व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘उन्हाळा व हिवाळा हे व्हावयाचे राहणार नाहीत’

‘उन्हाळा व हिवाळा हे व्हावयाचे राहणार नाहीत’

यहोवाच्या निर्मितीतील शोभा

‘उन्हाळा व हिवाळा हे व्हावयाचे राहणार नाहीत’

वाळवंटावर सूर्य आग ओकतो. पण पृथ्वीच्या इतर भागांत कडक हिवाळ्यानंतर तो उब देतो. होय, सूर्याची उष्णता ही वातावरण आणि ऋतू निर्माण करण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.

संपूर्ण पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू आहेत. त्यांचा आपल्यावर कसा परिणाम होतो? पाने फुले आपल्या सुप्तावस्थेतून जागी होतात तो वसंतऋतूचा ताजेतवाना करणारा टवटवीतपणा पाहून तुम्हाला आनंद होतो का? उन्हाळ्यातली ती सुखकर संध्याकाळ तुम्हाला कशी वाटते? झाडांच्या पानांनी भडक रंगांची उधळण केलेला आल्हाददायक शरदऋतू तुम्हाला आवडतो का? हिमाच्छादित जंगले पाहून तुम्हाला प्रसन्‍न वाटते का?

ऋतू कशामुळे घडून येतात? थोडक्यात सांगायचे तर, पृथ्वी एकीकडे झुकल्यामुळे ऋतू घडून येतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करीत असताना तिचा अक्ष तिच्या कक्षेच्या पातळीशी लंब नसून २३.५ अंशाने झुकलेला असतो. पृथ्वीचा अक्ष झुकलेला नसता तर ऋतू घडून आले नसते. पृथ्वीवर नेहमी एकच वातावरण असते. वनस्पतींवर आणि अन्‍नधान्याच्या उत्पादनाच्या चक्रावर याचा परिणाम झाला असता.

एका पाठोपाठ येणाऱ्‍या ऋतूंमागे निर्माणकर्त्याचा हात असल्याचे दिसून येते. यहोवा देवाला उद्देशून स्तोत्रकर्त्याने अगदी उचितपणे म्हटले: “पृथ्वीच्या सर्व सीमा तूच ठरविल्या. उन्हाळा व हिवाळा हे तूच केले.” (तिरपे वळण आमचे.)—स्तोत्र ७४:१७. *

आकाशातील दृश्‍य गोष्टी जसे की सूर्य, चंद्र किंवा तारे ऋतूंची न चुकता सूचना देतात. सौरमाला निर्माण करताना देवाने असा हुकूम दिला: “आकाशाच्या अतंराळात ज्योति होवोत; त्या चिन्हे, ऋतु, दिवस व वर्षे दाखविणाऱ्‍या होवोत.” (उत्पत्ति १:१४) एका वर्षात, पृथ्वी तिच्या कक्षात अशा दोन स्थानी येते जेथे सूर्यकिरणे विषुववृत्ताला दुपारी थेट डोक्यावर येतात. याला संपातदिन म्हणतात आणि पुष्कळ राष्ट्रांत त्यानंतर वसंतऋतू आणि शरदऋतूची सुरवात होते. संपातदिनी, पृथ्वीच्या पृष्ठावरील बहुतेक सर्व ठिकाणी दिवस व रात्र समान कालावधीचे असतात.

ऋतूंचे अस्तित्व आणि त्यांची सुरवात यांत केवळ आकाशातील खज्योतींची हालचाल आणि स्थिती गोवलेली नाही. ऋतू, हवामान, वातावरण हे सर्व एकमेकांशी एका जटील चक्रात जोडलेले आहेत ज्यामुळे सजीव सृष्टी टिकून राहते. कृषी व अन्‍न उत्पादनाशी चांगल्याप्रकारे परिचित असलेल्या आशिया मायनरमध्ये राहणाऱ्‍या लोकांशी बोलताना ख्रिस्ती प्रेषित पौल आणि त्याचा सोबती बर्णबा यांनी असे म्हटले, की देवाने “आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतु तुम्हाला दिले, आणि अन्‍नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले.”—प्रेषितांची कृत्ये १४:१४-१७.

प्रकाश संश्‍लेषणाची अद्‌भुत प्रक्रिया भूमीवरील वनस्पतींना आणि समुद्रातील फायटोप्लॅन्कटन म्हटलेल्या वनस्पतींना जिवंत ठेवते. यामुळे अन्‍नसाखळी आणि वैविध्यपूर्ण अद्‌भुत सजीवसृष्टी हवामान आणि वातावरणानुसार अतिशय सूक्ष्मरीत्या कार्य करू लागते. या सर्वात यहोवाचा हात असल्याचा उचित उल्लेख पौलाने असे म्हणून केला: “जी भूमि आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्‍यांना उपयोगी अशी वनस्पती उपजविते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो.”—इब्री लोकांस ६:७.

ज्या ठिकाणी वसंतऋतुमुळे तापमान साधारण होते, दिवसमान मोठा होतो, अधिक सूर्यप्रकाश पडतो आणि अनुकूल पाऊस पडतो तेव्हा काय होते यांवर तुम्ही जरा थांबून विचार केलात, तर तुम्हाला “आशीर्वाद” या शब्दाचा वेगळा अर्थ मिळेल. या ऋतुत फुले उमलतात, किडे हिवाळ्यातल्या आपल्या अभयस्थानांतून बाहेर पडतात व वनस्पतींचे परागण करण्यास तयार असतात. चित्रात दिसणाऱ्‍या ब्लू जे सारख्या पक्ष्यांमुळे रानात जणू काय रंग भरतो, त्यांची कलकल सुरू होते, जंगले जिवंत होतात. जीवनाचे चैतन्य वाढते. प्राणीजिवांचा जन्म, पुनःजन्म, वाढ हे चक्र सुरू होते. (गीतरत्न २:१२, १३) ही, उन्हाळ्याच्या शेवटी किंवा शरदऋतूत येणाऱ्‍या सुगीच्या हंगामाची तयारी असते.—निर्गम २३:१६.

यहोवाची कार्ये, आपल्याला दिवस आणि रात्र, ऋतू, बीज उत्पन्‍न होणारा काळ, सुगीचा हंगाम हे सर्व देण्याकरता पृथ्वीला ज्या प्रकारे स्थित केले आहे त्यावरून प्रकट होतात. उन्हाळ्यानंतर हिवाळा येतो हे आपल्याला निश्‍चित माहीत असते. कारण स्वतः देवाने असे वचन दिले आहे: “पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची राहणार नाहीत.”—उत्पत्ति ८:२२.

[तळटीप]

^ परि. 6 यहोवाच्या साक्षीदारांचे २००४ कॅलेंडर, जुलै/ऑगस्ट पाहा.

[९ पानांवरील चौकट/चित्र]

जीवनासाठी आवश्‍यक असलेला ग्रह

अनेक युगांपासून चंद्रामुळे मानवाला प्रेरणा मिळाली आहे, लोकांना त्याचे अप्रूप वाटले आहे. परंतु ऋतू निर्माण होण्यात चंद्रही जबाबदार आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? चंद्राच्या अस्तित्वामुळे, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना तिचा झुकलेला अक्ष स्थिर राहतो. हे, “पृथ्वीवर जीवन टिकून राहण्याकरता असलेली परिस्थिती निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते,” असे विज्ञान लेखक ॲन्ड्रू हिल यांनी म्हटले. आपल्या ग्रहाच्या झुकलेल्या अक्षाला स्थिर करण्याकरता चंद्रासारखा एखादा मोठा नैसर्गिक ग्रह नसता तर तापमान वाढले असते आणि कदाचित पृथ्वीवर जीवन अशक्य झाले असते. यावरून खगोलशास्त्रज्ञांच्या एका गटाने असा निष्कर्ष काढला, की “चंद्र, हा पृथ्वीच्या ऋतुत बदल घडवून आणण्याच्या संभाव्यतेवरील नियंत्रक आहे, असे म्हटले जाऊ शकते.”—स्तोत्र १०४:१९.

[चित्राचे श्रेय]

चंद्र:U.S. Fish & Wildlife Service, Washington, D.C./Bart O’Gara

[९ पानांवरील चित्र]

उत्तर आफ्रिका आणि अरेबियन पेनीनसुला येथील उंट