व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही “परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात” रमता का?

तुम्ही “परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात” रमता का?

तुम्ही “परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात” रमता का?

‘जो पुरुष परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो तो धन्य.’स्तोत्र १:१, २.

१. यहोवाचे सेवक या नात्याने आपण आनंदी का आहोत?

यहोवा आपल्याला त्याचे निष्ठावान सेवक म्हणून मदत करतो आणि आशीर्वाद देतो. हे खरे की, आपल्याला अनेक परीक्षांचा सामना करावा लागतो. परंतु, आपल्याला खरा आनंदही मिळतो. यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नाही कारण आपण ‘आनंदी देवाची’ सेवा करतो आणि त्याचा पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणात आनंद निर्माण करतो. (१ तीमथ्य १:११, NW; गलतीकर ५:२२) आनंद म्हणजे एखाद्या उत्तम गोष्टीची अपेक्षा केल्याने अथवा ती गोष्ट प्राप्त झाल्याने मिळणारे खरे समाधान. आणि उत्तम देणग्या आपल्याला आपला स्वर्गीय पिता याच्याकडून निश्‍चितच मिळतात. (याकोब १:१७) म्हणूनच आपण आनंदी आहोत!

२. आपण कोणत्या स्तोत्रांची चर्चा करणार आहोत?

स्तोत्रसंहितेच्या पुस्तकात आनंद या गुणाची ठळकपणे चर्चा केली आहे. उदाहरणार्थ, स्तोत्रे १ आणि यांच्याबाबतीत हे खरे आहे. येशू ख्रिस्ताच्या प्रारंभिक अनुयायांनी दुसऱ्‍या स्तोत्राचे श्रेय इस्राएलच्या राजा दावीदाला दिले. (प्रेषितांची कृत्ये ४:२५, २६) पहिल्या स्तोत्राचा अज्ञात रचनाकार आपल्या प्रेरित गीताची सुरवात पुढील शब्दांनी करतो: “जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही . . . तो धन्य [“आनंदी,” NW].” (स्तोत्र १:१, २) या तसेच पुढील लेखात, स्तोत्रे १ आणि यांतून आपल्याला आनंद मानण्यास कोणता आधार मिळतो ते पाहू या.

आनंदाचे रहस्य

३. स्तोत्र १:१, २ नुसार धार्मिक व्यक्‍ती आनंदी का असते?

एक धार्मिक व्यक्‍ती आनंदी का असते हे स्तोत्र १ यात दाखवले आहे. आनंदी असण्याची काही कारणे देऊन स्तोत्रकर्ता गातो: “जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गांत उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही . . . तो धन्य.”—स्तोत्र १:१, २.

४. जखऱ्‍या आणि अलीशिबाने कोणता उदाहरणीय मार्ग अवलंबला?

खरोखर आनंदी व्हायचे असल्यास, यहोवाच्या नीतिमान अपेक्षांनुसार असण्याची गरज आहे. बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचे पालक होण्याचा सुहक्क प्राप्त झालेले जखऱ्‍या आणि अलीशिबा ‘देवाच्या दृष्टीने नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होते.’ (लूक १:५, ६) आपणही असाच मार्ग धरला आणि ‘दुर्जनांच्या मसलतीने चालायला’ किंवा त्यांचा दुष्ट सल्ला अनुसरायला ठामपणे नकार दिला तर आपण आनंदी होऊ शकू.

५. ‘पापी जनांचा मार्ग’ आपण कसा टाळू शकतो?

आपण दुष्टांची विचारसरणी झिडकारली तर आपण ‘पापी जनांच्या मार्गांत उभे राहणार नाही.’ याचा अर्थ, ते असतात तेथे—अनैतिक मनोरंजनाच्या किंवा कुप्रसिद्ध ठिकाणी—आपण खरेच दिसणारही नाही. पापी जनांसोबत गैरशास्त्रीय पद्धतीने वागण्यास आपल्याला मोह झाला तर काय? मग आपण देवाकडे मदतीसाठी याचना करू या म्हणजे प्रेषित पौलाच्या पुढील शब्दांनुसार आपल्याला वागता येईल: “तुम्ही विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीति व स्वैराचार ह्‍यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार?” (२ करिंथकर ६:१४) आपण देवावर विसंबून राहिलो आणि “अंतःकरणाचे शुद्ध” राहिलो तर आपण पापी जनांची मनोवृत्ती आणि जीवनशैली अनुसरणार नाही आणि ‘निष्कपट विश्‍वासासोबत’ शुद्ध हेतू व इच्छा बाळगू.—मत्तय ५:८; १ तीमथ्य १:५.

६. निंदकांविषयी आपण खास दक्ष का असावे?

यहोवाला संतुष्ट करण्यासाठी आपण निश्‍चितच ‘निंदकांच्या बैठकीत बसू नये.’ काहीजण तर धर्मीपणाची बेधडकपणे निंदा करतात; पण या ‘शेवटल्या काळात’ धर्मत्यागी बनलेले पूर्वीचे ख्रिस्ती विशेषकरून तिरस्काराने निंदा करू लागले आहेत. प्रेषित पेत्राने सह विश्‍वासू जनांना अशी ताकीद दिली: “प्रियजनहो . . . प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, ‘त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हांपासून सर्व कांही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.’” (२ पेत्र ३:१-४) आपण ‘निंदकांच्या बैठकीत बसलोच नाही’ तर त्यांच्यावर येणाऱ्‍या अरिष्टापासून आपण वाचू.—नीतिसूत्रे १:२२-२७.

७. स्तोत्र १:१ मधील शब्दांकडे आपण लक्ष का द्यावे?

स्तोत्र १ मधील सुरवातीच्या शब्दांकडे लक्ष दिले नाही तर शास्त्रवचनांचा अभ्यास केल्याने प्राप्त केलेली आध्यात्मिकता आपण गमावून बसू. एवढेच नव्हे तर, आपले जीवन पूर्वीपेक्षाही बिकट होईल. दुष्टांच्या मसलतीने चालणे ही आपल्या घसरणीची सुरवात असेल. मग आपण त्यांच्यासोबत नियमितपणे सहवास करू लागू. कालांतराने, आपण विश्‍वास नसलेले धर्मत्यागी निंदकही बनू. स्पष्टतः, दुष्टांसोबत मैत्री ठेवल्याने आपल्यामध्ये अधार्मिक आत्मा निर्माण होऊ शकतो आणि यहोवा देवासोबतचा आपला नातेसंबंध नष्ट होऊ शकतो. (१ करिंथकर १५:३३; याकोब ४:४) आपल्यासोबत असे घडण्यास आपण कधीही अनुमती देऊ नये.

८. आध्यात्मिक गोष्टींवर आपले लक्ष कशामुळे केंद्रीत राहील?

प्रार्थनेमुळे आपले लक्ष आध्यात्मिक गोष्टींवर केंद्रीत राहील आणि दुष्टांसोबत आपण संगती करण्याचे टाळू. पौलाने लिहिले, “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” प्रेषिताने सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध प्रशंसनीय, श्रवणीय, सद्‌गुणी, स्तुतीयोग्य गोष्टींवर मनन करण्यास उत्तेजन दिले. (फिलिप्पैकर ४:६-८) आपण पौलाच्या सल्ल्यानुसार वागू या आणि दुष्टांच्या थरापर्यंत कधीही जाऊ नये.

९. आपण दुष्ट चालीरीती टाळत असलो तरी सर्व तऱ्‍हेच्या लोकांना मदत करायचा आपण कसा प्रयत्न करतो?

आपण दुष्टांच्या कार्यांचा तिरस्कार करत असलो तरी इतरांना कुशलतेने साक्ष मात्र देतो; प्रेषित पौलानेही रोमी सुभेदार फेलिक्स याला “नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्‍यांविषयी” सांगितले. (प्रेषितांची कृत्ये २४:२४, २५; कलस्सैकर ४:६) आपण सर्व तऱ्‍हेच्या लोकांना राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करतो आणि त्यांना दयेने वागवतो. “सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले” लोक उपासक बनतील आणि देवाच्या नियमशास्त्रात रमतील असा आत्मविश्‍वास आपल्याला आहे.—प्रेषितांची कृत्ये १३:४८.

परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात तो रमतो

१०. व्यक्‍तिगत अभ्यासाच्या वेळी आपल्या मनावर आणि अंतःकरणावर कायमची छाप कशामुळे पडेल?

१० आनंदी व्यक्‍तीविषयी स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो: “[तो] परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस हळू आवाजात वाचन करितो.” (स्तोत्र १:२NW) देवाचे सेवक यानात्याने आपण “परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो.” शक्य तेव्हा, व्यक्‍तिगत अभ्यासाच्या आणि मनन करण्याच्या वेळी, आपण कदाचित “हळू आवाजात वाचन करितो” अर्थात ते बोलून दाखवतो. शास्त्रवचनाचा कोणताही भाग वाचताना त्यातील शब्द बोलून दाखवल्याने आपल्या मनावर व अंतःकरणावर त्यांची कायमची छाप पडेल.

११. आपण “रात्रंदिवस” बायबलचे वाचन का करावे?

११ ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ आपल्याला दररोज बायबल वाचण्याचे उत्तेजन दिले आहे. (मत्तय २४:४५) मानवजातीकरता यहोवाचा काय संदेश आहे हे पूर्णपणे जाणून घेण्याच्या तीव्र इच्छेपोटी बायबलचे वाचन “रात्रंदिवस” करणे उत्तम आहे—होय, आपल्याला काही कारणास्तव झोप येत नाही तेव्हा देखील आपण हे करू शकतो. पेत्राने आपल्याला आर्जवले: “तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धि व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निऱ्‍या दुधाची इच्छा धरा.” (१ पेत्र २:२, ३) बायबलचे दररोज वाचन करण्यात आणि देवाच्या वचनावर व उद्देशांवर रात्रीच्या वेळी मनन करण्यात तुम्ही रमता का? स्तोत्रकर्ता असे करत असे.—स्तोत्र ६३:६.

१२. यहोवाच्या नियमशास्त्रात आपण रमलो तर आपण काय करू?

१२ आपला अनंतकाळाचा आनंद, देवाच्या नियमशास्त्रात रमण्यावरती अवलंबून आहे. ते नियमशास्त्र परिपूर्ण, न्याय्य असून ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ती होते. (स्तोत्र १९:७-११) शिष्य याकोबाने लिहिले: “जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृति करणारा होतो व त्याला आपल्या कार्यांत धन्यता मिळेल.” (याकोब १:२५) आपण यहोवाच्या नियमशास्त्रात खरोखर रमलो तर आध्यात्मिक गोष्टींचा विचार केल्याशिवाय आपला एकही दिवस जाणार नाही. निश्‍चितच, ‘देवाच्या गहन गोष्टींचा शोध’ घेण्यास आणि देवाच्या राज्यासंबंधी गोष्टींना जीवनात प्रथम स्थान देण्यास आपण प्रवृत्त होऊ.—१ करिंथकर २:१०-१३; मत्तय ६:३३.

तो झाडाप्रमाणे होतो

१३-१५. कोणत्या अर्थाने आपण भरपूर पाण्याच्या पुरवठ्याशेजारी लावलेल्या झाडाप्रमाणे होऊ शकू?

१३ पुढे नीतिमान व्यक्‍तीचे वर्णन करून स्तोत्रकर्ता म्हणतो: “जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” (स्तोत्र १:३) इतर सर्व अपूर्ण मानवांप्रमाणे, यहोवाची सेवा करणाऱ्‍या आपणा सर्वांना जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. (ईयोब १४:१) आपल्याला कदाचित आपल्या विश्‍वासासाठी छळाचा किंवा इतर परीक्षांचा सामना करावा लागेल. (मत्तय ५:१०-१२) परंतु, ज्याप्रमाणे एखादे मजबूत झाड वादळी वाऱ्‍यात तग धरून उभे राहते त्याप्रमाणे देवाच्या मदतीने आपण यशस्वीपणे या परीक्षांचा सामना करू शकू.

१४ पाण्याचा सतत पुरवठा असलेल्या ठिकाणी लावलेले झाड उष्ण हवामानात किंवा अनावृष्टीतही वाळत नाही. आपण देव-भीरू असलो तर आपल्याला केव्हाही न चुकणाऱ्‍या स्रोताकडून—यहोवा देवाकडून—शक्‍ती मिळेल. पौलाला देवाकडून मदत मिळाली व तो म्हणू शकला: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून [यहोवाकडून] मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१३) यहोवाचा पवित्र आत्मा आपले मार्गदर्शन करतो आणि आध्यात्मिकरित्या आपले पोषण करतो तेव्हा आपण कोमेजणार नाही किंवा फळ न देणारे अथवा आध्यात्मिकरित्या मृत होणार नाही. आपण देवाच्या सेवेत फलदायी राहू आणि त्याच्या आत्म्याची फळे देखील प्रदर्शित करू.—यिर्मया १७:७, ८; गलतीकर ५:२२, २३.

१५ ‘सारखा’ असा अनुवाद केलेल्या इब्री शब्दाचा उपयोग करून स्तोत्रकर्ता उपमालंकाराचा उपयोग करतो. तो, सारखे गुण असलेल्या परंतु भिन्‍न असलेल्या दोन गोष्टींमध्ये तुलना करतो. मनुष्य आणि झाडे यांच्यात फरक आहे परंतु पाण्याचा भरपूर पुरवठा असलेल्या ठिकाणच्या हिरव्यागार झाडावरून स्तोत्रकर्त्याला ‘परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमणाऱ्‍या’ व्यक्‍तीच्या आध्यात्मिक उत्कर्षाची आठवण होते. आपण देवाच्या नियमशास्त्रात रमलो तर आपलेही आयुष्य झाडासारखे होईल. किंबहुना, आपण सर्वकाळ जगू शकू.—योहान १७:३.

१६. आपण ‘जे हाती घेऊ ते सिद्धीस जाईल’ हे का व कसे?

१६ आपण सरळ मार्गावर चालत राहिलो तर यहोवा आपल्याला येणाऱ्‍या अडीअडणींचा व परीक्षांचा दबाव सहन करण्यास मदत करील. देवाच्या सेवेत आपण आनंदी आणि फलदायी आहोत. (मत्तय १३:२३; लूक ८:१५) आपण ‘जे काही हाती घेऊ ते सिद्धीस जाईल’ कारण यहोवाची इच्छा करणे हा आपला मुख्य हेतू असेल. त्याचे उद्देश नेहमीच यशस्वी ठरत असल्यामुळे व त्याच्या आज्ञा मानण्यात आपल्याला आनंद होत असल्यामुळे आपली आध्यात्मिक भरभराट होते. (उत्पत्ति ३९:२३; यहोशवा १:७, ८; यशया ५५:११) अडीअडचणींचा सामना करतेवेळी देखील ही गोष्ट खरी आहे.—स्तोत्र ११२:१-३; ३ योहान २.

दुर्जन सुसंपन्‍न असल्यासारखे वाटतात

१७, १८. (अ) स्तोत्रकर्ता दुर्जनांची तुलना कोणाशी करतो? (ब) दुर्जनांची भौतिकरित्या भरभराट होत असली तरी त्यांच्याजवळ कायमची सुरक्षा का नाही?

१७ नीतिमानांपेक्षा दुर्जनांची स्थिती किती वेगळी आहे! दुर्जन काही काळापर्यंत भौतिकरित्या सुसंपन्‍न असल्यासारखे वाटतील परंतु आध्यात्मिकरित्या त्यांची भरभराट होत नसते. स्तोत्रकर्त्याच्या पुढील शब्दांवरून हे स्पष्ट होते: “दुर्जन तसे नाहीत. ते वाऱ्‍याने उडून जाणाऱ्‍या भुसासारखे आहेत. ह्‍यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाहीत; पापी जन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत.” (स्तोत्र १:४, ५) लक्ष द्या, स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो की, “दुर्जन तसे नाहीत.” त्याला असे म्हणायचे आहे की, ते धार्मिक व्यक्‍तींसारखे नाहीत ज्यांची तुलना फलदायी, मजबूत झाडांशी केली आहे.

१८ दुर्जनांची भौतिकरित्या भरभराट झाली तरी त्यांना कायमची सुरक्षा नसते. (स्तोत्र ३७:१६; ७३:३, १२) ते येशूच्या दृष्टान्तातील असंमजस श्रीमंत मनुष्यासारखे आहेत ज्याने येशूला वारशाच्या बाबतीत निर्णय घ्यायला सांगितला होता. येशूने तेथे उपस्थित असलेल्यांना म्हटले: “संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी येशूने एक दाखला सांगितला: कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला इतके पीक आले की, त्याने आपला सगळा माल साठवण्यासाठी कोठारे मोडून मोठी बांधली. मग त्या मनुष्याने खाऊन, पिऊन, सुखी राहण्याचा निश्‍चय केला. पण देवाने त्याला म्हटले: “अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे, ते कोणाचे होईल?” आपल्या मुद्द्‌यावर आणखी जोर देत येशू म्हणाला: “जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करितो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.”—लूक १२:१३-२१.

१९, २०. (अ) प्राचीन काळी मळणी आणि उफणणी कशाप्रकारे होत असे त्याचे वर्णन करा. (ब) दुर्जनांची तुलना कोंड्याशी का करण्यात आली आहे?

१९ दुर्जन “देवविषयक बाबतीत धनवान” नाहीत. यामुळे त्यांची सुरक्षितता आणि स्थिरता भुशाइतकीच अर्थात धान्यावरील पातळ आवरणाइतकीच आहे. प्राचीन काळी, पीकाची कापणी केल्यावर, धान्य मळणीत नेले जाई; सहसा ही मळणी उंचावरती तयार केलेली एक सपाट जागा असे. तेथे दगडी किंवा लोखंडी दातेरे असलेल्या सपाट पट्ट्यांना जनावरे जुंपून धान्यावर चालवले जात असे व अशाप्रकारे धान्याचे देठ मोडून धान्य कोंड्यापासून वेगळे केले जाई. त्यानंतर, उफणणीच्या फावड्याने हे धान्य वाऱ्‍यावर पाखडले जाई. (यशया ३०:२४) धान्य खाली जमिनीवर पडे परंतु वाऱ्‍यामुळे देठ बाजूला पडत आणि कोंडा उडून जाई. (रूथ ३:२) त्यानंतर, चाळणीने धान्यातले खडे व बाकीचा कचरा काढून ते साठवण्यासाठी किंवा दळण्यासाठी तयार होत असे. (लूक २२:३१) कोंडा मात्र त्यात सापडतही नसे.

२० ज्याप्रमाणे धान्य जमिनीवर पाडले जात आणि कोंडा उडवला जाई त्याचप्रमाणे नीतिमान आपल्या जागी राहतील आणि दुर्जन काढून टाकले जातील. परंतु, आपल्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की, दुर्जन सर्वकाळासाठी नाहीसे होतील. त्यांचा नायनाट झाल्यावर, यहोवाच्या नियमशास्त्रात रमणाऱ्‍या लोकांना महान आशीर्वाद प्राप्त होतील. आज्ञाधारक मानवांना सरतेशेवटी देवाकडून सार्वकालिक जीवनाची देणगी प्राप्त होईल.—मत्तय २५:३४-४६; रोमकर ६:२३.

‘नीतिमानांचा आशीर्वादित मार्ग’

२१. “नीतिमानांचा मार्ग परमेश्‍वराला अवगत” कसा आहे?

२१ पहिले स्तोत्र पुढील शब्दांनी समाप्त होते: “नीतिमानांचा मार्ग परमेश्‍वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.” (स्तोत्र १:६) देवाला ‘नीतिमानांचा मार्ग कसा अवगत असतो’? आपण सरळ मार्गाने चालत असलो तर आपला स्वर्गीय पिता आपल्या नीतिमान जीवनशैलीची दखल घेतो आणि आपल्याला त्याचे संमती दिलेले सेवक समजतो. याच्या बदल्यात, तो आपली खरोखर काळजी करतो या खात्रीने आपण त्याच्यावर आपली पूर्ण चिंता टाकू शकतो, नव्हे, टाकली पाहिजे.—यहेज्केल ३४:११; १ पेत्र ५:६, ७.

२२, २३. दुर्जन आणि नीतिमान यांचे काय होईल?

२२ “नीतिमानांचा मार्ग” हमेशासाठी राहील परंतु आपला मार्ग बदलण्यास तयार नसलेले दुर्जन यहोवाच्या न्यायामुळे नष्ट होतील. आणि त्यांचा “मार्ग” किंवा त्यांचे जीवन त्यासोबतच समाप्त होईल. आपण दावीदाच्या पुढील शब्दांमध्ये भरवसा करू शकतो: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधिशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही; पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील. नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:१०, ११, २९.

२३ दुर्जनांचा नामोनिशाण नसलेल्या परादीस पृथ्वीवर राहण्याची संधी प्राप्त होणे किती आनंदाचे असेल! मग, नम्र आणि नीतिमान जनांना खरी शांती मिळेल कारण “परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात” ते नेहमी रमतील. परंतु त्याआधी, “परमेश्‍वराचा निर्णय” अंमलात आणला पाहिजे. (स्तोत्र २:७अ) हा निर्णय काय आहे आणि आपल्याकरता व आपल्या संपूर्ण मानवी कुटुंबाकरता त्याचा काय अर्थ होईल हे पुढील लेखातून आपल्याला पाहायला मदत होईल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• धार्मिक व्यक्‍ती आनंदी का असते?

• आपण यहोवाच्या नियमशास्त्रात रमतो हे कशावरून दिसून येते?

• एक व्यक्‍ती भरपूर पाणी मिळणाऱ्‍या झाडासारखी कशी असू शकते?

• नीतिमानाचा मार्ग दुर्जनापासून वेगळा कसा आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११ पानांवरील चित्र]

दुर्जनांशी संगती टाळायला प्रार्थना मदत करेल

[१२ पानांवरील चित्र]

नीतिमान व्यक्‍ती झाडासारखी का आहे?