व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“परमेश्‍वराचा निर्णय” फोल ठरू शकत नाही

“परमेश्‍वराचा निर्णय” फोल ठरू शकत नाही

“परमेश्‍वराचा निर्णय” फोल ठरू शकत नाही

“मी परमेश्‍वराचा निर्णय कळवितो; तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, . . . माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन.”स्तोत्र २:७, ८.

१. देवाचा आणि राष्ट्रांचा उद्देश यांच्यात कोणता फरक आहे?

यहोवा देवाचा मानवजातीकरता आणि पृथ्वीकरता एक उद्देश आहे. राष्ट्रांचा देखील एक उद्देश आहे. परंतु या उद्देशांमध्ये किती फरक आहे, नाही का? हे अपेक्षितच आहे कारण देव म्हणतो: “आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत.” देवाचा उद्देश निश्‍चित पूर्ण होईल कारण तो पुढे म्हणतो: “पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणाऱ्‍यास बीज, खाणाऱ्‍यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत; त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:९-११.

२, ३. दुसऱ्‍या स्तोत्रात कोणती गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे, पण कोणते प्रश्‍न उपस्थित होतात?

मशीही राजासंबंधी देवाचा उद्देश पूर्ण होईल हे दुसऱ्‍या स्तोत्रात स्पष्ट होते. हे स्तोत्र ज्याने रचले त्या प्राचीन इस्राएलच्या दावीद राजाला ईश्‍वराकडून प्रेरणा मिळाली व त्याने भाकीत केले की, राष्ट्रे दंगल मांडतील असा एक उल्लेखनीय समय येईल. त्यांचे शासक यहोवा देव आणि त्याचा अभिषिक्‍त याच्याविरुद्ध उठतील. परंतु स्तोत्रकर्त्याने असेही गायिले: “तू माझा पुत्र आहेस, . . . माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतांपर्यंतचे स्वामित्व तुला देईन.”—स्तोत्र २:७, ८.

‘यहोवाच्या निर्णयाचा’ राष्ट्रांकरता काय अर्थ होतो? सर्वसामान्यपणे मानवजातीवर त्याचा कसा परिणाम होतो? या घटनांचा, दुसरे स्तोत्र वाचणाऱ्‍या सर्व देव-भीरू लोकांकरता काय अर्थ आहे?

दंगल मांडणारी राष्ट्रे

४. स्तोत्र २:१, २ मधील मुख्य मुद्दे तुम्ही सारांशात कसे मांडाल?

राष्ट्रे आणि त्यांच्या शासकांच्या कार्यांना संबोधून स्तोत्रकर्ता आपल्या गीताची सुरवात अशी करतो: “राष्ट्रांनी दंगल का मांडिली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत? परमेश्‍वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्‍ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत.”—स्तोत्र २:१, २. *

५, ६. लोकांनी कोणती ‘व्यर्थ योजना केली आहे’?

आधुनिक दिवसातील राष्ट्रांतील लोक कोणती “व्यर्थ योजना . . . करीत आहेत”? देवाचा अभिषिक्‍त अर्थात मशीहा किंवा ख्रिस्त याला स्वीकारण्याऐवजी राष्ट्रे आपला स्वतःचा अधिकार टिकवून ठेवण्यासाठी ‘योजना करीत आहेत’ किंवा चिंतन करत आहेत. सा.यु. पहिल्या शतकात, यहुदी आणि रोमी अधिकाऱ्‍यांनी मिळून देवाचा नियुक्‍त राजा, येशू ख्रिस्त याला ठार मारले तेव्हाही दुसऱ्‍या स्तोत्रातील या शब्दांची पूर्णता झाली. परंतु, १९१४ मध्ये येशूला स्वर्गीय राजा बनवण्यात आले तेव्हा याची मोठी पूर्णता सुरू झाली. तेव्हापासून, पृथ्वीवरील एकाही राजनैतिक संघटनेने देवाच्या सिंहासनाधिष्ठ राजाला मान्य केलेले नाही.

“लोक व्यर्थ योजना का करीत आहेत” असे स्तोत्रकर्त्याने विचारले त्याचा काय अर्थ होतो? त्यांचा उद्देश व्यर्थ आहे; तो पोकळ असून निश्‍चित फोल ठरेल. ते पृथ्वीवर शांती आणि एकता आणू शकत नाहीत. तरीही, ते देवाच्या शासनाचा विरोध होईल असे कार्य करतात. इतकेच नव्हे तर, त्यांनी एकत्र मिळून बंड केले आहे व त्यांनी सर्वश्रेष्ठ देवाच्या आणि त्याच्या अभिषिक्‍ताच्या विरुद्ध स्वतःला जमवले आहे. किती हा मूर्खपणा!

यहोवाचा प्रतापी राजा

७. येशूच्या प्रारंभिक अनुयायांनी प्रार्थनेमध्ये स्तोत्र २:१, २ कशाप्रकारे लागू केले?

येशूच्या अनुयायांनी स्तोत्र २:१, २ मधील शब्द त्याला लागू केले. त्यांना विश्‍वासाकरता छळण्यात आले तेव्हा त्यांनी प्रार्थना केली: “हे स्वामी [यहोवा], आकाश, पृथ्वी, समुद्र ह्‍यांचा व त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्‍नकर्ता तूच आहेस; आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, ह्‍याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटले: ‘राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्‍ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी जमले;’ कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू ह्‍याच्याविरुद्ध ह्‍या शहरात परराष्ट्रीय व इस्राएल लोक ह्‍याच्यासह हेरोद [अंतिपा] व पंतय पिलात हे एकत्र झाले.” (प्रेषितांची कृत्ये ४:२४-२७; लूक २३:१-१२) * होय, पहिल्या शतकात देवाचा अभिषिक्‍त सेवक येशू याच्याविरुद्ध कट रचण्यात आला होता. परंतु, या स्तोत्राची अनेक शतकांनंतर आणखी एक पूर्णता होणार होती.

८. स्तोत्र २:३ सध्याच्या राष्ट्रांना कसे लागू होते?

प्राचीन इस्राएलमध्ये दावीदासारखा मानवी राजा होता तेव्हा, मूर्तिपूजक राष्ट्रे आणि शासक मिळून देवाविरुद्ध आणि त्याच्या सिंहासनाधिष्ठ अभिषिक्‍ताविरुद्ध जमले होते. परंतु आपल्या काळाविषयी काय? सध्याच्या काळातील राष्ट्रांना यहोवाचे आणि मशीहाचे नियम पाळायचे नाहीत. यास्तव, ते असे म्हणत असल्याचे दाखवले आहे: “आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश फेकून देऊ”! (स्तोत्र २:३) देवाने आणि त्याच्या अभिषिक्‍ताने कोणतेही बंधन घातले तर शासक आणि राष्ट्रे त्यांचा विरोध करतील. अर्थात, ही बंधने तोडून टाकण्याचे व पाश फेकून देण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतील.

यहोवा त्यांचा उपहास करतो

९, १०. यहोवा राष्ट्रांचा उपहास का करतो?

राष्ट्रांचे शासक स्वतःचे सार्वभौमत्व स्थापन करण्यासाठी कितीही प्रयत्न करत असले तरी यहोवा निर्धास्त आहे. दुसऱ्‍या स्तोत्रात पुढे असे म्हटले आहे: “स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे; प्रभु त्यांचा उपहास करीत आहे.” (स्तोत्र २:४) यहोवा आपला उद्देश पूर्ण करतो; या शासकांना तो महत्त्व देत नाही. त्यांचे धैर्य पाहून तो हसतो; तो त्यांचा उपहास करतो. त्यांना जे काही करायचे आहे त्याची त्यांना फुशारकी मारू दे. यहोवाच्या समोर मात्र ते हास्यस्पद आहेत. ते व्यर्थपणे त्याचा विरोध करतात यावर तो हसतो.

१० आपल्या स्तोत्रांत इतर ठिकाणी दावीद शत्रू असलेल्या लोकांना व राष्ट्रांना उद्देशून असे गातो: “हे परमेश्‍वरा, सेनाधीश देवा, इस्राएलाच्या देवा, तू सर्व राष्ट्रांची झडती घेण्यास जागृत हो; कोणाहि दगेखोर दुष्टावर दया करू नको. संध्याकाळी ते माघारी येतात कुत्र्याप्रमाणे गुरगुरतात व नगराभोवती हिंडतात. पाहा, ते आपल्या मुखावाटे दुष्ट उद्‌गार काढितात; त्यांच्या तोंडचे शब्द तरवारीच आहेत; कारण, ऐकतो कोण, असे ते म्हणतात; परंतु हे परमेश्‍वरा, तू त्यांस हसशील; तू सर्व राष्ट्रांचा उपहास करिशील.” (स्तोत्र ५९:५-८) राष्ट्रे, यहोवाविरुद्ध मूर्खपणाचा मार्ग अवलंबून फुशारकी मारत आहेत आणि गोंधळून गेली आहेत म्हणून यहोवा त्यांच्यावर हसतो.

११. राष्ट्रे देवाच्या उद्देशाविरुद्ध कार्य करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा काय घडते?

११ देव कोणत्याही समस्येवर उपाय काढू शकतो हा आपला विश्‍वास स्तोत्र २ मधील शब्दांनी मजबूत होतो. आपण अशी पक्की खात्री बाळगू शकतो की, तो नेहमी आपली इच्छा पूर्ण करतो आणि कधीही आपल्या निष्ठावान सेवकांना त्यागत नाही. (स्तोत्र ९४:१४) तर मग, यहोवाच्या उद्देशाच्या विरुद्ध कार्य करण्याचा प्रयत्न राष्ट्रे करतात तेव्हा काय घडते? या स्तोत्रानुसार, गर्जनेच्या भयंकर गडगडण्याच्या आवाजाप्रमाणे देव “त्यांच्याशी क्रोधयुक्‍त होऊन बोलेल.” शिवाय, “तो संतप्त होऊन” वीज कडाडल्याप्रमाणे “त्यांस घाबरे करील.”—स्तोत्र २:५.

देवाचा राजा अधिष्ठित होतो

१२. स्तोत्र २:६ मधील अधिष्ठित होणे कशाला सूचित होते?

१२ स्तोत्रकर्त्याद्वारे यहोवा पुढे जे म्हणतो त्याने राष्ट्रे निश्‍चितच अवस्थ होतात. देव घोषणा करतो: “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.” (स्तोत्र २:६) सीयोन पर्वत जेरूसलेममधील एक डोंगर होता जेथे दावीदाला संपूर्ण इस्राएलवर राजा नियुक्‍त करण्यात आले होते. पण मशीही राजा त्या शहरात किंवा पृथ्वीवर कोठेही सिंहासनाधिष्ठ होणार नाही. उलट, यहोवाने येशू ख्रिस्ताला आपला निवडलेला मशीही राजा म्हणून स्वर्गीय सीयोन पर्वतावर केव्हाच अधिष्ठित केले आहे.—प्रकटीकरण १४:१.

१३. यहोवाने आपल्या पुत्रासोबत कोणता करार केला?

१३ मशीही राजा आता बोलतो. तो म्हणतो: “मी परमेश्‍वराचा [ज्याने आपल्या पुत्राबरोबर राज्यासाठी करार केला आहे त्याचा] निर्णय कळवितो; तो [यहोवा देव] मला म्हणाला, ‘तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.’” (स्तोत्र २:७) ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांशी बोलताना राज्य कराराचा उल्लेख करून म्हटले: “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीहि तुम्हास नेमून देतो.”—लूक २२:२८, २९.

१४. येशू राजपदाचा हक्कदार आहे यात वाद नाही असे का म्हणता येऊ शकते?

१४ स्तोत्र २:७ मध्ये भाकीत केल्याप्रमाणे, येशूला त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी आणि नंतर आत्मिक जीवनासाठी पुनरुत्थित करून यहोवाने आपला पुत्र म्हणून त्याची ओळख करून दिली. (मार्क १:९-११; रोमकर १:४; इब्री लोकांस १:५; ५:५) होय, स्वर्गीय राज्याचा राजा देवाचा एकुलता एक पुत्र आहे. (योहान ३:१६) राजा दावीदाच्या शाही घराण्यातून येशूचा जन्म झाल्यामुळे राजपदाचा तो हक्कदार आहे यात वाद नाही. (२ शमुवेल ७:४-१७; मत्तय १:६, १६) या स्तोत्रानुसार, देव आपल्या पुत्राला म्हणतो: “माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतांपर्यंतचे स्वामित्व तुला देईन.”—स्तोत्र २:८.

१५. येशू वतनादाखल राष्ट्रे देण्याची विनंती का करतो?

१५ राजा—देवाचा स्वतःचा पुत्र—यहोवाच्या खालोखाल आहे. येशू हा यहोवाच्या कसोटीला उतरलेला, निष्ठावान आणि विश्‍वसनीय व्यक्‍ती आहे. शिवाय, देवाचा ज्येष्ठपुत्र या नात्याने येशू वारसदार देखील आहे. अर्थातच, येशू ख्रिस्त “अदृश्‍य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पतीत ज्येष्ठ आहे.” (कलस्सैकर १:१५) त्याला केवळ देवाकडे मागावे लागते आणि देव ‘त्याला राष्ट्रे वतनादाखल देतो, पृथ्वीच्या दिगंतांपर्यंतचे स्वामित्व त्याला देतो.’ ‘मनुष्यजातीच्या ठायी येशूला आनंद मिळतो’ आणि पृथ्वीसंबंधी व मानवजातीसंबंधी आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करण्याची त्याला आसक्‍ती असल्यामुळे तो ही विनंती करतो.—नीतिसूत्रे ८:३०, ३१.

राष्ट्रांविरुद्ध यहोवाचा निर्णय

१६, १७. स्तोत्र २:९ नुसार राष्ट्रांचे काय होणार आहे?

१६ दुसऱ्‍या स्तोत्राची पूर्णता आता म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या अदृश्‍य उपस्थितीदरम्यान होत असल्यामुळे राष्ट्रांचे काय होईल? राजा लवकरच देवाने जाहीर केलेले वचन पूर्ण करील: “लोहदंडाने तू त्यांस फोडून काढिशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करिशील.”—स्तोत्र २:९.

१७ प्राचीन काळातील राजांकडे असलेले दंड शाही अधिकाराची चिन्हे होती. काही दंड, या स्तोत्रात सांगितल्यानुसार लोखंडाचे होते. राजा ख्रिस्त राष्ट्रांचा नाश किती सहजपणे करील हे या स्तोत्रातील लाक्षणिक भाषेतून दिसते. लोहदंडाने कुंभाराच्या मडक्यावर जोरदार फटका मारल्यावर त्याचा पूर्ण चुराडा होतो.

१८, १९. देवाची संमती प्राप्त करण्यासाठी, पृथ्वीवरील राजांना काय करण्याची गरज आहे?

१८ राष्ट्रांच्या शासकांना हा चुराडा होताना पाहावेच लागेल का? नाही, कारण स्तोत्रकर्ता त्यांना पुढील शब्दांमध्ये विनंती करतो: “राजांनो, आता शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या.” (स्तोत्र २:१०) राजांना दखल घेण्यास, बोध घेण्यास सांगितले गेले आहे. देवाचे राज्य मानवजातीच्या कल्याणाकरता जे करील याच्या विरोधात त्यांच्या योजना किती व्यर्थ आहेत याचा त्यांनी विचार करावा.

१९ देवाची संमती प्राप्त करण्यासाठी पृथ्वीवरील राजांना त्यांचा मार्ग बदलावा लागेल. “भीड धरून परमेश्‍वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा,” असे त्यांना आर्जवले आहे. (स्तोत्र २:११) त्यांनी हे केल्यास काय होईल? दंगल मांडण्याऐवजी किंवा क्षुब्ध मनःस्थितीत असण्याऐवजी मशीही राजाने त्यांच्याकरता ठेवलेल्या भावी प्रत्याशेकडे पाहून ते आनंदी होऊ शकतात. पण, पृथ्वीवरील शासकांना, आपल्या शासनात दाखवत असलेला घमंडीपणा आणि गर्विष्ठपणा सोडून द्यावा लागेल. शिवाय, त्यांना उशीर न लावता बदल करावा लागेल आणि यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या अतुलनीय श्रेष्ठत्वाविषयी व देवाच्या आणि त्याच्या मशीही राजाच्या प्रतिकार न करता येणाऱ्‍या शक्‍तीविषयी बोध घ्यावा लागेल.

‘पुत्राचे चुंबन घेणे’

२०, २१. ‘पुत्राचे चुंबन घेण्याचा’ काय अर्थ होतो?

२० यानंतर, स्तोत्र २ मध्ये राष्ट्रांच्या शासकांना दयाळुपणाने आमंत्रण देण्यात येते. एकत्र जमून विरोध करण्याऐवजी, त्यांना असा सल्ला देण्यात येतो: “पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल.” (स्तोत्र २:१२अ) सार्वभौम प्रभू यहोवा निर्णय घेतो तेव्हा दखल घेण्याची गरज आहे. देवाने आपल्या पुत्राला सिंहासनावर विराजमान केले तेव्हा पृथ्वीवरील राजांनी “व्यर्थ योजना” करण्याचे सोडून द्यायला हवे होते. त्यांनी लगेच राजाला स्वीकारायचे होते आणि त्याला पूर्ण अधीनता दाखवायची होती.

२१ ‘पुत्राचे चुंबन घेण्याची’ काय गरज आहे? हे स्तोत्र रचण्यात आले त्या काळी, चुंबन घेऊन मैत्री व्यक्‍त केली जात असे व घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले जात असे आणि पाहुण्यांचा पाहुणचारही केला जात असे. निष्ठा किंवा विश्‍वासूपणा दाखवण्यासाठीही चुंबन घेतले जाई. (१ शमुवेल १०:१) दुसऱ्‍या स्तोत्रातील या वचनात, देव राष्ट्रांना त्याच्या पुत्राचे चुंबन घेण्यास अथवा अभिषिक्‍त राजा म्हणून त्याचे स्वागत करण्यास आज्ञा देत आहे.

२२. राष्ट्रांच्या शासकांनी कोणत्या इशाऱ्‍याकडे कान द्यावा?

२२ देवाच्या नियुक्‍त राजाचा अधिकार जे मान्य करत नाहीत ते यहोवाचा अनादर करतात. ते यहोवा देवाचे विश्‍वव्यापी सार्वभौमत्व, त्याचा अधिकार आणि मानवजातीकरता उत्तम शासक असलेला राजा निवडण्याची त्याची क्षमता मान्य करत नाहीत. राष्ट्रांच्या शासकांना कळेल की, ते स्वतःच्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना देवाचा क्रोध त्यांच्यावर आकस्मात येईल. ‘त्याचा क्रोध त्वरित पेटतो’ किंवा तो फार लवकर संतप्त होतो आणि त्याचा प्रतिकार कोणी करू शकत नाही. राष्ट्रांच्या शासकांनी कृतज्ञपणे हा इशारा स्वीकारावा आणि त्यानुसार कार्य करावे. मगच त्यांना जीवन मिळेल.

२३. लोकांना अजूनही काय करण्यासाठी वेळ आहे?

२३ या नाट्यमय स्तोत्राच्या शेवटी असे म्हटले आहे: “त्याला [यहोवाला] शरण जाणारे सगळे धन्य होत.” (स्तोत्र २:१२ब) प्रत्येक व्यक्‍तीला सुरक्षा प्राप्त करण्यास अद्याप वेळ आहे. राष्ट्रांच्या योजनांना पाठिंबा देणाऱ्‍या वैयक्‍तिक शासकांना देखील सुरक्षा प्राप्त करण्यास वेळ आहे. आपल्या राज्य शासनात आसरा देणाऱ्‍या यहोवाकडे ते शरण जाऊ शकतात. परंतु मशीही राज्य विरोधी राष्ट्रांचा चुराडा करील त्या आधी त्यांना पाऊल उचलण्याची गरज आहे.

२४. या त्रस्त जगातही आपण अधिक समाधानाचे जीवन कसे जगू शकतो?

२४ आपण शास्त्रवचनांचा मेहनतीने अभ्यास केला आणि त्यांचा सल्ला आपल्या जीवनात लागू केला तर या त्रस्त जगातही आपण अधिक समाधानकारक जीवन जगू शकू. शास्त्रवचनीय सल्ला लागू केल्याने कुटुंबात आनंद नांदतो आणि जगाला ग्रासलेल्या चिंतांपासून आणि भयांपासून मुक्‍तता मिळते. बायबलचे मार्गदर्शन अनुसरल्याने आपण निर्माणकर्त्याला संतुष्ट करत असल्याचा आत्मविश्‍वास आपल्याला मिळतो. ‘आताच्या’ व देवाच्या राज्याचे शासन झिडकारून जे योग्य त्याचा विरोध करतात अशा लोकांचा पृथ्वीवरून नायनाट केल्यानंतर येणाऱ्‍या ‘पुढच्या जीवनाची’ खात्री विश्‍वव्यापी सार्वभौमाशिवाय आणखी कोणीही देऊ शकत नाही.—१ तीमथ्य ४:८.

२५. “परमेश्‍वराचा निर्णय” अपयशी ठरणार नसल्यामुळे, आपल्या काळात काय घडण्याची आपण अपेक्षा करू शकतो?

२५ “परमेश्‍वराचा निर्णय” अपयशी ठरणार नाही. देव आपला निर्माणकर्ता असल्यामुळे मानवजातीकरता काय सर्वोत्तम आहे हे त्याला ठाऊक आहे आणि तो आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आज्ञाधारक मानवजातीला शांती, समाधान आणि कायमची सुरक्षा बहाल करून आपला उद्देश सिद्धीस नेईल. आपल्या काळाविषयी संदेष्ट्या दानीएलाने लिहिले: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; . . . तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) म्हणूनच, ‘पुत्राचे चुंबन घेणे’ आणि सार्वभौम प्रभू यहोवाची सेवा करण्याची हीच वेळ आहे!

[तळटीपा]

^ परि. 4 सुरवातीला, राजा दावीद हा ‘अभिषिक्‍त जण’ होता आणि “पृथ्वीवरील राजे” पलिष्टी शासक होते ज्यांनी दावीदाविरुद्ध आपले सैन्य एकत्र केले होते.

^ परि. 7 ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील इतर वचनांतूनही हे दिसून येते की, दुसऱ्‍या स्तोत्रात उल्लेखलेला परमेश्‍वराचा अभिषिक्‍त येशू आहे. प्रेषितांची कृत्ये १३:३२, ३३ आणि इब्री लोकांस १:५; ५:५ याच्याशी स्तोत्र २:७ ची तुलना केल्यावरही ही गोष्ट शाबीत होते. स्तोत्र २:९ आणि प्रकटीकरण २:२७ देखील पाहा.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• लोकांनी कोणती ‘व्यर्थ योजना केली आहे’?

• यहोवा राष्ट्रांचा उपहास का करतो?

• राष्ट्रांविरुद्ध देवाचा निर्णय काय आहे?

• ‘पुत्राचे चुंबन घ्या’ याचा काय अर्थ होतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चित्र]

दावीदाने प्रतापी मशीही राजाविषयी गीत गायिले

[१७ पानांवरील चित्र]

शासकांनी आणि इस्राएलच्या लोकांनी येशू ख्रिस्ताविरुद्ध कट रचला

[१८ पानांवरील चित्र]

ख्रिस्ताला स्वर्गीय सीयोन पर्वतावर राजा म्हणून अधिष्ठित करण्यात आले आहे