व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव खरोखर तुमची काळजी वाहतो

देव खरोखर तुमची काळजी वाहतो

देव खरोखर तुमची काळजी वाहतो

अडचणीत असताना देवाकडे मदतीसाठी याचना करणे हे साहजिक आहे. कारण, तो “थोर व महासमर्थ आहे; त्याची बुद्धि अमर्याद आहे.” (स्तोत्र १४७:५) आपल्या समस्यांना तोंड देण्यासाठी आपली मदत करण्यास तो समर्थ आहे. शिवाय, “त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा” असे आमंत्रण बायबल आपल्याला देते. (स्तोत्र ६२:८) पण, पुष्कळांना असे वाटते की, देव त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर देत नाही. याचा अर्थ, त्याला आपली काळजी नाही असे आहे का?

देव काहीच हालचाल करत नाही म्हणून लगेच देवावर दोष देण्याऐवजी तुम्ही लहान होता त्या वेळेचा विचार करा. तुमच्या पालकांनी तुमच्या प्रत्येक मागण्या पूर्ण केल्या नाहीत तेव्हा त्यांना तुमच्यावर प्रेम नव्हते असा दोष तुम्ही त्यांच्यावर लावला का? पुष्कळ मुले तसे करतात. परंतु, तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला हे कळते की, प्रेम अनेक मार्गांनी दाखवले जाते आणि मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणे हे खरे तर प्रेमळपणाचे नाही.

त्याचप्रमाणे, आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला यहोवाकडून प्रार्थनांचे उत्तर मिळत नाही तेव्हा तो आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे असा त्याचा अर्थ होत नाही. उलट, देव अनेक मार्गांनी आपल्याबद्दल त्याची काळजी व्यक्‍त करतो.

“आपण त्याच्याठायी जगतो”

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, आपण देवामुळेच “जगतो, वागतो व आहो.” (प्रेषितांची कृत्ये १७:२८) त्याने आपल्याला जीवन देऊन आपल्याप्रती निश्‍चित रूपाने प्रेमळ काळजी व्यक्‍त केली आहे!

शिवाय, यहोवा आपल्याला जिवंत राहण्यासाठी आवश्‍यक असलेल्या गोष्टी पुरवतो. आपल्याला असे वाचायला मिळते: “तो जनावरांसाठी गवत आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वनस्पति उगवितो; ह्‍यासाठी की, मनुष्याने भूमीतून अन्‍न उत्पन्‍न करावे.” (स्तोत्र १०४:१४) उलट, आपला निर्माणकर्ता जीवनाच्या मूलभूत गरजांपेक्षाही अधिक गोष्टी पुरवतो. तो मूठ उघडून ‘पर्जन्य आणि फलदायक ऋतु देतो आणि अन्‍नाने व हर्षाने आपले मन तृप्त करतो.’—प्रेषितांची कृत्ये १४:१७.

तरीही, काहीजण म्हणतील, ‘देवाला आपण इतके प्रिय आहोत तर मग तो आपल्याला दुःख सहन का करायला लावत आहे?’ या प्रश्‍नाचे उत्तर तुम्हाला ठाऊक आहे का?

देव दोषी आहे का?

मनुष्यांचे बहुतेक दुःख स्वतःहून ओढवलेले असते. उदाहरणार्थ, काही हानीकारक कार्यहालचालींचे धोके सर्वांना ठाऊक आहेत. तरीही, लैंगिक अनैतिकता, मद्याचा दुरुपयोग व इतर अंमली पदार्थांचे सेवन, तंबाखूचा वापर, जिवाला धोका असलेले खेळ खेळणे, वेगाने गाडी चालवणे वगैरे गोष्टींमध्ये लोक सामील होतात. अशा हानीकारक वर्तनामुळे दुःख ओढवते तेव्हा ती कोणाची जबाबदारी असते? देवाची की मूर्खपणे वागणाऱ्‍या व्यक्‍तीची? देवाचे प्रेरित वचन म्हणते: “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.”—गलतीकर ६:७.

याशिवाय, मानव सहसा एकमेकांना इजा पोहंचवतात. एक राष्ट्र युद्ध पुकारते तेव्हा त्याच्या परिणामांकरता देव निश्‍चितच जबाबदार नाही. एक गुन्हेगार सह-नागरिकावर हल्ला करतो आणि त्यामुळे काही इजा होते किंवा मृत्यू घडतो तेव्हा देव याला जबाबदार आहे का? मुळीच नाही! एक हुकूमशाह लोकांवर अत्याचार करतो, त्यांचा छळ करतो आणि हत्या करवतो तेव्हा देवाला जबाबदार ठरवले जावे का? हे निश्‍चितच अनुचित ठरेल.—उपदेशक ८:९.

पण, दारिद्र्‌यात राहणाऱ्‍या किंवा उपाशी राहणाऱ्‍या कोट्यवधी लोकांचे काय? यांच्या स्थितीला देव जबाबदार आहे का? नाही. आपले निवासस्थान असलेला हा पृथ्वी ग्रह प्रत्येकासाठी भूरपूर मात्रेत अन्‍न पुरवतो. (स्तोत्र १०:२, ३; १४५:१६) पण देवाने बहुत प्रमाणात पुरवलेल्या या साठ्याचे योग्य वितरण न झाल्यामुळे उपासमार आणि दारिद्र्‌य सगळीकडे पसरले आहे. शिवाय, मानवी स्वार्थामुळे ही समस्या सुटेनाशी झाली आहे.

मूळ कारण

पण आजारपणामुळे किंवा वार्धक्यामुळे कोणाला मरण आले तर कोण जबाबदार आहे? यासाठी देखील देव जबाबदार नाही हे ऐकून तुम्हाला आश्‍चर्य वाटते का? होय, देवाने मानवाला वृद्ध होऊन मरण्यास निर्माण केले नव्हते.

आदाम आणि हव्वा या पहिल्या मानवी जोडप्याला एदेन बागेत ठेवले होते तेव्हा यहोवाने त्यांच्यासमोर पार्थिव परादीसात सार्वकालिक जीवन जगण्याची प्रत्याशा ठेवली होती. परंतु, त्याची इच्छा होती की पृथ्वीवर केवळ असे मानव राहावेत, ज्यांना आपल्या वारशाची कदर असेल. म्हणून, त्याने भावी जीवनाच्या त्यांच्या प्रत्याशेसाठी एक अट दिली. आदाम आणि हव्वा जोवर त्यांच्या प्रेमळ निर्माणकर्त्याच्या अधीन राहतील तोवर त्यांना परादीसमध्ये राहू दिले जाईल.—उत्पत्ति २:१७; ३:२, ३, १७-२३.

दुःखाची गोष्ट म्हणजे, आदाम आणि हव्वा यांनी बंड केले. हव्वेने स्वतःहून दियाबल सैतानाचे ऐकले. त्याने तिला खोटे सांगितले की, देव तिच्यापासून काहीतरी चांगले लपवून ठेवत आहे. म्हणून तिने स्वतंत्र मार्ग निवडला आणि “देवासारखे बरेवाईट जाणणारे” होण्याचा प्रयत्न केला. आदामानेही तिला या बंडाळीत साथ दिली.—उत्पत्ति ३:५, ६.

आदाम आणि हव्वेने अशाप्रकारे पाप केले आणि आपण सर्वकाळ जगण्याच्या योग्य नाही हे दाखवून दिले. त्यांना पापाचे विनाशकारी परिणाम भोगावे लागले. त्यांची शक्‍ती आणि जोम नाहीसा झाला आणि शेवटी ते मरण पावले. (उत्पत्ति ५:५) परंतु, त्यांच्या बंडळीचे याहून गंभीर परिणाम झाले. आदाम आणि हव्वेच्या पापाचे परिणाम आपल्याला आजही भोगावे लागत आहेत. प्रेषित पौलाने लिहिले: “एका माणसाच्या [आदाम] द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) होय, आदाम आणि हव्वेच्या बंडाळीमुळे पाप आणि मृत्यू संपूर्ण मानवजातीत एखाद्या प्राणघातक रोगासारखे पसरले.

देव काळजी वाहतो याचा सर्वात मोठा पुरावा

याचा अर्थ देवाच्या मानवी निर्मितीला काहीच आशा राहिली नव्हती का? नाही. याच संदर्भात, देवाला आपल्याविषयी काळजी आहे याचा त्याने सर्वात मोठा पुरावा दिला. देवाने मानवजातीला पाप आणि मृत्यूपासून मुक्‍त करण्याचा मार्ग पुरवला; यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली. येशूचे परिपूर्ण जीवन ही मुक्‍तीची किंमत होती जी त्याने आपल्याकरता स्वच्छेने दिली. (रोमकर ३:२४) म्हणून, प्रेषित योहानाने लिहिले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) अशा उल्लेखनीय मार्गाने प्रीती व्यक्‍त केल्यामुळे, आपल्याला पुन्हा एकदा सर्वकाळ जगण्याची प्रत्याशा आहे. पौलाने रोमकरांना लिहिले: “नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते.”—रोमकर ५:१८.

आपण ही खात्री बाळगू शकतो की, देवाच्या नियुक्‍त वेळी, पृथ्वी ग्रहावरून दुःख व मृत्यू नाहीसे केले जातील. त्याउलट, प्रकटीकरणाच्या पुस्तकात पूर्वभाकीत केलेली परिस्थिती सगळीकडे नांदेल: “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:३, ४) तुम्ही कदाचित म्हणाल, ‘तोपर्यंत मी जिवंत राहणार नाही.’ पण कोणास ठाऊक, तुम्ही कदाचित जिवंत असाल. आणि तुम्ही मरण पावलात तरी देव तुम्हाला मेलेल्यांतून उठवू शकतो. (योहान ५:२८, २९) हाच देवाचा आपल्याकरता उद्देश आहे जो नक्की पूर्ण होईल. मग, देवाला मानवजातीची काळजी नाही असे म्हणणे सत्य परिस्थितीपासून किती वेगळे आहे, नाही का?

“देवाजवळ या”

मानवी दुःखाच्या समस्येवर देवाने कायमस्वरूपी उपाययोजना केली आहे हे जाणून आपल्याला सांत्वन मिळते. पण आज काय? आपली कोणी प्रिय व्यक्‍ती मरण पावली किंवा आपले मूल आजारी पडले तर आपण काय करू शकतो? आजारपण आणि मृत्यू काढून टाकण्याची देवाची नियुक्‍त वेळ अद्याप आलेली नाही. ते घडण्यासाठी आपल्याला काही काळ धीर धरावा लागेल असे बायबल दाखवते. पण देवाने आपल्याला वाऱ्‍यावर सोडून दिलेले नाही. शिष्य याकोबाने म्हटले: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” (याकोब ४:८) होय, निर्माणकर्त्यासोबत जवळचा व्यक्‍तिगत नातेसंबंध ठेवायला तो आपल्याला आमंत्रण देतो आणि जे लोक असे करतात त्यांना कठीणातल्या कठीण परिस्थितीतही त्याचा आधार निश्‍चित जाणवतो.

आपण देवाच्या जवळ कसे जाऊ शकतो? सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी राजा दावीदाने अगदी असाच प्रश्‍न विचारला होता; त्याने म्हटले होते: “हे परमेश्‍वरा, . . . तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?” (स्तोत्र १५:१) दावीदानेच स्वतः याचे उत्तर देऊन म्हटले: “जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो. आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही.” (स्तोत्र १५:२, ३) दुसऱ्‍या शब्दांत, यहोवा अशांना स्वीकारतो जे आदामाने व हव्वेने नाकारलेला मार्ग अनुसरतात. त्याची इच्छा करणाऱ्‍यांच्या तो जवळ येतो.—अनुवाद ६:२४, २५; १ योहान ५:३.

आपण देवाची इच्छा कशी पूर्ण करू शकतो? “आपला तारणारा देव ह्‍याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य” काय ते जाणून त्यानुसार कार्य करण्याचा निर्णय घेण्याची आवश्‍यकता आहे. (१ तीमथ्य २:३) यामध्ये देवाचे वचन, बायबल याविषयी अचूक ज्ञान घेण्याची गरज आहे. (योहान १७:३; २ तीमथ्य ३:१६, १७) केवळ वरवर बायबल वाचून चालणार नाही. तर आपण पहिल्या शतकातील बिरुयातील यहुद्यांचे अनुकरण केले पाहिजे ज्यांनी पौलाचा प्रचार ऐकला होता. त्यांच्याविषयी आपल्याला असे वाचायला मिळते: “त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्‍या गोष्टी अशाच आहेत की काय ह्‍याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.”—प्रेषितांची कृत्ये १७:११.

त्याचप्रमाणे आजही, बायबलचा सखोल अभ्यास केल्याने देवावरील आपला विश्‍वास मजबूत होतो आणि त्याच्यासोबत आपला जवळचा नातेसंबंध वाढतो. (इब्री लोकांस ११:६) शिवाय यहोवा मानवांसोबत नेमका कशाप्रकारे व्यवहार करतो—तो केवळ अल्पकालीन फायदे पाहत नाही तर योग्य असलेल्या सर्वांचे दीर्घकालीन फायदे पाहतो ही गोष्ट समजण्यासही आपल्याला मदत होईल.

देवासोबत जवळचा नातेसंबंध असलेल्या काही ख्रिश्‍चनांचे उद्‌गार पाहा. डॅन्यल म्हणते, “मला यहोवावर खूप प्रेम आहे आणि त्याचे किती आभार मानावे तितके कमीच आहे. त्याने मला प्रेमळ आईवडील दिलेत ज्यांना त्याच्याविषयी खरे प्रेम आहे आणि ज्यांनी मला त्याच्या वचनानुसार शिक्षण दिले आहे.” उरुग्वेतील एक ख्रिस्ती बांधव लिहितो: “माझं हृदय कृतज्ञतेनं भरून येतं आणि यहोवाच्या अपात्र कृपेबद्दल आणि मैत्रीबद्दल त्याचे आभार मानल्याशिवाय मला राहावत नाही.” देव अगदी लहानग्यांनाही स्वीकारतो. सात वर्षांची गेब्रीएला म्हणते: “संपूर्ण जगात मला सर्वात जास्त प्रेम देवावर आहे! माझ्याजवळ माझं स्वतःचं बायबल आहे. मला देवाबद्दल आणि त्याच्या पुत्राबद्दल शिकायला फार आवडतं.”

स्तोत्रकर्त्याने म्हटले: “देवाजवळ जाणे ह्‍यातच माझे कल्याण आहे.” आज, लाखो लोक त्याच्याशी पूर्णपणे सहमत आहेत. (स्तोत्र ७३:२८) त्यांना सध्याच्या समस्यांना तोंड देण्यास मदत मिळाली आहे आणि त्यांना पृथ्वीवरील परादीसमध्ये सर्वकाळ जगण्याची खात्रीलायक आशा आहे. (१ तीमथ्य ४:८) तुम्ही देखील ‘देवाच्या जवळ जाण्याचे’ ध्येय का ठेवत नाही? आपल्याला असे आश्‍वासन दिले गेले आहे की, “तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.” (प्रेषितांची कृत्ये १७:२७) होय, देवाला खरोखर तुमची काळजी आहे!

[५ पानांवरील चित्रे]

यहोवाला आपल्याबद्दल काळजी असल्याचे अनेक मार्गांनी दिसून येते

[७ पानांवरील चित्र]

अगदी लहान मुले देखील देवाच्या जवळ जाऊ शकतात

[७ पानांवरील चित्रे]

आज, यहोवा आपल्याला तग धरून राहण्यास मदत करतो. तो नियुक्‍त वेळी आजारपण व मृत्यू काढून टाकील