व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनुवादाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

अनुवादाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

अनुवादाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

सा.यु.पू. १४७३. यहोवाने इस्राएल पुत्रांना ईजिप्तच्या दास्यातून सुटका दिल्यापासून चाळीस वर्षे उलटली आहेत. ही वर्षे अरण्यात घालवल्यानंतर अजूनही इस्राएल राष्ट्राकडे स्वतःचे वतन नाही. पण शेवटी ते प्रतिज्ञात देशाच्या सीमेवर येऊन पोचले आहेत. या देशाचा ताबा घेताना त्यांना कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे? त्यांच्यासमोर कोणते अडथळे येतील आणि त्यांचा सामना त्यांनी कशाप्रकारे करावा?

यार्देन नदी पार करून इस्राएल राष्ट्र कनान देशात प्रवेश करण्याअगोदर, मोशे त्यांच्यापुढे असलेली भव्य कामगिरी पार पाडण्याकरता त्यांच्या मनाची तयारी करतो. ती कशी? तर त्यांना अनेक व्याख्याने देण्याद्वारे. या भाषणांतून तो इस्राएलांना प्रोत्साहन देतो, त्यांना आर्जव करतो, मार्गदर्शन व प्रसंगी ताकीदही देतो. तो त्यांना आठवण करून देतो की यहोवा देवाला अनन्य भक्‍तीची अपेक्षा आहे, तसेच, त्यांनी आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये. बायबलमधील अनुवादाच्या पुस्तकात आपल्याला ही भाषणे वाचावयास मिळतात. आणि इस्राएलांना देण्यात आलेले मार्गदर्शन आज आपल्याकरताही अत्यंत उपयुक्‍त आहे कारण आपणही अशा जगात राहत आहोत की जेथे यहोवाची अनन्य भक्‍ती करणे एक आव्हान आहे.—इब्री लोकांस ४:१२.

शेवटला एक अध्याय वगळल्यास, सबंध अनुवादाचे पुस्तक दोन महिन्यांपेक्षा थोड्या जास्त काळादरम्यान मोशेने लिहिले आहे. * (अनुवाद १:३; यहोशवा ४:१९) तर आता आपण पाहू या की या पुस्तकात नेमके काय सांगितले आहे; आणि यात लिहिलेल्या गोष्टी आपल्याला यहोवा देवावर पूर्ण मनाने प्रीती करण्यास व त्याची विश्‍वासूपणे उपासना करण्यास कशी मदत करू शकतात.

‘तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरू नकोस’

(अनुवाद १:१-४:४९)

पहिल्या भाषणात, मोशे अरण्यातील काही अनुभवांचे कथन करतो—खासकरून प्रतिज्ञात देशाचा ताबा घेताना इस्राएलांना साहाय्यक ठरतील अशा अनुभवांची त्याने त्यांना आठवण करून दिली. शास्त्यांची नेमणूक करण्याविषयीच्या वृत्तान्ताने नक्कीच त्यांना याची आठवण करून दिली असेल की यहोवा आपल्या लोकांची प्रेमळपणे काळजी घेतली जाईल याची खात्री करतो व त्यानुसारच त्यांचे संघटन करतो. मोशेने इस्राएलांना हे देखील सांगितले की कशाप्रकारे पूर्वीची पिढी, दहा हेरांच्या प्रतिकूल वृत्तामुळे प्रतिज्ञात देशात प्रवेश करू शकली नाही. प्रतिज्ञात देश इस्राएलांच्या डोळ्यापुढे असताना मोशेने त्यांना या इशारेवजा उदहारणाविषयी सांगितले तेव्हा त्यांच्यावर याचा किती जबरदस्त परिणाम झाला असेल याची कल्पना करा.

यार्देन नदी पार करण्याआधी यहोवाने इस्राएल पुत्रांना जे विजय मिळवून दिले होते त्यांची आठवण केल्याने त्यांना कमालीचे धैर्य मिळाले असावे कारण लवकरच ते नदीच्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा लढणार होते. ते ज्या देशाचा लवकरच ताबा घेणार होते, तो देश मूर्तिपूजेने भरलेला होता. त्यामुळे मोशेने मूर्तिपूजेविषयी दिलेली कडक शब्दांतील ताकीद खरोखरच समर्पक होती!

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:४-६, ९, १९, २४, ३१-३५; ३:१-६—यार्देन नदीच्या पूर्वेकडे राहणाऱ्‍या काही लोकांना इस्राएलांनी नाश केले पण इतरांना केले नाही असे का? यहोवाने इस्राएलांना आज्ञा केली की त्यांनी एसावाच्या पुत्रांशी संघर्ष करू नये. का? कारण ते याकोबाच्या भावाचे वंशज होते. मवाबी व अमोरी लोकांशीही युद्ध करण्यास त्यांना मना करण्यात आले होते कारण मवाबी व अमोरी लोक अब्राहामाचा भाचा लोट याचे वंशज होते. पण सीहोन व ओग या अमोरी राजांचे इस्राएलांशी कोणतेही नाते नसल्यामुळे ते आपल्या ताब्यात असलेल्या देशावर हक्क सांगू शकत नव्हते. त्यामुळे जेव्हा सीहोन राजाने इस्राएलांना आपल्या देशातून जाऊ दिले नाही आणि ओग त्यांच्याशी लढाई करण्यास आला तेव्हा यहोवाने इस्राएलांना या राजांची शहरे नष्ट करून त्यातील एकाही माणसास जिवंत न ठेवण्याची आज्ञा दिली.

४:१५-२०, २३, २४—कोरीव मूर्ती करण्याविरुद्ध लावण्यात आलेल्या प्रतिबंधानुसार कलात्मक उद्देशांसाठी एखाद्या वस्तूची प्रतिमा तयार करणेही अयोग्य आहे का? नाही. ही आज्ञा, उपासना करण्याच्या उद्देशाने प्रतिमा तयार करण्याविरुद्ध होती—‘त्यांना दंडवत घालण्याविरुद्ध व त्यांची पूजा करण्याविरुद्ध’ होती. शास्त्रवचनांत कलात्मक उद्देशांसाठी मूर्ती कोरण्याविरुद्ध किंवा निरनिराळ्या वस्तूंची चित्रे रंगवण्याविरुद्ध कोणतीही आज्ञा नाही.—१ राजे ७:१८, २५.

आपल्याकरता धडे:

१:२, १९. सेईर पर्वताच्या मार्गाने गेल्यास होरेबपासून [ज्या ठिकाणी दहा आज्ञा देण्यात आल्या तो सिनाय पर्वताभोवतालचा डोंगराळ प्रदेश], कादेश-बर्ण्या केवळ अकरा दिवासांच्या वाटेवर होते; तरीपण इस्राएल वंशांना जवळजवळ ३८ वर्षे अरण्यात भटकावे लागले. यहोवा देवाच्या आज्ञा न पाळण्याची किती भारी किंमत त्यांना मोजावी लागली!—गणना १४:२६-३४.

१:१६, १७. देवाच्या न्यायाचे मापदंड आजही तेच आहेत. ज्यांना न्यायदान समितीत सेवा करण्याची जबाबदारी दिली जाते त्यांनी कधीही पक्षपातामुळे किंवा मनुष्याच्या भयामुळे न्यायाचा विपर्यास करू नये.

४:९. ‘डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी न विसरणे’ हे इस्राएलांना भविष्यात यशस्वी होण्याकरता अत्यंत आवश्‍यक होते. प्रतिज्ञात नवे जग जवळ येत असता, यहोवाच्या वचनाचा मनःपूर्वक अभ्यास करण्याद्वारे त्याची अद्‌भुत कृत्ये सदोदित आपल्या डोळ्यांपुढे ठेवणे आपल्याकरताही अत्यंत आवश्‍यक आहे.

यहोवावर प्रीती करा व त्याच्या आज्ञा पाळा

(अनुवाद ५:१-२६:१९)

आपल्या दुसऱ्‍या भाषणात मोशे, सिनाय पर्वतावर नियमशास्त्र दिले जाण्याविषयी सांगतो व दहा आज्ञांची पुनरुक्‍ती करतो. सात राष्ट्रांचा संपूर्ण नाश करण्याकरता खास उल्लेख केला जातो. अरण्यात शिकलेल्या एका महत्त्वाच्या धड्याची इस्राएलांना आठवण करून दिली जाते: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्‍वराच्या मुखातून निघाणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल.” त्यांच्या नव्या परिस्थितीत त्यांनी देवाची आज्ञा ‘संपूर्ण पाळली’ पाहिजे.—अनुवाद ८:३; ११:८.

इस्राएली लोक प्रतिज्ञात देशात वस्ती करू लागतील तेव्हा साहजिकच त्यांना केवळ उपासनेसंबंधी नव्हे तर न्याय, शासन, युद्धनीती आणि सामाजिक व वैयक्‍तिक पातळीवर दैनंदिन जीवनासंबंधी कायद्यांची गरज भासेल. मोशे या कायद्यांचे समालोचन करतो आणि यहोवावर प्रीती करण्याच्या व त्याच्या आज्ञांचे पालन करण्याच्या गरजेवर भर देतो.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

८:३, ४—अरण्यात भटकताना इस्राएल लोकांचे कपडे जीर्ण झाले नाहीत व त्यांचे पाय सुजले नाहीत ते कोणत्या अर्थाने? मान्न्याच्या नियमित पुरवठ्याप्रमाणेच ही देखील एक चमत्कारिक तरतूद होती. जे कपडे व पादत्राणे घेऊन ते निघाले होते तेच त्यांनी शेवटपर्यंत वापरले. लहान मुले मोठी व्हायची व प्रौढ माणसांचा मृत्यू व्हायचा तेव्हा हे कपडे इतरांना दिले जायचे. अरण्यातील भ्रमंतीच्या सुरवातीला व शेवटी घेण्यात आलेल्या जनगणनेतून इस्राएल लोकांची संख्या वाढली नसल्याचे दिसून आले; त्याअर्थी सुरवातीपासून त्यांच्याजवळ असलेले कपडे शेवटपर्यंत पुरले असावेत.—गणना २:३२; २६:५१.

१४:२१—रक्‍त वाहू न दिलेला मृत प्राणी स्वतः न खाता तो उपऱ्‍याला अथवा परक्याला द्यावा असे इस्राएलांना का सांगण्यात आले होते? बायबलमध्ये, ‘उपरी’ हा शब्द यहुदी मतानुसारी बनलेल्या गैर इस्राएली व्यक्‍तीला किंवा इस्राएल लोकांसोबत स्थाईक होऊन राष्ट्राचे मूलभूत कायदे अनुसरणाऱ्‍या पण यहोवाचा उपासक न बनलेल्या माणसास सूचित करत होता. यहुदी मतानुसारी न बनलेला परका किंवा उपरी नियमशास्त्राच्या अधीन नसल्यामुळे रक्‍त न वाहिलेल्या पशूचा ते अनेकप्रकारे उपयोग करू शकत होते. इस्राएलांना असे प्राणी त्यांना देण्याची अथवा विकण्याची परवानगी होती. पण यहुदी मतानुसारी बनलेला व्यक्‍ती नियमशास्त्राच्या कराराधीन होता. लेवीय १७:१० यानुसार, अशा व्यक्‍तीला प्राण्याचे रक्‍त खाण्याची परवानगी नव्हती.

२४:६—‘जाते किंवा जात्याची वरची तळी गहाण ठेवून घेणे’ हे “मनुष्याचे जीवितच” गहाण ठेवण्यासारखे का होते? जाते व त्याची वरची तळी एका व्यक्‍तीचे ‘जीवित’ किंवा त्याच्या उपजीविकेचे साधन होते. ते गहाण ठेवल्यामुळे सबंध कुटुंबाला दररोजची भाकर मिळणे कठीण होते.

२५:९—दीराचे कर्तव्य करून आपल्या भावजयीशी लग्न करण्यास नकार देणाऱ्‍याच्या पायातील पायतण काढून त्याच्या तोंडावर थुंकण्यामागे कोणता उद्देश होता? ‘वतन सोडविण्याची इस्राएल लोकांत प्राचीन काळी अशी वहिवाट होती की मनुष्य आपले पायतण काढून दुसऱ्‍यास देत असे.’ (रूथ ४:७) ज्याने भावजयीशी लग्न करण्यास नकार दिला त्याच्या पायातील पायतण काढणे ही या गोष्टीची निश्‍चिती होती की त्याने आपल्या मृत भावाकरता वंशज उत्पन्‍न करण्याचे आपले कर्तव्य व हक्क नाकारला आहे. ही लज्जास्पद गोष्ट होती. (अनुवाद २५:१०) तोंडावर थुंकणे ही कृती अपमानदर्शक होती.—गणना १२:१४.

आपल्याकरता धडे:

६:६-९. इस्राएलांना ज्याप्रमाणे नियमशास्त्रासंबंधी आज्ञा देण्यात आली होती त्याचप्रमाणे आपण देखील देवाच्या आज्ञांशी चांगल्याप्रकारे परिचित झाले पाहिजे, सदैव त्यांना आपल्या डोळ्यांपुढे ठेवले पाहिजे आणि आपल्या मुलांवरही या आज्ञांनुसारच संस्कार केले पाहिजेत. आपण ‘त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांधल्या पाहिजेत,’ अर्थात आपल्या हातून घडणाऱ्‍या कृतींवरून आपण यहोवाच्या आज्ञा पाळतो हे दिसून आले पाहिजे. तसेच त्या ‘आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून आपण लावल्या पाहिजेत,’ म्हणजेच, आपले आज्ञापालन हे सर्वांना दिसून आले पाहिजे.

६:१६. इस्राएलांनी मस्सा येथे यहोवावर अविश्‍वास प्रकट करून, पाण्याकरता कुरकूर करण्याद्वारे त्याची परीक्षा घेतली तसे आपण कधीही करू नये.—निर्गम १७:१-७.

८:११-१८. भौतिक गोष्टींच्या मागे लागल्यामुळे आपल्याला यहोवाचा विसर पडण्याची शक्यता आहे.

९:४-६. फाजील धार्मिकपणाचा पाश आपण टाळला पाहिजे.

१३:६. यहोवाच्या उपासनेपासून आपल्याला दूर नेण्यास आपण कोणालाही वाव देऊ नये.

१४:१. स्वतःच्या अंगावर वार करून घेतल्याने मानवी शरीराबद्दल अनादर दिसून येतो; याचा संबंध खोट्या उपासनेशीही असू शकतो तेव्हा आपण ही प्रथा टाळली पाहिजे. (१ राजे १८:२५-२८) आपल्याला पुनरुत्थानाची आशा असल्यामुळे, मृत व्यक्‍तीबद्दल शोक व्यक्‍त करण्यासाठी अशी टोकाची पावले उचलणे योग्य ठरणार नाही.

२०:५-७; २४:५. ज्यांची अपवादात्मक परिस्थिती आहे त्यांच्याबद्दल विचारशीलता दाखवली जावी; महत्त्वाचे कार्य असेल तरीसुद्धा अशी विचारशीलता दाखवणे योग्यच आहे.

२२:२३-२७. एखाद्या स्त्रीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा सर्वात प्रभावी बचावाचा मार्ग म्हणजे तिने आरडाओरड करावी.

“जीवन निवडून घे”

(अनुवाद २७:१–३४:१२)

आपल्या तिसऱ्‍या भाषणात मोशे म्हणतो की यार्देन पार केल्यानंतर इस्राएलांनी मोठमोठ्या धोंड्यांवर नियमशास्त्र लिहून काढावे; तसेच आज्ञाभंगामुळे कोणते शाप येतील आणि आज्ञापालन केल्यास कोणते आशीर्वाद मिळतील याविषयीही सांगावे. चवथ्या भाषणात यहोवा व इस्राएल यांच्यातल्या कराराची पुनरुक्‍ती केली जाते. मोशे पुन्हा एकदा आज्ञाभंग न करण्याची ताकीद देतो आणि लोकांना ‘जीवन निवडून घेण्याचा’ आग्रह करतो.—अनुवाद ३०:१९.

ही चार भाषणे देण्याव्यतिरिक्‍त मोशे इस्राएलांना त्यांच्या नव्या नेत्याविषयी माहिती देतो. तसेच तो त्यांना एक सुरेख गीत शिकवतो ज्यात तो यहोवाची स्तुती करतो व अविश्‍वासूपणामुळे होणाऱ्‍या वाईट परिणामांविषयी बजावतो. सर्व इस्राएल वंशांना आशीर्वाद दिल्यानंतर, १२० वर्षांच्या मोशेचा मृत्यू होतो व त्याला पुरण्यात येते. इस्राएल त्याच्याकरता तीस दिवस सुतक धरून शोक करतात. अनुवादाचे पुस्तक लिहिण्याकरता लागलेल्या काळाचा हा निम्मा काळ होय.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

३२:१३, १४—इस्राएलांना चरबी खाण्याची मनाई होती, मग “कोकरांची चरबी” याचा काय अर्थ होतो? येथे या वाक्यांशाचा लाक्षणिक अर्थाने प्रयोग केला असून त्याचा अर्थ कळपांतील सर्वात उत्तम असा होतो. मूळ इब्री भाषेत याच वचनात पुढे, “गव्हाच्या कलेजीची चरबी” व “द्राक्षांचे रुधीर” असाही उल्लेख केला आहे, त्यावरून ही काव्यात्मक भाषा असल्याचे लक्षात येते.

३३:१-२९—मोशेने इस्राएल पुत्रांना जो आशीर्वाद दिला, त्यात शिमोनाचा विशिष्टपणे उल्लेख का नाही? याचे कारण असे की शिमोन तसेच लेवी यांनी “उन्मतपणाने” कार्य केले होते व त्यांचा राग “भयंकर” होता. (उत्पत्ति ३४:१३-३१; ४९:५-७) त्यांना मिळालेले वतन हे इतर वंशांसारखे नव्हते. लेव्याला ४८ शहरे मिळाली तर शिमोनाचा वाटा यहुदाच्या क्षेत्रात होता. (यहोशवा १९:९; २१:४१, ४२) त्यामुळे मोशेने शिमोनाचा वेगळा उल्लेख करून त्याला आशीर्वाद दिला नाही. पण इस्राएलास देण्यात आलेल्या आशीर्वादात शिमोनाचाही समावेश होता.

आपल्याकरता धडे:

३१:१२. मंडळीच्या सभेत लहान मुलांनीही मोठ्यांसोबत बसून ऐकण्याचा व शिकून घेण्याचा प्रयत्न करावा.

३२:४. यहोवाची कृती परिपूर्ण आहे याचा अर्थ असा की न्याय, बुद्धी, प्रीती व सामर्थ्य हे सर्व गुण तो पूर्ण संतुलन राखून प्रदर्शित करतो.

आपल्याकरता अतिशय मोलाचे

अनुवादाचे पुस्तक यहोवाची ओळख “अनन्य परमेश्‍वर” या रितीने करून देते. (अनुवाद ६:४) देवासोबत एक विलक्षण नातेसंबंध असलेल्या राष्ट्राविषयी हे पुस्तक आहे. अनुवादाचे पुस्तक मूर्तिपुजेबद्दलही ताकीद देते आणि देवाला अनन्य उपासना देण्याच्या गरजेवर भर देते.

नक्कीच, अनुवाद आपल्याकरता अतिशय मोलाचे पुस्तक आहे! आपण नियमशास्त्राच्या अधीन नसलो तरीसुद्धा आपल्याला या पुस्तकातून बरेच काही शिकायला मिळते, जेणेकरून आपल्याला यहोवावर ‘पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्‍तीने प्रीति करता येईल.’—अनुवाद ६:५.

[तळटीप]

^ परि. 3 शेवटला अध्याय ज्यात मोशेच्या मृत्यूचाही वृत्तान्त आहे, तो कदाचित यहोशवाने किंवा प्रमुख याजक एलियेजर याने जोडला असावा.

[२४ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

सेईर

कादेश- बर्ण्या

सिनाय पर्वत (होरेब)

तांबडा समुद्र

[चित्राचे श्रेय]

Based on maps copyrighted by Pictorial Archive (Near Eastern History) Est. and Survey of Israel

[२४ पानांवरील चित्र]

अनुवादाच्या पुस्तकात प्रामुख्याने मोशेने दिलेली भाषणे आढळतात

[२६ पानांवरील चित्र]

यहोवाने केलेल्या मान्न्याच्या तरतुदीवरून आपण काय शिकू शकतो?

[२६ पानांवरील चित्र]

जाते किंवा जात्याची वरची तळी गहाण ठेवून घेण्याची तुलना “मनुष्याचे जीवितच” गहाण ठेवून घेण्याशी करण्यात आली होती