व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

दुसरे करिंथकर ६:१४ मध्ये पौलाने, ‘विश्‍वास न ठेवणारे’ असे कोणाला संबोधून म्हटले?

दुसरे करिंथकर ६:१४ मध्ये आपण असे वाचतो: “विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका.” या वचनाची पार्श्‍वभूमी पाहिल्यास, हे स्पष्ट दिसते, की पौल ख्रिस्ती मंडळीचे सदस्य नसलेल्या लोकांबद्दल बोलत होता. याला बायबलच्या इतर वचनांद्वारे पुष्टी मिळते ज्यात पौलाने, ‘विश्‍वास ठेवणारे’ किंवा ‘विश्‍वास न ठेवणारे’ या वाक्यांशांचा उपयोग केला आहे.

उदाहरणार्थ, “विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांपुढे” कोर्टात गेल्याबद्दल पौल ख्रिश्‍चनांना जोरदारपणे खडसावतो. (१ करिंथकर ६:६) येथे, विश्‍वास न ठेवणारे हे न्यायाधीश आहेत जे करिंथमधील कोर्टात काम करत होते. आपल्या दुसऱ्‍या पत्रात, पौल असे म्हणतो, की सैतानाने “विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मने . . . आंधळी केली आहेत.” सुवार्ता पाहण्याच्या बाबतीत अशा लोकांच्या डोळ्यांवर “आच्छादन” असते. या लोकांनी, यहोवाची सेवा करण्यात कसलीही आवड दाखवलेली नसते; कारण पौलाने आधी असे म्हटले: “त्यांचे अंतःकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते.”—२ करिंथकर ३:१६; ४:४.

काही विश्‍वास न ठेवणारे अधार्मिकतेत किंवा मूर्तीपूजेत गोवलेले आहेत. (२ करिंथकर ६:१५, १६) परंतु सर्वच लोक यहोवाच्या सेवकांचा विरोध करत नाहीत. काहीजण सत्याबद्दल आवड दाखवतात. पुष्कळांचे वैवाहिक सोबती सत्यात आहेत व त्यांच्याबरोबर राहायला त्यांना आनंद वाटतो. (१ करिंथकर ७:१२-१४; १०:२७; १४:२२-२५; १ पेत्र ३:१, २) परंतु, पौल सातत्याने ‘विश्‍वास न ठेवणारे’ ही संज्ञा वर सांगितल्याप्रमाणे अशांना संबोधून वापरतो की जे, ‘प्रभूला मिळालेल्या विश्‍वास ठेवणाऱ्‍यांनी’ मिळून बनलेल्या ख्रिस्ती मंडळीचे सदस्य नाहीत.—प्रेषितांची कृत्ये २:४१; ५:१४; ८:१२, १३.

दुसरे करिंथकर ६:१४ मधील तत्त्व, ख्रिश्‍चनांसाठी सर्व परिस्थितीत एक अमूल्य मार्गदर्शन आहे; वैवाहिक सोबती शोधणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना सल्ला देताना या वचनाचा सर्रासपणे उल्लेख केला जातो. (मत्तय १९:४-६) समर्पित, बाप्तिस्मा घेतलेली सुज्ञ ख्रिस्ती व्यक्‍ती, विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांतून अर्थात सत्यात नसलेल्या लोकांतून वैवाहिक सोबती निवडणार नाही; कारण, सत्यात नसलेल्या व्यक्‍तीचे नैतिक दर्जे, तिची ध्येये आणि तिचे विश्‍वास खऱ्‍या ख्रिश्‍चनापेक्षा कितीतरी वेगळे असतात.

पण, जे बायबलचा अभ्यास करत आहेत व ख्रिस्ती मंडळीशी सहवास राखू लागले आहेत अशांविषयी काय? बाप्तिस्मा न घेतलेल्या प्रचारकांविषयी काय? तेही विश्‍वास न ठेवणारे आहेत का? नाही. सुवार्तेचे सत्य स्वीकारलेल्यांना आणि बाप्तिस्मा घेण्याच्या मार्गावर सातत्याने प्रगती करत असलेल्यांना विश्‍वास न ठेवणारे संबोधले जाऊ नये. (रोमकर १०:१०; २ करिंथकर ४:१३) कर्नेल्याला त्याच्या बाप्तिस्म्याआधी ‘नीतिमान व देवाचे भय बाळगणारा,’ असे म्हटले होते.—प्रेषितांची कृत्ये १०:२.

मग जर २ करिंथकर ६:१४ येथील पौलाचा सल्ला याबाबतीत काटेकोरपणे लागू होत नाही तर, एका समर्पित ख्रिश्‍चन व्यक्‍तीने, ज्याला/जिला बाप्तिस्मा न घेतलेला/घेतलेली प्रचारक म्हणून स्वीकारण्यात आले आहे अशा व्यक्‍तीबरोबर प्रणयसंबंध ठेवणे व नंतर विवाह करणे सुज्ञपणाचे आहे का? नाही. का नाही? कारण ख्रिस्ती विधवांना पौलाने असा सल्ला दिला: “तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर, पण केवळ प्रभूमध्ये, लग्न करावयाला ती मोकळी आहे.” (तिरपे वळण आमचे.) (१ करिंथकर ७:३९) या सल्ल्याच्या अनुषंगात, समर्पित ख्रिश्‍चनांना असे आर्जवले जाते, की त्यांनी “केवळ प्रभूमध्ये” असलेल्यांपैकीच वैवाहिक सोबती शोधावा.

“प्रभूमध्ये” आणि याजशी संबंधित असलेल्या “ख्रिस्तामध्ये” या वाक्यांशाचा अर्थ काय होतो? पौल, रोमकर १६:८-१० आणि कलस्सैकर ४:७ येथे, “ख्रिस्तामध्ये” किंवा “प्रभूमधील” लोकांविषयी बोलतो. तुम्ही ही वचने वाचलीत तर तुम्हाला दिसेल, की हे लोक “सहकारी,” ‘पसंतीस उतरलेले,’ “प्रिय बंधु,” “विश्‍वासू सेवक,” आणि ‘सोबतीचे दास,’ आहेत.

एक व्यक्‍ती ‘प्रभूमधील दास’ केव्हा होतो? जेव्हा तो स्वतःहून दासाप्रमाणे कार्य करतो आणि स्वतःचा त्याग करतो. येशूने म्हटले: “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.” (मत्तय १६:२४) एक व्यक्‍ती देवाला स्वतःचे जीवन समर्पित केल्यानंतर ख्रिस्ताचे अनुकरण करू लागते आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे त्याच्या अधीन करते. त्यानंतर, ती बाप्तिस्मा घेण्यास स्वतःला सादर करते आणि यहोवा देवासमोर एका स्वीकृत भूमिकेत त्याचा एक नियुक्‍त सेवक बनते. * यास्तव, ‘प्रभूमध्ये लग्न’ करण्याचा अर्थ, अशा व्यक्‍तीसोबत लग्न करणे ज्याने, तो खरोखरच एक विश्‍वासू, “देवाचा व प्रभु येशू ख्रिस्ताचा [समर्पित] दास” आहे हे स्पष्टपणे दाखवून दिले आहे.—याकोब १:१.

यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करणारे व उत्तम आध्यात्मिक प्रगती करणारे प्रशंसेस पात्र आहेत. परंतु, अशा व्यक्‍तीने अद्याप स्वतःला यहोवाला समर्पित केलेले नसते व सेवा आणि त्याग असलेल्या जीवनासाठी स्वतःला सादर केलेले नसते. त्याने अद्यापही पुष्कळ आवश्‍यक बदल करण्याची गरज आहे. विवाहासारखा जीवनातल्या आणखी एका मोठ्या बदलाचा विचार करण्याआधी त्याने, समर्पित, बाप्तिस्माप्राप्त ख्रिस्ती बनण्यात जे सर्व बदल गोवलेले आहेत ते करण्याची गरज आहे.

एखाद्या ख्रिश्‍चनाने, बायबलचा अभ्यास करणाऱ्‍या व्यक्‍तिचा बाप्तिस्मा झाल्यावर मी तिच्याबरोबर विवाह करेन कदाचित असा विचार करून तिच्याबरोबर प्रणयसंबंध वाढवावेत का? नाही. एक समर्पित ख्रिस्ती आपल्याशी विवाह करू इच्छितोय परंतु फक्‍त आपला बाप्तिस्मा झाल्यानंतरच तो असे करेल, हे जेव्हा एखाद्या बायबल विद्यार्थ्याला कळते तेव्हा आपण बाप्तिस्माप्राप्त ख्रिस्ती बनावे की नाही याबाबतीत तो गोंधळून जाऊ शकतो.

सहसा, एक व्यक्‍ती, ती बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती करेपर्यंत काही काळ बाप्तिस्मा न घेतलेली प्रचारक असते. यास्तव, केवळ प्रभूमध्ये लग्न करा हा वरील सल्ला अवाजवी नाही. परंतु, जर का एक व्यक्‍ती लग्न करण्याच्या वयाची झाली आहे, ख्रिस्ती कुटुंबातच ती लहानाची मोठी झाली आहे, काही वर्षांपासून मंडळीत सक्रिय आहे व बाप्तिस्मा न घेतलेली प्रचारक म्हणून सेवा करीत आहे तर? असे असेल तर कोणत्या गोष्टीने तिला, यहोवाला आपले जीवन समर्पित करण्यापासून रोखून धरले आहे? ती बाप्तिस्मा घेण्यास मागेपुढे का पाहत आहे? तिच्या मनात शंका आहेत का? अशी व्यक्‍ती विश्‍वास न ठेवणारी नसली तरी, ती “प्रभूमध्ये” आहे असेही म्हणता येणार नाही.

विवाहाविषयी पौलाने दिलेला सल्ला आपल्याच फायद्यासाठी आहे. (यशया ४८:१७) विवाह करणाऱ्‍या दोन्ही सोबत्यांनी यहोवाला आपले जीवन समर्पित केलेले असते तेव्हा विवाहात एकमेकांना देत असलेल्या वचनासाठी तो पक्का आध्यात्मिक पाया असतो. दोघांचीही सारखीच मूल्ये आणि सारखीच ध्येये असतात. याची त्यांच्या सुखी संसारात खूप मोठी भर पडते. शिवाय, “केवळ प्रभूमध्ये लग्न” केल्यामुळे एक व्यक्‍ती यहोवाप्रती आपली एकनिष्ठता व्यक्‍त करते ज्यामुळे तिला सार्वकालिक आशीर्वाद मिळतात कारण, यहोवा ‘निष्ठावंतांशी निष्ठेने वागतो.’—स्तोत्र १८:२५, मराठी कॉमन लँग्वेज.

[तळटीप]

^ परि. 10 पौलाने हे पत्र पहिल्यांदा ज्यांच्यासाठी लिहिले होते त्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी, ‘प्रभूचा दास’ असण्यात, देवाचे पुत्र आणि ख्रिस्ताचे बांधव यानात्याने त्यांचा अभिषेक स्वीकारणे देखील समाविष्ट होते.

[३१ पानांवरील चित्र]

यहोवा ‘निष्ठावंतांशी निष्ठेने वागतो’