व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आध्यात्मिक ध्येयांद्वारे निर्माणकर्त्याचे गौरव करा

आध्यात्मिक ध्येयांद्वारे निर्माणकर्त्याचे गौरव करा

आध्यात्मिक ध्येयांद्वारे निर्माणकर्त्याचे गौरव करा

“आपण कोणत्या बंदरावर उतरणार आहोत, हे जर एखाद्याला माहीतच नसेल तर वारा कोणत्या दिशेने वाहत आहे, याचा तो विचार करत नाही.” या शब्दांचे श्रेय पहिल्या शतकातील रोमी तत्त्वज्ञानी लुक्यस ऑनायनस सेनेका यांना दिले जाते; हे शब्द, जीवनाला मार्गदर्शन मिळण्यासाठी ध्येयांची गरज आहे या फार पूर्वी स्वीकृत केलेल्या सत्याला पुष्टी देतात.

बायबलमध्ये, ध्येये ठेवणे किती महत्त्वाचे आहे ही जाणीव असलेल्यांची उदाहरणे आहेत. नोहाने, “आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्‍वासाने तारू तयार” करण्यासाठी सुमारे ५० वर्षे कष्ट केले. संदेष्ट्या मोशेची “दृष्टी प्रतिफळावर होती.” (इब्री लोकांस ११:७, २६) मोशेचा वारसदार यहोशवा याला, कनान देशावर विजय मिळवण्याचे ध्येय ठेवण्याची आज्ञा देवाकडून देण्यात आली.—अनुवाद ३:२१, २२, २८; यहोशवा १२:७-२४.

सा.यु. पहिल्या शतकात, प्रेषित पौलावर, “राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल,” या येशूच्या शब्दांचा मोठा प्रभाव पडल्यामुळे त्याने आध्यात्मिक ध्येये ठेवली. (मत्तय २४:१४) प्रभू येशूने, पौलाला व्यक्‍तिगतरीत्या दिलेल्या संदेशांमुळे व दृष्टान्तांमुळे तसेच “[येशूचे] नाव घेऊन जाण्याकरिता” मिळालेल्या नेमणुकीमुळे प्रवृत्त होऊन त्याने आशिया मायनर आणि युरोपमध्ये अनेक मंडळ्या स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.—प्रेषितांची कृत्ये ९:१५; कलस्सैकर १:२३.

होय, पिढ्यान्‌पिढ्यांपासून यहोवाच्या सेवकांनी उदात्त ध्येये ठेवण्याद्वारे व ती साध्य करण्याद्वारे देवाचे गौरव केले आहे. आज आपण आध्यात्मिक ध्येये कशी ठेवू शकतो? आपण कोणती ध्येये प्राप्त करण्यास झटले पाहिजे आणि या ध्येयांपर्यंत पोहंचण्याकरता आपण कोणती व्यावहारिक पावले उचलू शकतो?

उचित हेतू बाळगण्याचे महत्त्व

जीवनातील जवळजवळ सर्व कार्यांत ध्येये ठेवली जाऊ शकतात; या जगातही ध्येये ठेवून ते गाठणारे लोक आहेत. परंतु जगिक ध्येये ईश्‍वरशासित ध्येयांप्रमाणे नसतात. जगातील बहुतेक लोक, धनसंपत्ती बाळगण्याची मनसा आणि हुद्दा व सत्ता मिळवण्याची हाव यांमुळे ध्येय ठेवतात. पण सत्ता आणि नाव मिळण्यासाठी एखाद्या ध्येयाच्या मागे लागणे किती चुकीचे ठरू शकते! यहोवा देवाचे गौरव करणाऱ्‍या ध्येयांचा, आपल्या उपासनेशी आणि देवाच्या राज्याला आपण देत असलेल्या पाठिंब्याशी थेट संबंध आहे. (मत्तय ६:३३) ही ध्येये यहोवा देवाप्रती आणि सहमानवाप्रती असलेल्या प्रेमाने प्रवृत्त होऊन ईश्‍वरी भक्‍ती वाढवण्यासाठी ठेवली जातात.—मत्तय २२:३७-३९; १ तीमथ्य ४:७.

खास सेवा वाढवण्यासाठी किंवा व्यक्‍तिगत आध्यात्मिक प्रगतीसाठी आपण ठेवत असलेल्या आध्यात्मिक ध्येयांमागे उचित हेतू असला पाहिजे. परंतु कधीकधी, उचित हेतूने ठेवलेली ध्येये देखील पूर्ण होत नाहीत. आपण ध्येये कशी ठेवू शकतो आणि त्यांच्यापर्यंत पोहंचण्याची शक्यता कशी वाढवू शकतो?

तीव्र इच्छा अत्यावश्‍यक

यहोवा देवाने विश्‍वाची निर्मिती कशी साध्य केली त्याचा विचार करा. “संध्याकाळ झाली व सकाळ झाली” या शब्दांद्वारे यहोवाने प्रत्येक निर्मितीकाळ वेगळा केला. (उत्पत्ति १:५, ८, १३, १९, २३, ३१) प्रत्येक निर्मिती काळाच्या सुरवातीला, त्या दिवसासाठी त्याचे काय उद्दिष्ट आहे हे त्याला स्पष्टपणे माहीत होते. अशारितीने सर्व काही निर्माण करण्याचा आपला उद्देश देवाने पूर्ण केला. (प्रकटीकरण ४:११) कुलपिता ईयोब याने यहोवाविषयी म्हटले: “त्याच्या जिवाने जे इच्छिले तेच तो करतो.” (ईयोब २३:१३, पं.र.भा.) “आपण केलेले सर्व” पाहून यहोवाला किती समाधान वाटले असावे; सर्व काही पाहिल्यानंतर त्याने “फार चांगले आहे,” अशी पावती दिली.—उत्पत्ति १:३१.

आपली ध्येये पूर्ण होण्याकरता, आपल्यामध्येही तशी तीव्र इच्छा असली पाहिजे. अशी तीव्र इच्छा आपण कशी निर्माण करू शकतो? पृथ्वी, आधी निराकार व पडीक होती तेव्हासुद्धा यहोवा शेवटला परिणाम पाहू शकत होता—अंतराळात त्याचे गौरव व त्याचा आदर करणारे एक देखणे रत्न तो पाहू शकत होता! तसेच, आपणही शेवटल्या परिणामावर आणि ध्येय साध्य केल्यानंतर मिळणाऱ्‍या लाभांवर मनन करण्याद्वारे आपले विशिष्ट ध्येय गाठण्याची तीव्र इच्छा आपल्यात निर्माण करू शकतो. १९ वर्षीय टोनीचा असाच अनुभव आहे. पश्‍चिम युरोपमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला त्याने दिलेली भेट तो कधीच विसरू शकला नाही. तेव्हापासून त्याच्या मनात सतत हाच प्रश्‍न घोळत राहिला, ‘अशा ठिकाणी राहून काम करण्याचा अनुभव कसा असावा?’ टोनीने या शक्यतेवर विचार करण्याचे थांबवले नाही तर तो ते ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत राहिला. अनेक वर्षांनंतर शाखा दफ्तरात काम करण्यासाठी त्याने भरलेला अर्ज स्वीकारण्यात आला तेव्हा त्याला किती आनंद झाला!

एक विशिष्ट ध्येय ठेवून ते पूर्ण केलेल्यांबरोबर संगती केल्यानेसुद्धा आपल्यामध्ये ध्येय ठेवून ते साध्य करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. ३० वर्षीय जेसनला किशोरवयात असताना क्षेत्र सेवेत जायला आवडत नसे. पण उच्च शाळा संपल्यानंतर त्याने आनंदाने पायनियर सेवा सुरू करून तो पूर्णवेळेचा राज्य उद्‌घोषक बनला. जेसनमध्ये पायनियर बनण्याची इच्छा कोणत्या गोष्टीमुळे निर्माण झाली? तो म्हणतो: “पायनियरींग केलेल्यांबरोबर बोलल्यामुळे व त्यांच्याबरोबर क्षेत्र सेवेत गेल्यामुळे माझ्यावर बराच प्रभाव पडला.”

आपली ध्येये लिहून काढणे मदतदायक

एक अस्पष्ट कल्पना व्यक्‍त करण्यासाठी आपण शब्द निवडतो तेव्हा ती आपल्या मनात अधिक स्पष्टपणे आकार घेते. शलमोनाने म्हटले, की उचित शब्द जीवनाला मार्गदर्शन देणाऱ्‍या शक्‍तिशाली पराण्यासारखे होऊ शकतात. (उपदेशक १२:११) असे शब्द कागदावर लिहिल्यावर मन आणि अंतःकरणावर त्यांची खोल छाप पडते. यहोवाने इस्राएलमधील राजांना नियमशास्त्राची एक व्यक्‍तिगत प्रत लिहून काढायला काय उगाच सांगितले होते? (अनुवाद १७:१८) यास्तव, आपण हवे असल्यास, एका कागदावर आपली ध्येये, त्यांना साध्य करण्याचे मार्ग, मार्गात येऊ शकणारे अडथळे, अडथळ्यांवर कशाप्रकारे मात करायची हे सर्व लिहून काढू शकतो. तसेच, ज्या गोष्टींबद्दलची माहिती घेतली पाहिजे ते विषय ओळखायला, कला शिकून घ्यायला आणि आपल्याला साहाय्य व पाठिंबा देणाऱ्‍या लोकांविषयी जाणून घ्यायला देखील मदत होईल.

एका आशियाई राष्ट्रात दूरवरच्या क्षेत्रात अनेक काळापासून खास पायनियर म्हणून सेवा करणारे जेफ्री यांची मनःस्थिती, स्वतःसाठी आध्यात्मिक ध्येये ठेवल्यामुळे शांत किंवा स्थिर झाली. त्यांच्या पत्नीचा अचानक मृत्यू झाला तेव्हा त्यांच्यावर जणू आभाळ कोसळले. या दुःखातून स्वतःला सावरल्यानंतर, जेफ्री यांनी आध्यात्मिक ध्येये ठेवून पायनियर सेवेत पूर्णपणे व्यस्त होण्याचे ठरवले. एका कागदावर आपल्या योजनांविषयी लिहिल्यानंतर त्यांनी प्रार्थनापूर्वक महिन्याच्या शेवटपर्यंत तीन नवीन बायबल अभ्यास संचालित करण्याचे ध्येय ठेवले. ते दररोज आपल्या कार्याची उजळणी करीत आणि प्रत्येक दहा दिवसांनंतर आपण किती प्रगती केली ते पाहत. त्यांना आपले ध्येय गाठण्यात यश आले का? हो तर! महिन्याअखेरी त्यांनी मोठ्या आनंदाने आपल्या रिपोर्टमध्ये चार नवे बायबल अभ्यास नोंदले.

निशाणी म्हणून अल्पकाळाची ध्येये ठेवा

काही ध्येये सुरवातीला, साध्य करण्यास कठीण वाटू शकतील. आधी उल्लेख केलेल्या टोनीच्या बाबतीत, त्याला शाखा दफ्तरात सेवा करणे हे स्वप्न वाटत होते. कारण तो हेकेखोर मनोवृत्तीचा होता, आणि त्याने अद्याप देवाला आपले जीवन समर्पितही केले नव्हते. पण टोनीने आपले जीवन यहोवाच्या मार्गांच्या सामंजस्यात आणण्याचे ठरवले आणि बाप्तिस्मा घेण्याच्या पात्रतेचे बनण्याचे ध्येय ठेवले. हे ध्येय साध्य केल्यानंतर त्याने सहायक पायनियरींगचे आणि नंतर सामान्य पायनियरींगचे ध्येय ठेवले; तो पायनियरींग कोणत्या दिवशी सुरू करेल त्या कॅलेंडरवरील तारखांवर त्याने निशाणी करून ठेवली. काही काळ पायनियरींग केल्यानंतर त्याला शाखा दफ्तरात सेवा करणे, स्वप्न नव्हे तर वास्तविक वाटू लागले.

आपणही दीर्घकाळाच्या ध्येयांचे विभाजन अल्पकाळाच्या ध्येयांत करू शकतो. ही अल्पकाळाची ध्येये, दीर्घकाळचे ध्येय साध्य करण्यातले टप्पे ठरू शकतात. मग प्रत्येक वेळा आपण कितपत प्रगती केली आहे त्याची उजळणी केल्यास आपल्याला आपले लक्ष आपल्या मुख्य ध्येयावर केंद्रित ठेवण्यास मदत होईल. आपल्या योजनांविषयी यहोवाला सतत प्रार्थना केल्याने देखील आपल्याला मार्गावर राहण्यास मदत मिळेल. प्रेषित पौलाने असे आर्जवले: “निरंतर प्रार्थना करा.”—१ थेस्सलनीकाकर ५:१७.

दृढनिश्‍चय आणि चिकाटी आवश्‍यक

कधीकधी काही ध्येयांविषयी काळजीपूर्वक योजना केल्यावर व त्यांना पूर्ण करण्याची तीव्र इच्छा असूनही ती अधूरी राहतात. प्रेषित पौलाने जेव्हा योहान मार्कला आपल्या दुसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍याच्या वेळी सोबत नेले नाही तेव्हा मार्कला किती वाईट वाटले असावे. (प्रेषितांची कृत्ये १५:३७-४०) यावरून मार्कला धडा शिकावा लागला असेल आणि अधिक सेवेसाठी आपल्या ध्येयात फेरफार करावा लागला असेल. आणि त्याने तसे केले. नंतर पौलाने मार्कचा चांगला उल्लेख केला व बॅबिलोनमध्ये प्रेषित पेत्राबरोबरही मार्क राहिला. (२ तीमथ्य ४:११; १ पेत्र ५:१३) येशूचे जीवन व त्याची सेवा यांबद्दलचा ईश्‍वरप्रेरित अहवाल लिहिणे, हा त्याचा सर्वात महान विशेषाधिकार होता.

आध्यात्मिक ध्येये पूर्ण करत असताना आपल्याला देखील कदाचित काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल. अशा वेळी हार मानण्याऐवजी आपण, केलेल्या प्रगतीची उजळणी केली पाहिजे, आपले ध्येय अजूनही उचित व साध्य करण्याजोगे आहे की नाही हे तपासून पाहिले पाहिजे आणि आवश्‍यक असल्यास ध्येय बदलले पाहिजे. अडथळे सामोरे येतात तेव्हा आपण दृढनिश्‍चयाने व चिकाटीने प्रगती करण्यास झटले पाहिजे. “आपली सर्व कार्ये परमेश्‍वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील,” असे राजा शलमोन आपल्याला आश्‍वासन देतो.—नीतिसूत्रे १६:३.

तरीसुद्धा कधीकधी परिस्थितींमुळे विशिष्ट ध्येये साध्य करणे व्यावहारिक नसते. उदाहरणार्थ, नाजूक तब्येतीमुळे किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांमुळे आपल्याला काही ध्येये साध्य करता येणार नाहीत. आपण कधीही विसरू नये, की शेवटचे बक्षीस चिरकालिक जीवन आहे—मग ते स्वर्गात असो किंवा पृथ्वीवरील परादीसात असो. (लूक २३:४३; फिलिप्पैकर ३:१३, १४) हे बक्षीस कसे मिळवता येईल? प्रेषित योहानाने लिहिले: “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७) आपल्या परिस्थितीमुळे आपण एखादे ध्येय साध्य करू शकत नसलो तरी आपण ‘देवाचे भय धरून त्याच्या आज्ञा पाळू शकतो.’ (उपदेशक १२:१३) आध्यात्मिक ध्येये आपल्याला देवाची इच्छा पूर्ण करण्यावर आपले लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात. तेव्हा आध्यात्मिक ध्येयांद्वारे आपण आपल्या निर्माणकर्त्याचे गौरव करू या.

[२२ पानांवरील चौकट]

विचार करण्याजोगी आध्यात्मिक ध्येये

○ बायबलचे दररोज वाचन करणे

टेहळणी बुरूज सावध राहा! नियतकालिकाचा प्रत्येक अंक वाचणे

○ आपल्या प्रार्थनांचा दर्जा सुधारणे

○ आत्म्याचे फळ आपल्या जीवनात दाखवणे

○ सेवेत अधिक भाग घेण्याचा प्रयत्न करणे

○ प्रचार कार्य व शिकवण्यात अधिक प्रभावी होणे

○ टेलिफोनद्वारे, अनौपचारिकरीत्या व व्यापारी क्षेत्रात साक्षकार्य करण्याचे कौशल्य विकसित करणे