात प्रवेश केला होता. *

स्थानिक बांधवांसोबत असण्याची शेवटली संधी मंडळीच्या पुस्तक अभ्यासाच्या दिवशी मिळाली. सभेनंतर स्थानिक साक्षीदारांनी पाहुण्यांना तेथील खास जेवणाची अनपेक्षित मेजवानी दिली. नंतर, बांधवांनी पारंपरिक पोशाख घालून लोकनृत्यांचे सुरेख नमुने सादर केले. पाहुणे व रापा नुई बांधवांना संमेलनाच्या तयारीकरता केलेले सर्व प्रयत्न सार्थक झाल्याचे समाधान वाटले.

पाहुणे म्हणून आलेल्या सर्वांना या एकाकी ठिकाणी राहणाऱ्‍या बंधूबहिणींसोबत एक आनंददायक आठवडा घालवल्यानंतर त्यांच्याबद्दल मनस्वी आपुलकी वाटू लागली. बेट सोडून जाताना एकमेकांचा निरोप घेणे सर्वांनाच जड गेले. नव्या ओळखी व मैत्री तसेच त्यांना मिळालेले आध्यात्मिक प्रोत्साहन ते कधीही विसरणार नाहीत. विमानतळावर, स्थानिक बांधवांनी पाहुण्यांना आपण स्वतः बनवलेल्या शिंपल्यांच्या माळा घातल्या.

पाहुणे जायला निघाले तेव्हा त्यांनी परत येण्याचे आश्‍वासन दिले: “इयोराना! लाउ हे होकी माई ए रापा नुई ईए,” ज्याचा अर्थ, असा होतो: “गुडबाय, रापा नुई. मी परत येईन.” होय, या नवलाईपूर्ण, एकाकी, रहस्यमय परंतु मैत्रीपूर्ण ईस्टर बेटावर आपल्या नव्या मित्रमैत्रिणींना आणि आध्यात्मिक कुटुंबियांना पुन्हा भेटण्याकरता परत एकदा येथे येण्यास सर्वच उत्सुक आहेत!

[तळटीपा]

^ परि. 4 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित सावध राहा! याचा जुलै ८, २००० अंक पाहा.

^ परि. 27 रानो राराकू ज्वालामुखीच्या खळग्यांत अनेक खोदीव लेख असलेले दगड आहेत. बेटावर राज्य करू इच्छिणाऱ्‍यांमध्ये होणाऱ्‍या एका विशिष्ट स्पर्धेचा सुरवातीचा टप्पा रानो काऊ येथे होता. या स्पर्धेत त्यांना उभ्या चढाच्या पहाडावरून खाली जाऊन एका लहानशा बेटापर्यंत पोहून, तेथे एका स्थानिक पक्षाचे अंडे शोधावे लागायचे. त्यानंतर ते अंडे फुटू न देता परत मुख्य बेटापर्यंत पोहत येऊन, पहाडावरून चढून वर यावे लागत होते.

[२४ पानांवरील चौकट]

ईस्टर बेटावर साक्षकार्य

या संस्मरणीय संमेलनाच्या सुमारे दोन वर्षांआधी एक विभागीय पर्यवेक्षक व त्यांच्या पत्नीने या बेटाला भेट दिली होती व त्यांना येथे अनेक सुरेख अनुभव आले. उदाहरणार्थ, ज्या बहिणीने त्यांना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन पोचवले तिने जवळजवळ १६ वर्षांआधी किशोरावस्थेत असताना दक्षिण चिलीत आपल्याबरोबर तुम्हीच बायबलचा अभ्यास केला होता अशी त्यांना आठवण करून दिली, तेव्हा त्यांना किती आश्‍चर्य वाटले असेल याची कल्पना करा! कित्येक वर्षांआधी पेरलेले ते बी रापा नुई येथे फलद्रूप झाले.

त्यांना आणखी एक मजेदार अनुभव आला: भेटवस्तूंच्या एका दुकानाच्या मालकाने त्यांच्याकडून पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी) आणि बायबल अभ्यासाचे साधन असणारे सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान ही, दोन्ही यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेली प्रकाशने स्वीकारली. पण ते पुन्हा त्याच्याकडे गेले तेव्हा त्याने सांगितले की ते बायबल मी वाचू शकत नाही. त्यांनी चुकून स्पॅनिशऐवजी फ्रेंच भाषेत त्याला बायबल दिले होते! असो, ती समस्या लवकरच सोडवण्यात आली आणि स्थानिक साक्षीदारांच्या मदतीने व स्वतःच्या भाषेतले बायबल वाचल्यानंतर त्याला कळाले की बायबल समजायला तितके कठीण नाही.

[२२ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

ईस्टर बेट

चिली

[२३ पानांवरील चित्रे]

विभागीय संमेलनात बाप्तिस्मा झालेल्यांपैकी दोघे

[२५ पानांवरील चित्रे]

रानो राराकू ज्वालामुखीचा उतार; आतील चित्र: बेटावर पिकणारे ग्वायाबा नावाचे एक जंगली फळ