व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निर्गमच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

निर्गमच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

निर्गमच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

ज्यांना “सक्‍तीने काम” करायला लावले जात होते अशांच्या मुक्‍ततेची ही खरी कहाणी आहे. (निर्गम १:१३) हा एका राष्ट्राच्या जन्माचा रंजक अहवालही आहे. थक्क करणारे चमत्कार, अत्युत्तम कायदेकानून, निवासमंडपाचे बांधकाम, हे सर्व त्यातील काही लक्षवेधक पैलू आहेत. थोडक्यात, हेच सर्व निर्गमच्या पुस्तकात दिले आहे.

निर्गमचे पुस्तक इब्री संदेष्टा मोशे याने लिहिले; सा.यु.पू. १६५७ मध्ये योसेफाच्या मृत्यूपासून सा.यु.पू. १५१३ मध्ये निवासमंडप बांधून होईपर्यंतच्या १४५ वर्षांच्या कालावधीत इस्राएली लोकांना कशा कशाचा अनुभव घ्यावा लागला ते या पुस्तकात सांगितले आहे. हा अहवाल केवळ इतिहास नाही. तो देवाच्या वचनाचा किंवा मानवजातीसाठी असलेल्या संदेशाचा एक भाग आहे. त्यामुळे तो “सजीव, सक्रिय” आहे. (इब्री लोकांस ४:१२) तेव्हा, निर्गमचे पुस्तक आपल्यासाठी खरोखरच अर्थपूर्ण आहे.

“देवाने त्यांचा आकांत ऐकला”

(निर्गम १:१–४:३१)

ईजिप्तमध्ये राहणाऱ्‍या याकोबाच्या वंशजांची संख्या भराभर वाढू लागली होती; त्यामुळे त्यांना दास बनवून छळण्याचा राजाने आदेश दिला. इतकेच नव्हे तर फारोने सर्व इस्राएली मुलगे असलेल्या बाळांना ठार मारण्याचा हुकूमही दिला. पण तीन महिन्यांचा मोशे यातून बचावतो; फारोच्या मुलीने त्याला दत्तक घेतले होते. राजसी घराण्यात तो लहानाचा मोठा झाला पण वयाच्या ४० व्या वर्षी मात्र त्याने आपल्या लोकांची बाजू घेतली आणि एका ईजिप्शियन मनुष्याला ठार मारले. (प्रेषितांची कृत्ये ७:२३, २४) आपला जीव वाचवण्यासाठी तो मिद्यानला पळून जातो. तेथे त्याचे लग्न होते आणि तो मेंढपाळ म्हणून राहू लागतो. चमत्कारिकरीत्या जळणाऱ्‍या एका झुडूपाजवळ, यहोवा, त्याला ईजिप्तला पुन्हा जाऊन इस्राएली लोकांना दास्यत्वातून सोडवून आणण्याची कामगिरी सोपवतो. त्याचा भाऊ अहरोन याला त्याचा प्रवक्‍ता म्हणून नेमले जाते.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

३:१—इथ्रो कोणत्या प्रकारचा याजक होता? कुलपित्यांच्या काळात, कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबासाठी याजकाचे काम करी. इथ्रो निश्‍चितच मिद्यानी वंशाचा कुल प्रमुख होता. मिद्यानी अब्राहामाची दुसरी पत्नी कटूरा हिच्याकडून झालेल्या मुलांचे वंशज असल्यामुळे त्यांना यहोवाच्या उपासनेविषयी माहिती असावी.—उत्पत्ति २५:१, २.

४:११—कोणत्या अर्थाने यहोवा मनुष्यास ‘मुका, बहिरा, आंधळा करतो’? काही प्रसंगी यहोवाने काहींना आंधळे व मुके केले असले तरी, प्रत्येक दुर्बलतेच्या बाबतीत तो जबाबदार नाही. (उत्पत्ति १९:११; लूक १:२०-२२, ६२-६४) या दुर्बलता वारशाने मिळालेल्या पापाचा परिणाम आहेत. (ईयोब १४:४; रोमकर ५:१२) देवाने या दुर्बलता राहू दिल्या असल्यामुळे, आपण मनुष्यास मुका, बहिरा, आंधळा “करतो” असे तो स्वतःविषयी म्हणू शकला.

४:१६—मोशे अहरोनाला “देवाच्या ठिकाणी” कसा झाला? मोशे देवाचा प्रतिनिधी होता. त्यामुळे अहरोन मोशेच्या वतीने बोलत असल्यामुळे मोशे अहरोनाला “देवाच्या ठिकाणी” झाला.

आपल्याकरता धडे:

१:७, १४. ईजिप्तमध्ये जुलूमाखाली असलेल्या आपल्या लोकांना यहोवाने आधार दिला. असेच आजही तो आपल्या आधुनिक-दिवसांतील साक्षीदारांना, त्यांचा तीव्र छळ होत असतानाही टिकून राहायला मदत करतो.

१:१७-२१. आपल्या “हितार्थ” यहोवा आपली आठवण करतो.—नहेम्या १३:३१.

३:७-१०. यहोवा आपल्या लोकांचा आकांत ऐकतो.

३:१४. यहोवा आपल्या उद्देशांची पूर्ती न चुकता करतो. त्यामुळे आपण ही खात्री बाळगू शकतो, की तो आपल्या बायबल आधारित आशाही पूर्ण करील.

४:१०, १३. आपल्याला नीट बोलता येत नाही असा आत्मविश्‍वासच मोशेजवळ नव्हता त्यामुळे मी तुझ्या पाठीशी आहे असे देवाने त्याला आश्‍वासन दिले तरीसुद्धा त्याने देवाला विनंती केली की फारोशी बोलण्याकरता त्याने कोणा दुसऱ्‍याला पाठवावे. तरीपण, यहोवाने मोशेचाच उपयोग केला आणि त्याला आपली कामगिरी पूर्ण करण्याकरता लागणारी बुद्धी व शक्‍ती दिली. आपल्या कमजोरींवर जास्त लक्ष देण्यापेक्षा आपण यहोवावर विसंबून राहू या आणि प्रचार व शिकवण्याची आपल्याला दिलेली कामगिरी विश्‍वासूपणे पार पाडू या.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.

अद्‌भुत चमत्कारांनंतर सुटका मिळते

(निर्गम ५:१–१५:२१)

मोशे आणि अहरोन फारोकडे येतात आणि अरण्यात यहोवासाठी सण साजरा करण्यास इस्राएलांना आपण अनुमती द्यावी असे त्याला म्हणतात. हा कठोर ईजिप्शियन शासक सरळ नकार देतो. यहोवा मग मोशेद्वारे त्याच्यावर एकापाठोपाठ एक विपत्ती आणतो. दहाव्या विपत्तीनंतर कोठे फारो इस्राएलांना जाऊ देतो. पण, लगेच त्याचे मन बदलते आणि तो व त्याचे सैन्य इस्राएलांचा पाठलाग करू लागतात. यहोवा मग तांबड्या समुद्रातून आपल्या लोकांसाठी वाट करून त्यांना वाचवतो. ईजिप्शियन तांबड्या समुद्रातून जेव्हा पाठलाग करीत असतात तेव्हा समुद्र पुन्हा एक होतो आणि सर्व ईजिप्शियन त्यात मरून जातात.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

६:३—देवाचे नाव कोणत्या अर्थाने अब्राहाम, इसहाक व याकोब यांना सांगण्यात आले नव्हते? हे कुलपिता देवाच्या नावाचा उपयोग करीत होते आणि त्यांना यहोवाकडून अभिवचनेही मिळत होती. पण ही अभिवचने पूर्ण करणारा या नात्याने त्यांना यहोवाचा प्रत्यय आला नव्हता.—उत्पत्ति १२:१, २; १५:७, १३-१६; २६:२४; २८:१०-१५.

७:१—मोशेला कोणत्या अर्थाने “फारोचा देव” करण्यात आले होते? मोशेला दैवी शक्‍ती आणि फारोवर अधिकार देण्यात आला होता. त्यामुळे त्याला फारोचे भय बाळगण्याची काही गरज नव्हती.

७:२२—ज्याचे रक्‍त झाले नाही असे पाणी ईजिप्शियन जादुगारांना कोठे मिळाले? ही पीडा येण्याआधी त्यांनी नाईल नदीतून घेतलेल्या पाण्याचा उपयोग केला असावा. किंवा कदाचित नाईल नदीजवळच्या ओलसर जमिनीत विहिरी खणून रक्‍त न झालेले पाणी त्यांनी मिळवले असावे.—निर्गम ७:२४.

८:२६, २७—इस्राएलच्या अर्पणांमुळे “मिसर लोकांस किळस येईल” असे मोशेने का म्हटले? ईजिप्तमध्ये पुष्कळ प्राण्यांची उपासना केली जाई. त्यामुळे अर्पणांचा उल्लेख केल्यामुळे, इस्राएली लोकांना यहोवासाठी अर्पण करण्यास जाऊ द्यावे म्हणून मोशे आणखी जोर देऊ व गळ घालू शकला.

१२:२९—प्रथमवत्स कोणास ठरवण्यात आले? प्रथमवत्स म्हणजे केवळ पुरुष. (गणना ३:४०-५१) फारो स्वतः देखील प्रथमवत्स होता, परंतु त्याला ठार मारण्यात आले नाही. त्याचे स्वतःचे कुटुंब होते. कुटुंब प्रमुख नव्हे तर कुटुंबातील ज्येष्ठ पुत्र दहाव्या पीडेमुळे मरण पावला.

१२:४०—इस्राएली लोक ईजिप्तमध्ये किती काळ राहिले? येथे उल्लेखण्यात आलेल्या ४३० वर्षांत इस्राएलचे पुत्र ‘मिसर देशात व कनान देशात’ राहिल्याचा समावेश होतो. (रेफरन्स बायबलची तळटीप पाहा.) कनानला जाताना पंचाहत्तर वर्षीय अब्राहामने सा.यु.पू. १९४३ मध्ये युफ्रेटिस नदी पार केली. (उत्पत्ति १२:४) तेव्हापासून, १३० वर्षीय याकोब ईजिप्तमध्ये राहायला येईपर्यंत २१५ वर्षे होतात. (उत्पत्ति २१:५; २५:२६; ४७:९) याचा अर्थ इस्राएल लोक त्यानंतर ईजिप्तमध्ये २१५ वर्षे राहिले.

१५:८—तांबड्या समुद्राचे “थिजून” गेलेले पाणी बर्फ झाले होते का? “थिजून” असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे त्या इब्री शब्दाचा अर्थ आकसणे किंवा घट्ट होणे असा होतो. ईयोब १०:१० मध्ये या वाक्यांशाचा उपयोग, दुधाचे दह्‍यासारखे विरजविले जाण्याच्या संबंधाने करण्यात आला आहे. त्यामुळे, थिजलेले पाणी याचा अर्थ नेहमीच, बर्फ झालेले पाणी असा होत नाही. निर्गम १४:२१ येथे उल्लेखण्यात आलेला “पूर्व दिशेचा जोराचा वारा” पाण्याला थिजवून टाकण्याइतपत थंड असता तर, गारठ्याविषयीचा काहीतरी उल्लेख निश्‍चित करण्यात आला असता. पाणी ज्यामुळे रोखण्यात आले होते ते दिसत नसल्यामुळे ते थिजल्याप्रमाणे, कडक किंवा घट्ट झाल्याप्रमाणे दिसत होते.

आपल्याकरता धडे:

७:१४–१२:३०. दहा पीडा निव्वळ योगायोग नव्हत्या. त्यांच्याविषयी भाकीत करण्यात आले होते आणि सूचित केल्याप्रमाणे त्या आल्या. या दहा पीडांवरून, निर्माणकर्त्याला पाणी, सूर्यप्रकाश, कीटक, प्राणी आणि मानव यांच्यावर नियंत्रण आहे याचे सचित्र वर्णन दिसून येते! त्या पीडांवरून हेही दिसून येते, की देव आपल्या उपासकांची रक्षा करून केवळ आपल्या शत्रूंवरच विपत्ती आणू शकतो.

११:२; १२:३६. यहोवा आपल्या लोकांना आशीर्वादित करतो. इस्राएली लोकांनी ईजिप्तमधील त्यांच्या कष्टाचे प्रतिफळ मिळत आहे याची यहोवाने खात्री केली. या देशात, दास म्हणून वागवले जाण्याकरता युद्धातून कैद करून त्यांना आणण्यात आले नव्हते तर स्वतंत्र लोक म्हणून ते आले होते.

१४:३०. येणाऱ्‍या ‘मोठ्या संकटातून’ यहोवा आपल्या उपासकांची सुटका करील असा भरवसा आपण बाळगू शकतो.—मत्तय २४:२०-२२; प्रकटीकरण ७:९, १४.

यहोवा एक ईश्‍वरशासित राष्ट्र संघटित करतो

(निर्गम १५:२२–४०:३८)

ईजिप्तमधून सुटका मिळाल्यानंतरच्या तिसऱ्‍या महिन्यात इस्राएल लोकांनी सीनाय पर्वताच्या पायथ्याशी तळ ठोकला. तेथे त्यांना दहा आज्ञा आणि इतर नियम देण्यात आले; यहोवाबरोबर त्यांचा एक करार होतो व ते एक ईश्‍वरशासित राष्ट्र बनतात. मोशे ४० दिवस पर्वतावर राहतो; तेथे त्याला खऱ्‍या उपासनेच्या बाबतीत आणि वाहून नेण्याजोगे मंदिर अर्थात यहोवाच्या निवासमंडपाच्या बाबतीत सूचना मिळतात. त्यादरम्यान, इस्राएली लोक सोन्याचे वासरू बनवून त्याची उपासना करू लागतात. पर्वतावरून खाली येत असताना मोशे जे पाहतो त्यामुळे त्याचा पारा इतका चढतो की देवाने त्याला दिलेल्या दहा आज्ञांच्या दोन दगडी पाट्या तो खाली आपटतो. चूक करणाऱ्‍यांना उचित शिक्षा दिल्यानंतर मोशे पुन्हा पर्वतावर जातो आणि तेथे त्याला दुसऱ्‍या दोन दगडी पाट्या दिल्या जातात. मोशे पर्वतावरून खाली आल्यानंतर, निवासमंडपाचे बांधकाम सुरू होते. इस्राएली लोकांना सुटका मिळाल्याच्या पहिल्या वर्षाच्या अंताला हा अद्‌भुत तंबू बांधून त्यातील सर्व सामानसुमान तयार होते. त्यानंतर यहोवा त्याला आपल्या तेजाने भरून टाकतो.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२०:५—यहोवा भावी पिढींचे त्यांच्या “वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन” कसे करतो? प्रौढ झाल्यावर प्रत्येक व्यक्‍तीचा तिचे वर्तन आणि तिची मनोवृत्ती यानुसार न्याय केला जातो. परंतु, इस्राएल राष्ट्र मूर्तीपूजेकडे वळाले तेव्हा त्याला अनेक पिढ्यांपर्यंत याचा परिणाम भोगावा लागला. विश्‍वासू इस्राएली लोकांनाही याची झळ लागली; ती या अर्थी की राष्ट्रातील धार्मिक दुष्कर्मामुळे त्यांना एकनिष्ठ राहायला कठीण होत होते.

२३:१९; ३४:२६—करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये, या आज्ञेचा काय अर्थ होता? पाऊस पडावा म्हणून खोट्या धर्माचे लोक, एखाद्या करडाला (बकरीच्या किंवा इतर प्राण्याच्या पिल्लाला) त्याच्या आईच्या दुधात शिजवण्याची प्रथा आचरत, असे सांगितले जाते. शिवाय, आईचे दूध तिच्या पिलासाठी पोषक असल्यामुळे, त्याच दुधात तिच्या पिलाला शिजवणे हे एक क्रूर कृत्य होते. या नियमामुळे देवाच्या लोकांना हे दाखवण्यात आले, की त्यांनी दयाळू असण्याची गरज होती.

२३:२०-२३—येथे उल्लेखण्यात आलेला दूत कोण आहे आणि “त्याच्या ठायी” यहोवाचे नाव होते हे कसे? हा दूत कदाचित मानवरूप धारण करण्याआधीचा येशू होता. इस्राएली लोकांना वचनयुक्‍त देशात नेण्याकरता त्याचा उपयोग करण्यात आला होता. (१ करिंथकर १०:१-४) यहोवाचे नाव “त्याच्या ठायी” होते याचा अर्थ येशू आपल्या पित्याचे नाव उंचावून धरणाऱ्‍यांमध्ये व पवित्र करणाऱ्‍यांमध्ये प्रथम आहे.

३२:१-८, २५-३५—सोन्याचे वासरू बनवल्यामुळे अहरोनाला शिक्षा का करण्यात आली नाही? वास्तविक पाहता, अहरोनाला ही मूर्तीपूजा पटली नव्हती. नंतर, त्याने देवाच्या बाजूने असलेल्या सहलेवीयांची बाजू घेतली व ज्यांनी मोशेचा विरोध केला त्यांच्याविरुद्ध तो झाला. मूर्तीपूजा करणाऱ्‍यांना मृत्यूदंड मिळाल्यानंतर मोशेने लोकांना ही आठवण करून दिली की त्यांनी घोर पाप केले होते आणि हे सूचित केले, की अहरोनाला सोडून इतरांनाही यहोवाने दया दाखवली होती.

३३:११, २०—देव मोशेशी “समोरासमोर” कसा बोलला? या वाक्यांशावरून, दोन घनिष्ठ व्यक्‍तींमधील संभाषण सूचित होते. मोशे देवाच्या प्रतिनिधीशी बोलला आणि त्याच्याद्वारेच यहोवाने त्याला मौखिक सूचनाही दिल्या. पण मोशेने यहोवाला पाहिले नाही कारण ‘कोणीही मानव देवाचे मुख पाहून जिवंत राहू शकत नाही.’ वास्तविक पाहता, खुद्द यहोवा मोशेशी बोलला नाही. गलतीकर ३:१९ मध्ये म्हटले आहे, की नियमशास्त्र “मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे” देण्यात आले होते.

आपल्याकरता धडे:

१५:२५; १६:१२. यहोवा आपल्या लोकांच्या गरजा भागवतो.

१८:२१. ख्रिस्ती मंडळीत जबाबदार पदांसाठी निवडण्यात आलेल्या बांधवांनी सुयोग्य, देव-भीरू, भरवसालायक आणि निःस्वार्थ असले पाहिजे.

२०:१–२३:३३. यहोवा हा सर्वश्रेष्ठ नियमकर्ता आहे. इस्राएली लोकांनी त्याच्या नियमांचे पालन केले तोपर्यंत ते त्याची उपासना सुव्यवस्थित व आनंदाने करू शकले. आजही यहोवाची एक ईश्‍वरशासित संघटना आहे. या संघटनेला सहकार्य दिल्याने आपल्याला आनंद व संरक्षण मिळते.

आपल्याकरता खरा अर्थ

निर्गमचे पुस्तक यहोवाविषयी काय प्रगट करते? यहोवा प्रेमळ दाता, अतुलनीय तारणकर्ता आणि आपल्या उद्देशांची पूर्ती करणारा आहे, हे त्यात सांगितले आहे. तो ईश्‍वरशासित संघटनेचा देव आहे.

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची तयारी करताना साप्ताहिक बायबल वाचनाच्या वेळी निर्गमच्या पुस्तकातून पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्यामुळे तुमच्यावर गहिरा प्रभाव पडू शकतो, यात काही शंका नाही. “शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे” या भागात जे सांगितले आहे त्याचा तुम्ही विचार केल्यास तुम्हाला विशिष्ट शास्त्रवचनीय उताऱ्‍यांतील गहन गोष्टी समजतील. “आपल्याकरता धडे” या मथळ्याखालील टिपणीतून तुम्हाला, सप्ताहाच्या बायबल वाचनातून लाभ कसा मिळवावा हे समजेल.

[२४, २५ पानांवरील चित्र]

यहोवाने, नम्र मनुष्य मोशे याला इस्राएली लोकांना दास्यत्वातून मुक्‍त करण्यास नेमले

[२५ पानांवरील चित्र]

दहा पीडांवरून, निर्माणकर्त्याला पाणी, सूर्यप्रकाश, कीटक, प्राणी आणि मानव यांच्यावर ताबा असल्याचे स्पष्ट दिसले

[२६, २७ पानांवरील चित्र]

मोशेद्वारे यहोवाने इस्राएली लोकांना एका ईश्‍वरशासित राष्ट्रात संघटित केले